पंजाबी चिकनने न्यूझीलंडची निम्मी टीम गारद केली होती

त्याकाळी आजच्या प्रमाणे क्रिकेटचा भडिमार झाला नव्हता. वर्षातून अगदी मोजके कसोटी सामने खेळले जायचे. गोष्ट आहे 1988ची, जवळपास 10 वर्षांनी न्यूझीलंड ची टीम भारत दौऱ्यावर आली होती.

नंतर भारताचे कोच बनलेले गुरू जॉन राईट न्यूझीलंडचे कॅप्टन होते तर मुंबईकर दिलीप वेंगसरकर भारताचे कर्णधार होते.

भारताची टीम तगडी होती. के श्रीकांत, सिद्धू, अझरुद्दीन, वेंगसरकर, रवी शास्त्री असे तुफान हाणामारी करणारे बॅट्समन भारताची मेन ताकद होती. शिवाय फॉर्ममध्ये असलेला कपिल, नरेंद्र हिरवानी हे बॉलिंगची बाजू समर्थपणे हाताळत होते.

न्यूझीलंड ची टीम सुद्धा नावाजलेली होती. त्यांची बॉलिंग खतरनाक होती. सर रिचर्ड हेडली तेव्हा आपल्या करियरच्या पीक पॉईंट वर होते. कसोटीमध्ये 400 विकेट घेण्याच्या ते उंबरठ्यावर होते. शिवाय जॉन राईट, ग्रेटबॅच , रुदरफोर्ड सारखे जागतिक कीर्तीचे बॅट्समन कोणत्याही पिचवर मोठा स्कोर उभा करण्यासाठी प्रसिद्ध होते.

पहिलीच कसोटी बंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार होती.

वेंगसरकरने टॉस जिंकुन पहिली बॅटिंग निवडली. सिद्धूने जोरदार सुरवात केली. त्याने ठोकलेल्या शतकाच्या आणि वेंगसरकरच्या 75 धवांच्या जोरावर भारताने 384 धावा उभा केल्या.

उत्तरादाखल न्युझीलंडने फक्त 189 धावा बनवल्या आणि ऑल आउट झाली. कपिल देव सोबतच नवख्या अर्षद आयुबने 4 विकेट घेतल्या. न्यूझीलंड टीमची बेक्कार वाट लागली होती.

त्याकाळी कसोटी च्या दरम्यान एक रेस्ट दिवस असायचा. त्या दिवशी दुःखात असलेल्या न्यूझीलंडच्या टीमने डिनरला भारतीय स्टाईलच्या चिकन, कबाबवर ताव मारला.

पण दुर्दैवाने हा खाना त्यांना झेपला नाही.

कसोटीचा चौथा दिवस सुरू झाला आणि न्यूझीलंडच्या नाजूक प्लेअर्सची पाकिस्तानची वारी सुरू झाली. अगदी खेळ सुरू झाला तरी काही जण टॉयलेटमधून बाहेर येण्यास तयार नव्हते.

भारताच्या दुसऱ्या इनिंगमध्ये के श्रीकांत आणि सिद्धू ची जोडी सेट झाली होती. ते काही केल्या किवी बॉलर्सना आउट होत नव्हते. सर रिचर्ड हेडलीचं पोट बिघडलं होत त्यामुळे ते खेळायला उतरलेच नव्हते.

त्यातच चॅटफिल्ड नावाचा दुसरा फास्टर बॉलर बॉलिंग ला उतरला. त्याने मोठी रनअप घेतली. पण बॉल टाकलाच नाही, अंपायर, बॅट्समन,विकेट किपर सगळ्यांना मागे टाकून थेट पव्हेलीयन दिशेने धूम ठोकली. बाकीचे प्लेअर्स बघतच राहिले. चॅटफिल्डने थेट ड्रेसिंग रूमचा टॉयलेट गाठला .

सगळं स्टेडियम हसत होत. न्यूझीलंड टीमची अवस्था अतिशय वाईट झाली होती. त्यांचे हाल कुत्रे देखील खात नव्हते. त्यांचे राखीव खेळाडू देखील हगवणीमुळे संपले.

अखेर कॉमेंटेरी करणाऱ्या दोघांना न्यूझीलंडने फिल्डिंग करण्याची विनंती केली.

भारताने 141 धावावर आपली इनिंग डिक्लेर केली आणि न्यूझीलंडने सुखाचा श्वास सोडला. त्यांची दुसरी इनिंग लगेच गुंडाळली गेली. अनेक बॅट्समन फक्त हजेरी लावून गेले. भारताने तबाबल 172 धावांनी न्यूझीलंडवर विजय मिळवला.

या मॅचचं मॅन ऑफ दी मॅच पंजाबी चिकन ठरले.

तिथून पुढे न्यूझीलंडच्या कोचने टीमला आदेश दिले की खेळाडूंनी स्वतः स्वतः स्वयंपाक बनवून खायचा, बाहेर जेवायला जायचे नाही. आजही परदेशी टीम भारतात दौऱ्या साठी आली तर विराट कोहली, बुमराह वगैरे राहिले बाजूला इथल्या जेवणाची आणि उष्ण हवामानाची तयारी पहिली करतात.

हे ही वाच भिडू.