हाडं गोठवणाऱ्या थंडीत मुक्या जीवांना आधार देण्यासाठी ‘पीपल फार्म’ पुढे आलीये…

‘ॲनिमल लव्हर्स’ हा आजकाल वेगानं वाढत जाणारा एक मोठा गट तयार झालाय. त्यातल्या त्यात डॉग लव्हर्स ही तर सगळ्यात मोठी कॅटेगरी. हाय क्लास घरांमध्ये तर या कुत्र्यांच्या खाण्यापिण्यासाठी एक वेगळं बजेट तर असतंच, पण त्यांना पाळायला स्पेशल माणूस सुद्धा असतो. असो… ज्याचे त्याचे शौक असतात. 

पण हेच चित्र रस्त्यावरच्या कुत्र्यांसाठी मात्र वेगळं पाहायला मिळतं.

उदाहरण आपल्यापासूनच घ्या ना, एखादा भटका कुत्रा खाण्यापिण्यासाठी आपल्या मागं आला तर पळवून कसं लावायचं हे आपल्याला कळतं. आपल्या दारात, दुकानाच्या आसपास यायला नको म्हणून लाल रंगाचं पाणीही आपण करून ठेवतो.

त्यांना पुरेसं अन्न खायला मिळत नसल्यानं ते आक्रमक होतात. यामुळं मानव आणि भटक्या कुत्र्यांमध्ये संघर्ष झाल्याची अनेक उदाहरणं आहेत. सध्या स्पिती व्हॅलीत अशीच परिस्थिती आहे. यामुळं स्थानिक नागरिक कंटाळले आहेत. मात्र हा संघर्ष टाळण्यासाठी एक संघटनेनं पुढाकार घेतला असून स्थानिक नागरिक आणि भटक्या कुत्रांमध्ये संघर्ष कमी करण्यासाठी ते काम करत आहेत.

या संस्थेचं नाव आहे, द पीपल फार्म. 

ही संस्था नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे. २०१४ मध्ये हिमाचल प्रदेशमधल्या एका लहान खेड्यात समविचारी तरुणांनी एकत्र येत ही संस्था सुरु केली. पीपल फार्म ही संस्था भटक्या प्राण्यांची सुटका आणि त्यांच्याबद्दल जागरूकता निर्माण करण्याचं काम करते. 

आता या संस्थेनं स्पिती व्हॅलीतल्या उपाशी भटक्या कुत्र्यांना अन्न देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमा अंतर्गत ही संस्था दररोज ३०० ते ४०० भटक्या कुत्रांना अन्न पुरवते. त्यामुळे झालं असं कि, व्हॅलीतला मनुष्य आणि प्राणी संघर्ष यामुळं कमी झाला.

ही संस्था केवळ भटक्या कुत्रांना अन्नच पुरवत नाही तर लोकांमध्ये त्या कुत्र्याबद्दल असणारे गैरसमज आणि भीती दूर करण्याचा प्रयत्न सुद्धा करत आहे.

द पीपल फार्मच्या वतीनं ५ डिसेंबर २०२१ पासून भटक्या कुत्र्यांना शिजवलेलं अन्न दिलं जातंय. स्पिती व्हॅलीत हिवाळ्यात होणारी भटक्या कुत्र्यांची अन्नासाठी होणारी फरफट पाहून संस्थेच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या कामासाठी १२ स्थानिक महिलांची मदत पीपल फार्म घेत आहे. या महिला स्पिती व्हॅलीतल्या चिचम, किब्बेर, खुरीक, रंगरिक, लाडंग आणि काझा या गावातल्या भटक्या कुत्र्यांना अन्न पुरवतात. त्याबदल्यात त्या महिलांना पीपल फार्मच्या वतीनं पैसे देण्यात येतात.

या सर्व भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्यासाठी दररोज ५० ते ६० किलो अन्न शिजवावं लागतं. भटक्या कुत्र्यांना देण्यात येणाऱ्या अन्नाची रेसिपी सोप्पी आहे. त्या महिला पीठ मळून घेतात, त्यात मांसाचे तुकडे मिसळतात, पिठाचे गोळे करतात, पाण्यात उकडतात. आणि मग हे शिजवलेलं अन्न ३०० ते ४०० भटक्या कुत्र्यांना टाकण्यात येते.

हा उपक्रम एप्रिल २०२२ पर्यंत सुरु राहील, पण त्यानंतर मात्र या भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतंय. 

भटके कुत्रे आणि स्थानिकांमध्ये संघर्ष हा होतोय?

स्पिती व्हॅलीत हिवाळ्यात हाडं गोठवणारी थंडी पडत असते. हिवाळ्यात व्हॅलीत तापमान -२० ते -३० अंश सेल्सिअसपर्यंत खाली येतं. इथं तापमान ४-५ अंशावर असलं कि, लोकं घराच्या बाहेर पडत नाहीत.  अशा थंडीत खायला काहीच मिळत नाही. 

यावेळी भटके कुत्रे इतर कुत्र्यांची शिकार करून त्यांचं मास खातात. व्हॅलीतल्या ब्लु शिप आणि आयबेक्स सारख्या दुर्मिळ पशुधनाची शिकारही हे कुत्रे करतात अशी माहिती मिळतेय. 

स्थानिकांच्या म्हणण्याप्रमाणं स्पिती व्हॅलीत नागरिकांकडे मोठ्या प्रमाणात पशुधन होतं. मात्र या भटक्या कुत्र्यांनी केलेल्या सततच्या हल्ल्यामुळे त्यांची संख्या घटली आहे. यामुळं मानव आणि भटक्या कुत्र्यांमध्ये संघर्ष पेटला आहे. 

२०१४ मध्ये स्पिती व्हॅलीत मोठ्या प्रमाणत बर्फवृष्टी झाली होती. त्यात ब्लु शिप आणि आयबेक्स बर्फात अडकले होते. याचा फायदा घेत भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ले केले. 

पीपल फार्मवाले या भटक्या कुत्र्यांपर्यंत कसे पोहोचले?

स्पिती व्हॅलीत बेकरी चालवणारे वांगचुक डोलमा आपला भाऊ कालझांग याच्यासोबत पीपल फार्मच्या ऑफिसमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांनी स्पिती व्हॅलीत होणाऱ्या मानव आणि भटक्या कुत्र्यांच्या संघर्षाबद्दल माहिती दिली आणि तुम्ही आमच्या भागात भेट द्यावी अशी विनंती केली. त्यानंतर पीपल फार्मचे सहसंस्थापक रॉबिन सिंग आपली पत्नी शिवानीसोबत स्पिती व्हॅलीत गेले.

रॉबिन सिंग यांनी स्पिती व्हॅली पोहोचल्याबरोबर त्यांना भटक्या कुत्र्यांमुळं निर्माण झालेल्या परिस्थितीचं  गांभीर्य लक्षात आलं. यानंतर लगेच रॉबिन सिंग यांनी खुरकी आणि काझा गावात भटक्या कुत्रांना अन्न द्यायला सुरुवात केली. खुरकीमध्ये त्यांनी एक कुक ठेवला जो अन्न शिजवून त्या भटक्या कुत्रांना खाऊ घालू लागला. 

उन्हाळ्यात स्पिती व्हॅलीत या भटक्या कुत्र्यांमुळे कुठलीही समस्या उद्भवत नाही. मात्र, हिवाळ्यात या भटक्या कुत्र्यांना पुरेसे अन्न मिळत नाही. त्यामुळे हे कुत्रे उपासमार आणि कडाक्याच्या थंडीत एकमेकांना खात असतात. जर घराचे दार उघडे असेल तर हे कुत्रे अन्न पळवून नेतात.

ज्यावेळी पीपल फार्मकडून या भटक्या कुत्र्यांना अन्न द्यायला सुरुवात केली होती. त्यावेळी स्थानिक रहिवाशांनी ‘हे कुत्रे आम्हाला चावतात. त्यामुळे तुम्ही त्यांना खाऊ घालू नका’ असं म्हणत याला मोठ्या प्रमाणात विरोध केला होता.  मात्र, रॉबिन सिंग यांचं म्हणणं होतं की, जर त्यांना खायला मिळालं तर ते चावणार नाहीत. 

या उपक्रमासाठी पीपल फार्मला अनेक जण आर्थिक मदत करत आहेत. तर काही जण त्यांना अन्न उपलब्ध करून देत आहेत. पीपल फार्मवाले अन्नाची पाकिटं, फिरायला येणारे पर्यटक आणि स्थानिक नागरिकांच्या मार्फत त्या ६ गावांमध्ये पोहचवतात.  यासाठी पीपल फार्मकडून आतापर्यंत काही लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. पण त्याही पेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्यांच्या मदतीमुळं मुक्या प्राण्यांना आधार, सुरक्षा आणि अन्नही मिळतंय.  

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.