सायकलवरून फिरणाऱ्या नेत्याचं नाव पुढं झालं आणि सगळ्याच आमदारांनी पगार वाढवून घेतला..

आणीबाणीनंतरचा काळ होता. इंदिरा गांधी यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. संपूर्ण देशात जनता दलाचे वारे होते. इंदिराजींनी राजकारणात नवख्या असलेल्या संजय गांधी यांचा सल्ला ऐकून देशावर आणीबाणी लादली असे कॉंग्रेसमधल्या जुन्या नेत्यांचे मत होते. या दोन्ही गटात वाद झाल्यामुळे कॉंग्रेस पक्ष फुटला आणि दोन गट तयार झाले.

हे दोन्ही कॉंग्रेस स्वतःला मूळ कॉंग्रेस म्हणवून घ्यायचे. तरी त्यांच्या अध्यक्षांच्या नावावरून ते ते पक्ष ओळखले जायचे. इंदिरा कॉंग्रेस आणि रेड्डी कॉंग्रेस.

१९७८ विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात दोन्ही काँग्रेस स्वतंत्र्यपणे लढल्या. मात्र राष्ट्रीय पातळीवरील जनता दलाच्या लाटेचे पडसाद महाराष्ट्रात देखील पडले होते. त्यांचे सर्वाधिक ९९ आमदार निवडून आले होते. तर रेड्डी कॉंग्रेसचे ६९ आणि इंदिरा कॉंग्रेसचे ६२ आमदार विजयी झाले होते.

कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. अशा त्रिशंकु परिस्थितीमध्ये इंदिरा काँग्रेेेस आणि रेड्डी काँग्रेस यांची आघाडी झाली. रेड्डी कॉंग्रेसकडे मुख्यमंत्रीपद तर इंदिरा कॉंग्रेसकडे उपमुख्यमंत्रीपद अशी विभागणी करण्यात आली. वसंतदादा पाटील पुन्हा मुख्यमंत्री बनले.

आघाडी तर झाली होती पण नासिकराव तिरपुडे सरकारवर आणि मुख्यमंत्र्यांवर सतत टीका करत होते. त्यामुळे इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस यांच्यामधली दरी वाढत होती. त्यामुळे अखेर शरद पवारांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

अखेर १२ जून १९७८ रोजी शरद पवार, सुंदरराव सोळंकी, सुशीलकुमार शिंदे व दत्ता मेघे या चार मंत्र्यांनी राजीनामा दिला. त्यांना ३८ आमदारांचा पाठींबा होता.

आबासाहेब कुलकर्णी यांनी चंद्रशेखर यांना फोन करून जनता पक्षाच्या पाठिंब्याची व्यवस्था केली. १९७८ सालच्या जुलै महिन्यात पावसाळी अधिवेशन सुरू असतांना शरद पवार रेड्डी कॉंग्रेसच्या ४० आमदारांना सोबत घेऊन बाहेर पडले.

वसंतदादा पाटलांच सरकार अल्पमतात आले आणि पहिले आघाडी सरकार चार महिन्यात कोसळले.

पवारांनी वसंतदादा पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसला अशी चर्चा त्याकाळात झाली.

शरद पवारांनी समाजवादी काँग्रेसची स्थापना केली. जनता पक्षाला सोबत घेतले. आघाडीत शेकाप, कम्युनिस्ट पक्ष सहभागी झाले आणि या आघाडीला पुरोगामी लोकशाही दल म्हणजेच पुलोदचे सरकार म्हणून नाव देण्यात आले.

मुख्य प्रश्न होता या पुलोदचा मुख्यमंत्री कोण होणार ?

सर्वाधिक आमदार जनता पक्षाचे होते म्हणून मुख्यमंत्रीपदावर त्यांचाच दावा होता. एस.एम जोशींनी मुख्यमंत्रीपदासाठी नकार दिला होता. मात्र त्यांनी दोन नावे पुढे केली. एक होते बापू काळदाते आणि दुसरे निहाल अहमद.

त्याकाळात जनता पक्षात दोन मुख्य गट होते. एक होता समाजवादी विचारांचा आणि दुसरा जनसंघाचा. आणिबाणीविरुद्ध लढा देताना ते एकत्र आले होते मात्र दोन्ही पक्षांची विचारसरणी वेगळी होती. जनसंघ हा हिंदुत्ववादी पक्ष होता. त्यांनी उत्तमराव पाटील यांची उमेदवारी पुढे केली. बापू काळदाते तेव्हा खासदार होते त्यामुळे त्यांचं नाव आपोआप मागे पडलं.

आता उरले उत्तमराव पाटील आणि निहाल अहमद.

निहाल अहमद हे मूळचे मालेगावचे. तिथल्या  कामगार व कष्टकरी वर्गाचे ते दिग्गज नेते होते.

नाशिकला आचार्य नरेंद्र देव, डॉ.राममनोहर लोहिया आणि जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पक्षाची स्थापना झाली; तेव्हापासून निहालभाईंनी समाजवादाचा झेंडा हाती धरला होता. मालेगाव शहराला त्यांनी समाजवादी विचार आणि कार्यक्रमाची प्रयोगशाळा बनवली.

स्वातंत्र्य चळवळीत ते लढले. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात त्यांचे नेतृत्व फुलले. आणीबाणीत लोकशाहीहक्कांच्या लढ्यात ते महाराष्ट्राचे नेते बनले. या लढ्यात त्यांनी तुरुंगवासही भोगला. राजकीय काम करताना ते स्वत: हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक बनले. ते स्वत:ला अभिमानाने ‘गंडेदार’ मुसलमान म्हणत. गंडेदार म्हणजे खास भारतीय परंपरा पाळणारा मुसलमान.

लोकांचे प्रश्न समजणारा, अभ्यासू, भ्रष्टाचारविरोधी, सामाजिक न्यायवादी, धर्मनिरपेक्ष अशी त्यांची प्रतिमा होती.

त्यांनी मुख्यमंत्री व्हावं असा एस.एम.जोशी यांचा आग्रह होता. त्या निमित्ताने शाहू फुले आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात पहिल्यांदाच एक मुस्लिम मुख्यमंत्री खुर्चीत बसलेलं पाहता येईल असं त्यांना वाटत होतं. मात्र जनसंघाचे नेते आडवे आले. निहाल अहमद या नावावर त्यांनी जोरदार विरोध केला.

दोन्ही गटांचे एकमत न झाल्यामुळे अखेर मधला मार्ग काढण्यात आला आणि काँग्रेस मधून बाजूला झालेल्या शरद पवारांना सर्व सहमतीचा मुख्यमंत्री करण्यात आलं.   

निहाल अहमद त्यांच्या मंत्रिमंडळात रोजगार हमी योजनामंत्री झाले. त्या खात्याचे प्रमुख काम करताना निहालभाईंनी दुष्काळ हटवण्यासाठी शेती सुधारणा, जलसंधारण कार्यक्रम राबवला. मजुरांना धान्य देण्याची योजना सुरू केली.

निहाल अहमद यांची विधानसभेतील खुसखुशीत भाषणे म्हणजे सभागृहाचा एक ‘अभ्यासवर्ग’ असायचा. समाजाची मानसिकता ओळखून त्यानुसार निर्णय घेण्याची, प्रसंगी धार्मिक भावनांची गणिते ओळखून कुणाला दुखावणारी व कुणाला सुखावणारी राजकीय कृती करतानाही बेरजेचीच उत्तरे जुळविण्याच्या असामान्य हातोटीमुळे, मालेगावसारख्या मुस्लीमबहुल मतदारसंघात मुस्लिमेतर मतदारांनीही निहालभाईंच्या पारडय़ात मतांचे दान सातत्याने ओतले. 

पुलोद सरकारमध्ये दिग्गज मंत्री राहूनही निहाल अहमद यांनी जेपी लोहिया यांच्या पासून चालत आलेला विचारांचा साधेपणा मनापासून जपला. म्हणूनच त्यांच्यावर कधी भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत. सत्ता हि स्वतःच्या नाही तर  गोरगरिबांचे कल्याण करण्यासाठी मिळालेली असते याची शिकवण त्यांनी आपल्या वागण्यातून कार्यकर्त्यांना घालून दिली.

पुढे सत्ता गेली तरी त्यांच्या सच्चेपणात कोणताही फरक पडला नाही.

आमदार असतानाही मालेगाव मध्ये डोक्यावर समाजवादी टोपी, साधा कुडता पायजमा घालून सायकलवरून फिरणाऱ्या निहाल अहमद यांना पाहून कोणाला धक्का बसायचा नाही. निहाल अहमद यांचा आदर्शवाद तिथल्या नागरिकांना ठाऊक होता.

मात्र एकदा निहाल अहमद यांचा सायकल वरचा फोटो कोणत्या तरी वृत्तपत्रामधून प्रसिद्ध झाला आणि त्यांची राज्यभरात चर्चा सुरु झाली. एकेकाळचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार माजी मंत्री सायकलवरून फिरतात या बद्दल राज्य सरकारवर टीका देखील झाली.

अखेर तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील व त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या शिवाजीराव देशमुख यांनी आमदारांच्या मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव घेऊन आले आणि त्यांची पगारवाढ देखील केली.

मात्र जनतेने दबाव टाकून केलेल्या पगारवाढीचा फायदा निहाल अहमद यांच्यापेक्षा इतर आमदारांना  झाला. आजही जेव्हा जेव्हा आमदारांच्या पगारवाढीचा विषय समोर येतो तेव्हा निहाल अहमद यांची  आठवण हटकून काढली जाते.

पुढे अनेक वर्ष जनता पक्षाचे नेतृत्व निहाल भाईंनी केलं. पक्षाचा जोर कमी झाल्यावरही तरी विरोधी बाकांवरील निहाल अहमद यांच्या आवाजाची धार कायम होती.

बाबरी मशीद पडल्यानंतर निहालभाईंना धक्का बसला होता. धर्मांध शक्तींचा वाढता प्रभाव त्यांच्या काळजीचा विषय बनला होता. तेव्हापासून ते दररोज शर्टाच्या बाहीवर काळी रिबीन लावू लागले.

ती रिबीन त्यांनी मरेपर्यंत ठेवली. त्यांनी मनात आणले असते तर या विषयावरून त्यांना मालेगाव सतत पेटते ठेवता आले असते आणि त्यावर आपली सत्तेची पोळी शेकता आली असती. पण दोन्ही समाजातील कट्टरांना दोन हात दूर ठेवत त्यांनी राजकारण केले.

त्यामुळेच निहालभाईंनी सत्यशोधक चळवळीच्या हमीद दलवाईंना जशी साथ दिली, तसेच मुस्लिमबहुल मालेगावात हिंदू नगराध्यक्ष करून दाखविला. सायकलवर फिरताना लोकांशी सहज संवादी राहता येते, हा त्यांचा विचार त्यांनी अखेरपर्यंत जपला.

गेल्या काही वर्षांत राजकारणाचा बाज बदलला. निवडणुकीचे रंगही बदलले. गाडय़ा, विमाने, हेलिकॉप्टरच्या धुरळ्याने मतदारसंघ न्हाऊ लागले. मात्र आजही सायकलवरून प्रचार करणाऱ्या या महान नेत्याची आठवण मालेगावला हमखास येते.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.