गावोगावी उभ्या राहिलेल्या NIIT मुळे भारताची संगणकक्रांती यशस्वी झाली

ऐंशीचं दशक. जगभरात कॉम्प्युटर या संकल्पनेने बाळसं धरलं होतं. अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅली मध्ये शेकडो कंपन्या उभ्या राहत होत्या. भारतात सुद्धा लायसन्सराज कमी होऊन कंप्युटर येऊ लागले होते.

या पूर्वी भारतात सॉफ्टवेअर कंपन्या नव्हत्या अस नाही पण जर तुम्हाला ऑफिससाठी साधा फोन घ्यायचा असेल तर वर्षभर सरकारकडे चकरा मारायला लागायच्या. सॉफ्टवेअर कंपन्यांना देखील स्वतःचे काँप्युटर घेण्याची परवानगी नव्हती.

मग कशा कॉम्प्युटर कंपन्या येणार?

एकविसावे शतक संगणकाचे आहे हे ओळखलेल्या राजीव गांधी यांच्या प्रयत्नाने कॉम्प्युटर क्षेत्रातले सगळे जाचक नियम शिथिल केले. जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे अमेरिकेला जाणारे आयआयटी इंजिनियर्स भारतात थांबू लागले, आयटी कंपन्या उभ्या राहू लागल्या, भारतात संगणकक्रांती येऊ घातली होती.

अशाच आयआयटीमधून पास आऊट झालेली दोन मुले मुंबईमध्ये कॉम्प्युटर क्षेत्रात नवीन बिझनेसचा जम बसवण्यासाठी धडपड करत होते.

त्यांच्या कंपनीचं नाव होतं NIIT

जम्मू काश्मीर मध्ये जन्मलेले राजेंद्रसिंग पवार आणि मुंबईचे विजय थडानी हे दोघे आयआयटी दिल्लीचे इलेक्ट्रिकल इंजिनियर. तेव्हापासूनचे पक्के मित्र.

भारतात येऊ घातलेल्या संगणकयुगाची त्यांना चाहूल १९८१ सालीच लागली होती. स्वतःची आयटी कंपनी सुरू करणे हा त्यांच्यापुढे एक ऑप्शन होता मात्र त्याच्या पेक्षाही त्यांना आयडिया सुचली ती कमी भांडवलाची आणि अनोखी होती.

चहाच्या गप्पातून सुचलेली ही आयडिया फक्त त्यांचंच नाही तर अख्ख्या भारतातील करोडोजणांच आयुष्य बदलणारी ठरणार होती.

भारतात उभ्या राहणाऱ्या आयटी कंपन्या असतील, सरकारी ऑफिसेस, खाजगी ऑफिसेस येथे कॉम्प्युटर लागणार, या सगळ्या कॉम्प्युटरला चालवायला संगणकसाक्षर मनुष्यबळ हवं. सॉफ्टवेअर इंजिनियर पासून ते साध्या बँकेतल्या क्लार्कपर्यंत प्रत्येकाला कॉम्प्युटर चालवता येणे हे बेसिक ज्ञान आवश्यक असणार होत.

भारतात याचा अंदाजच कोणाला आला नव्हता.

बहुसंख्य लोकांचे म्हणणे होते की एक कॉम्प्युटर शंभर जणांची नोकरी घालवणार. कित्येकजण कॉम्प्युटरला विरोध करत होते. अगदी संसदेतही राजीव गांधी यांना कॉम्प्युटरवरून शिव्या खाव्या लागत होत्या.

एक कॉम्प्युटर १०० जणांची नोकरी घालवू शकतो पण तेच १०० जण कॉम्प्युटरवर काम करू लागले तर तेव्हा कंपनी तर मोठी होईल पण कर्मचाऱ्यांच उत्पन्न देखील कित्येक पटीने वाढेल हे सूत्र विरोधकांच्या लक्षातच येत नव्हतं.

राजेंद्रसिंग पवार यांनी यातली अपोर्च्युनीटी ओळखली. त्यानी आपल्या पार्टनरला तयार करून १० लाख रुपये भांडवलाच्या जीवावर दिल्लीमध्ये NIITची स्थापना केली, त्याचा फुलफॉर्म होता

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी

ही एक कॉम्प्युटर ट्रेनिंग देणारी खाजगी इन्स्टिट्यूट होती. प्रत्येकाला समजेल अशा सहज सोपा अभ्यासक्रम यामुळे कॉम्प्युटरची भीती कमी करायला मदत होत होती. आयआयटीशी साधर्म्य असणारे नाव यामुळं अनेकांना तिने आकर्षित करून घेतले होते.

एनयआयटी अगदी काही दिवसात दिल्लीमध्ये फेमस झाली. पुढच्याच वर्षी मुंबई व चेन्नई या मेट्रो सिटीमध्ये पवारांनी नवीन शाखा सुरू केल्या. कॉर्पोरेट ट्रेनिंग सुरू केलं. पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशन सारख्या मल्टिमेडिया टेक्नॉलॉजीचा वापर करून शिक्षण हे भारत अभिनवच होतं.

वेगाने वाढणाऱ्या NIIT ची ख्याती सरकारमध्ये देखील पोहचली.

सरकारी ट्रेनिंगची कामे देखील त्यांना मिळू लागली. फक्त ट्रेनिंगच नाही तर प्रत्यक्षात सॉफ्टवेअर निर्मिती साठी त्यांनी इन्सॉफ्ट नावाची कंपनी स्थापन केली,

पण त्यांच्या लक्षात आले की कॉम्प्युटर प्रशिक्षण हीच आपली स्पेशालिटी आहे, त्यातच आपल्याला यश आहे.

प्रत्येक मोठ्या शहरात NIIT चे सेंटर उघडण्यात आले मात्र आणखी सेंटरची मागणी वाढतच होती. या वाढत्या मागणीला कसे हाताळायचे हा प्रश्न राजेंद्रसिंग पवार यांनी चुटकीसरशी सोडवला. मॅक्डोनाल्ड, केफसी वगैरे ब्रँडच्या फ्रँचाईजी वाटल्या जातात त्या प्रमाणे niitच्या देखील फ्रँचाईजी देण्यास सुरुवात केली.

यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात लहानमोठ्या शहरांमध्ये NIIT च्या ब्रँच सुरू झालेल्या दिसू लागले.

एवढंच काय तर १९९१ साली थेट अमेरिकेत niit सुरू करण्यात आली. बिल गेट्सच्या मायक्रोसॉफ्ट बरोबर त्यांचे करार झाले. १९९७ साली NIIT ही CMM लेव्हल5 चा दर्जा मिळणारी पहिली भारतीय कंपनी ठरली.

जगज्जेता विश्वनाथ आनंद त्यांचा ब्रँड अँबेसिडर बनला होता.

त्यांची जाहिरात होती,

How far is NIIT from your house?”

आणि ते अगदी खरं होतं. तुम्ही भारतातल्या कोणत्याही शहरात असा, NIITचे सेंटर अगदी आपल्या हाकेच्या अंतरावर उभे असलेले दिसत होते.

जगभरातून हॉंगकॉंगचीन पासून अमेरिकेपर्यंत बेस्ट आयटी ट्रेनिंग कंपनीचा दर्जा त्यांना मिळाला. अनेक पुरस्कार मिळाले होते, मोठमोठ्या जागतिक ट्रेनिंग कंपन्या त्यांनी विकत घेतल्या. डॉटकॉम बुमच्या वेळी त्यांना थोडा फटका बसला मात्र राजेंद्रसिंग पवार यांच्या कल्पक नेतृत्वाखाली स्वतःमध्ये बदल घडवत हे संकट त्यांनी यशस्वी रित्या पार केले.

चेअरमन पवार व मॅनेजिंग डायरेक्टर थडानी यांनी हजारो कोटींचे साम्राज्य उभं केलं होतं.

२००९ साली राजस्थान येथे NIIT विद्यापिठाची स्थापना करण्यात आली. इथे कंप्युटर सायन्समधील बीटेक, एम टेक शिवाय, एमबीए हे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले.

राजेंद्रसिंग पवार यांना २०११ साली भारत सरकारने पद्मभूषण देऊन सन्मानित केलं.

आजही पंतप्रधान मोदी सरकारच्या अनेक योजना NIIT च्या मार्फत चालवल्या जात आहेत. आजही लाखोजण NIIT मध्ये प्रशिक्षण घेतात.

आज एकविसाव्या शतकात आपण संगणकक्रांतीची फळे चाखत आहे. प्रत्येक गोष्ट कॉम्प्युटराईज्ड झाली आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाने आयुष्य व्यापुन टाकले आहे. भारतदेश सॉफ्टवेअर क्षेत्रात जगात आघाडीवर आहे. यात टीसीएस इन्फोसिस या मोठ्या कंपन्यांचा वाटा तर आहेच पण त्यासाठी कुशल प्रशिक्षित संगणक पिढ्या घडवणाऱ्या NIIT चा देखील तितकाच सिंहाचा वाटा आहे हे नक्की.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.