तिला मारून फ्रिजमध्ये बंद केलं आणि त्याच दिवशी त्याने दुसरीशी लग्न केलं…

वसईच्या श्रद्धा वालकरची दिल्लीमध्ये लिव्ह-इन पार्टनरने हत्या केली. ते प्रकरण समोर आलं तेव्हा अख्खा देश हादरून गेला होता… कारणही तसंच होतं. लिव्ह इन पार्टनर आफ्ताब पूनावालाने श्रद्धाचा फक्त जीव घेतला नव्हता तर, त्यानंतर तिच्या शरीराचे तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवलेले. त्यानंतर या प्रकरणाला लव्ह जिहाद वगैरेचा रंग देऊन टीकाही झाल्या

आता आणखी एक प्रकरण समोर आलंय ते ही दिल्लीमधूनच. निक्की यादव नावाच्या मुलीच्या खुनाचं हे प्रकरण. बरं हे प्रकरण सुद्धा लिव्ह-इन पार्टनरने खून केल्याचंच आहे. आता हे प्रकरण श्रद्धा वालकर प्रकरणसारखंच आहे अशा बातम्या समोर येतायत… नेमकं हे प्रकरण काय आहे ते बघुया.

अशी झाली यांच्या प्रेमाची सुरूवात…
निक्की यादव ही मुळची हरयाणाची. साहिल गेहलोत हा ज्यावेळी एसएससीचा अभ्यास करत होता त्यावेळी तो दिल्लीतल्या उत्तम नगर भागात असलेल्या करीअर पॉईंट कोचींग सेंटरमध्ये तयारी करायचा. तर, जवळच असलेल्या एका इन्स्टिट्यूटमध्ये निक्की यादव ही मेडिकलच्या पूर्वपरीक्षेची तयारी करत होती.

एकाच भागात दोघांचेही कोचींग क्लास असल्यामुळं बऱ्याचदा ते दोघं एकमेकांना कोचींगमधून येता-जाताना बसमध्ये दिसायचे. आता साधारण एकाच वयाचे असल्यामुळं, एकाच बसने प्रवास करत असल्यामुळं त्यांचं बोलणं सुरू झालं… ओळख वाढली आणि प्रेमाची सुरूवात झाली. ते दोघं एक-मेकांना डेट करू लागले.

एकाच कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन घेतलं.
प्रेमात असलेल्या निक्की आणि साहील दोघांनीही ग्रेटर नोएडा भागातल्या गलगोटीया कॉलेजमध्ये वेगवेगळ्या कोर्सेससाठी अ‍ॅडमिशन घेतलं. इथं मग त्यांनी एकत्र राहायचं ठरवलं. एका भाड्याच्या घरात हे दोघं लिव्ह-इनमध्ये राहायला लागले. हे सगळं साधारण २०१८ च्या सुरूवातीला घडत होतं.

या काळात दोघं अनेक ठिकाणी फिरायला गेले. मनाली, ऋषिकेश, हरिद्वार, देहराडून अशा अनेक ठिकाणांचा यात समावेश होता.

कधीतरी प्रेमाची आठवण राहावी म्हणून त्यांनी काढलेले याच ट्रिपमधले फोटोड आता हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर व्हायरल होतायत.

हे सगळं सुरू असताना, त्यांचं प्रेम वाढत असताना कोरोना आला आणि लॉकडाऊन लागलं. त्यामुळे, मग दोघांनाही आपापल्या मूळ घरी परत जावं लागलं. पण कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरला आणि लॉकडाऊनबाबतचे नियम शिथील करण्यात आले आणि हे दोघे पुन्हा एकत्र आले.

लॉकडाऊननंतर हे द्वारका भागात एक घर भाड्यावर घेऊन लिव्ह-इन मध्ये राहायला लागले. आता हे सगळं सुरू असताना साहीलने आपल्या प्रेमाबद्दल किंवा निक्की सोबतच्या त्याच्या नात्याबद्दल त्याच्या घरी काहीच कल्पना दिली नव्हती. ही गोष्ट तशी निक्कीला कायमच खटकत होती, पण प्रेम असल्यामुळे ती ही काही बोलत नव्हती.

इकडे साहीलच्या घरच्यांनी मात्र त्याचं लग्न दुसऱ्याच एका मुलीबरोबर ठरवत होते. साहीलला ते लग्न करायचं होतं की नव्हतं हा वेगळा मुद्दा, पण अखेर त्याचं लग्न ठरलं आणि तारीखही ठरली.

लग्नाची तारीख ठरली १० फेब्रूवारी. आता हे ज्यावेळी निक्कीला समजलं तेव्हा निक्की आणि साहीलमध्ये भांडण झालं. याच भांडणामध्ये साहीलला राग अनावर झाला आणि त्याने निक्कीचा खून केला.
ही सगळी कहाणी स्वत: साहीलने पोलिसांना दिलेल्या स्टेटमेंटमध्ये सांगितलीये.

यानंतर खेळ सुरू झाला तो मृतदेह आणि स्वत:चा गुन्हा लपवण्याचा.
हे सगळं काही घडलं ते दिल्लीतल्या काश्मिरी गेट या भागात. या भागात दोघांचं भांडण झालं आणि त्यानंतर रागात साहीलने त्याच्याजवळ असलेल्या चार्जिंग केबलने निक्कीचा गळा आवळून तिचा खून केला. मग तिचा मृतदेह आपल्या कारमध्ये टाकला… कारमधून मग त्याने मृतदेह त्याच्या मालकीच्या असलेल्या ढाब्यावर नेला.
मृतदेह कारमधून बाहेर काढला…  आपल्या ढाब्यावर असलेल्या फ्रीजमध्ये तो मृतदेह भरला आणि तो फ्री तिथून लांब मित्रौ गावाच्या बाहेर नेऊन फेकला.

हे सगळं घडलं ते ९ आणि १० फेब्रूवारीच्या मधल्या रात्री… यानंतर तो आपल्या घरी गेला आणि ठरल्याप्राणे १० फेब्रुवारीला त्याने दुसऱ्या मुलीशी लग्नसुद्धा केलं.

हा मृतदेह समोर आल्यावर पोलिसांनी आपली सूत्र हलवली आणि खबऱ्यांकडून माहिती मिळाली की, एका ढाब्याच्या मालकाने एका मुलीचा खून केलाय. बस! पोलिस तपासासाठी मित्रौ गावात पोहोचले तर तिथे साहील नव्हता आणि त्याचा फोनही बंद होता. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी साहीलचा शोध घेत त्याला ताब्यात घेतलं आणि चौकशी मध्ये त्याने खूनाची कबुलीही दिली.

अशाप्रकारे निक्की यादव खून प्रकरण समोर आलं.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.