अपमानित होऊन राजीनामा द्याव्या लागलेल्या निलंगेकरांना परराष्ट्रमंत्री होण्याची संधी आलेली..

ऐंशीच्या दशकात महाराष्ट्राचं राजकारण अत्यंत अस्थिर होतं. मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांनी जेव्हा प्रदेशाध्यक्षपदाच्या मुद्द्यावरून तडकापडकी राजीनामा दिला तेव्हा देशभरात खळबळ उडाली होती. राजीव गांधींनी दादांना समजवायला अनेकांना मुंबईला पाठवलं पण दादा माघार घेणाऱ्यातले नव्हते.

अखेर वसंतदादांच्या विश्वासातल्या माणसाला मुख्यमंत्री करायचं ठरलं.

नाव शिवाजीराव निलंगेकर पाटील

मराठवाड्याच्या निलंगा गावचा साधासुधा राजकारणी. शेतकरी कुटूंबात त्यांचा जन्म झाला. हैद्राबाद मुक्तिसंग्रामात एक छोटा कार्यकर्ता म्हणून त्यांनी सहभाग घेतला होता. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंचायत समिती, जिल्हापरिषद अशा तळातल्या राजकारणापासून सुरवात केली. आमदार झाले, पुढे वसंतराव नाईकांच्या मंत्रिमंडळात देखील गेले.

दुष्काळी मराठवाड्यात सहकाराची विकासगंगा आणणाऱ्या मोजक्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश केला जायचा. सहकारी साखर कारखाने, बँका, सूत गिरणी, तेल गिरणी अशा अनेक सहकारी संस्थांचं जाल त्यांनी लातूर भागात विणलं. यातूनच महाराष्ट्राच्या सहकाराचे भाग्यविधाते असलेल्या वसंतदादा पाटील यांच्याशी संपर्क आला. मैत्री जुळली, निलंगेकर हे वसंतदादांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाऊ लागले.

दादांनी जेव्हा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला तेव्हा निलंगेकर आमदार देखील नव्हते. त्यावेळी काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून दादांना समजावून सांगण्यासाठी आलेल्यांमध्ये सीताराम केसरी, मूपनार यांच्यासोबत केंद्रीय अर्थमंत्री व्ही.पी.सिंग देखील होते. मुंबईमध्ये ज्या घडामोडी घडत होत्या त्याकडे व्ही.पी.सिंग यांचे बारीक लक्ष होते.

दादांच्या सांगण्यावरून जेव्हा निलंगेकर यांना मुख्यमंत्रीपदाची सूत्रे देण्यात आली तेव्हा यात व्ही.पी.सिंग यांचा मोठा हात होता.

निलंगेकर यांनी पदावर येताच संपूर्ण राज्याचा दौरा सुरु केला. विदर्भ, कोकण, मराठवाडा येथील अनुशेष भरून काढण्यासाठी त्यांनी ४० कलमी योजना जाहीर केली. शेतकरी पीकविमा योजना, स्वातंत्र्यसैनिकांच्या पेन्शन मध्ये मोठी वाढ, बारावी पर्यंतच्या मुलींसाठी मोफत शिक्षण असे काही क्रांतिकारी निर्णय त्यांच्या कार्यकाळात झाले.

शिवाजीराव निलंगेकरांनी काँग्रेसच्या शताब्दीचा जंगी कार्यक्रम मुंबईत आयोजित केला. संपूर्ण देशभरातून कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी हजर होते. बलुचिस्थानमधून सरहद्द गांधी खान अब्दुल गफार खान देखील या कार्यक्रमात सहभागी झाले. निलंगेकरांनी केलेले चोख आयोजन याच कौतुक दिल्लीच्या श्रेष्ठींमध्ये झालं. खुद्द पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्यांची पाठ थोपटली.

निलंगेकर पाटलांच वाढत असलेलं वजन राज्यातील काही नेत्यांना पसन्त पडत नव्हते. त्यांना खुर्चीतून खाली खेचण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. अनेक डावपेच आखले गेले. काही दिवसातच त्यांना यश आलं.

शिवाजीराव निलंगेकर यांच्या मुलीला वैद्यकीय कॉलेजला प्रवेश मिळवण्यासाठी तिच्या गुणपत्रिकेतील मार्क्स वाढवण्यात आले असल्याचा आरोप करण्यात आला. तत्कालीन विरोधी पक्षात असलेले शरद पवार यात आघाडीवर होते.

राज्यभर हे प्रकरण गाजले. मुंबई उच्च न्यायालयात देखील मुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढण्यात आले. या आरोपांमुळे व्यथित झालेल्या शिवाजीराव पाटील निलंगेकरांनी थेट मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. दादांच्या राजीनाम्या पाठोपाठ १० महिन्यात ते पायउतार झाले.

मुलीच्या मार्कशीट मधील गुण वाढवल्याप्रकरणी राजीनामा द्यावा लागणारे निलंगेकर हे पहिलेच मुख्यमंत्री ठरले. संपूर्ण देशभरातून निलंगेकरांवर टीका आणि खिल्ली उडवण्यात आली.

या राजीनाम्यानंतर शिवाजीराव पाटील निलंगेकर राजकारणातून काहीसे बाजूला पडले होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे आजारी असलेल्या वसंतदादा पाटील यांचे लवकरच निधन झाले त्यामुळे निलंगेकरांच्या पाठीशी असणारा भक्कम आधार गेला. शंकरराव चव्हाण, शरद पवार यांच्या सारखे विरोधक मुख्यमंत्रीपद आले होते.

शिवाजीराव निलंगेकर पाटील एकत्र काँग्रेसमधून सोडतील अथवा  ते राजकारणातून बाहेर फेकले जातील असं बोललं जात होतं.

१९८९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा मोठा पराभव झाला. राजीव गांधींना पाय उतार व्हावे लागले. त्यांच्या ऐवजी जनता दलात गेलेले व्ही.पी.सिंग पंतप्रधान बनले. व्ही.पी.सिंग यांच्याकडे देखील मोठे संख्याबळ नव्हते. इतर छोट्या मोठ्या पक्षांना घेऊन त्यांनी सत्ता स्थापन केली होती. अशावेळी सरकार चालवण्यासाठी त्यांना अनुभवी नेत्यांची आवश्यकता होती.

व्ही.पी. सिंग यांनी काँग्रेसमध्ये असतुंष्ट असणाऱ्या नेत्यांचा शोध सुरु केला. यात त्यांना प्रमुख नाव आढळले माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर पाटील.

त्यांच्यावरील मुलीच्या मार्क्स वाढवण्याच्या प्रकरणाची हवा तो पर्यंत निघून गेली होती. या आरोपांमागे काहीही नाही असे सिद्ध देखील झाले होते. काँग्रेसमध्ये भवितव्य नसल्यामुळे निलंगेकरांनी जनता दलात जाऊन राष्ट्रीय राजकारण करावे अशी त्यांच्या समर्थकांची इच्छा होती. नव्या पंतप्रधानांशी त्यांचे जुने मैत्रीचे संबन्ध होते.

व्ही.पी.सिंग यांनी निलंगेकरांना निरोप पाठवला की तुम्हाला आमच्या मंत्रिमंडळात परराष्ट्र खाते देतो. काँग्रेस सोडून जनता दलात प्रवेश करा.

शिवाजीराव निलंगेकरांनी मात्र याला स्पष्ट नकार कळवला. आपली हयात काँग्रेसमध्ये गेली आहे आणि कोणतंही संकट आलं तरी पक्ष सोडणार नाही असं त्यांनी सांगितलं. हाताशी आलेलं एवढं मोठं पद निलंगेकरांनी पक्ष निष्ठा जपण्यासाठी गमावलं.

पुढे ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनले. आठ वेळा विधानसभा निवडणूक जिंकण्याचा विक्रम देखील त्यांच्या नावावर होता. एकेकाळी मुख्यमंत्री राहिलेला हा नेता पुढे सुशील कुमारांच्या मंत्रिमंडळात महसूल मंत्री म्हणून देखील कार्यरत राहिला. यात त्यांना कमीपणा वाटला नाही. त्यांचे नातू सून भाजपमध्ये गेले, शिवाजीराव पाटलांना निवडणुकीत हरवलं पण अखेर पर्यंत निलंगेकर काँग्रेसचे सच्चे कार्यकर्ते म्हणूनच ओळखले गेले.

हा किस्सा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एके ठिकाणी सांगितलेला आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.