महाराष्ट्रातील एकमेव मुख्यमंत्री ज्यांना आडनाव थेट विधानसभा अध्यक्षांनी दिलं…

९ फेब्रुवारी  १९३१,  निलंगा तालुक्यात असणाऱ्या ननंद या गावी शिवाजीरावांचा जन्म झाला. आजोळी जन्मलेल्या या मुलाचं नाव सुरवातीला उमराव असं ठेवण्यात आलं होतं. पण हे नाव सरंजामी वाटतंय असं वाटून वडील भाऊराव आणि आई वत्सलाबाई यांनी मुलाचं नाव शिवाजी असं बदललं.

छोट्याशा गावातील हे शेतकरी कुटुंब. खरं आडनाव गायकवाड पण गावचे पाटील असल्यामुळे ते देखील आडनाव जोडलेलं.  म्हणून मुलाचं नाव शिवाजीराव पाटील गायकवाड.

मराठवाड्यावर असलेल्या निजामशाही राजवटीचा हा काळ. सहा महिन्याचा असतानाच शिवाजीरावांच्या डोक्यावरील वडिलांचं छत्र हरपलं. शिवाजीरावांच्या आईने न डगमगता घर सांभाळलं. स्वतः शेतात राबून त्यांनी मुलांना वाढवलं. शिवाजीराव गावातल्या जिल्हा बोर्डाच्या शाळेत शिकले. माध्यमिक शिक्षण गुलबर्गा येथे झालं. निजामाच्या राजवटीमुळे त्यांचं शिक्षण उर्दू माध्यमात झालं.

शाळेत असताना निजामशाहीचा अत्याचार, नागरिकांची पिळवणूक याचा त्यांनी अनुभव घेतला होता. देश स्वतंत्र झाला तरी हैदराबादचा निजाम आपली सत्ता सोडण्यास तयार नव्हता म्हणून हैद्राबाद मुक्तिसंग्रामाचे आंदोलन सुरु झाले. मॅट्रिकमध्ये असलेले शिवाजीराव आपलं शिक्षण सोडून या आंदोलनात उतरले.

निजामाने आपले संस्थान भारतात विलीन केल्यावर शिवाजीराव परत शाळेत दाखल झाले. हैद्राबाद, नागपूर येथे आपलं उच्चशिक्षण पूर्ण केलं. जात्याच हुशार असणाऱ्या शिवाजीरावांनी एम ए एलएलबी पूर्ण केली आणि १९५५ साली वकिलीचा व्यवसाय सुरु केला.

विद्यार्थी दशेपासूनच ते राजकीय व सामाजिक कार्यात सहभागी होत होते. हैद्राबाद येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात स्वयंसेवक म्हणून त्यांनी काम केलं. जवाहरलाल नेहरूंच्या पासून ते अनेक राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांची भाषणे ऐकता आली. या महान नेत्यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर खोलवर झाला. निलंगा तालुक्याच्या विकासासाठी ते झटू लागले.

१९५८ साली जिल्हा बोर्डाच्या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. त्यावेळी त्यांनी तळागाळात जाऊन काम केलं. निलंगा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष झाले. ब्लॉक डेव्हलपमेंट बोर्डाचे अध्यक्ष, काँग्रेसचे निलंगा तालुका अध्यक्ष अशी चढत्या क्रमाने प्रगतीच होत गेली.

संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हा होणाऱ्या पहिल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने या तरुण कार्यकर्त्याला निलंगा मतदारसंघातून तिकीट दिले. त्यांच्याविरुद्ध शेकापचे श्रीपतराव सोळुंखे उभे होते. त्यांचं पारडं जड होतं पण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खेडोपाडी प्रचाराचा धुरळा उडवून दिला. वयाचे अवघे तीस वर्ष पूर्ण केलेले शिवाजीराव पाटील तब्बल दहा हजारांचे लीड घेऊन निवडून आले.

महाराष्ट्राच्या सर्वात तरुण आमदारांमध्ये त्यांची गणना होत होती. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी निलंगा तालुक्यात सहकाराचं जाळं पसरलं. त्यांना जिल्हा काँग्रेसचं अध्यक्षपद देण्यात आलं. पाटबंधारे योजना, सहकारी बँक यांच्या मदतीने दुष्काळी शेतकऱ्यांच्या पिकाला चांगले दिवस आणले. लातूर-उस्मानाबाद भागात रस्ते बांधले, विकासाची गंगा आणली.

फक्त मतदारसंघ नाही तर शिवाजीराव पाटलांनी विधिमंडळ देखील गाजवलं. आपल्या भागाचे प्रश्न विधानसभेत मांडण्यासाठी ते नेहमी आघाडीवर असत.

गंमतीची गोष्ट म्हणजे त्याकाळात महाराष्ट्राच्या विधानसभेत ४ शिवाजीराव पाटील होते. जेव्हा प्रश्नोत्तराच्या तासावेळी शिवाजीराव पाटील यांच्या नावाची घोषणा व्हायची तेव्हा चारही पाटलांच्यात घोळ व्हायचा. असं वारंवार घडू लागलं.

त्याकाळी विधानसभेचे अध्यक्ष होते शेषराव वानखेडे. त्यांचा स्वभाव गंमत्या होता. नेहमी आमदारांची फिरकी घेत खेळकर वातावरणात ते विधिमंडळाचे कामकाज चालवायचे. एकदा शिवाजीराव पाटलांच्या नावावरून गोंधळ झाला तेव्हा शेषराव वानखेडे वैतागले. त्यांनी चौघांनाही त्यांच्या मतदारसंघावरून हाक मारायला सुरवात केली.

त्याच दिवशी शिवाजीराव पाटील गायकवाड हे नाव मागं पडून निलंगेकर या नावाचा उदय झाला. 

वानखेडे यांच्यामुळेच सगळी विधानसभा शिवाजीराव पाटलांना निलंगेकर म्हणून हाक मारू लागली. ते पहिले असे नेते होते जायना आडनाव महाराष्ट्राच्या विधिमंडळ सभागृहाने दिल. शिवाजीरावांना देखील आपल्या गावाचा अभिमान होता. त्यांनी हेच नाव नेहमीच्या वापरात आणलं.

ते आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर वसंतराव नाईकांच्या मंत्रिमंडळात मंत्री झाले. पुढच्या दहा वर्षात त्यांनी मुख्यमंत्रीपदापर्यंत झेप घेतली. मराठवाड्यासारख्या मागासलेल्या भागात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला तळागाळातुन आलेला नेता मुख्यमंत्री बनतो ही मोठी गोष्ट होती. 

त्यांच्यामुळे निलंगेकर हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात फेमस झालं. अल्पकाळ मिळलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्यांनी चांगली छाप पाडली. पण मुलीचे मार्क वाढवल्याची चर्चा झाल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला मात्र कालांतराने सर्व आरोप खोटे ठरले. 

पुढे प्रदेशाध्यक्ष म्हणून निलंगेकर हे नाव राज्याच्या राजकारणात नेहमी गाजत राहलं. आठ वेळा विधानसभा जिंकण्याचा पराक्रम त्यांनी केला. आज त्यांच्या पुढच्या पिढ्या राजकारणात आहेत. गेली पन्नास वर्षे निलंग्याच राजकारण निलंगेकर या नावाभोवतीच फिरतंय. 

महाराष्ट्राच्या नकाशात दुर्बीण घेऊन शोधायला लागेल असं निलंगा हे छोटस गावं आजही आपल्या या सुपुत्रामुळे संपूर्ण राज्याच्या कानाकोपऱ्यात ओळखलं जातंय. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.