पहिल्या बॉलवर विकेट घेण्याचा रेकॉर्डसुद्धा निलेश कुलकर्णीच्या कामी आला नाही….

तुमचं पहिलं इम्प्रेशन तुमचं भविष्य ठरवतं असं म्हटलं जातं. बऱ्याच लोकांच्या बाबतीत ते खरंही असू शकतं. क्रिकेटमध्ये तर पहिल्या मॅचला तुमचा गेम ऑन असला पाहिजे म्हणजे जास्त संधी मिळत जातात. चांगला खेळ आणि लक असा दोन्हींचा योग जुळून आला पाहिजे असं प्रत्येक खेळाडूला वाटतं. आजचा किस्सासुद्धा असाच आहे पहिलं इम्प्रेशन वर्ल्ड रेकॉर्ड ठरलं पण पुढे काय झालं जाणून घेऊया.

निलेश मोरेश्वर कुलकर्णी. डोंबिवलीत त्यांचं बालपण गेलं आणि मुंबईत ते क्रिकेट जगतात वाढू लागले. फर्स्ट क्लास क्रिकेटमधल्या प्रदर्शनाच्या जोरावर निलेश कुलकर्णी यांची निवड भारतीय संघात झाली होती. स्लो लेफ्ट आर्म बॉलिंग आणि लोवर मिडल ऑर्डरमधला बॅट्समन म्हणून निलेश कुलकर्णी खेळायचे. पण त्यांचं मेन काम हे बॉलिंग होतं. 

निलेश कुलकर्णी हे मुंबईचे असे खेळाडू होते जेव्हा सचिन तेंडुलकर हा भारताचा कॅप्टन होता आणि तेव्हा भारताच्या संघात बरेच मुंबईचे क्रिकेटर होते. ते साल होतं १९९७ चं. श्रीलंकेतील कोलंबोमधल्या प्रेमदासा स्टेडियममध्ये सामना सुरु होता. पहिल्या डावात भारताने ५३७/८ असा स्कोर केला होता. सचिन तेंडुलकरने १४३ धावा फटकावल्या होत्या. डाव घोषित झाल्यावर श्रीलंकेच्या बॅटिंगने भारताची पुरती हवा काढली.

सनथ जयसूर्या आणि अरविंद डिसिल्व्हा या दोघांनी चौफेर फटकेबाजी करायला सुरवात केली. जयसूर्याने एकट्याने ३४० धावा तडकावल्या. श्रीलंकेने ९५६ धावांचा महाकाय डोंगर उभा केला. याच मॅचमध्ये एक नवीन खेळाडू भारताकडून पदार्पण करत होता तो म्हणजे निलेश कुलकर्णी. सौरव गांगुलीचा रूमपार्टनर म्हणून निलेश कुलकर्णी राहत असायचे. तेव्हा कर्णधार सचिन तेंडुलकरने विकेट काढण्यासाठी मोठ्या विश्वासानं निलेश कुलकर्णी यांना ओव्हर दिली. 

निलेश कुलकर्णी यांनी कसोटी क्रिकेटमधला पहिलाच बॉल टाकला आणि पहिल्याच बॉलवर त्यांना विकेट मिळाली. मार्वन अट्टापटूचा झेल नयन मोंगियाने घेतला. टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्याच बॉलवर विकेट मिळवणारे निलेश कुलकर्णी पहिले भारतीय ठरले.

हाच विक्रम करणारे ते जगातले १२ वे खेळाडू होते. पण कुलकर्णी यांना पुढच्या भविष्याची काहीएक कल्पना नव्हती. पुढच्या अडीच तासांपर्यंत त्यांना एकही विकेट मिळाली नाही.

त्या डावात निलेश कुलकर्णी यांनी ७० ओव्हर फेकल्या. पहिल्या बॉलवरच्या विकेटनंतर त्यांनी आणखी ४१९ बॉल फेकले पण त्यांना एकही विकेट नंतर मिळाली नाही. हि मॅच भलेही पुढे ड्रॉ झाली पण निलेश कुलकर्णी यांनी हा मॅचमध्ये इतिहास घडवला होता.

पुढे मात्र श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात निलेश कुलकर्णींची निवड झाली खरी पण ते विशेष चमक दाखवू शकले नाही. त्यांनी वनडेमध्ये १० सामने खेळले पण त्यांना फक्त ११च विकेट मिळवता आल्या. पाकिस्तानविरुद्ध ३/२७ हि कुलकर्णीची बेस्ट बॉलींग ठरली. टेस्ट क्रिकेटमध्ये सुद्धा त्यांना जास्त संधी मिळाली नाही.  ३ टेस्टमध्ये त्यांना फक्त २ विकेट मिळवता आल्या. 

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ३०० बळी तेही आंध्र प्रदेशाविरुद्ध ७/६० या बेस्ट बॉलिंग फिगरसह ते संघात खेळत होते. पण पहिल्या मॅचमध्ये त्यांनी केलेली हवा शेवट्पर्यंत ते टिकवू शकले नाही. संधी मिळूनही त्यांना चांगली कामगिरी करता आली नाही. दुखापती, राजकारण, निवड समिती यातच निलेश कुलकर्णी अडकून पडले.

निवडकर्ते अनेकदा त्यांच्याकडे अनुभवी खेळाडू म्हणून पाहत पण ऐन मोक्याच्या वेळी त्यांची विशेष कामगिरी होत नसे. क्रिकेटमध्ये सुरवात चांगली होऊनही निलेश कुलकर्णी संघातून बाहेर फेकले गेले कारण सातत्य नव्हतं. पहिल्या मॅचचा रेकॉर्डसुद्धा सुनील कुलकर्णींना वाचवू शकला नव्हता.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.