ट्रक बांधणाऱ्यांचं गाव : इथला एकही मुलगा बेरोजगार नाही

प्रत्येक गावाची एक वेगळी ओळख असते. कोल्हापूर चपलेसाठी फेमस आहे तर सोलापूर चादरीसाठी. अशा अनेक गावांनी आपली खास वैशिष्ट्ये जपली शिवाय राबणाऱ्या हातांना काम मिळवून दिलं.

असच बेळगाव जिल्ह्यात एक गाव आहे.

नाव आहे निलजी पण गावाची ओळख ट्रक बांधणाऱ्या माणसांचं गाव अशी आहे.

महाराष्ट्र कर्नाटक बाऊंडरी म्हणजे सीमावादाने पेटलेला भाग. कर्नाटकाच्या वाटणीला गेलेल्या मराठी गावांवर तिथल्या आजवरच्या सरकारांनी अन्यायच केला. कष्टाच्या बळावरच इथल्या लोकांना आपला विकास घडवावा लागला.

बेळगावच्या अगदी जवळ असलेलं हे निलजी गाव. पूर्वापार चालत आलेली शेती हाच इथला प्रमुख व्यवसाय इथल्या लोकांना ठाऊक होता.

शेतीयोग्य जमीन सुद्धा थोडीच शिवाय पावसापाण्यावर अवलंबून असल्यामुळे संपूर्ण कुटूंबाच पोट त्यावर भरणे अशक्य होतं. हळूहळू बांधकाम व्यवसायात मजुरीच्या निमित्ताने तरुण गावाबाहेर पडू लागले.

अशातच एकजण होते नारायण मोदगेकर.

स्वातंत्र्यपूर्व काळात बनत असलेल्या हायवेवर मैलाचे दगड रंगवण्याचे काम करत होते. हे काम करत असताना कधीकधी विश्रांतीसाठी थांबलेल्या ट्रक चालकांशी त्यांच्या गप्पा व्हायच्या. या ओळखीतून त्यांनी ट्रक रंगवण्यास सुरवात केली.

ट्रक रंगवता रंगवता त्यांनी ट्रक बांधणी शिकून घेतली.

त्यातून त्यांनी धारवाड हायवेच्या बाहेर शिवाजी कंपाऊंड येथे ट्रक बांधणीचा व्यवसाय सुरू केला. ते वर्ष होतं १९४८.

नारायण मोदगेकर ट्रक बिल्डिंग करू लागले. काही दिवसातच त्यांची ख्याती त्या भागात पसरली. चार पैसे हातात येऊ लागले.

फक्त स्वतः पैसे कमवून गप्प बसले नाहीत तरमोदगेकरांनी आपल्या गावातल्या पोरांना देखील या धंद्यात आणले. त्यांना हा व्यवसाय शिकवला.

पुढे मोदगेकर यांच्या बरोबर आस पासच्या ट्रक बॉडी बिल्डर यांच्याकडे हे निलजीचे तरुण काम करू लागले. हातगुण म्हणा किंवा स्किल त्यांची प्रसिद्धी सर्वदूर पसरू लागली.

ट्रक बांधावा तर निलजीच्या लोकांनी अस म्हटलं जाऊ लागलं.

येत्या काही वर्षात आसपास सर्वत्र निलजीकरांचे ट्रक बिल्डिंगचे कंपाऊंड उभे राहिले. प्रत्येक घरटी एकजण तरी या धंद्यात पडू लागला. गावाला या धंद्याचं टेक्निक सापडलं होतं.

फक्त ट्रक बॉडी बिल्डिंग नाही तर त्याला लागणाऱ्या खिळ्या पासून ते पत्रा,पेंट पर्यंत प्रत्येक गोष्टीचा सप्लाय गावातल्याच लोकांनी सुरू केला.

बघता बघता निलजी गावाचं ट्रक बिल्डिंगच साम्राज्य उभं राहिलं.

आजही महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यातील सर्व ट्रक मालक बॉडी बिल्डिंग साठी इकडे येतात.

निलजीकरांचं हे खास टेक्निक ‘ बेळगाव बॉडी’ म्हणून फेमस संपूर्ण भारतात फेमस झालंय.

पुढे नरसिंहराव आणि मनमोहनसिंग यांनी दिल्लीत जाहीर केलेल्या जागतिकीकरणाचे पडसाद खेडोपाडी देखील पडले. ट्रक बिल्डिंग व्यवसायावर देखील परिणाम झाला. पण निलजीकर जिद्दीचे होते. त्यांनी गावाबाहेर पडायचं ठरवलं.

पुणे सांगली सातारा कोल्हापूर पासून पार सोलापूर नगर धुळे प्रत्येक शहरात निलजी गावाच्या माणसांनी ट्रक बिल्डिंगचा व्यवसाय उघडला आहे. गाव सुटलं पण नाळ सुटली नाही.

या गावात एकही माणूस बेरोजगार नाही. जवळपास १२०० जण याच व्यवसायात आहेत. एक व्यावसायिक दर महिन्याला २ ट्रक बांधतो. असे जवळपास ६० बिल्डर गावात आहेत. अंदाजे दर महिन्याला ४-५ कोटी रुपयांची उलाढाल या गावात होते.

देशात गेले काही वर्षे बेरोजगारीची लाट आली आहे. नोकऱ्या नाहीत यामुळे युवक देशोधडीला लागत आहेत. सरकारी नोकरी पायी पुण्यासारख्या शहरात हजारो मुलांचे उमेदीची वर्षे वाया जात आहे.

अशा वेळी स्वतःच्या पायावर उभं राहणारं निलजी सारख गाव गेल्या चार पिढ्या सरकारी नोकरीच्या मागे न लागता सुखाने नांदत आहे.

संदर्भ-गाव माझं वेगळंः ट्रकची बांधणी करणारे गाव निलजी दैनिक सकाळ विनायक जाधव

हे ही वाच भिडू.

 

1 Comment
  1. असेच एक गाव आहे नाशीक जिल्ह्यात मालेगाव व मनमाड हायवेवर हे या गावात दर दसर्याला कीमान २०-२५ नविन ट्रक येतात.गावाचं गाव जळगाव(चोंडी) सध्याच्या घडीला गावात ४००-५०० ट्रक असायला हव्या प्रत्येक घरातुन कीमान २ लोक ड्रायव्हर आहेत सारनखेड्याच्या वाळूपसून राजमंद्री गुजरात आध्रं या रुट ला यांची एक तारी गाडी १००% असणार.एकदा माहीती मीळवून बघा आपल्याला माहीती रोचक वाटली तथ्य वाटलं तर एक लेख चोंडी जळगाव वर द्या.

Leave A Reply

Your email address will not be published.