आपण कुठे चुकतोय याची जाणीव नसीरुद्दीन शाह यांना निळू फुलेंचा अभिनय पाहून झाली…

मराठी सिने आणि नाट्य सृष्टीत असे अनेक कलाकार होऊन गेले आहेत जे सर्वांसाठी एक आदर्श उदाहरण म्हणून कायम राहतील. बॉलिवुड कितीही मोठं असलं तरी तिथे सुद्धा चांगला अभिनय करणाऱ्या कलाकारांना एक वेगळा मान असतो.

कसं आहे, हिरो कोणीही होऊ शकतो. कारण हिंदी सिनेसृष्टीत हिरो अनेक असतात परंतु एक सच्चा अभिनेता नेहमीच या हिरोंपेक्षा वरचढ असतो.

दोन हिरो असले तरीही काही सिनेमे फ्लॉप होतात परंतु एक अभिनेता या सर्व हिरोंना पुरून उरतो. त्यामुळे अशा अभिनेत्यांची कदर करणारी काही विशिष्ट माणसं असतात. शिष्य कितीही तरबेज झाला तरीही आपण कुठे चुकत आहोत हे गुरु कडून त्याला कळतं.

असंच काहीसं झालं होतं नसीरुद्दीन शाह यांच्या बाबतीत. नसीर साब यांना चुकीची जाणीव होण्यास कारणीभूत ठरले निळूभाऊ फुले.

नसीरुद्दीन आणि निळूभाऊ दोघेही हिरो या वर्गवारीत कधीही बसले नाहीत. नसीर साबने हिंदीत अनेक व्यावसायिक सिनेमे सुद्धा केले. सिनेमा कोणत्याही प्रकारचा असो कलाकार म्हणून नसीर साब हे नेहमी चांगला अभिनय करत आहेत.

नसीर साब यांनी अभिनयाचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं आहे. दिल्ली येथील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मधून अभिनयाच्या सर्व गोष्टींचा त्यांनी अभ्यास केला. आणि यानंतर नाटक, सिनेमे करत आजही ते अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत.

दुसरीकडे मराठमोळे आपल्या सर्वांचे लाडके निळूभाऊ फुले. अभिनयाचं कोणतंही प्रशिक्षण नाही. आयुष्याकडून मिळणाऱ्या अनुभवातून ते शिकत गेले. जे अनुभव मिळत गेले त्याचा वापर त्यांनी अभिनयात केला. शिक्षण जेमतेम मॅट्रीक पर्यंत. कथा अकलेच्या कांद्याची या वगनाट्याद्वारे त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

आपण मोठे नट होऊ, आपल्याला प्रसिद्धी मिळेल याची अपेक्षा नाही किंवा हव्यास नाही. वाट्याला आलेली प्रत्येक भूमिका त्यांनी प्रभावीपणे रंगवली.

या दोघांबद्दल सांगायचं कारण, नसीरुद्दीन यांनी अभिनयाचं शिक्षण जरी घेतलं असलं तरीही त्यांच्या लेखी निळूभाऊ हे कायम महान कलाकार होते.

नसीरुद्दीन शाह अभिनयाच्या बाबतीत मराठी कलाकारांना फार मानतात. विशेषतः निळू फुले आणि डॉ. श्रीराम लागू हे त्यांचे आदर्श. मुलाखतीमध्ये वारंवार या दोन कलाकारांचा नसीर साब उल्लेख करतात.

एकदा निळू फुले यांचा अभिनय पाहून आपण कुठे चुकत आहोत याची जाणीव नसीरुद्दीन शाह यांना झाली होती,

त्याचा हा किस्सा.

विजय तेंडूलकर लिहित ‘बेबी’ हे नाटक १९७० ते १९८० च्या सुमारास रंगभूमीवर आले होते. या नाटकाविषयी बोलायचं झालं तर, तेंडुलकरांच्या इतर नाटकांप्रमाणे या नाटकात सुद्धा वास्तव आयुष्याचं चित्रण दाखवण्यात आलं आहे.

या नाटकात निळू फुले बेबीचा भाऊ राघवची भूमिका रंगवायचे. राघव हा बेबीला गुंडांच्या तावडीतून सोडवतो. हेच गुंड पोलिसांशी संगनमत करून राघवला जेलमध्ये डांबतात. पुढे राघवला वेड्यांच्या इस्पितळात दाखल केलं जातं.

तिथून सुटून आल्यावर राघवला कळतं की, ज्या गुंडांच्या तावडीतून आपण बहिणीला वाचवलं होतं, आज तीच बहीण त्या गुंडाची रखेल झाली आहे. हे कळाल्यावर राघव मुळापासून हादरतो. असं काहीसं या नाटकाचं कथानक.

राघवची भूमिका निळू फुले यांच्या आवडीची भूमिका. या नाटकात बेबीची भूमिका लालन सारंग साकारायच्या. विजय तेंडुलकरांनी राघव आणि बेबीचे संवाद इतके टोकदार लिहिले होते की दर प्रयोगाला रंगमंचावर अभिनय करताना लालन सारंग यांच्या डोळ्यात पाणी यायचं.

‘बेबी’ हे नाटक जेव्हा हिंदीत करायचं ठरवलं तेव्हा सत्यदेव दुबे यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली. हिंदीमध्ये राघवची भूमिका करणार होते नसीरुद्दीन शाह.

‘बेबी’ नाटकाचे मराठी आणि हिंदी भाषेत एकाच वेळी प्रयोग सुरू होते. एकदा नसीरुद्दीन शाह मराठी नाटकाचा प्रयोग पाहायला आले.

सकाळी १० वाजता शिवाजी मंदिरला प्रयोग होता. नसीरुद्दीन शाह नाटक पाहायला बसले. नाटक पाहत असताना निळुभाऊंनी साकारलेली राघवची भूमिका पाहून ते अवाक झाले. प्रयोग झाल्यावर नसीरुद्दीन शाह प्रचंड भारावले होते.

विंगेत जाऊन ते निळुभाऊंना भेटले आणि म्हणाले.

“भाऊ तुम्ही राघवची जी भूमिका केली आहे त्याला तोड नाही. तुमची भूमिका पाहून मला अनेक गोष्टी कळल्या. मी हिंदीत राघव रंगवताना कुठे चुकत आहे याची जाणीव झाली.

तुमचा अभिनय पाहून मला राघवच्या भूमिकेची खोली आणखी जास्त कळली. आता बघा उद्यापासून मी हिंदी प्रयोगात काय करतो ते!”

असं म्हणून नसीरुद्दीन शाह यांनी निळू फुलेंचा निरोप घेतला.

नसीरुद्दीन शाह यांना झालेली ही जाणीव निळू भाऊंच्या अभिनयाला दिलेली एक अप्रत्यक्ष दाद म्हणता येईल. मराठीमध्ये निळू फुलें सारखे अनेक कलाकार प्रसिद्धीच्या शिखरावर असले तरीही त्यांचे पाय जमिनीवर असायचे.

त्यामुळे त्यांचा अभिनय, त्यांनी साकारलेल्या भूमिका या नेहमी वास्तवदर्शी आणि खऱ्या वाटायच्या. याचप्रमाणे निळू फुले यांच्या अनेक भूमिका आज नव्या कलाकारांसाठी अभिनयाचं विद्यापीठ आहेत.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.