चुकून रोल मिळाला आणि गावागावात झेले अण्णांचा जयजयकार होऊ लागला

ज्ञानदा नाईक यांच्या पुस्तकात सांगितलेला एक किस्सा. या गोष्टीची सुरवात आपण त्याच किस्स्यापासून करू. स्थळ होतं लातूरचं बसस्थानक. दूपारची वेळ. बस स्टॅण्ड खचाखच भरून गेलेलं. भज्यांचा वास, मुतारीचा वास, डिझेलचा वास असा सारा वास एकत्र झालेला. बस आत शिरली आणि कंडक्टरने हाळी दिली,

लातूर आलं उतरून घ्या…

गाडी रिकामी होऊ लागली पण दोघं तसेच बसलेले. त्या रात्री नाटकाचा प्रयोग होता. हे दोघं प्रयोगासाठी आलेले. नाटकाचं नाव होतं कथा अकलेच्या कांद्याची. इतक्यात नाटकातला एकजण वर आला आणि त्यातल्या एकाला म्हणाला, उठा की राव किती वेळ वाट बघता. सडपातळ असणारा माणूस एस्टीतून खाली उतरला तर समोर ही गर्दी.

गर्दीने एकच जल्लोष केला,

झेले अण्णा जिंदाबाद…

झेले अण्णाला घेवून गर्दी लॉजपर्यन्त गेली. खांद्यावर घेवून झेले अण्णांची मिरवणूक काढण्यात आली. गावात एक गाव बारा भानगडी सिनेमा हाऊसफुल्ल चालू होता. या माणसाची त्या दिवशी चेअरमन सारखी मिरवणूक काढली गेली, तेव्हा त्याला पण माहित नव्हतं आपण इथपासून ते आयुष्यभरासाठी परमनंट चेअरमन असणार आहोत.

निळू फुलेंचा तो गाजलेला पहिला रोल. तिथून निळू फुले हे नाव घराघरात पोहचलं. निळु फुले हे़ममाळी म्हणून माळ्याचं काम करत होते. सेवादलाशी बांधले गेले होते. लोकनाट्यात सहभागी व्हायचे.

काही काळानंतर हेडमाळी सोडून पुन्हा पुर्ण ताकदीने नाटकात उतरले. लवंगी मिरची, अकलेचा कांदा ही नाटके चालू लागली. गावोगावी प्रयोग होऊ लागले.

त्याच दरम्यान दूसऱ्या दिशेला अमृत गोरे ला एक नाटक करायचं होतं. एक गाव बारा भानगडी नावाचं या नाटक त्याने शंकर पाटील यांच्याकडून लिहून घेतलं होतं. या नाटकाचं वाचन अनंत माने आणि निर्माते वितरक वि.गो.नेमाडे यांच्यासमोर करण्यात आलं होतं. तेव्हा माने आणि नेमाडे यांना या कथेत पिक्चरचा जर्म दिसला. त्यांनी हिच कथा चित्रपटासाठी करण्याची सुचना केली. अमृत गोरे यांनी माने व नेमाडेंना चित्रपटासाठी ही कथा दिली.

जेव्हा नाटक लिहायचं म्हणून अमृत गोरेने विचार केलेला तेव्हा नाटकातल्या झेले अण्णा या पुढाऱ्याची भूमिका निळु फुलेंना द्यायची असा त्यांनी विचार केलेला. पण नाटक तर चित्रपटासाठी गेलं. माने आणि नेमाडे यांना निळु फुलेंच नाव देखील माहित नव्हतं. नाटकाचा पिक्चर होत असताना ही झेले अण्णांची भूमिका वसंत शिंदे करतील हे फिक्स झालेलं होतं.

पण अमृत गोरेंच्या डोक्यात झेले अण्णासाठी निळु फुलेंच नाव घोळत राहिल. त्यांनी माने आणि नेमाडेंची भेट घेवून झेले अण्णाचा रोल निळु फुले याच व्यक्तिला द्यावा असा आग्रह धरला. माने आणि नेमाडे यांनी गोरेंच्या आग्रहावरून ही भूमिका निळु फुलेंना दिली…

एक गाव बारा भानगडी रिलीज झाला आणि सुपरहिट ठरला. पुढारी असणारा झेले अण्णा परमनंट पुढारी झाला. या पहिल्या पुढाऱ्याच्या सुपरहिट रोलनंतर निळु फुलेंनी कधीच मागे वळुन पाहिलं नाही.

कधीकधी ते चेष्टेत निर्मात्याला पुढाऱ्याच्या ड्रेससहित भूमिकेचं मानधन सांगत असत. अस पुढारी आणि निळु फुलेंच नातं निर्माण झालं पण याचं सगळं क्रेडिट जातं ते अमृत गोरे या माणसाला. त्यांनी आग्रह धरला नसता तर निळु फुलेंसारखा सरपंच, चेअरमन आपणाला मिळाला नसता.

झेले अण्णा जिंदाबाद !!!

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.