बर्लिनमध्ये निळूभाऊ आणीबाणीवर टीका करत होते आणि काँग्रेस नेते ऐकून घेत होते

सध्या देशात काश्मीर फाईल्स चित्रपटाची प्रचंड चर्चा आहे, म्हणजे आता वादविवाद बाजूला ठेवले, तरी कुठला अभिनेता किंवा अभिनेत्री या चित्रपटाबद्दल काही बोलले, की त्याची लगेच बातमी होते. चित्रपटाविषयीचं त्यांचं मत ही कित्येकांना कलाकारांची राजकीय भूमिका वाटते. मग त्यावरुन कौतुक होतं किंवा मग टीका होते.

याच्या निमित्ताने चर्चा सुरु झाली आहे कि, कलाकारांनी आपली राजकीय मते मांडावीत कि नाही? कलाकार हि देखील एक स्वतंत्र व्यक्ती आहे आणि त्यांची राजकीय मते असणे साहजिक आहे असं बोललं जात असलं, तरी कलाकारांच्या राजकीय पोस्टवरून किंवा मतांवरून मोठा गदारोळ उठत असतो. होता. त्यांची मतं चूक की बरोबर हि गोष्ट वेगळी पण त्यांना तो मांडण्याचा अधिकार आहे हे नक्की.

याचा अर्थ असा आहे का की कलाकार आपली राजकीय मते पहिल्यांदाच मांडत आहेत. तर तसं नाही. यापूर्वी देखील कलाकारांनी आपली राजकीय भूमिका अगदी थेट मांडली होती. आणि तत्कालीन सरकारला कितीही कडू वाटलं तरी त्यांनी ती मते मांडू दिली होती.

सत्तरच्या दशकातला काळ.  

जगातल्या सर्वात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठी सिनेमाची निवड झाली होती

‘ सामना ‘

सामना हा चित्रपट मराठी सिनेमा विश्वातला मैलाचा दगड म्हणता येईल इतका अत्युच्च दर्जाचा होता. ज्यावेळी दिग्गज लोकांची भट्टी जमून येते तेव्हा अद्भुत काहीतरी निर्माण होते, तसंच घडलं ते सामनाच्या बाबतीत.

लेखक विजय तेंडुलकर, दिग्दर्शक डॉ.जब्बार पटेल, निर्माते रामदास फुटाणे आणि अभिनयाची जुगलबंदी असलेले निळूभाऊ आणि डॉ. श्रीराम लागू. हा चित्रपट महाराष्ट्रात रिलीज झाला तेव्हा भयंकर धुमाकूळ घातला. चित्रपटगृहात जाऊन चित्रपटाचे खेळ बंद पाडण्यात आले. दगडफेक, अश्रूधूर वैगरे इथपर्यंत सामना चित्रपट प्रसिद्धीस पावला होता.

ग्रामीण संस्कृतीच्या विरोधात रचलेलं कथानक आहे असे आरोप चित्रपटावर होऊ लागले. औरंगाबादच्या एका थिएटरमध्ये सामना चित्रपट चालू असताना जमाव थेटरात घुसला आणि त्यांनी थेट पडदा फाडून टाकला आणि चित्रपट बंद केला होता.

पुढे सामना हिंदीतही तयार केला गेला पण तो कधी आला आणि कधी गेला कुणालाही कळले नाही. सामनाने त्यावेळी महाराष्ट्रात धडाक्यात उसळी मारली होती. दगडफेकीपर्यंत प्रकरण गेलं म्हणून लोकं अजूनच उत्सुकतेने चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करू लागले. सामनाने व्यावसायिकरित्या बॉक्स ऑफिसवर कमाई करायला सुरवात केली होती.

सगळीकडून निळूभाऊ आणि श्रीराम लागूंवर कौतुकाचा वर्षाव होत होता. सामनाचे शो सुद्धा हाऊसफुल चालले होते. त्याच वेळी बातमी येऊन धडकली कि १९७५ सालच्या ‘बर्लिन फिल्म फेस्टिव्हल’ साठी भारतातर्फे ‘सामना’ ची निवड झाली आहे.

जगात अनेक चित्रपट महोत्सव होत असतात, पण त्यातल्या त्यात बर्लिन फिल्म फेस्टिवल हा मानाचा समजला जाणारा चित्रपट महोत्सव.

संपूर्ण भारतातून सामना हा चित्रपट निवडला गेला होता आणि हा सिनेमा निवडला होता तो नर्गिस दत्त यांनी.

भारताच्या चित्रपट निवड समितीच्या अध्यक्षा म्हणून त्यांची त्यावर्षी निवड झाली होती.

नर्गिस यांचं वास्तव्य मुंबईत असल्याने त्यांना उत्तम मराठी बोलता येत असे. श्रीराम लागूंच्या नटसम्राटच्या तीनशेव्या प्रयोगाला त्या अध्यक्षा म्हणून आल्या होत्या. ज्यावेळी नर्गिस दत्त यांनी सिनेमा पाहिला त्यावेळी त्यांना तो इतका आवडला होता कि त्यांनी हट्ट करून भारतातला त्या वर्षीचा ऑल टाइम हिट चित्रपट म्हणून सामनाची निवड केली.

आता इथं सामनाच्या टीमने अडचण दर्शवली कि पण चित्रपट तर प्रादेशिक भाषेत आहे , परदेशातल्या व्यक्तींना कुठे मराठी कळणार आहे ?

त्यावर नर्गिस दत्त यांनी सांगितलं कि,

प्रादेशिक भाषेत असला म्हणून काय झालं ? कुठल्याही इंग्रजी चित्रपटाला सब टायटल्स असतातच कि !

पहिल्यांदाच एखादा मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय महोत्सवात दाखवला जाणार होता. नर्गिस दत्त यांनी जब्बार पटेल, निळूभाऊ, श्रीराम लागू आणि रामदास फुटाणे यांच्यासोबत एक अधिकारी पाठवून त्यांची व्यवस्था बर्लिन फिल्म फेस्टिव्हल साठी केली.

अगदी तिकीट मिळवण्यापासून प्रत्येक गोष्टीला संघर्ष करावा लागला. ते निघणार त्या दिवशीच इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली. मात्र या सगळ्या घडामोडीतही सामनाची टीम बर्लिनला सुखरूप दाखल झाली.

नर्गिस दत्त आणि सुनील दत्त हे अगोदरच बर्लिनला पोहचले होते. बर्लिन फिल्म फेस्टिव्हल मध्ये सामना दाखवण्यात आला. प्रेक्षकांमध्ये बसून निळूभाऊ आणि लागू यांनी चित्रपट पाहिला. सिनेमा संपल्यावर स्टेजवर टाळ्यांच्या कडकडाटात सामनाच्या टीमचं स्वागत झालं.

नर्गिस दत्त यांनी हा मराठी सिनेमा चित्रपट महोत्सवात झळकवण्यासाठी इतके प्रयत्न केले पण बर्लिनमध्ये त्यांना हा चित्रपट पाहता आला नाही. कारण सुनील दत्त आणि नर्गिस दत्त हे ट्राफिक जॅम मध्ये अडकले होते. पण त्यांनी तिथेही सामनाच्या चमूचं अभिनंदन केलं.

नर्गिस व सुनील दत्त त्यांचा पाकिस्तानचा मित्र अयूब यांच्या घरी राहात होते. तेथे नर्गिस यांनी ‘सामना’ च्या सन्मानार्थ खास भोजन ठेवले होते. सर्व जेवण नर्गिस यांनी स्वतः तयार केले होते. फक्त नान कलकत्ता रेस्टॉरंटमधून मागविले होते. पार्टीत भारतीय वकिलातीतील काही सरकारी अधिकारीही हजर होते.

रामदास फुटाणे तेव्हाची आठवण सांगताना म्हणतात,

आणीबाणीचा काळ असल्यामुळे या पार्टीमध्ये काय बोलावं व काय बोलू नये याबद्दल इतर कलाकार थोडे जागरूक होते. पण निळूभाऊ म्हणजे निळूभाऊ.  त्यांनी दोन पेगनंतर पाठीचा कणा ताठ केला. तोंडात सिगरेट ठेवली. डाव्या हाताचे बोट डाव्या नाकपुडीवर ठेवले उजवी नाकपुडीवर ओढली व पुन्हा पाठीत बाक घेऊन बावन्नसाली डॉ. राम मनोहर लोहिया काय म्हणाले हे सुरू केले,

 हळू हळू काँग्रेस व नोकरशाहीची धुलाई सुरू झाली. रामदास फुटाणे यांनी निळूभाऊंना आवरण्याचा प्रयत्न केला तेव्हा सुनील दत्त म्हणाले, 

“रामदास, उन्हें बोलने दो.. वो सही बोल रहे हैं।” 

फुटाणे गप्प झाले. नंतर निळूभाऊंनी सर्व मैफल हातात घेतली. या देशाची स्थिती व काँग्रेसनीती, नेत्याचे जगणे यातील फरक स्पष्ट केला. सिगरेटबरोबरच सरकार व सरकारीबाबू यांची ‘राख’ ते झाडत होते. त्यांना ज्यांनी जर्मनीला आणलं ते नर्गिस व सुनील दत्त कान लावून ऐकत होते. त्यांचे काँग्रेस प्रेम सर्वानाच ठाऊक होते. नर्गिस या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या अगदी जवळच्या व्यक्तींपैकी एक होत्या.

मात्र तरीही त्यांना निळूभाऊंचा हिंदुराव धोंडेपाटील खूपच आवडला होता. परंतु त्याहीपेक्षा निळूभाऊंच्या समाजवादी विचाराने त्या भारावून गेल्या होत्या. निळूभाऊ फुले यांनी आणीबाणीचा केलेला विरोध, त्यांची काँग्रेस टीका दत्त दाम्पत्यानं अगदी खिलाडू वृत्तीने घेतली. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.