आझाद हिंद सेनेच्या पहिल्या महिला हेराने देशप्रेमाखातर स्वतःच्याच पतीची हत्या केली होती….

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या सुभाषचंद्र बोस यांची आझाद हिंद सेना हि आघाडीवर होती. आक्रमक धोरण स्वीकारून आझाद हिंद सेनेने ब्रिटिशांची झोप उडवली होती. या आझाद हिंद सेनेत महिला वीरांगनासुद्धा सहभागी होत्या. या महिला विरांगणांपैकी एक होत्या नीरा आर्या. नीरा आर्या यांचं योगदान इतिहासाच्या पानांमध्ये खूप मोठं आहे मात्र त्यावर कोणाची नजर गेली नाही त्यामुळे त्यांच्या योगदानाबद्दल जाणून घेऊया.

आझाद हिंद सेनेतील राणी झाँसी रेजिमेंटमध्ये नीरा आर्या प्रमुख शिपाई म्हणून कार्यरत होत्या. त्यांना नीरा नागिणी या नावानेसुद्धा ओळखलं जायचं. निराचे बंधू वसंतकुमार हेसुद्धा आझाद हिंद सेनेत सहभागी होते. ५ मार्च १९०२ साली उत्तरप्रदेशातल्या खेकडा या गावात झाला. वडिलांचा मोठा व्यापार होता आणि देशभर पसरलेला होता, कोलकता हे त्यांचं व्यापाराचं प्रमुख केंद्र होतं.  त्यामुळे निराचं शिक्षण हे कोलकाता येथेच झालं.

नीरा इंग्रजी, हिंदी आणि बंगाली भाषेत मास्टर होत्या. पवित्र मोहन रॉय हे तेव्हा आझाद हिंद सेनेच्या गुप्तचर या विभागाचे प्रमुख होते. पण आझाद हिंद सेनेच्या पहिल्या महिला हेराचा मान नीरा आर्य यांना जातो. नीरा यांना हेरगिरीच्या जबाबदारी स्वतः नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिली होती.

नीरा आर्य यांचं लग्न झालं ते श्रीकांत जयरंजन दास यांच्यासोबत. श्रीकांत हे ब्रिटिश आर्मीमध्ये सीआयडी ऑफिसर होते आणि ब्रिटिश सरकारमध्ये त्यांना मानाचं स्थान होतं, पण नीरा यांना याबद्दल चीड होती. त्यामुळे त्या आझाद हिंद सेनेत सहभागी झाल्या. इंग्रजांनी हि संधी बघून एक कट रचला.

श्रीकांत जयरंजन दास यांना ब्रिटिशांनी हुकूम केला कि सुभाषचंद्र बोस यांच्यावर नजर ठेवून त्यांची हत्या करावी. नीरा आर्य या एक देशभक्त महिला होत्या. देशासाठी त्यांनी आझाद हिंद सेनेत सहभाग घेतला होता. सुभाषचंद्र बोस यांची हेरगिरी करताना श्रीकांत जयरंजन दास यांनी सुभाषबाबूंवर गोळ्या झाडल्या पण सुदैवाने त्यातून बोस बचावले. याच वेळी सुभाषचंद्र बोस यांना वाचवण्यासाठी नीरा आर्य यांनी स्वतःच्याच पतीची चाकू भोसकून हत्या केली.

आझाद हिंद सेनेच्या शरणागतीनंतर नोव्हेम्बर १९४५ ते मे १९४६ या काळात लाल किल्यावर खटला भरला. बऱ्याच आरोपीना यातून सुटका मिळाली पण नीरा आर्य यांना पतीची हत्या करण्याच्या आरोपात काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. अंदमानच्या सेल्युलर जेलात त्यांना डांबण्यात आलं. या काळात ब्रिटिश सैनिकांनी निरा आर्य यांना अतिशय हीन वागणूक दिली. जेलमध्ये अनेकदा त्यांना त्रास दिला.

सेल्युलर जेलमध्ये नीरा आर्य यांच्यासमोर प्रस्ताव ठेवण्यात आला कि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा ठावठिकाणा सांगितला तर सोडून देण्यात येईल. निराने याला प्रत्युत्तर म्हणून सांगितलं कि सुभाषबाबूंचं निधन विमान दुर्घटनेत झालं आहे. जेलरने सांगितलं कि तू खोटं बोलत आहेस, बोस जिवंत आहेत. नीराने निडरपणे सांगितलं कि हो ते जिवंत आहेत, माझ्या काळजात ते जिवंत आहेत.

जेलरला या गोष्टीचा राग आला आणि त्याने निराचे कपडे फाडले आणि एका बाजूचं स्तन कापून टाकलं. बराच छळ नीरा आर्य यांचा करण्यात आला. पण त्या घाबरल्या नाहीत. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर हैद्राबादमध्ये फुल विकण्याचा व्यवसाय नीरा आर्य करू लागल्या. एका साध्या झोपडीत त्या राहत होत्या आणि कुठलीही पेन्शन त्यांनी स्वीकारली नाही. पुढे त्यांची झोपडी सरकारी अतिक्रमणात काढून टाकण्यात आली.

२६ जुलै १९९८ साली हॉस्पिटलमध्ये नीरा आर्य यांचं निधन झालं. हैद्राबादच्या महिला त्यांना पेदम्मा म्हणून हाक मारायच्या. आझाद हिंद सेनेतील महत्वाच्या हेर असलेल्या नीरा आर्य यांचं योगदान मुळीच विसरता येणार नाही.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.