ती अशी एकमेव मुलगी आहे जिला भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशातून शौर्य पुरस्कार मिळाले.

५ सप्टेंबर १९८६ पॅन अमेरिकन एअरवेजचे फ्लाईट ७३ हे विमान मुंबई वरून न्यूयॉर्कला निघाले होते. या फ्लाईट दरम्यान पाकिस्तानातील कराची व जर्मनीतील  फ्रँकफर्ट असे दोन स्टॉप होते. रात्री मुंबईहून निघालेले विमान कराचीला पहाटे ४.३० वाजता पोहचले. विमानात ३८० प्रवासी व १३ क्रू मेम्बर होते.

कराचीला काही प्रवासी उतरले. पाकिस्तानमधून अमेरिकेला निघालेले प्रवासी विमानात स्थानापन्न होत होते अचानक कळालं की हे विमान अतिरेक्यांनी हायजॅक केलं आहे. अबू निदाल या संघटनेच्या चार अतिरेक्यांनी बंदुकीच्या धाकावर हे विमान अपहरण केले होते. 

इस्रायलकडून होत असलेल्या पॅलेस्टाईनवरील अन्यायाचा निषेध म्हणून त्यांनी हे विमान अपहरण केलं होतं. त्या आत्मघाती अतिरेक्यांचा इस्रायल मधल्या एका बिल्डिंग हे विमान धडकवण्याचा विचार होता. विमान फ्रँकफर्टच्या दिशेने टेक ऑफ करतच होते इतक्यात या अपहरणाची माहिती फ्लाईट क्रू मधल्या एका मुलीने कोडवर्ड द्वारे कॉकपीट मध्ये पायलटला दिली.

कॉकपीटमधील पायलट व इतर क्रू मेम्बर तिथल्या दरवाजाचा वापर करून पळून गेले. आता अतिरेक्यांकडे हायजॅक केलेले विमान तर होते पण ते उडवू शकेल असा पायलट नव्हता.

हि समयसूचकता जिने दाखवली ती विमानाची सिनियर पर्सर अटेन्डन्ट होती नीरजा भानोत

फक्त २३ वर्षांची नीरजा मूळची चंदीगडची. तिचे वडील हरीश हे मुंबईमधले एक पत्रकार होते. तिचं संपूर्ण शिक्षण चंदीगडमधील ‘सेक्रेड हार्ट सेकंडरी स्कूल’, मुंबईमधील बॉम्बे स्कॉटिश स्कूल व सेंट झेविअर्स महाविद्यालय यांमधून झाले होते.

तिने काही काळ मॉडेलिंग देखील केलं होत. बऱ्याच टीव्ही व वर्तमानपत्र जाहिरातीत तिचा चेहरा झळकायचा.

मार्च १९८५ मध्ये तिचे लग्न झाले व ती तिच्या पतीसोबत गल्फमध्ये स्थायिक झाली होती. पण हुंड्याच्या दबावामुळे ती दोन महिन्यांतच माहेरी मुंबईला परत आली. नंतर तिने पॅन ॲम कंपनीत विमान खानपान सेविका (पर्सर) म्हणून दाखल झाली.

त्या दिवशी विमान हायजॅक प्रकरणात तिच्या हुशारीमुळेच अतिरेक्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरल गेलं. पायलट नसल्यामुळे त्यांचे पंख कापल्या सारखं झालं होतं. अतिरेक्यांनी पाकिस्तान सरकारला एका पायलटची मागणी केली. पण तत्कालीन पाकिस्तान सरकारने चक्क ती मागणी फेटाळली. तेव्हा संतापलेल्या अतिरेक्यांनी सरकार वर दबाव आणण्यासाठी प्रवाश्यांना मारायची धमकी दिली.

योगायोगाने त्यांना एक प्रवासी अमेरिकी नागरिक असल्याचं कळलं. आपलं म्हणणं खरं करून दाखवण्यासाठी त्यांनी त्या प्रवाशाला गोळ्या घालून ठार केले. 

संपूर्ण विमानात घरबराहटीचे वातावरण पसरले. अनेकांना आपला शेवट आल्यासारखं वाटत होतं. अतिरेक्यांचे टार्गेट अमेरिकन नागरिक होते. त्यांनी नीरजाला सर्व प्रवाश्यांचे पासपोर्ट गोळा करायला सांगितले.  तिच्या लक्षात आलं कि या पासपोर्टचा वापर करून ते अमेरिकन प्रवाश्यांचा वापर पाकिस्तान आणि अमेरिकेवर दबाव टाकण्यासाठी करणार होते.

निरजाने पासपोर्ट गोळा केले पण शिताफीने त्यातील ५ अमेरिकन प्रवाश्यांचे पासपोर्ट तिने त्यांच्या सीट खाली लपवून ठेवले आणि उरलेल्या प्रवाशांचे पासपोर्ट अतिरेक्यांना दिले. त्यातील एक विमान प्रवासी ब्रिटिश नागरिक होता. तेव्हा एका अतिरेक्याने पायलट मिळावा म्हणून त्याला मारायचं व पाकिस्तान सरकारवर दबाव आणायचं ठरवलं.

पण नीरजाने त्या अतिरेक्याला समजावून सांगितलं. तिच्याच मुळे त्या ब्रिटिश प्रवाशाचे प्राण वाचले.

असेच कित्येक तास गेले. काही वेळाने नीरजाच्या लक्षात आले की असच चालू राहिलं तर विमानातील इंधन संपून पूर्ण अंधार होईल. या परिस्थितीचा फायदा उठवायचा असे नीरजाने ठरवले. तिने एक योजना आखली, प्रवाशांना जेवण जेवण देण्याच्या बहाण्याने विमानातील इमर्जन्सी गेटबद्दल माहिती देणारी पत्रक प्रवाश्यांपर्यंत पोहोचवली.

तिचा अंदाज होता तसंच घडलं, थोड्या वेळाने विमानातील इंधन संपले आणि विमानात पूर्णे अंधार पसरला. या परिस्थितीचा फायदा घेऊन नीरजाने विमानाचे सर्व आपत्कालीन दरवाजे उघडले. प्रवाश्यांनी देखील पटापट विमानाबाहेर उड्या मारल्या.

अतिरेक्यांच्या लक्षात ही गोष्ट येताच त्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला. काही जणांना गोळ्या लागल्या पण ते बचावले. सर्व प्रवासी विमानातून बाहेर पड़ेपर्यंत धाडसी नीरजा विमानात थांबली होती. ती विमानातून बाहेर पडणार एतक्यात तिला एका लहान मुलांचा रडण्याचा आवाज ऐकायला आला. एव्हड्या वेळात पाकिस्तानी कमांडोज पण विमानाच्या आत पोहोचले होते. त्यांनी त्या चार अतिरेक्यांपैकी तिन जणांना मारून टाकले.

नीरजा त्या मुलांना शोधून विमानाच्या बाहेर पडत होती तेवढ्यात तो चौथा अतिरेकी नीरजाच्या समोर आला. नीरजाने त्या मुलांना इमर्जन्सी एक्झिटमधून बाहेर फेकून दिले आणि त्या अतिरेक्याने झाडलेल्या गोळ्या अंगावर घेतल्या. यातच नीरजाचा शेवट झाला.

निरजाने दाखवलेले साहस अतुलनीय होते. तिच्याच पराक्रमामुळे अन समयसूचकतेमुळे  ४०० जणांचा जीव वाचला होता. तिच्या या शौर्याचं कौतुक भारताचं नाही तर जगभरात झालं. त्यावर्षीचा भारत सरकार तर्फे दिला जाणारा नागरी शौर्याचा सर्वोच्च पुरस्कार ‘अशोक चक्र’ हे निरजाला देण्यात आलं.

इतकंच नाही तर अमेरिकेतर्फे त्यांच्या नागरिकांचा जीव वाचवल्याबद्दल जस्टिस फॉर व्हिक्टम ऑफ क्राईम ॲवार्ड हा वीरता पुरस्कार देण्यात आला. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे पाकिस्तान सरकारने देखील  तमगा-ए-इन्सानियत हा सर्वोच्च पुरस्कार मरणोत्तर निरजा भानोतच्या पराक्रमाला अर्पण केला.

भारत पाकिस्तान व अमेरिकेचा शौर्य पुरस्कार मिळवणारी निरजा हि जगातली एकमेव व्यक्ती ठरली. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे याच निरजा भानोतच्या पराक्रमावर गेल्या काही वर्षांपूर्वी बनलेला निरजा हा सिनेमा सध्याच्या पाकिस्तानी सरकारने रिलीज होऊ दिला नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.