ती माफी मागायची नाही म्हणून निरुपम यांनी सामनाला रामराम ठोकला

शिवसेना म्हणजे सामना आणि सामना म्हणजे शिवसेना असे समीकरण आहे. २३ जानेवारी १९८९ ला शिवसेनेचे मुखपत्र म्हणून सामनाचा जन्म झाला. संपादक स्वतः बाळासाहेब ठाकरे तर कार्यकारी संपादक अशोक पडबद्री. आपली भाषा जहाल असेल, त्यात ठाकरी स्टाईल असणारच आहे त्यांनी आधीच स्पष्ट केले. रोज घडणाऱ्या घडामोडींवर आणि मराठी माणसाच्या मुद्द्यावर बाळासाहेब अग्रलेखातून आपले मत व्यक्त करु लागले.

त्याच दरम्यान १९८८च्या आसपास दिल्लीमधून मुंबईत ‘जनसत्ता’ वृत्तपत्राच्या सिनेपत्रकारितेची जबाबदारी घेऊन एक बिहारचा २३ वर्षाचा तरुण दाखल झाला. संजय ब्रिजकिशोर निरूपम असं त्या युवकाचं नाव.

सिनेक्षेत्रातील बातम्या करताना त्यांची ओळख शत्रुघ्न सिन्हा यांच्याशी झाली. त्यांच्या माध्यमातून निरूपम बाळासाहेब ठाकरेंना भेटले. त्यावेळी ‘सामना’ नुकताच सुरू केला होता.

हळू हळू बाळासाहेब आणि निरुपम यांच्यातील सलोखा वाढत गेला. एक दिवस धाडस करून निरुपमांनी मुंबईमधील अमराठी लोकांपर्यंत पोहचण्यासाठी हिंदीत वृत्तपत्र सुरू करायची कल्पना बाळासाहेबांना सुचवली. शिवसेनेची प्रतिमा तेव्हा उत्तर भारतीय विरोधी अशी झाली होती. त्यांनाही ती बदलण्यासाठी कोणी व्यक्ती हवीच होती, त्यामुळे ही कल्पना आवडली. आणि १९९३ मध्ये ‘दोपहर का सामना’ हे सामनाचे हिंदी एडिशन सुरु झाले.

बाळासाहेबांनी कार्यकारी संपादकपदाची जबाबदारी संजय निरुपम यांनाच दिली.

निरूपम मूळचे संघाच्या विचारांचे. ते पत्रकारितेच्या सुरुवातीला संघाच्या ‘पांचजन्य’ या मुखपत्रासाठी बिहारमधून काम करायचे. एस.पी.सिंग यांनी त्यांना मुख्य प्रवाहात आणले. तिथून दिल्ली आणि नंतर मुंबईत जनसत्ताचा प्रवास करत ते सामनाचे कार्यकारी संपादकपदी रुजू झाले.

त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली इथूनच. हिंदी सामनाचे संपादक झाल्यानंतर आपसूकच त्यांचं मुंबईच्या राजकारणात पदार्पण झालं. निरुपम यात एक सदर लिहायचे आणि त्यात राजकारणी, हिंदी लेखक, साहित्यिक, पत्रकार यांच्यावर सडकून टीका करायचे.

९० च्या दशकात ठाकरेंचा हिंदुत्ववाद आणि उत्तर भारतीयांचे मुद्दे यांना एकत्र आणत त्यांनी शिवसेनेतलं आपलं वजन वाढवले.

त्यांनी शिवसेनेला हिंदी भाषकांमध्ये चांगल्या प्रमाणात पोहोचवले.

राजकारणात प्रवेश

‘दोपहर का सामना’ पासूनच निरुपम यांच्या राजकीय आकांक्षा वाढीस लागल्या.

यातूनच ते आपल्या भाषणामधून शिवसेनेतील पहिल्या फळीतील नेते बनले. फायरब्रांड शिवसैनिक झाले. बाळासाहेब ठाकरेंच्या जवळ गेले, बाळासाहेबांनीही त्यांना जवळ केले. अनेकदा जाहिरपणे ते निरुपमांना आपला दत्तक पुत्र मानायचे.

सोबतच दिल्लीत शिवसेनेची बाजू भक्कम मांडण्यासाठी आपला नेता हवा यासाठी त्यांना १९९६ मध्ये पहिल्यांदा राज्यसभा खासदार बनवण्यात आले. पुढे २००२ मध्ये त्यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यात आले. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना वायव्य मुंबईतून सुनील दत्त यांच्या विरोधात तिकीट दिले. पण त्यावेळी निरुपम फक्त ४७ हजार ३५८ मतांनी पराभूत झाले. 

पण अद्यापही कार्यकारी संपादकपदी निरुपमच होते.

वर्ष २००५. शिवसेना आणि भाजपची युती होती. पण तरीही त्यांची लेखणी भाजपच्या विरोधात सहज चालत होती. तत्कालीन भाजपचे नेते प्रमोद महाजन यांच्याशी निरुपम यांचा छत्तीसचा आकडा होता. महाजांना कोंडीत पकडायला संजय निरुपम एकही संधी सोडत नव्हते.

अशातच देशभरात खळबळ माजवणारे रिलायंस इंफोकॉमच्या शेयर घोटाळ्याचे प्रकरण बाहेर आले. जेव्हा या शेअर्सचे वाटप झाले होते, तेव्हा केंद्रीय दूरसंचार मंत्री होते प्रमोद महाजन. त्यांच्या जवळच्या व्यावसायिकाला चुकीच्या पद्धतीने शेअर दिल्याचा ठपका महाजनांवर होता.

संजय निरुपम यांनी ही संधी सोडली नाही. आपला मोर्चा सरळ प्रमोद महाजनांच्या विरोधात वळवला होता. ‘दोपहर सामना’ मधून प्रमोद महाजन यांच्यावर सरळ टीका करायला सुरुवात केली.

प्रमोद महाजनांनी ही तक्रार बाळासाहेबांकडे नेली. त्यातून तणावाचे प्रसंग निर्माण झाले. तसेच शिवसेनेतल्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांशी त्यांचे वाद झाले. पण २००५ पर्यंत शिवसेना बदलली होती. बाळासाहेब ठाकरेंसोबत पक्षात आता उद्धव ठाकरेंचाही शब्द चालत होता.

प्रमोद महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर दबाव टाकयला सुरवात केली. संजय निरुपम यांच्या लेखणीला सामनामधून ब्रेक देण्यात यावा यासाठी हलक्या आवाजात चर्चा सुरु झाली होती. नंतर उद्धव ठाकरेंच्या काळात कोअर टीममध्ये निरुपम नव्हते.

अखेर ९ मार्च २००५ रोजी उद्धव ठाकरे यांनी संजय निरुपम यांना प्रमोद महाजन यांची सार्वजनिकरित्या माफी मागण्यास सांगितली.

पण संजय निरुपम यांच्या म्हणण्यानुसार ते हाडाचे पत्रकार आणि कडक स्वभावाचे असल्याने त्यांनी माफी मागण्यास नकार दिला. यानंतर त्यांनी कार्यकारी संपादक पदाचा राजीनामा दिला आणि शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. बिहारमधून आलेल्या हिंदी भाषिक पत्रकाराने शिवसेनेच्या मुखपत्राचे कार्यकारी संपादक बनून दाखवले होते.

कॉंग्रेसमध्ये गेल्यावर त्यांना २००९ मध्ये लोकसभेचे तिकीट देण्यात आले. त्यामध्ये त्यांना विजय मिळाला. मात्र २०१४च्या निवडणुकीत भाजपच्या गोपाल शेट्टी यांच्याकडून जवळपास २ लाख मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्षपद देण्यात आले. पण सततच्या पराभवानंतर २०१७ मध्ये त्यांनी राजीनामा दिला. २०१९ मध्ये देखील त्यांचा शिवसेनेच्या गजानन किर्तीकर यांच्याकडून पराभव झाला होता. यानंतर ते पक्षातून साईडलाईन होत गेले.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.