निसर्ग, तौक्ते ते महापूर मदतीच्या बाबतीत कोकणाकडे दुर्लक्ष करण्यात येतय का..? 

कोकणात मागच्या दिड वर्षाच्या काळात नैसर्गिक संकटांनी ३ वेळा आघात केले आहेत. यात ३ जून २०२० रोजी ‘निसर्ग चक्रीवादळ’ त्यानंतर १५ आणि १६ मे २०२१ रोजी आलेलं ‘तोक्ते चक्रीवादळ आणि अलीकडेच आलेला महापूर आणि भुस्खलन. या सगळ्या आघातांमुळे कोकण मागच्या काळात अगदी मोडून पडलेला पहायला मिळत आहे. 

अशातच २ दिवसापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले होते, 

मी पॅकेज घोषित करणारा नाही तर मदत करणारा मुख्यमंत्री आहे.

त्यामुळेच या मोडून पडलेल्या कोकणाला पुन्हा उभं करण्यासाठी राज्य सरकारनं काय आणि कशी मदत केली हे बघणं महत्वाचं ठरत…

निसर्ग चक्रीवादळ

३ जून २०२० ला निसर्ग चक्रीवादळ कोकण किनाऱ्यावर धडकले होते. यात सगळ्यात जास्त फटका बसला तो रायगड जिल्ह्याला आणि दापोली, मंडणगड, गुहागर या तालुक्यांना. यात या भागातील घर, शेती, किनाऱ्यावरील बोटी अशा सगळ्या वस्तूंच मोठं नुकसान झालं होतं. याच वादळामुळे रायगडमधील अनेक गाव वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे जवळपास महिनाभर अंधारात होती. 

सोबतचं आंबा, काजू, नारळ, सुपारीच्या बाग जमीनदोस्त झाल्या होत्या. त्यामुळे बागायदारांचा आधारचं नष्ट झाला होता. 

त्यानंतर ५ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यात जावून या सगळ्या नुकसानीची पहाणी केली होती आणि त्याच दिवशी मुंबईला जावून त्यांनी बैठक घेतली होती. यात त्यांनी तातडीची मदत म्हणून रायगड जिल्ह्याला १०० कोटी रुपये मदतची घोषणा केली होती. तर रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७५ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी २५ कोटी रुपये मदतीची घोषणा केली होती.

पुढे ९ जून रोजी झालेल्या राज्य शासनाच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर NDRF च्या नियमांपेक्षा जास्त मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. NDRF च्या निकषांच्या वरती जो खर्च लागेल तो राज्य सरकार देणार असल्याचं सांगण्यात आलं. 

त्यानुसार पूर्ण नष्ट झालेल्या घराला दीड लाखांची मदत देण्याची घोषणा केली होती. यापूर्वी ही मदत ९५ हजार इतकी दिली जात होती. सोबतच काही प्रमाणात पडझड झाली त्यांना ६ हजाराऐवजी १५ हजारांची मदत देण्याची घोषणा केली होती. 

घरांची पडझड झाली नाही मात्र नुकसान झालं त्यांना ३५ हजारांची मदत, नुकसान झालेल्यांना १० हजारांच्या रोख रक्कमेची मदत, शेतीचं हेक्टरी नुकसान झालेल्या शेताला २५ हजाराहून ५० हजार रुपयांची मदत, सोबतचं पुढील दोन महिने मोफत धान्य देणार अशा काही मदतीची घोषणा देखील ठाकरे सरकारकडून करण्यात आली होती. 

यानुसार मदत देण्यात आली का? याबाबतबोल भिडूशी बोलताना दापोलीचे प्रांताधिकारी शरद पवार यांनी सांगितले की, 

नक्कीच याप्रमाणे मदतीचं वाटप करण्यात आलं आहे. माझ्या कार्यक्षेत्रात दापोली आणि मंडणगड असे दोन तालुके येतात. या दोन्ही तालुक्यांमध्ये मिळून तब्बल १४३ कोटी रुपयांच्या मदतीचं वाटप करण्यात आलं आहे. 

यातील जर मंडणगड तालुक्यातील सांगायचं म्हंटलं तर एकूण १०९ गावं बाधित झाली होती या गावांमध्ये जवळपास ६० कोटी रुपयांची मदत पोहचवण्यात आली आहे. यात पुर्णतः पडझड झालेली ४३० घर होती तर अंशतः पडझड झालेली १६ हजार ९२० घर होती. या सगळ्यांना सरकारकडून मदत देण्यात आली आहे असं पवार म्हणाले. 

तर नुकसान झालेल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनमधील शशिकांत देसाई म्हणाले, 

आम्हाला घराची ३५ हजार मदत मिळाली. यात आम्ही आमच्याकडील आणखी थोडे पैसे टाकून घर उभं केलं, पण आमच्या नारळ सुपारीच्या झाडांच काय? कारण एकदा पैसे देवून ती झाडं घरासारखी पुन्हा लगेचचं उभी राहतं नाहीत. एक झाड लावून ती वाढायला १० ते १५ वर्ष तरी सहज जातात. हे नुकसान भरुन न येण्यासारखं आहे. 

तोक्ते चक्रीवादळ : 

निसर्ग चक्रीवादळाला उणेपुरे एक वर्ष देखील झाले नव्हते मात्र याच कालावधीत १५ आणि १६ जून २०२१ रोजी कोकण किनारपट्टीवर तौक्ते चक्रीवादळ धडकले. या वादळामुळे देखील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे नुकसान झाले. सोबतचं जवळपास २ हजार ५०० घरांची अंशत: तर ६ घरांची पूर्णतः पडझड झाली असल्याची आकडेवारी समोर आली होती. 

यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २१ मे रोजी कोकणाचा एक दिवसीय नुकसान पहाणी दौरा केला होता. मात्र त्या दौऱ्यावर विरोधकांकडून जोरदार टीकाही झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जाहिर केले की, 

तात्पुरती घोषणा न करता आढावा घेऊन, पंचनामे करुन व्यवस्थित मदत दिली जाईल. कोणालाही मदतीपासून वंचित ठेवलं जाणार नाही. सोबतचं ज्या प्रमाणे निसर्ग चक्रीवादळावेळी निकषांच्या बाहेर जावून मदत केली होती त्याचप्रमाणे यावेळी देखील तशीच मदत देण्यात येईल. 

यानंतर मात्र जवळपास १ महिन्यानंतर म्हणजे २९ जून रोजी राज्य शासनाकडून मदतीसाठीच्या निधीला मान्यता देण्यात आली होती. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबतची माहिती दिली होती. यात बहुवार्षिक पिकांचं, घरांच अंशतः आणि पुर्णतः नुकसान, मृत जनावरांसाठी मदत, मत्स्यबोटी आणि जाळ्यांसाठी, मत्स्यबीजासाठी अशा नुकसानांची भरपाई म्हणून राज्य शासनाकडूप १७० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. यात कोकण विभागासाठी तब्बत १५२ कोटी ४८ लाख २८ हजार इतका निधी मंजूर करण्यात आला होता. 

सोबतच तो वितरीत करण्याचे निर्देश देखील त्यावेळी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रशासनाला दिले होते. 

मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याती झाराप गावचे नितीन गोलतकरबोल भिडूशी बोलताना म्हणाले, 

या १५२ कोटी रुपयांमधील आम्हाला एकही रुपया मिळाला नाही,

कारण आमच्या तलाठ्यांनी आमचा पंचनामाच केला नव्हता. एकतर आमच्याकडे ३ ते ४ गावांना मिळून एक तलाठी. त्यामुळे वादळ येण्यापुर्वी आणि वादळ येवून गेल्यानंतर ना तलाठी फिरकले, ना सरपंच ना ग्रामसेवक.  ज्यांच्या या लोकांशी ओळखी होत्या, त्यांच्याकडील पंचनामे झाले. मात्र आमच्याकडे फिरकलेच नाहीत आणि आम्ही देखील त्यांच्या या म्हणून मागं लागलो नाही. 

कारण उध्वस्त झालेल्या झाडांचे ६०/७० रुपये नुकसान भरपाई जाहीर केली होती. पण त्या ६०/७० रुपयांसाठी शेकडो हेलपाटे, शिवाय हातापाया पडावे लागेल असते ते वेगळचं. त्यामुळे भिक नको पण कुत्र आवर याचा प्रत्यय येतो. कारण नारळाचं नवीन झाड लावायचं म्हंटलं तर २०० रुपये खर्च येतो आणि नुकसान भरपाई मिळणार ६० रुपये.

महापूर 

जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात संपूर्ण कोकण आणि सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात मुसळधार पाऊस पडला. यात कृष्णा, कोयना, पंचगंगा, वाशिष्टी, सावित्री अशा नद्यांना महापूर आला होता. त्यामुळे या नद्यांच्या काठावर असलेल्या महाड, चिपळूण, कराड, सांगली, कोल्हापूर या गावांना मोठा फटका बसला होता. 

या काळात चिपळूण आणि महाडमध्ये तर तब्बल १० ते १५ फुट पाणी साचून शहर पाण्याखाली गेली होती. त्यामुळे नागरिकांचं जीवनोपयोगी सामान, गाड्या, घर याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं. 

पुढे पूर ओसरल्यानंतर शासनाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, उर्जामंत्री नितीन राऊत अशा मंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला होता. 

त्यानंतर मंत्री एकनाथ शिंदे आणि विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, पंचनामे करुन सगळ्यांना मदत दिली जाईल. मात्र तो पर्यंत तातडीची मदत म्हणून शासनाकडून ज्या घरांमध्ये आणि दुकानात पाणी शिरले त्यांना १० हजार रुपयांची मदत, तर अन्नधान्य खरेदीसाठी ५ हजार रुपयांच्या मदत करण्यात येईल. सोबतचं पुराने बाधित झालेल्या कुटुंबांना १० किलो तांदूळ, १० किलो गहू, ५ किलो तूरडाळ आआणि लिटर केरोसीन मोफत देण्यात अशी देखील घोषणा करण्यात आली होती. 

भूस्खलन/दरड कोसळणे

२२ जुलै रोजी संध्याकाळी कोकणतील मुसळधार पावसामुळे साधारण ४ च्या दरम्यान महाड मधील तळीये गावावर दरड कोसळली होती. अवघ्या १७३ कुटुंबांचं आणि ६७३ लोकसंख्येच्या या गावात दरड कोसळल्यानंतर दरडीखाली तब्बल ३५ घर दबली गेली. त्यात जवळपास ८४ जण लोक या ढिगाऱ्याखाली अडकले गेले.

सोबतचं पोलादपूर तालुक्यात देखील २ ठिकाणी भुस्खलन झालं होतं. यात साखर सुतारवाडी इथं ५ जणांचा मृत्यू झाला होता तर १६ नागरीक जखमी झाले होते. तर केवणाळे इथं ५ जणांचा मृत्यू झाला होता तर ६ नागरीक जखमी झाले होते.

यानंतर मृतांच्या वारशांना केंद्र सरकारच्या २ लाखाच्या मदतीसोबतच राज्य सरकारकडून देखील ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च शासनाकडून करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

https://www.facebook.com/dioraigad06/posts/3103237539904372

सोबतच संपूर्ण तळीये गाव पुन्हा वसवण्यासाठी म्हाडाने पुढाकार घेतला आहे.  राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून याबाबतची माहिती दिली होती.

मात्र शासनाकडून या तिन्ही संकटात कोकणाला कोणतीही मदत झाली नसल्याचा विरोधी पक्षाचा आरोप 

२२ जुलै रोजी माध्यमांशी बोलताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते,

कोकणातील परिस्थिती भीषण आहे. गेल्या वर्षभरात कोकणाला बसलेला हा तिसरा फटका आहे. यापूर्वी निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळावेळी राज्य सरकारने कोकणाला मदत केली नाही. किमान आतातरी मदत द्यावी. तसेच आवश्यक त्या सर्व यंत्रणा मदतीसाठी तयार ठेवाव्यात.

सोबतच त्यानंतर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र महापूर नुकसान पाहणी दरम्यान देखील फडणवीस यांनी हाच आरोप केला होता. ते म्हणाले होते, 

२०१९ मध्ये आम्ही अगदी रेशनकार्ड नसताना, कोणतेही कागद न मागता मोठी मदत आम्ही केली. अजून तरी कोणती मदत या सरकारने केली नाही. आमची अपेक्षा आहे की ती लवकर देण्यात यावी अशी मागणी फडणवीस यांनी केली होती.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.