प्राथमिक शाळेत शिकवणारा ‘निसिथ प्रामाणिक’ मोदींच्या कॅबिनेट मधला सर्वात तरुण मंत्री बनलाय.

कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला. मीडियात नवनियुक्त मंत्र्यांच्या बातम्या, किस्से छापून आले. कोण काय होता, कोण काय झाला, असलं बरंच काय काय. या मंत्रिमंडळात असणारे मंत्री बऱ्यापैकी राजकीय पार्श्वभूमी असलेले मंत्री आहेत. पण एक असा हि मंत्री आहे जो प्राथमिक शाळेत शिकवणारा शिक्षक आणि सर्वात तरुण मंत्री झालाय…

निसिथ प्रामाणिक  

बंगालच्या राजबंशी समाजातून असणारे निसिथ प्रामणिक पश्चिम बंगालच्या कूचबिहार मतदारसंघातून खासदार आहेत. आणि आता त्यांची वर्णी कॅबिनेट मंत्री म्हणून लागली आहे. १७ जानेवारी, १९८६ रोजी जन्मलेले ३५ वर्षाचे निसिथ प्रामणिक आजच्या घडीला सर्वात तरुण आणि कूचबिहार मतदारसंघातले  पहिले केंद्रीय मंत्री आहेत.

कूचबिहारमध्ये निसिथ प्रामणिक यांची ओळख खासदार आणि मंत्र्यापेक्षा एक शिक्षक म्हणूनच आहे. राजकारणात येण्याआधी निसिथ यांनी प्राथमिक शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून काम केलं होत. निसिथ यांनी बीसीएची डिग्री घेतली आहे.

निसिथ प्रामणिक यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात तृणमूल कॉंग्रेसमधून सुरू केली. तृणमूल कॉंग्रेसमध्ये त्यांची ओळख सुशिक्षित युवा नेत्याची होती. पण त्यांच्या या प्रतिमेला छेद देणारे अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. तृणमूलमूळ पुढं आलेल्या निसिथ प्रामाणिक यांनी २०१८ मध्ये तृणमूलला सोडचिट्ठी दिली.

मागे झालेल्या पंचायत निवडणुकीत निसिथ प्रामणिक यांनी तृणमूल कॉंग्रेसच्या विरोधात ३०० हून अधिक उमेदवार उभे केले होते. विशेष म्हणजे यापैकी बऱ्याच उमेदवारांनी निवडणुकाही जिंकल्या. पुढं दिनहाता विधानसभा मतदारसंघातून निसिथ यांनी निवडणूक लढवली आणि जिंकली ही.

त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकी आधी पश्चिम बंगालमध्ये भाजप आपली पाळंमुळं पसरविण्याचा प्रयत्न करीत होती. त्या दरम्यान भाजपाची नजर या तेज-तर्रार युवा नेत्यावर पडली. पार्टीच्या नेत्यांनी हे हेरलं होतं कि, निसिथमुळं लोकसभा निवडणुकांमध्ये पक्षाला बरीच लांब उडी घेता येईल. वेळ न दवडता, भाजपाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत निसिथ प्रामणिक यांना तिकीट दिलं आणि आपल्या बाजूला वळवून घेतलं.

भाजपकडून तिकीट मिळाल्यानंतर निसिथ प्रामणिक यांनी स्वत:ला सिद्ध केलं. कूचबिहार सारख्या महत्त्वाच्या मतदार संघाची जबाबदारी निसिथ प्रामणिक यांना देण्यात आली. एकेकाळी तृणमूलचा गड मानला जाणाऱ्या या कुचबिहारला खिंडार पाडायची योजना भाजपानं आखली. आणि निसिथच्या क्षमतेच्या बळावर, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेसचे प्रबळ उमेदवार परेश चंद्र अधिकारी यांचा निसिथ प्रमणिक यांनी पराभव केला.

निसिथच्या या विजयानं भाजपनं देखील आश्चर्यानं तोंडात बोट घातली. आणि याचमुळं आता मोदींच्या मंत्रिमंडळात निसिथ प्रामणिक यांचा प्रवेश झालायं. वरवर सोप्प दिसतं असलं तरी निसिथच्या मंत्रीमंडळातल्या  प्रवेशावरुन भाजपाला अजूनही बंगालमध्ये सक्रिय राहण्याची इच्छा आहे हेच दिसून येतयं.

हे हि वाचा भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.