आमदारांना पळविणारी निता ट्रॅव्हल्स नेमकी कोणाच्या मालकीची ? निता अंबानी की राज ठाकरे यांची

शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर अनेक समर्थक आमदारांसह त्यांचा मुक्काम सुरतच्या ले मॅरिडियन हॉटेल मध्ये होता. दिवसभरात घडलेल्या घडामोडी नंतर आमदारांना सुरतवरून थेट गुवाहाटी हलविण्यात आलंय.

टीव्हीवर या घटनेचं एका एका गोष्टीचं लाइव्ह टेलिकास्ट करण्यात येतंय. हॉटेल मधून विमानतळावर आमदारांना खासगी बस मधून नेण्यात आले. ती खासगी बस होती नीता ट्रॅव्हल्सची. आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रत दिसणारी नीता ट्रॅव्हल्स गुजरातमध्ये देखील दिसली.

नेहमी निता ट्रॅव्हल्स बद्दल एक चर्चा होत असते. काही जण म्हणतात की, या ट्रॅव्हल्सचे मालक राज ठाकरे आहेत तर काही जण निता अंबानी यांच्या मालकीची असल्याचा सांगतात.  

यामुळे आम्ही तुम्हाला निता ट्रॅव्हल्स नेमकी कोणच्या मालकीची आहे हे सांगणार आहोत.

राज ठाकरे यांचे नाव का ?

याच कोणतच ठोस कारण नाही. राज ठाकरेंच्या पत्नींच नाव शर्मिला ठाकरे तर मुलीच नाव उर्वशी ठाकरें. निताच काय तर नुसत्या “ता” या अक्षराचा देखील राज ठाकरेंशी दूरदूरचा संबध नाही. त्यांच्या घरात कोणी निता नावाचं नाही हे खरच सांगतोय. मग दोन चार जणांना विचारलं तूला निता ट्रव्हल्स राज ठाकरेंची आहे अस का वाटतं तेव्हा एकाने खतरनाक कारण सांगितलं, तो म्हणाला राज ठाकरेंच्या पक्षाच काहीही काम असलं की तिथं निता ट्रॅव्हल्स हमखास असते.

मध्यंतरी मुंबई महानगरपालिकेच्या निकालानंतर मनसेचे नगरसेवक फोडाफोडीच काम चालू होतं. तेव्हा मनसेनं सगळ्या नगरसेवकांना ट्रॅव्हल्समधून गोव्याला नेलं होतं. ती ट्रॅव्हल्स पण निता होती. त्यांच्या घरची ट्रॅव्हल्स असल्यासारखं काम चालतं. म्हणून. 

या पलिकडे काहीच नाही. आत्ता निता ट्रॅव्हल्स राज ठाकरेंची मनसे वापरत जरी असली तरी यावरून कंपनी त्यांची होतं नाही. तस असतं तर आज आम्ही जिओ वापरतो म्हणून अंबानी आमचेच म्हणलो असतो. 

असो राज ठाकरेंची कंपनी असल्याची अफवा आहे त्याला फक्त इतकच कारण. खळ खट्याक. 

ही कंपनी निता अंबानींची आहे का ? 

ही अफवा पसरवणाऱ्यांचे विचार किती दळभद्री असतील बघा.

म्हणजे वैचारिक श्रीमंती नावाची गोष्ट असते. कस किमान माणसाने विचार तरी मोठ्ठे ठेवावेत. अहो निता अंबानी. कळत का किती मोठ्ठ नाव आहे ते. अहो BSNL रद्दीत काढून जिओ चालू करायच्या बातम्या ज्यांच्या नावाने पेरल्या जातात, ज्या बच्चनला आपल्या पोरीच्या लग्नात वाढप्याच काम करायला लावतात, जमीनीवर बसून रनबीर आणि आलिया भट्ट जिथं जेवण करतात अशी माणसं ट्रॅव्हल्सची फक्त एक कंपनी चालवतील. आणि ती पण स्वत:च नाव टाकून.

हा विचार जरी तुमच्या मनात येत असला तर तुम्ही इंदूरीकर महाराजांच एक्स्ट्रा किर्तन ऐकण्याची गरज आहे. सरळ सांगतो निता अंबानी आणि निता ट्रॅव्हल्सचा कोणताच संबध नाही. अन् आम्ही हे सांगतोय म्हणून मान्य करायचं. याचा पुरावा द्यायला आम्हाला वेळ नाही. 

आत्ता शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न, मग निता ट्रॅव्हल्स कुणाची ? 

निता ट्रॅव्हल्सच्या मालकाच नाव आहे सुनिल सावला. सुनिल सावला हे मुंबईचे. मुळचे बिझनेसमॅनच. २००० मध्ये त्यांनी निता ट्रॅव्हल्सची स्थापना केली. निता टूर अँड ट्रॅव्हल्स अस त्यांच्या कंपनीच नाव. या कंपनीची मुख्य ऑफिसेस मुंबई आणि पुण्यात आहेत. पुणे हैद्राबाद, पुणे बंगलुरू, शिर्डी हैद्राबाद, राजकोट मुंबई, मुंबई दिल्ली अशा खूपसाऱ्या मार्गावर निता ट्रॅव्हल्स सर्व्हिस देते. कंपनीच्या मालकीच्या स्वत:च्या अशी तीनशेहून अधिक बसेस आहेत.  

त्यांचा वार्षिक टर्नओव्हर ३१ कोटी असल्याच सांगण्यात येत. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गोवा, कर्नाटक, गुजरात, राजस्थान अशा राज्यातं बससेवा दिली जाते. राज्यातल्या १७० ठिकाणी बससेवा असून यात वाढ करण्याच कंपनीच लक्ष असल्याचं सुनिल सावला यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. 

विषय संपला खळ खट्याक. 

हे ही वाच भिडू. 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.