नितीन गडकरींनी कंपल्सरी केलेल्या एअर बॅगचा शोध एका नेव्ही अधिकाऱ्यानं लावलाय

‘गाडीचा भीषण अपघात, अमुक-अमुक जणांचा मृत्यू’ अश्या हेडलाईनच्या कित्येक बातम्या आपण दररोज पेपरमध्ये, सोशल मीडियावर वाचत असतो. म्हणजे जर आपण फक्त भारतातच दरवर्षी रोड अपघातात मृत्यू होणाऱ्या लोकांची संख्या बघितली तर ती लाखांच्या घरात आहे.

अशा परिस्थतीत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वीच आश्वासन दिल होत कि, हे रस्ते अपघात टाळण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. याचाच एक भाग म्हणून १४ जानेवारीला संक्रांतीच्या दिवशी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एक ट्विट केलं. ज्यात त्यांनी प्रवाश्यांच्या सुरक्षेसाठी ८ पॅसेंजरच्या गाडीत एअर बॅग कंपल्सरी केल्या आहेत. या ८ पॅसेंजरच्या गाडीत कमीत कमी ६ एअर बॅग तरी असल्या पाहिजे असं ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले.

गडकरींच्या म्हणण्यानुसार, आठ प्रवासी वाहनांमध्ये सहा एअरबॅग कंपल्सरी करण्याच्या मसुद्याच्या अधिसूचनेला त्यांनी नुकतीच मान्यता दिली आहे. त्यामुळे इथून पुढे कार बनवणाऱ्या कंपन्यांना प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी वाहनांमध्ये एअरबॅगची संख्या वाढवावी लागणार आहे. हा नवा नियम ऑक्टोबरपर्यंत लागू होणार असल्याचं म्हंटल जातंय. रस्ते अपघातात होणारी जीवितहानी टाळण्यासाठी केंद्रानं हे पाऊल उचलल्याचं म्हंटल जातंय.

आता तशी या एअर बॅगची कन्सेप्ट काही नवीन नाही. आताच्या घडीला सुद्धा अनेक कार कंपन्या आपल्या कारमध्ये एअर बॅगची सुविधा दिलीये. पण तुम्हाला माहितेय या एअर बॅगच्या शोधामागे नक्की कोणाचं डोकं होत…

तर भिडू ही एअर बॅगची कन्सेप्ट शोधली जॉन डब्ल्यू हेट्रिक या नेव्ही अधिकाऱ्याने. म्हणजे त्यांच्या डोक्यात तसं काही नव्हतं, आपली नेव्हीच्या सेवेतून रिटायरमेंट घेतल्यानंतर फॅमिली सोबत चांगला वेळ घालवत होते, सगळं सुखी चाललेलं पण म्हणतात ना अनुभव माणसाला शिकवतो, असंच काहीसं जॉन डब्ल्यू हेट्रिक यांच्यासोबतच सुद्धा झालं. 

म्हणजे झालं  काय, १९५० च्या आसपासची गोष्ट आहे. जॉन डब्ल्यू हेट्रिक आपल्या पत्नी आणि मुलीसोबत गाडीत कुठे तरी चालले होते, त्याच वेळी त्यांच्या कारचा अपघात झाला. नशीब चांगलं म्हणून कोणाला काही झालं नाही, पण या घटनेमुळे हेट्रिक यांना अशा एखाद्या गोष्टीची गरज भासायला लागली कि, जरी कारचा अपघात झाला तरी प्रवाशांचा मृत्यू होणार नाही, किंवा मोठी गंभीर दुखापत होणार नाही.

हेट्रिक नेव्हीमध्ये इंजिनिअर होते त्यामुळे याचा अनुभव घेऊन त्यांनी वाहनांसाठी ‘सेफ्टी कुशन असेंब्ली’चे प्रोटोटाइप विकसित केले. ज्यात त्यांनी कंप्रेस हवेच्या टॅंकला फुगवटा असलेली पिशवी कनेक्ट केली.  ही पिशवी स्टीयरिंग व्हीलच्या आत, डॅशबोर्डच्या मध्यभागी किंवा ग्लोव्ह बॉक्सच्या जवळ जोडण्यात आली. 

हेट्रिकने त्याचे एअरबॅग डिझाइन १९५२ मध्ये युनायटेड स्टेट्स पेटंट ऑफिसकडे पेटंटसाठी दाखल केले आणि १८ ऑगस्ट १९५३ पर्यंत त्यांना पेटंट मिळाले.

जवळजवळ त्याच काळात, वॉल्टर लिंडरर नावाच्या एका जर्मन इंजिनिअरने जर्मन पेटंट ऑफिसमध्ये त्याच पेटंटसाठी फील्ड केले आणि हेट्रिकला पेटंट मिळाल्याच्या तीन महिन्यानंतर म्हणजे १२ नोव्हेंबर १९५३ ला त्याला ते पेटंट मिळालं.

पण हेट्रिक आणि लिंडररच्या डिझाइनमध्ये थोडासा फरक होता. म्हणजे हेट्रिकने असा स्प्रिंग सेटअप तयार केला ज्याच्या मदतीने कॉम्प्रेस्ड एअर टँकमधील व्हॉल्व्ह सक्रिय करून, पिशवीत हवा सोडते आणि फुगवते. तर लिंडररच्या डिझाईनमध्ये एअरबॅग बंपर इफेक्टने ओपन होते.  पुढे यात आणखी काही इंजिनिअर्सने उडी घेतली आणि एअर बॅग तंत्रज्ञानात नवनवीन अपडेट आणले. 

एअरबॅग तंत्रज्ञानातील क्रांतीनंतर, ऑटो कंपन्यांनी त्यांच्या कारमध्ये या एअर बॅगचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. ७० च्या दशकात जीएम आणि फोर्डने त्यांच्या काही टेस्टिंग कारमध्ये एअरबॅग बसवायला सुरुवात केली.  जीएमची ओल्डस्मोबाईल टोरोनाडो ही प्रवासी एअरबॅगसह  उपलब्ध असलेली पहिली कार  होती आणि तिच्याकडे असलेली एअरबॅग सिस्टीम ‘एअर कुशन रेस्ट्रेंट सिस्टम’ किंवा ACRS म्हणून विकली गेली.

यानंतर आतापर्यंत या एअर बॅग सिस्टीममध्ये अनेक बदल होत गेले. पण अजूनही अनेक कंपन्यांनी आपल्या कारमध्ये ही सिस्टीम डेव्हलप केली नाही. पण आता अपघातांची वाढती संख्या पाहता केंद्रानं घेतलेला हा निर्णय नक्कीच चांगला आहे. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.