निवडणूक लढायला निधी नाही म्हणून गडकरींनी एकदा थेट डिझेल चोरून आणलं होतं..

सध्या शतक मारून पलीकडे गेलेल्या पेट्रोलने अख्खा देश पेटवलाय. लोक भडकलेत, शेर पाला है तो खर्चा तो होगा ही असं म्हणणारे भक्त लोक देखील सध्या घामाने डबडबलेत. सोन्यापेक्षाही पेट्रोल इम्पॉर्टन्ट झालंय. सोशल मीडियावरच्या मिमर्सना तर भलताच जोर चढलाय.मोदीजींपासून ते सौदीजी  पर्यंत सगळ्यांना ट्रॉल करण्यात आलंय.

पेट्रोल चोरीला जाईल म्हणून लॉकरमध्ये लपवून ठेवायची वेळ आली असल्याचं सांगितलं जातंय. आता हा झाला सध्याचा जोक. पण एकेकाळी एका माणसाने खरोखर पेट्रोल चोरली आणि त्यातल्या पैशातून निवडणूक जिंकली होती.

तो माणूस म्हणजे महाराष्ट्राचे पीएम इन वेटिंग नितीन गडकरी. 

नितीन गडकरी म्हणजे दिलखुलास माणूस. स्वतःच्या चुका जाहीररीत्या मान्य करायला देखील मोठं मन लागत. गडकरींकडे ते आहे हे नक्की. कधी कधी स्वतःच्या पक्षाच्या देखील ते चुका सांगायला जातात आणि त्याचा राजकीय तोटा होतो. असो. ती गोष्ट वेगळी. तर आपण बोलत होतो गडकरींच्या पेट्रोलच्या किस्स्याबद्दल.

गोष्ट आहे नितीन गडकरी कॉलेजमध्ये असतानाची.

नागपूर हि संघभूमी होती. नितीन गडकरी वाढलेच संघाच्या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या छायेत. अगदी लहान वयापासून त्यांना राजकीय घडामोडीबद्दल, नेत्यांच्या बद्दल उत्सुकता होती. त्यातूनच कॉलेजला गेल्यावर त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम हाती घेतलं. त्यांची कामाची धडाडी, वक्तृत्व, संघटन कौशल्य यामुळे लवकरच विद्यार्थ्यांमध्ये ते लोकप्रिय होत गेले.

त्याकाळी नागपूरमध्ये विद्यार्थी परिषदेचं काम दत्ताजी डिंडोरीकर पाहायचे.

कडक शिस्तीचे दत्ताजी संघाच्या मुशीत घडणाऱ्या या तरुण कार्यकर्त्यांचे ते जवळचे मार्गदर्शक. नितीन गडकरी मात्र त्यांच्याशी बिनधास्तपणे बोलायचे. त्याकाळात नागपूर विद्यापीठामध्ये काँग्रेसच्या एनएसयूआय या विद्यार्थी संघटनेच्या गुंडगिरीमुळे दरवर्षी परीक्षा पुढे ढकलल्या जायच्या. सुरवातीला एबीव्हीपी त्यांना अर्ज विनंत्या करायची मात्र पुढे नितीन गडकरींनी त्यांना जशास तसे उत्तर द्यायचे ठरवले.

नागपूर विद्यापीठात तेव्हा परीक्षा वेळेवर घ्याव्यात म्हणून गडकरींनी आंदोलन केलं. मोठा गोंधळ झाला. अखेर विद्यापीठाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं ऐकावं लागलं. या आंदोलनामध्ये संघाची शिस्त मोडल्यामुळे गडकरींना मोठ्या नेत्यांचा ओरडा देखील खावा लागला मात्र दत्ताजी त्यांना म्हणाले,

एखाद चांगलं काम पार पाडण्यासाठी चुकीचा मार्ग अवलंबला तरी ठीक आहे. पण हे चूक आहे त्याचे समर्थन मात्र कधी करायचं नाही.

आपल्या धडाडीमुळे नितीन गडकरी यांच्याकडे नागपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे नेतृत्व आपसूकच येत गेले.

गडकरी राजकारणात हातपाय मारत होते, फक्त विद्यार्थी परिषदच नाही तर त्यांचे संघाच्या नेतृत्वामध्ये देखील नाव एक होतकरू कार्यकर्ता म्हणून पोहचलं होतं. पण गडकरींची घरची परिस्थिती मात्र ठिकठाकच होती. लष्कराच्या भाकऱ्या भाजण्यासाठी घरून पैसे मिळायचे नाहीत. कार्यकर्त्यांचे संघटन उभं करायचं धडपडायचं तर फिरायला एक स्कुटर हवी अशी त्यांची इच्छा असायची.

त्याकाळात स्कुटरच्या बुकिंगला वर्षानुवर्षे नम्बर असायचे. अशातच एकदा गडकरींना कळालं की एका संघाच्या विचारांना मानणाऱ्या अधिकाऱ्याच्या दोन गाड्या बुक झाल्या आहेत. दत्ताजींनी गडकरींना त्या अधिकाऱ्याकडे पाठवलं.

गडकरी खुशी खुशीत गेले पण तो अधिकारी त्यांना म्हणाला,

नितीन तुला मी ती स्कुटर देईन मात्र तुला ऑनची रक्कम द्यावी लागेल. सध्या बाजारात साडे तीन हजार रुपये रेट आहे, तू मला अडीच हजार रुपये दिलेस तरी चालेल.

गडकरी तणतणतच दत्ताजींकडे आले आणि म्हणाले,

“हाच का तुमचा संघ ?”

पण दत्ताजींनी त्यांना समजावून सांगितलं. आपल्या माणसांच्या चुका देखील पोटात कशा घालायच्या याच पाठ त्यांनी गडकरींना शिकवला. 

त्याकाळात एबीव्हीपी कडे देखील काही पैसे नसायचे. कार्यक्रमासाठी वगैरे दत्ताजींना घरून पैसे द्यावे लागायचे. अशाच कार्यक्रमांमुळे बऱ्याचदा गडकरींना देणेकऱ्यांचे तोंड लपवून पळावे लागायचे.

एकदा गडकरींनी प्रभाकर पणशीकरांचा एक नाटकाचा कार्यक्रम आयोजित केला होता. पण दुर्दैवाने पैसे गोळा झाले नाहीत. अखेर त्यांनी आपली सोन्याची अंगठी गहाण ठेवली आणि नाटकवाल्यांचे पैसे चुकते केले.

त्याकाळी विद्यापीठामध्ये निवडणूका होत असत. नितीन गडकरी देखील या निवडणुकांना उभे राहायचे. तेव्हा सुद्धा निवडणुका जिंकायच्या तर पैशांची जुळवाजुळव करावी लागायची. हे आणीबाणीच्या काळातले दिवस होते. विद्यार्थी परिषद आणि त्याचे कार्यकर्ते कंगाल असायचे.

अशीच एक निवडणूक होती. गडकरी उभे होते. पण त्यांना पैशांची खूप आवश्यकता होती. कशी सोय करावी हा प्रश्न होता. गडकरींनी शेवटी ठरवलं पेट्रोल पळवायचं. त्यांचा एक प्रमोद पेंडके नावाचा मित्र होता. त्याला त्यांनी चार पाच कार्यकर्त्यांच्या सोबत एमएससीबीच्या कुऱ्हाडी ग्राउंडवर पाठवलं.

चार पाच कार्यकर्त्यांच्या सोबत एमएसईबीच्या गाड्या थांबवल्या आणि त्यातून प्लॅस्टिकच्या पुंगळ्या मधून डिझेल काढून घेतल. कंपनीपासून चोरून त्या ड्रायव्हरनी त्यांना निम्म्या किंमतीत हे डिझेल दिलं होतं. अशा अनेक खटपटी करून गडकरींनी निवडणूक लढवली होती.

इतर पक्षांच्या नेत्याप्रमाणे त्यांना आयत काही मिळालं नव्हतं. अनंत खटपटी करून त्यांनी लढा दिला तेव्हा ते जिंकले. आज गडकरी देशाचे दळणवळण मंत्री आहेत. भाजपच्या सर्वोच्च नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. पण तरीही मोठ्या मानाने ते विद्यार्थी दशेतील आपल्या उचापत्यांबद्दल बिनधास्तपणे सांगत असतात.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.