अंबानींना चॅलेंज दिलं, स्वस्तात रस्ता नाही बांधून दाखवला तर मिशी कापून देईन

नितीन गडकरी म्हणजे भारतातला रस्तेवाला माणूस. ते देशात दररोज २५ किलोमीटरचा रस्ता बांधतात असं सांगितलं जातं. ते देखील अत्यंत कमी खर्चात आणि विक्रमी वेळेत. काही दिवसापूर्वीच सोलापूर-विजापूर महामार्गावर एका लेनवर सलग १८ तासात २५ किलोमीटरचा रस्ता डांबरीकरण करण्यात आला. या ऐतिहासिक रस्त्याच्या बांधणीच्या रेकॉर्डची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.

आज केंद्रातच नाही तर अगदी महाराष्ट्रात असल्यापासूनच अशी आव्हानात्मक काम करण्यासाठी गडकरींची ओळख. असाचं एका आव्हानात्मक आणि विक्रमी कामाचा किस्सा गडकरी यांनी एके ठिकाणी सांगितला आहे.

सालं होतं १९९६. युतीचं सरकार आणि मुख्यमंत्री होते मनोहर जोशी. या मंत्रिमंडळात नितीन गडकरी सार्वजनिक बांधकाम मंत्री होते.

शासनाकडून हायवेचं टेंडर काढण्यात आलं. त्यात सगळ्यात कमी टेंडर भरलं ते धीरूभाईंच्या रिलायन्सने. ते होतं ३ हजार ६०० कोटींचं. पण गडकरींचा मात्र अंदाज होता हे काम २ हजार कोटींचं आहे आणि तेवढ्यात होऊ शकतं.

ते मनोहर जोशी आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडेंकडे गेले आणि सांगितलं, हे काम २ हजार कोटीपेक्षा जास्त नाही आणि सगळ्यात कमी टेंडर अंबानींचं आहे. त्यांनी ३ हजार ६०० कोटी टाकलयं. त्यामुळे मला वाटतं आपण हे टेंडर रिजेक्ट करावं.

पण त्यात दोन मतप्रवाह होते. त्यावेळचे मंत्री सुरेश जैन हे देखील तिथं उपस्थित होते. ते म्हणाले,

गडकरी साहेब हे बघा, तुम्ही टेंडर काढलं, ते धीरूभाईंनी भरलं. नियमानुसार जे कमी आहे त्यांना दिलं पाहिजे.

बाकीचे इतर मंत्री देखील अंबानींना हे टेंडर नाकारायला नको याच मताचे होते. पण तरी गडकरी अद्याप २ हजार कोटींवर हटून बसले होते. आपण हे स्वस्तात करू शकतो हा विश्वास त्यांना होता. त्यांनी मुंडेंना हे टेंडर नाकारायला तयार केलं. मुंडेंनी मनोहर जोशींना तयार केलं.

पण काम हे होणार कसं हा प्रश्न अद्याप होताच. मनोहर जोशींनी विचारलं पैसे कोठून आणशील नितीन? त्यावर गडकरी म्हणाले ‘सर माझ्यावर विश्वास ठेवा’.

गडकरींवर विश्वास ठेऊन अखेर धीरूभाईंना हे टेंडर नाकारण्यात आलं.

धीरूभाईंचे दिवंगत बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन यांच्याशी चांगले संबंध होते. त्यांनी हे टेंडर नाकारल्यामुळे दोघांकडे देखील नाराजी व्यक्त केली. प्रमोद महाजन एक दिवस म्हणाले,

नितीन धीरूभाई बरेच नाराज झालेत, तू त्यांना जाऊन समजावं.

त्यासाठी मेहकर चेंबर्समध्ये जेवायचं नियोजन ठरलं. नितीन गडकरी, धीरूभाई अंबानी, अनिल आणि मुकेश हे दोन्ही भाऊ, त्यावेळचे रिलायन्सचे व्हाईस प्रेसिडेंट नितीन चैनी असे सगळे उपस्थित होते.

धीरूभाई अद्याप नाराज होते, जेवताना विषय निघाला. धीरूभाई गडकरींना म्हणाले,

कैसे रोड बनेगा नितीन, ये टेंडर तो आपने रिजेक्ट कर दिया.

त्यावर गडकरी म्हणाले,

होगा धीरूभाई, मै करके दिखाऊंगा.

त्यावर धीरूभाई परत म्हणाले,

क्या होगा, बोलने वाले बहुत लोग होते है. मैने बहुत देखे है, ये कुछ नाही होगा.

झालं. या वाक्यावर आतापर्यंत शांत असलेल्या गडकरींचा इगो काहीसा दुखावला. हा ना करता करता गडकरींनी धीरूभाईंना चॅलेंज दिलं. म्हणाले,

धीरूभाई अगर मै ये रोड नाही बना पाया तो ये जो मुछे रखी है ये काट दूंगा. बोल दूंगा धीरूभाई जीत गये, मै हार गया.

पर मै अगर रोड बनाउंगा तो आप क्या करेंगे? त्यावर धीरूभाईंनी पुन्हा ना चा पाढा लावला. धीरूभाईंची समजूत काढायला गेलेले गडकरी त्यांना चॅलेंज देऊन आले.

आल्यानंतर गडकरींनी पैसे उभे करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची स्थापना केली. गुंतवणूकदार शोधण्याचं जिकिरीचं काम गडकरींनी स्वतः लक्ष घालून पूर्ण केलं. 

रस्त्याचं काम सुरु झालं. मुंगीरवार नामक यात मुख्य अभियंता होते. काम पूर्ण होतं आलं असताना एक दिवस धीरूभाईंनी हेलिकॉप्टर मधून जाताना वरून ते सगळं बघितलं. त्यांनी चैनींकरवी  नितीन गडकरींना भेटण्यासाठी पुन्हा आमंत्रण पाठवलं.

गडकरी परत मेहकर चेंबर्स मध्ये आले. आणि आल्या आल्या धीरूभाईंचं पहिलं वाक्य होतं,

नितीन मै हार गया, तुम जीत गये. तुमने करके दिखाया. अब रोड हो गया.  

नितीन गडकरींनी ३ हजार ६०० कोटींचा रोड २ हजार कोटीत बांधून दाखवला, आणि त्यांची मिशी देखील वाचली.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.