तेंव्हा गडकरी भाजप सोडणार होते, वाजपेयींच्या त्या शब्दांनी त्यांना नवं बळ दिलं…पण आता…
मी लोकांना आता सांगितलंय की, आता पुष्कळ झालं. मी पण निवडून आलो. लोकांना मी आता सांगतो, तुम्हाला पटलं तर मत द्या. मी आता फार लोणी लावायला तयार नाही. तुम्हाला वाटलं तर ठीक आहे, नाहीतर कोणीतरी निवडून येईल, असे वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना रविवारी ख्यातनाम वैज्ञानिक पद्मविभूषण रघुनाथ माशेलकर यांच्या मोहन धारीया राष्ट्र निर्माण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना गडकरींनी परत समाजकारणात जास्त रस असल्याचे सांगितले. त्यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
गडकरी राजकारणातून निवृत्ती घेणार अशाच प्रकारचं सूचक विधान त्यांनी केलं, एकदा नव्हे अलीकडच्या काळात त्यांनी अनेकदा असे संकेत दिलेत. आत्ता त्यांच्या राजकीय निवृत्तीची चर्चा आहे मात्र कधीकाळी त्यांच्या भाजपला सोडचिट्ठी देण्याच्या चर्चा होत्या,
फक्त चर्चा नव्हे तर त्यांनी ठाम निर्णयच घेतला होता. पण नंतर त्यांनी आपला निर्णय बदलला.
नितीन गडकरी भाजप सोडणार होते त्याचा हा किस्सा…
गोष्ट असेल साठच्या दशकातली. नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या. कधी नव्हे ते वातावरण तापले होते. संघाची जन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूरमध्ये महानगरपालिकेवर आपलं वर्चस्व असावं हि स्वयंसेवकांची फार काळची इच्छा होती. त्या दृष्टीने प्रयत्न देखील सुरु होते. म्हणूनच खास दिल्लीहून प्रचारासाठी जनसंघाचे प्रमुख नेते असलेल्या अटलबिहारी वाजपेयींना बोलावण्यात आलं होतं.
खरं तर जनसंघ या पक्षाचं त्या काळात इतकं म्हणावं तस वजन नव्हतं पण वाजपेयींच्या तरुण नेतृत्वाची चर्चा देशभरात होती. खुद्द नेहरूंनी त्यांना भारताचा भावी पंतप्रधान असं म्हणून कौतुक केलेलं. त्यांचं वक्तृत्व ऐकण्यासाठी खेड्यापाड्यातून लोक गर्दी करत.
नागपूर हे देशाच्या मध्यवर्ती असल्यामुळे संपूर्ण देशातील टपाल इथल्या विमानतळावर गोळा होत आणि तिथून ते वेगवेगळ्या भागात पाठवले जाई. त्यामुळे नागपूरच्या विमानतळावर मध्यरात्री देखील मोठी वर्दळ असे. अशाच एका टपालाच्या छोट्या डाकोटा विमानातून वाजपेयींचं नागपूरला आगमन झालं.
त्यांच्या बद्दलची उत्सुकता असल्यामुळे अनेक जनसंघाचे कार्यकर्ते स्वागतासाठी म्हणून विमानतळावर हजर होते. यात एक आठवी नववीला असणारा छोटा मुलगा देखील होता. मध्यरात्री दोन वाजता वाजपेयींचं विमान नागपुरात लँड झालं. ते बाहेर आले आणि जोरात घोषणा सुरु झाल्या. तो मुलगा देखील घोषणा देण्यामध्ये आघाडीवर होता.
जय जय जनसंघ भारतीय जनसंघ
देश का नेता कैसा हो अटलबिहारी जैसा हो
वाजपेयी हसले त्यांनी त्या कार्यकर्त्यांना थांबवलं आणि स्वागत स्वीकारताना म्हणाले,
“देश का नेता कैसा हो कोण हो ये सवाल नही है. देश कैसा हो ये सवाल है. देश के लिए सोचो नेता के लिए मत सोचो.”
त्या शब्दांनी त्या छोट्या कार्यकर्त्याच्या मनावर खोलवर परिणाम झाला. तो ते शब्द कधीच विसरू शकला नाही. तो मुलगा म्हणजे आजचे केंद्रीय बांधकाम व दळणवलन खात्याचे मंत्री श्री नितीन गडकरी.
नागपूर ही संघभूमी होती. नितीन गडकरी वाढलेच संघाच्या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या छायेत. अगदी लहान वयापासून त्यांना राजकीय घडामोडीबद्दल, नेत्यांच्या बद्दल उत्सुकता होती. त्यातूनच कॉलेजला गेल्यावर त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम हाती घेतलं. त्यांची कामाची धडाडी, वक्तृत्व, संघटन कौशल्य यामुळे लवकरच विद्यार्थ्यांमध्ये ते लोकप्रिय होत गेले.
नेमके याच काळात इंदिरा गांधींनी देशभरामध्ये आणीबाणी लागू केली. विरोधकांना जेलमध्ये टाकण्यात आलं. महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षात असलेल्या नितीन गडकरींनी नागपूर मध्ये विद्यार्थी आंदोलनाला सुरवात केली. स्कुटर वरून फिरून सहकाऱ्यांसोबत अर्ध्या कप चहा वर त्यांनी अंदोलन जिवंत ठेवले. प्रसंगी पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या.
आणीबाणी विरुद्धच्या आंदोलनातच त्यांची राजकारणात पहिली पावले पडली.
आणीबाणी संपली, जनता सरकार आले. एम कॉम एलएलबी पूर्ण केलेल्या नितीन गडकरी यांनी राजकारणातच करियर करायचं नक्की केलं. तो पर्यंत पूर्वाश्रमीचा जनसंघ जनता पक्षातून बाहेर पडून भारतीय जनता पक्ष बनला होता. या भाजपच्या युवा मोर्चामध्ये नितीन गडकरी सक्रिय झाले.
दरम्यानच्या काळात देशाच्या पातळीवर राजकारणात मोठी उलथापालथ घडली. जनता सरकारला अवघ्या दोनच वर्षात पायउतार व्हावे लागले. त्यांच्या कारभारावर भ्रमनिरास झालेल्या जनतेने पुन्हा काँग्रेसची वाट धरली. विशेषतः विदर्भ तर इंदिरा गांधींच्या आधीपासून पाठीशी होता.
१९८० च्या लोकसभा निवडणुकांमध्ये इंदिरा गांधींनी झोकात पुनरागमन केलं. त्यांच्या राजकीय लाटेत इतर पक्ष पालापाचोळ्या प्रमाणे उडून गेले. हा काळ भाजप नेत्यांसाठी एखाद्या दुःखद स्वप्नाप्रमाणे होता. सर्व निवडणुकांमध्ये पराभव होत होता. कोणतीही विजयाची चिन्हे दिसत नव्हती.
तेव्हा कार्यकर्ते देखील निराश होते. जनता पार्टीनंतर एवढा मोठा पराभव झाल्यानं अटलजी, अडवाणीजींना काही भविष्य नाही. या पक्षालाही काही भविष्य नाही. हा पक्ष संपला आहे. या पक्षाला काही आधार नाही, अशी टीका करण्यास पत्रकारांनी सुरुवात केली होती.
खुद्द नितीन गडकरी देखील आता काय करावं या द्विधा मनस्थितीत होते. ते सांगतात,
“तेव्हा मलाही अनेकदा निराश झाल्यासारखं व्हायचं. लोक म्हणायचे तू चांगला आहेस. पण पक्ष चांगला नसल्याने इथे तुझं भविष्य चांगलं नाही. त्यामुळे तू पक्ष बदल असा सल्ला काहींनी दिला. “
अशातच भाजपच्या पहिल्या अधिवेशनासाठी नितीन गडकरी मुंबईला आले. बांद्रा रेक्लमेशन येथे हे अधिवेशन भरलं होतं. तेव्हा एमसी छागला या अधिवेशनासाठी आले होते. ते आपल्या भाषणावेळी म्हणाले,
“मी उद्याच्या भविष्यातल्या रुलिंग पार्टीच्या कार्यकर्त्यांसमोर बोलत आहे आणि माझ्या शेजारी बसलेले अटलबिहारी वाजपेयी देशाचे भावी प्रधानमंत्री आहेत. “
टाळ्यांचा जोरदार कडकडाट झाला. संध्याकाळची वेळ होती. सूर्य मावळतीला निघाला होता. वाजपेयी भाषण करायला उभे राहिले,
“अरबी समुद्रातील हा सूर्यास्त होत आहे. त्याला साक्ष ठेवून मी देशाला सांगू इच्छितो की,
अंधेरा छटेगा कमल खिलेगा सूरज निकलेगा.”
वाजपेयींच्या जादुई शब्दांनी तिथे जमलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये निराळाच उत्साह भरला. पराभवाचे सावट दूर करून नव्या आत्मविश्वासाने परिस्थितीला सामोरे जाण्याचे बळ त्या शब्दांनी दिले. गडकरींनी देखील भाजप सोडण्याचे विचार टाकून दिले. पण पक्ष आमचा आहे, विचार आमचे आहेत. त्यामुळे पक्षासोबतच राहण्याची भूमिका मी घेतली,’ असं ते सांगतात.
हे ही वाच भिडू.
- आपल्या विरोधात उभ्या असलेल्या उमेदवाराला प्रचारासाठी गाडी देणारे नितीन गडकरी होते
- केंद्र आणि राज्याच्या राड्यात गडकरी हिरो ठरलेत..
- नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी यांच्यात एका माणसामुळे जोरात पंगा झाला होता..
- आता गडकरीच पंतप्रधान पाहिजेत !