आपल्या विरोधात उभ्या असलेल्या उमेदवाराला प्रचारासाठी गाडी देणारे नितीन गडकरी होते
नितीन गडकरी म्हणजे दिलखुलास व्यक्तिमत्व. नागपुरी अघळपघळ आदरातिथ्य, पाहुणचार त्यांच्याकडेही पाहायला मिळतं. अगदी टोकाचे विरोधक समजल्या जाणाऱ्या पवारांशीही त्यांची मैत्री असते हे चित्र सध्याच्या राजकारणातही अचंबित करणारी गोष्ट समजली जाते. मनात येईल ते बिनधास्त बोलणारे गडकरी टीकेला घाबरत नाहीत.
अशाच गडकरी यांच्या सुरवातीच्या काळातल्या निवडणुकीचा किस्सा जेष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांनी त्यांच्या ब्लॉगवर सांगितला आहे.
गोष्ट आहे १९८९ सालची. नागपूरचे पदवीधर विधानपरिषदेचे आमदार गंगाधरपंत फडणवीस यांच्या निधनानंतर ती जागा रिकामी झाली होती. देवेंद्र फडणवीस यांचे ते वडील होते. नितीन गडकरी हे त्यांचे पट्टशिष्य समजले जात होते. फडणवीस यांचा वारसदार म्हणून नागपूर पदवीधरच्या आमदारकीचे तिकीट नितीनजींना मिळालं होतं.
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूका नेहमीच्या निवडणुकांपेक्षा वेगळ्या समजल्या जातात. याचा प्रचार देखील नेहमीप्रमाणे होत नाही. नागपूरही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जन्मभूमी असल्यामुळे हा पदवीधर मतदारसंघ तर भाजपचा बालेकिल्ला मानला जायचा.
प्रवीण बर्दापूरकर तेव्हा नागपुर पत्रिका या वर्तमानपत्रात नोकरीला होते. त्यांची तरुण भारतचे प्रकाश देशपांडे, लोकमतचे सिद्धार्थ सोनटक्के यांच्याशी गाढ मैत्री होती.
पदवीधर निवडणुकीचे वारे वाहू लागले आणि मतदारयादी तपासत असताना सिद्धार्थ सोनटक्के यांना जाणवलं की आपणही निवडणूक लढवायला काय हरकत आहे ? त्यांचं देशपांडे व बर्दापूरकर यांच्याशी त्रिकुट असल्यामुळे त्यांनी हि कल्पना त्या दोघांनाही सांगितली.
तिघांचंही पदवीधर निवडणूक लढवायची यावर एकमत झालं.
हे तिघेही चांगलं लिहायचे, नागपूरच्या पत्रकारांच्यात त्यांचं नाव चांगलं होतं, वाचकांच्यातही त्यांची प्रसिद्धी चांगली होती, ओळखी झाल्या होत्या,शिवाय तरुण वय होतं, अंगात रग होती. सिद्धार्थ सोनटक्के उभे होते मात्र बाकीच्या दोघांनी निवडणूक जिंकायचीच म्हणून धडाक्यात प्रचार सुरु केला. पण पैशांचं पाठबळ काही नव्हतं. तिघांनी स्वतःच्या सेव्हिंगमधले पैसे काढले. सगळे एकत्र करून साधारण आठ-दहा हजार रुपये गोळा झाले.
बर्दापूरकर आपल्या ब्लॉगमध्ये म्हणतात,
“खिशात नाही दमडा आणि बाजारात निघाला कोंबडा अशी आमची अवस्था होती. काही मित्रांना आवाहन करून प्रवासाची व भोजनाची सोया केली आणि आम्ही प्रचाराला निघालो.”
काही पत्रकार मिळून नितीन गडकरींच्या विरुद्ध निवडणूक लढवत आहेत याची चर्चा एव्हाना पत्रकारांच्या वर्तुळात फिरू लागली होती. काही जणांनी कौतुक केलं तर काही जण मागून वेडं साहस असं म्हणत टोमणे मारले. पण कोण काय म्हणतय याची फिकीर त्यांना नव्हती.
सुरवातीला तिघेच प्रचार करायचे, नंतर हळूहळू बाकीची मित्रमंडळी त्यांना सामील झाली.
नागपूर पदवीधरचा मतदारसंघ संपूर्ण विदर्भात प्रचंड मोठा पसरलेला आहे. विधानसभेचा प्रचार असतो तसा प्रचार करून चालत नाही. प्रत्येक उमेदवार आपले मतदार नोंदणी करून मते पक्की करत असतात. सिद्धार्थ सोनवणे, प्रकाश देशपांडे आणि प्रवीण बर्दापूरकर यांना अननुभवामुळे याचा काहीच अंदाज नव्हता.
पाच सात जणांची टीम बसने फिरून विदर्भात प्रचार करायचा प्रयत्न करत होती. पण त्यांच्या आवाक्याबाहेरची ही गोष्ट होती. त्याच्या विरुद्ध म्हणजे भाजपचा प्रचार नेहमीप्रमाणे सुसूत्रबध्द रित्या सुरु होता. त्यांची यंत्रणा मोठी होती, कार्यकर्ते भरपूर होते. हा मतदारसंघ त्यांचा बालेकिल्ला होता. गडकरी यांचा विजय पक्का होता.
बर्दापूरकर व इतरांना याचा अंदाज आलाच होता. पण भाबडेपणामुळे त्यांनी उमेदवारी दाखल केली होती आता मागे हटणे शक्य नव्हतं.
निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला होता. आठ दहा दिवस राहिले होते. अचानक नितीन गडकरी यांचा फोन आला,
“मित्रा तुमची निवडणूक कशी चालली आहे ?”
प्रवीण बर्दापूरकर ठामपणे म्हणाले,
“या निवडणुकीत आमचा विजय नक्की आहे. आम्ही दुसऱ्या नंबरची मते तरी मिळणार हे निश्चित.”
यावर नितीन गडकरी नेहमीप्रमाणे मोकळ्या ढाकळ्या शैलीत गडगडाटी हसले. त्यांनी प्रचार कसा सुरु आहे याची चौकशी केली. बर्दापूरकर यांना कळेना की गडकरी यांना आपल्या प्रचारात एवढा का रस आहे ?
यावर गडकरी म्हणाले,
“आपण सर्व मित्र आहोत. मित्रांनी मित्रांची काळजी घेतली पाहिजे. आपण जरी निवडणूक लढवत असलो तरी आपण शत्रू नाही. आपण केवळ प्रतिस्पर्धी आहोत. निवडणूक सुरु होण्यापूर्वी, निवडणूक सुरु असताना आणि निवडणूक संपल्यावरही आपण मित्र म्हणून कायम राहणार आहोत. “
गडकरी फक्त एवढं म्हणून थांबले नाहीत. त्यांना कळालं होतं की सिद्धार्थ सोनवणे यांच्या प्रचारात गाडी नसल्यामुळे त्यांना बसने फिरून प्रचार करावा लागत आहे.
दुसऱ्या दिवशी पेट्रोलची टाकी भरून एक अँबेसिडर कार ड्रायव्हर सकट त्यांच्याकडे पाठवून दिली. गाडीत ठेवलेल्या पाकिटात वूइथ लव्ह फ्रॉम नितीन असं लिहिलं होतं.
बर्दापूरकर म्हणतात,
प्रतिस्पर्धी उमेदवाराला स्वतःच्या प्रचारासाठी रसद पुरवणारा नितीन गडकरी हा एकमेव नेता आजवरच्या आयुष्यात मी पाहिला असेल.
त्यांनी ती गाडी घेऊन शेवटचे चारपाच दिवस प्रचार केला. मात्र त्यामुळे विशेष काही चमत्कार घडू शकला नाही. सिद्धार्थ सोनवणे यांना तीनशे साडे तीनशे मते देखील मिळाली नव्हती तर नितीन गडकरी यांना पहिल्याच फेरीत साठ हजार नोंद झालेल्या मतांपैकी बेचाळीस हजार मते मिळून त्यांचा दणदणीत विजय झाला होता.
संदर्भ-“आम्ही पदवीधर लढवल्याची कथा ” प्रवीण बर्दापूरकर
हे ही वाच भिडू.
- आता गडकरीच पंतप्रधान पाहिजेत !
- बिहार जिंकणाऱ्या फडणवीस यांना वडिलांचा गड राखता आला नाही.
- सुरक्षायंत्रणेला गंडवून एक म्हातारा थेट मुख्यमंत्र्यांच्या बेडरूममध्ये घुसला होता.
- पुरात गाव वाहून गेलं होतं आणि मुख्यमंत्री झाडाखाली उभं राहून चौकशी करत होते.