नितीश कुमारांच्या जनता दलाची बदलेली हवा भाजपची डोकेदुखी वाढवणार?

पेगाससच्या मुद्द्यावर विरोधी पक्ष सातत्यानं आक्रमक होताना दिसत आहे. केंद्र सरकारनं या मुद्द्यावर संसदेमध्ये चर्चा करावी, खुलासा करावा अशी मागणी सुरु आहे. यामुळेच संसदेत मागच्या २ आठवड्यांमध्ये केवळ १८ तास कामकाज होऊ शकलं आहे. सोबत उद्यापासून अभिरूप संसद भरवणार असल्याचं देखील जाहीर केलं आहे.

सध्या विरोधकांच्या याच आवाजात भाजपचा मित्रपक्ष असलेल्या संयुक्त जनता दलाचा आवाज मिसळला आहे. पक्षाचे अध्यक्ष असलेल्या नितीश यांनी या प्रकरणाचा तपास करण्याची आणि चर्चा करण्याची मागणी केली आहे. सोबतच जे सत्य असेल ते देखील जनतेपुढे यावं अशी मागणी केली आहे. राजदचे खासदार मनोज झा यांनी देखील नितीश यांच्या या भूमिकेचं स्वागत केलं आहे.

सोबतच नितीश यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेच्या काहीशा विरोधात जात जातीआधारित जनगणना आणि शेतकरी आंदोलन या गोष्टींना देखील पाठिंबा दिला आहे.

त्यामुळेच सध्या नितीश आणि त्यांच्या जनता दलाची हवा पुन्हा एकदा भाजपच्या विरोधात वाहायला लागली आहे का असा सवाल विचारला जातं आहे.

नितीश कुमार यांची याआधीची भूमिका काय?

जातीआधारित जनगणनेसाठी पंतप्रधान मोदींना पत्र :

जाती आधारित जनगणनेची मागणी करताना नितीशकुमार म्हणाले, राष्ट्रीय स्तरावर जातीआधारित जनगणना व्हावी यासाठी ठराव संमत करण्यात आला आहे. बिहारमध्ये तर सर्व संमतीने दोन वेळा विधीमंडळाने हा ठराव मंजूर केला आहे व तो केंद्र सरकारला देखील पाठवला आहे.

विधानसभा आणि विधान परिषदेत सगळ्या पक्षांनी या ठरावाचे समर्थन केले होते. आमची इच्छा आहे की जाती आधारित जनगणना व्हावी. म्हणूनच विरोधी पक्षाच्या याच मागणीसोबत आम्ही देखील सहमत आहोत. सोबतची यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील पत्र लिहून त्यांची वेळ मागणार आहे. त्यांना भेटायला कोण-कोण जाणार त्या सगळ्यांची नाव देखील ठरलेली आहेत.

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा :

मागच्या जवळपास सात ते आठ महिन्यांपासून दिल्लीचा सीमेवर शेतकरी आंदोलन सुरू आहे सोबतच याच मुद्द्यावरून सध्या संसदेमध्ये देखील विरोधकांनी रान उठवलं आहे. विरोधकांच्या या आवाजाला सध्या नितीश कुमार यांचं देखील बळ मिळालं आहे. यावर चर्चा होणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

ते म्हणाले, बोलण्याचा अधिकार सगळ्यांना आहे आणि लोकांना चर्चेमधून विश्वास देणं गरजेचे आहे. सरकारची धोरण कोणाच्या विरोधात नाहीत मात्र शेतकऱ्यांसोबत पुन्हा चर्चा होणे गरजेचे आहे.

एकूणच विरोधकांनी ज्या प्रमुख मुद्द्यांवरून सरकारला अधिवेशनात घेरलं आहे त्यातील दोन मुद्द्यांवर तरी नितीशकुमार हे विरोधकांना सोबत आहेत. सोबतच विरोधकांची प्रमुख मागणी असलेली जाती आधारित जनगणनेसाठी देखील नितीशकुमार विरोधकांत सोबत आहेत. त्यामुळे आगामी काळात भाजपच्या अडचणी वाढताना दिसणार आहेत हे नक्की

यामागची कारण काय असू शकतात?

नितीश कुमार यांचा या भूमिकांमागे सध्या प्रमुख कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे मंत्रीपदावरून नाराजी :

मागच्या महिन्यामध्ये केंद्रातील मोदी कॅबिनेटचा विस्तार करण्यात आला. मात्र यामध्ये नितीश कुमार यांच्या जेडीयूला केवळ एकच मंत्रिपद मिळालं आहे. अस सांगितलं जातं की, नितेश कुमार हे मोदींकडे ३ ते ४ मंत्रीपदांची मागणी करत होते. पण एकाच मंत्रिपदावर भाजप ठाम होते. सध्या जेडीयुच्या कोट्यातून आरपी सिंह यांना मंत्री बनवण्यात आलं आहे.

याआधी २०१९ मध्ये मोदी सरकारचा दुसरा कार्यकाळ सुरू होण्यापूर्वी नितीश कुमार यांच्या जनता दलाने २ ते ३ मंत्रिपदाची मागणी केली होती. त्यावेळी नितीश कुमार लल्लन सिंह आणि आर पी सिंह यांना मंत्री बनवण्यासाठी इच्छुक होते, पण भाजपने त्यावेळी देखील जनता दलाला एक पेक्षा जास्त मंत्रीपद देण्यास तयारी दर्शवली नव्हती. यातूनच नाराज होत नितीश कुमार यांनी मंत्रिमंडळात मध्ये सामील होण्यास विरोध दर्शवला होता.

नितीश कुमार यांच्या भूमिकांमागचं दुसरं मोठं कारण म्हणजे त्यांची होणारी कुचंबना :

सध्या बिहार मध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार असले तरी तिथे भाजपच्या जागा जास्त आहेत त्यामुळे राज्याच्या राजकारणावर आणि एकूणच प्रशासनावर भाजपचा होल्ड असलेला दिसून येतो. त्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या मते, नितीश कुमार यांना अनेकदा निर्णय घेताना भाजपची मनधरणी करावी लागते, त्यांना विचारल्याशिवाय कोणतेही मोठे पाऊल टाकता येत नाही. त्यामुळे आपला मुख्यमंत्री असून देखील जनता दलाला भाजपाच्या मागे लागावे लागत आहे.

नितीश कुमार यांना राष्ट्रीय राजकारणात येण्याची इच्छा :

नुकतीच दिल्लीमध्ये जनता दलाचे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली यातच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष देखील निवडण्यात आला मात्र या बैठकीनंतर पक्षाचे संसदीय बोर्डाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह म्हणाले,

‘आज की तारीख में पीएम मोदी के अलावा और भी कई पीएम मटैरियल हैं और नीतीश कुमार उन्हीं में से एक हैं.”

पक्षात अत्यंत महत्त्वाच्या पदावर असलेल्या उपेंद्र कुशवाहा यांच्या या वक्तव्याकडे सध्या मोठा परिप्रेक्ष्यातून बघितलं जात आहे. कारण राष्ट्रीय कार्यकारिणीनंतरच त्यांनी हे वक्तव्य केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. कुशवाह यांच्यासोबतच गोपाल मंडल यांच्या सारखे आमदार देखील नितीश कुमार यांना पंतप्रधान म्हणून प्रोजेक्ट करू लागले आहेत.

त्यामुळेच नितीश कुमार यांना पुन्हा केंद्राच्या राजकारणात परतून राज्याच्या राजकारणावर फोल्ड मिळवायचा आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. नितीश कुमार यांनी सध्या जरी या चर्चा फेटाळून लावली असता तरी दबक्या आवाजात त्या अजूनही सुरूच आहेत.

विरोधी पक्षाचा काय फायदा :

नितीश कुमार यांच्या या भूमिकेमुळे सध्या भाजपसमोरच्या अडचणी वाढणार हे तर नक्की आहे. कारण एनडीएमधील एक प्रमुख घटक पक्ष म्हणून जनता दलाकडे बघितले जातं. मात्र त्यासोबतच नितीशकुमारांच्या भूमिकेमुळे विरोधकांना देखील बळ मिळणार आहे. सध्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सर्व विरोधकांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचा निर्णय घेतला आहे. ममता बॅनर्जी देखील विरोधकांची मोट बांधत आहेत.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.