भावाला देश सोडायला लागलं, पण त्यानं क्रिकेट नाद काय सोडला नाय

भारत हा क्रिकेट प्रेमींचा मोठा देश. इथल्या गल्ली क्रिकेटमध्ये आपल्याला सिक्स-फोर मारून खिडक्यांच्या काचा फोडणारा सचिनही  भेटतो आणि पळत येऊन समोरच्याची विकेट घेणारा बुमराह सुद्धा. आता सगळेच याला आपलं करियर म्हणून निवडतात असं नाही. कोणी अर्ध्यात डाव सोडून जाणारा असतो. आता हा गेम सोबत लकचा सुद्धा विषय आहे म्हणा. पण डाय हार्ट क्रिकेटप्रेमी आपल्या गेमसाठी लकसुद्धा बदलतात.

असाच एक क्रिकेटर म्हणजे निवेथन राधाकृष्णन. भावाला देश सोडायला लागला, पण त्यानं क्रिकेट नाद काय सोडला नाय. निवेठनचा क्रिकेटसाठीचा जजबा आणि  अनोखी स्टाईल पाहून ऑस्ट्रेलियाने अंडर १९ च्या संघात त्याला उचललं.

नुकताच अंडर-१९ क्रिकेट वर्ल्डकप २०२२ साठी ऑस्ट्रेलियन संघाने आपला अंडर-१९ संघ जाहीर केलाय. या टीममध्ये तमिळनाडूत जन्मलेल्या भारतीय वंशाच्या निवेथान राधाकृष्णनलाही संधी देण्यात आलीये.

निवेथन राधाकृष्णनची अशी अनोखी स्टाईल आहे, ज्यामुळं प्रत्येकजण चाट पडतो. ती म्हणजे हा भिडू दोन्ही हातांनी बॉलिंग करू शकतो.

तसा तर निवेथन भारतात सुद्धा क्रिकेट खेळलाय, तो जेव्हा भारतात होता तेव्हा त्याने तामिळनाडू प्रीमियर लीग (TNCL) खेळली आहे. याशिवाय या बॉलरने तामिळनाडूमध्ये राहून अनेक देशांतर्गत क्रिकेट सामनेही खेळले आहेत. आयपीएल २०२१ दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने राधाकृष्णनला त्यांच्या संघासोबत नेट बॉलर म्हणून ठेवले होते.

एका मुखातील बोलताना निवेथनने सांगितले कि, चेन्नईमध्ये टीव्हीवर किंवा लीग क्रिकेटमध्ये दोन्ही हातांनी बॉलिंग करणारं कोणीच नव्हतं, तेव्हा कोणीही याबद्दल ऐकलं सुद्धा नव्हत. तेव्हा मी असा विचार केला कि असं का नाही होऊ शकत, नंतर त्यावर काम केलं, मी दोन्ही हातानी स्पिन करू शकतो.

TNPL आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये असताना, निवेथन राधाकृष्णनला अनुभवी भारतीय ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनसोबत ड्रेसिंग रूम शेअर करण्याची संधी मिळाली. तो TNPL मध्ये सुब्रमण्यम बद्रीनाथ यांच्यासाठी ड्रिंक्स घेऊन जायचा.

दरम्यान, निवेथनचं सगळं कुटुंब काही वर्षांपूर्वीच ऑस्ट्रेलियात स्थायिक झालं. त्यामुळे क्रिकेटसाठी म्हणून सारखं सारखं भारतात येणं- जाणं निवेथनला अवघड जात होत. ऑस्ट्रेलियात जाण्यापूर्वी निवेथनचा मोठा भाऊ निकेथन सुद्धा तामिळनाडू अंडर -१४ टीमकडून खेळायचा. पण  ऑस्ट्रेलियाला गेल्यानंतर त्याने क्रिकेट सोडले.

पण निवेथनने आपला क्रिकेटचा नाद काही सोडला नाही. त्याच्या वडिलांनी सुद्धा त्याला यासाठी प्रोत्साहित केलं. निवेथान राधाकृष्णनने क्रिकेट खेळणं सुरूच ठेवलं. त्यामुळे त्यानं तिथेच सिडनीतील क्रिकेट अकादमीत  प्रवेश घेतला. आपल्या खेळण्याच्या अनोख्या स्टाईलमुळे  ऑस्ट्रेलियाने त्याला आपल्या अंडर १६ संघात घेतलं.

अंडर १६ मध्ये असताना २०१९ मध्ये, राधाकृष्णनची पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी निवड झाली होती. त्याने मिळालेल्या या संधीचा पुरेपूर वापर केला. आपलं कौशल्य आणि क्षमता त्यानं सगळ्यांनाच दाखवून दिली. या ऑलराऊंडर खेळाडूने पाच सामन्यांच्या मालिकेत १७२ रन्स बनवले आणि ८ विकेट घेतल्या.

त्याच्या याचं अफलातून खेळामुळं ऑस्ट्रेलियाने त्याला आपल्या सध्याच्या अंडर १९ टीममध्ये उचललयं. ऑस्ट्रेलियाच्या अंडर १९ टीममध्ये हरकिरत बाजवा, एडन काहिल, कूपर कॉनोली, जोशुआ गार्नर, आयझॅक हिगिन्स, कॅम्पबेल केलवे, कोरी मिलर, जॅक निस्बेट, निवेथन राधाकृष्णन, विल्यम साल्झमन, लचलान शॉ, जॅक्सन सेनफेल्ड, टोबियास स्नेल, टॉम व्हिटनी, टीग वायली यांची निवड करण्यात आलीये.

आता अंडर-१९ वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या अंडर-१९ संघासाठी हा दोन्ही हातांनी बॉलिंग करणारा भारतीय खेळाडू कशी कामगिरी करतो हे पाहणे महत्वाचं ठरेल.

हे ही  वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.