साळवे बाप-लेकांनी मिळून दिलीप कुमारांना सोडवलं होतं. तिथून सुरू झाला सिलसिला

एनकेपी साळवे आणि हरीश साळवे. बाप-लेकाची जोडी. वडील सीए आणि प्रतिष्ठीत राजकारणी एनकेपी अर्थात नरेंद्रकुमार प्रसादराव साळवे. तर मुलगा देशातील जेष्ठ, हुशार आणि सर्वात महागडे वकिल.

एनकेपी हे विदर्भातले काँग्रेसचे बडे नेते होते. सोबत क्रिकेट प्रशासक. इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि पी.व्ही.नरसिंह राव यां तिन्ही पंतप्रधानांच्या सरकारमध्ये ते विविध खात्यांचे मंत्री देखील होते. आणि अनेक मोठ-मोठ्या आसामींचे सीए म्हणून ते त्यांचे हिशोब ठेवत होते.

एनकेपी यांना जावून आता आठ वर्ष झाली

तर जयललितांपासून अगदी कुलभूषण जाधव यांच्या पर्यंत तर सलमान खान पासून टाटा, अंबानींचे वकिल अशी हरीश यांची ओळख. एका दिवसात न्यायालयात उभे राहण्यासाठी ३० लाख रुपये घेणारे वकिल. पण ते या एका महिन्याच्या आत पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आधी वयाच्या ६५ व्या वर्षी लग्न केल्यामुळे आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात अर्णब गोस्वामी यांची बाजू मांडण्यासाठी उभे राहिल्यामुळे.

सीए होणारे हरीश वकिल झाले.

आपल्या वडिलांचा प्रभाव हरीश यांच्यावर होता. त्यामुळे त्यांनी देखील महाविद्यालयात दाखल होईपर्यंत सीए होण्याच ठरवले होते. पण सीएच्या परीक्षेत ते दोनदा नापास झाले. एकदा एका कायद्याचे ड्राफ्टिंग चालू असताना हरीश यांनी मंत्री असलेल्या वडिलांच्या कायद्यात आणखी काही हव्या असलेल्या मुद्द्यांवर लक्ष वेधले.

वडिलांना आपल्या मुलाचा पिंड लक्षात आला होता. त्यामुळे त्यांनी प्रसिद्ध वकील नानी पालखीवाला यांच्याशी हरीश यांची भेट घडवून दिली. आणि त्यांच्याच सल्ल्यानुसार त्यांनी वकिलीचं शिक्षण सुरू केले. १९७४ च्या आसपास कायद्याची पदवी घेवून वकिल झाले.

पहिला खटला अभिनेता दिलीप कुमार यांचा

वडिल राजकारणी आणि सीए. तर मुलगा वकिल. या दोघांची आयुष्यात पहिल्यांदा न्यायालयात गाठभेट पडली ती दिलीप कुमार यांच्या खटल्यामध्ये. दोघांनी मिळून दिलीप कुमारांना या खटल्यातुन सोडवून आणले.

हरीश यांच्या मते त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात १९७५ साली अभिनेता दिलीप कुमार यांच्या खटल्यासह झाली.

दिलीप कुमार यांच्यावर काळा पैसा बाळगल्याचा आरोप झाला होता. आयकर विभागाने त्यांना नोटीस पाठवली होती. यात कर आणि दंड दोन्ही भरावा असे आदेश न्यायालयाने त्यांना दिले होते.

एनकेपी हे दिलीप कुमार यांचे मित्र आणि सीए असे दोघे ही होते. इन्कम टॅक्स ट्रिब्युनल, उच्च न्यायालय या ठिकाणी या खटल्याचा निकाल दिलीप कुमार यांच्या बाजुनेच लागला होता. पण आयकर विभागाने सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते.

यानंतर सर्वोच्च न्यायालयात हे वकिलपत्र हरिश यांना देण्यात आले. तो त्यांच्या आयुष्यातील पहिलाच खटला होता. यापुर्वी एकदा ही त्यांनी न्यायालयात वकिल म्हणून एकही खटला लढवला नव्हता.

या खटल्यात त्यांच्या वडिलांना मदत करत होते. सर्वोच्च न्यायालयात हरीश यांनी सगळी कागदपत्र व्यवस्थित फाईल केली. आणि ती पाहिल्यासोबतच अवघ्या ४५ सेकंदामध्ये आयकर विभागाचे अपील न्यायालयाने फेटाळून लावले. आणि दिलीप कुमार यातुन निर्दोष सुटले.

सुरुवातीच्या दिवसांबद्दल बोलताना साळवे म्हणतात, त्यादिवशी कोर्टाने मला युक्तिवाद करायला सांगितला नाही हे माझं नशीब. माझा तर आवाजच फुटला नसता. मी न्यायालयात बोलायला खूप घाबरायचो.

नंतर मात्र हरीश जेष्ठ कायदेतज्ञ आणि निष्णात वकील झाले. १९९२ मध्ये ते दिल्ली उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील म्हणून त्यांची नियुक्ती झाली. १९९९ मध्ये भारताचे सॉलिसीटर जनरल म्हणून त्यांची नियुक्ती झाली. २००१ पर्यंत ते या पदावर होते.

त्यानंतर केजी बेसिन प्रकरण, भोपाळ वायुगळती प्रकरण, नीरा राडिया प्रकरण आणि अलिकडचे व्होडाफोन प्रकरण यात त्यांनी टाटा, महिंद्रा आणि अंबानी यांसारख्या मोठ्या घराण्यांची वकिली केली. हेरगिरी प्रकरणात पाकिस्तानमध्ये बंदी असलेले कुलभूषण जाधव यांची बाजू मांडण्यासाठी त्यांनी केवळ १ रुपया फी घेतल्यामुळे संपुर्ण देशभरातुन त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.