”….इस्लामचा अपमान करण्याची पुन्हा कोणी हिंमत करणार नाही” हा फतवा ३३ वर्षे रश्दींच्या मागे होता

“जगातील मुसलमानांनी या पुस्तकाच्या लेखकाला आणि प्रकाशकांना लवकरात लवकर संपवावं ” ज्यामुळं “यापुढे कोणीही इस्लामच्या पवित्र मूल्यांचा अपमान करण्याची हिंमत करणार नाही.”

१४ फेब्रुवारी १९८९ रोजी इराणचे तत्कालीन सर्वोच्च धर्मगुरू आयोतुल्लाह खोमेनी यांनी “द सॅटनिक व्हर्सेस” लिहिल्याबद्दल सलमान रश्दी यांच्याविरोधात फतवा काढून जगातील तमाम मुस्लिमांना  हे आवाहन केलं होतं. सलमान रश्दींनी त्यांच्या पुस्तकातून ईशनिंदा केल्याचा या धर्मगुरूंचं म्हणणं होतं.

कोणाचा सलामन रश्दी यांना मारताना मृत्यू झाला तर तो शाहिद म्हणून ओळखला जाईल आणि त्याला मृत्यूनंतर जन्नत  हासील होईल असं खोमेनी म्हणाले होते.

त्याच्या ३३ वर्षांनंतर हा फतवा चर्चेत येण्याचं कारण ठरलं होतं सलमान रश्दी यांच्यावर झालेला जीवघेणा हल्ला.

१२ ऑगस्ट २०२२ रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात सलमान रश्दी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. न्यूयॉर्क  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 11 वाजता हल्लेखोराने रश्दी यांच्यावर चाकूने हल्ला केला. सलमान रश्दी यांच्या मानेवर वार झाल्याने ते स्टेजवर कोसळून पडले.त्यांची स्थिती नाजूक असून ते व्हेंटिलेटरवर आहेत अशी माहिती आहे. त्याचबरोबर त्यांच्या लिव्हर आणि डोळ्यालाही जबर जखम झाल्याची माहिती मिळते.

न्यूयॉर्क राज्य पोलिसांनी रश्दी यांचा हल्लेखोर हादी मातर या न्यू जर्सी येथील 24 वर्षीय तरुणाला पकडलं आहे . त्याच्या सोशल मीडियावर तो इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड (आयआरजीसी) आणि दिवंगत इराणी कमांडर कासिम सोलेमानी ज्याची अमेरिकेने 2020 मध्ये हत्या केली होती यांचा फॉलोवर असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे .

त्यामुळे हा २४ वर्षाचा पोरगा जो सलमान रश्दींचं “द सॅटनिक व्हर्सेस” प्रकाशित झालं तेव्हा जन्माला देखील नव्हता.

त्यानं सलमान रश्दींवर हा प्राणघातक हल्ला का केला हे बघण्यासाठी आपल्याला पुन्हा थोडं मागं जावं लागेल. तर सलमान रश्दी हे मूळचे भारतातील.  19 जून 1947 ला मुंबईत रश्दी यांचा जन्म झाला. ते 14 वर्षांचे असताना त्यांना इंग्लंडमधील रग्बी स्कुल येथे पाठवण्यात आलं. नंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठात इतिहास या विषयात पदवी मिळवली. शिक्षण झाल्या नंतर त्यांनी ब्रिटिश नागरिकत्व स्वीकरलं आणि ते तिथंच स्थायिक झाले.

सुरवातीला त्यांनी अभिनेता, जाहिरात क्षेत्रात लेखक म्हणून काम केलं आणि मग कादंबऱ्या लिहायला सुरुवात केली. ‘ग्रिमस’ ही त्यांची पहिली कादंबरी. मात्र त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली ते त्यांच्या दुसऱ्या पुस्तकामुळं. 

त्यांचं दुसरं पुस्तक ‘मिडनाईटस् चिल्ड्रन’ लिहायला त्यांना पाच वर्षं लागली.

त्यांच्या या पुस्तकाला 1981 मध्ये बुकर पुरस्कार मिळाला. सलमान रश्दी हे नाव जगभरात पोहचलं. या पुस्तकाच्या आतापर्यंत पाच लाख प्रती विकल्या गेल्या आहेत. ‘मिडनाईट्स चिल्ड्रन’नंतर त्यांची ‘शेम’  ‘द जग्वार स्माईल’ या कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आणि १९८८ साली आली मग त्यांची सॅटनिक व्हर्सेस ही कादंबरी.

त्यांचं मराठीत ट्रान्सलेशन करायचं झाल्यास त्याचा अर्थ होतो ”सैतानी आयते”.

त्यामुळे मुस्लीम स्कॉलर्सनी या नावालाच आक्षेप घेतला होता.  या पुस्तकात रश्दींनी एक काल्पनिक किस्सा लिहिला आहे. तो किस्सा असा, दोन चित्रपट कलाकार विमानाने मुंबईहून लंडनला जात आहेत. त्यातील एक म्हणजे फिल्मी दुनियेचा सुपरस्टार जिब्रिल आणि दुसरा म्हणजे ‘व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट’ सलाउद्दीन. मात्र यांच्या विमानाचा स्फोट होतो आणि ते इंग्लिश खाडीमध्ये पडतं. मात्र यातून ते दोघेही सही सलामत बाहेर पडतात आणि इंग्लंडला पोहचतात.

यामध्ये कुराणातील काही आयतांचा चुकीच्या पद्धतीने वापर करण्यात आल्याचा काही मुस्लिम धर्मगुरूंचा आरोप होता. पुढे कादंबरीतही असे अनेक उल्लेख होते ज्यामुळे या पुस्तकावर ईशनिंदेचा आरोप झाला. विशेषतः मोहम्मद पैगंबरांबद्दल अपमानजनक भाषा वापरण्यात आली होती.

आणि यामुळेच पुस्तकाला टोकाचा विरोध होऊ लागला.

जगभरातुन रश्दी यांच्यावर ईशनिंदेचा आरोप ठेऊन त्यांना मारून टाकण्याच्या धमक्या येऊ लागल्या. हिंसक आंदोलनं होऊ लागली. भारतातही या पुस्तकाच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

त्यामुळेच ऑक्टोबर १९८८ मध्ये भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी निवडणुकीपूर्वी मुस्लिमांचा पाठिंबा मिळेल या आशेने पुस्तकाच्या आयातीवर बंदी घातली होती. या पुस्तकावर बंदी घालणारा भारत हा जगातला पहिला देश होता. त्यानंतर सुमारे २० देशांनी यावर बंदी घातली.

जानेवारी १९८९ मध्ये ब्रिटनच्या उत्तरेकडील ब्रॅडफोर्ड शहरातील मुसलमानांनी सार्वजनिक ठिकाणी त्याच्या प्रती जाळल्या. फेब्रुवारी १९८९ च्या खोमेनी यांच्या फतव्यानंतर  वातावरण अजूनच तंग झालं.

यानंतर हजारो पाकिस्तानीं नागरिकांनी  इस्लामाबादमधील अमेरिकन इन्फर्मेशन सेंटरवर हल्ला केला आणि “सलमान रश्दींना फासावर लटकवा” अशी घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलिसांनी गोळीबार केला पाच नागरिक ठार झाले होते.

याचबरोबर सलमान रश्दी यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला होता. रश्दींच्या डोक्यावर २८ लाख डॉलरचा इनाम जाहीर झाला होता.

त्यानंतर ते जवळपास १३ वर्षे अज्ञातवासात गेले. या काळात जोसेफ अँटोन हे टोपणनाव घेऊन ते राहत होते. त्यांच्या या अज्ञातवासात पहिल्या सहा महिन्यात त्यांना ५६ वेळा आपला ठिकाणा बदलावा लागला होता.

त्यातच “द सॅटॅनिक व्हर्सेस”  हि कादंबरी त्यांना ज्या आपल्या बायकोला समर्पित केली होती तिच्यासही  त्यांचा घटस्फोट झाला. या एकांताला कंटाळलेले रश्दी या काळाबद्दल आपल्या डायरीत नोंद करताना लिहतात “मला तुरुंगात टाकण्यात आलंय आणि डांबण्यात आलंय . “मला साधं बोलताही येत नाही. मला माझ्या मुलाबरोबर पार्कमध्ये फुटबॉल खेळायचा आहे. इक साधं सर्वसामान्य जीवन जगायचं आहे जे माझ्यासाठी एक अशक्य स्वप्न आहे .”

१९९१ साली रश्दी आपल्या अज्ञातवासातून बाहेर येत होते.

पण त्याच वर्षी त्यांच्या एक जपानी अनुवादकाची हत्या झाली. काही दिवसांनंतर त्यांच्या इटालियन भाषांतरकारावर चाकूने वार करण्यात आले आणि दोन वर्षांनंतर नॉर्वेच्या एका प्रकाशकाला गोळ्या घालण्यात आल्या.

१९९३ मध्ये इस्लामी निदर्शकांनी तुर्कीमधील शिवास येथील एका हॉटेलची जाळपोळ केली. तिथल्या एका कार्यक्रमात लेखक अझीझ नेसिन यांच्या उपस्थितीमुळे लोकं संतप्त झाले होते. अझीझ नेसिन यांनी या कादंबरीचे तुर्की भाषेत भाषांतर करण्याचा प्रयत्न केला होता.ते त्या हॉटेलमधून निसटले  पण त्यामध्ये ३७ जण ठार झाले.

काही काळाने हिंसक हल्ले कमी झाले होते. मात्र अधूनमधून अतिरेकी संघटनांकडून सलमान रश्दी यांची आठवण करून देण्यात येत होती.

2006 मध्ये, हिजबुल्ला संघटनेच्या प्रमुखाने सांगितले की, लाखो मुस्लिम सलमान रश्दी यांनी केलेल्या ईशनिंदेचा बदला घेण्यासाठी तयार आहेत. पैगंबरांच्या अनादराचा बदला घेण्यासाठी काहीही करायला तयार आहेत. 2010 मध्ये अल कायदा या दहशतवादी संघटनेने हिटलिस्ट जारी केली होती. यामध्ये सलमान रश्दी यांना इस्लाम धर्माचा अपमान केल्याबद्दल ठार मारण्याची धमकीही देण्यात आली होती.

तरीही हे सगळं मागे टाकूनएक सामान्य जीवन जगण्याचा प्रयत्न सलमान रश्दींकडून चालू  होता. सध्या रश्दी न्यूयॉर्क शहरात आरामशीर जीवन जगत होते. वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी होत होते. 12 ऑगस्ट 2022 रोजी ते अशाच एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते तेव्हा तिथे त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला आहे.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.