दुसरं महायुद्ध संपून तीस वर्ष झालेली, तरिही तो एकटा लढत राहिला…

९ मार्च १९७४. दुसरं महायुद्ध संपून जवळपास तीस वर्षांचा काळ लोटला होता.

जगभरातील अनेक देश नव्याने स्वातंत्र्य झाली होती. फिलिपिन्समध्ये मात्र एक जपानी सैनिक दुसऱ्या महायुद्धातील सहभागानंतर तब्बल २९ वर्षानंतर सरेंडर करत होता. हिरू ओनाडा त्याचं नांव. साधारणतः १९४४ साली म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरच्या काळात त्याला फिलिपिन्समध्ये पाठविण्यात आलं होतं. फिलिपिन्सच्या जंगलातून शत्रुसैन्याच्या मार्गात जे काही अडथळे आणता येतील ते आणायची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली होती. शिवाय सर्वच सैन्याला कुठल्याही परिस्थिती सरेंडर न करण्याचेही आदेशही होते.

हा एक असा आदेश होता, जो त्याने पुढची २९ वर्षे पाळला.

झालं असं की, सप्टेंबर १९४५ मध्ये दुसरं महायुद्ध संपलं. जपानच्या सर्व पराभूत सैनिकांना सरेंडर करण्याविषयी सुचवण्यात आलं. परंतु जपानचा युद्धात पराभव झालाय या गोष्टीवर विश्वास ठेवायला काही तो तयार नव्हता. आपल्या सोबतच्या ३ सैनिकांसह तो फिलिपिन्सच्या जंगलात लपत राहिला. गनिमी पद्धतीने आपल्या कारवाया त्याने सुरूचं ठेवल्या. विशेष म्हणजे शत्रू सैनिक समजून त्यानं ३० लोकांना मारलंसुद्धा.

त्याच्यासोबतच्या असलेल्या इतर ३ सैनिकांपैकी एक जण जपानला परत गेला आणि एक जणाचा मृत्यू झाला. एक जण स्थानिक पोलिसांसोबतच्या चकमकीत मारला गेला. दरम्यानच्या काळात त्याने सरेंडर करावं यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आले. तसं करण्याविषयी सुचवणारे पत्रके फिलिपिन्सच्या जंगलात टाकण्यात आले. आपल्याला पत्रके तर मिळाली, पण तो आपल्याला फसविण्यासाठी अमेरिकाने रचलेला डाव असावा, असं वाटून आपण त्याकडे दुर्लक्ष केलं, अशी माहिती ओनाडा यांनीच नंतर एका मुलाखतीत दिली.

१९७४ च्या फेब्रुवारीमध्ये त्याची भेट नोरीओ सुझुकी या जापनीज माणसाशी झाली जो त्याचाच शोध घेत होता. ओनाडाबद्दल त्याला जाणून घ्यायचं होतं. ओनाडा आणि सुझुकीची मैत्री तर झाली पण ओनाडा यांनी तरीही सरेंडर करण्यास नकार दिला.

आपण आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाची वाट बघत असल्याचं त्यांनी त्यांनी सुझुकीला सांगितलं.

006
book- no surrender my thirty years war

ओनाडा यांच्याशी झालेल्या भेटीचे पुरावे घेऊन सुझुकी ज्यावेळी जपानमध्ये परतला, त्यावेळी जपान सरकारने ओनाडा यांचे युद्धकालीन वरिष्ठ अधिकारी मेजर योशिनी तानीगुची त्यांना फिलिपिन्सच्या जंगलात पाठवलं. त्यांनी ओनाडा याचं अधिकृतरीत्या सरेंडर करून घेतलं. “काहीही झालं तरी मी तुला घ्यायला परत येईल” हा १९४४ साली तानीगुची यांनी ओनाडांना दिलेला शब्द खरा ठरला.

सरेंडर केल्यानंतर ओनाडा यांनी फिलिपिन्सचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस यांची फिलिपिन्समध्ये त्यांच्याकडून मारल्या गेलेल्या लोकांच्या जीविताबद्दल माफी मागितली. तत्कालीन वस्तुस्थिती लक्षात घेता त्यांना फिलिपिन्सच्या राष्ट्राध्यक्षांनीही त्यांना माफी दिली. जपानमध्ये परतल्यानंतर तिथे त्यांचं एखाद्या नायकासारखं स्वागत झालं.

पुढे त्यांनी ‘No Surrender- My thirty years of war’ हे आत्मचरित्र लिहिलं. काही काळ ब्राझीलमध्ये घालवला. अनेक मानसन्मानांनी त्यांना गौरविण्यात आलं. २०१४ मध्ये हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाला.

हे ही वाचा – 

Leave A Reply

Your email address will not be published.