नोबेल जाहीर करणाऱ्यावर पहाटे फोन केला म्हणून खेकसणारा इडियट जिनियस

आजवर बहुतेक शास्त्रज्ञ वेडसर दाखवले जातात. गबाळे राहणे, आपल्यातच तंद्रीत रहाणे वगैरे. केस वाढलेले आईनस्टाईन, एपीजे अब्दुल कलाम आपल्याला माहीत. पण फाइनमनभाऊचा पॅटर्न पूर्ण वेगळा होता. प्रकांड बुद्धिमत्तेला रंगेल पणाची आणि मिश्किल तेची जोड. आणि दुनिया जाये भाड मे, काय बोलायचे ते बोलू दे.जगाला कोलायची मस्ती असलेला swag.

फाइनमन म्हणजे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व. गणितावर, विज्ञानावर आणि जीवनावर प्रचंड प्रेम करणारा शास्त्रज्ञ, मन लाऊन शिकवणारा प्राध्यापक, चांगला चित्रकार, वादक, सभा मारून नेणारा जबरदस्त वक्ता आणि मिश्कील स्वभावाचा भिडू. एक रंगीत जीवन जगलेला रंगीला मस्तमौला. रिचर्ड फाइनमन.एक वेडा जिनियस.

अमेरिकेत स्थलांतरित होऊन आलेल्या आणि मिळेल ते काम करून पोट भरणाऱ्या मेलविल आणि लूसिली या ज्यू जोडप्याचा हा पोरगा.

११ मे १९१८ रोजी जन्माला आला. तीन वर्षाचा होईपर्यंत बोलायला पण शिकला नाही.(आईनस्टाईन पण नव्हता शिकला राव.. काय योगायोग.) घरात गरिबी असली तरी मेलवील स्वप्न मात्र मोठी पाहत होता. आपल्या मुलानं शास्त्रज्ञ व्हावं असं मेलवीलला वाटायचे त्यामुळे लहान रिचीची चौकस बुद्धी, चिकित्सक वृत्ती कशी वाढेल यासाठी त्याने जाणीव पुर्वक प्रयत्न केले.

हे जग किती अद्भूत आणि रोचक आहे याची ओळख रीच्याला करून देत असताना मेलवीलचे धोरण थ्री इडियट मधल्या रांचो सारखे होते. केवळ घोकंपट्टी करायची नाही तर विषय मुळापासून शिकायचा.

“कामयाब नही काबिल बनो” हेच सूत्र.

वडिलांकडून वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आईकडून मिश्कीलपण लाभलेला हा रिची गणित, खगोल, संगीत, विज्ञान, चित्रकला सगळ्याच विषयात रस घेत होता.

“ग्यान तो हर जगह बट रहा है ना”

थ्री इडियट मधल्या रांचो ची स्टोरी आठवावी अगदी असेच बालपण या रिचीचे गेले. कोणताच विषय वर्ज्य नाही. मात्र रीचीला आपण हुशार असल्याचा गर्व होता.. आणि लोकांनी त्याला हुशार समजले पाहिजे असे तो मुद्दाम वागायचा. रूपगर्विता जश्या असतात तसा हा बुद्धी गर्वित

वयाच्या आठव्या वर्षी त्याची स्वतःची प्रयोगशाळा होती. त्यात आसपास च्या लोकांची बिघडलेली उपकरणे असायची.

त्याकाळात रेडिओचीच करमणूक असायची. घरोघरी रेडिओ असायचे. जे किरकोळ कारणाने बिघडायचे. याने लहान पणापासून “रांचोगीरी” केली असल्याने आठ वर्ष वयाचा रीचा कुशल रेडिओ मेक्यानिक म्हणून आसपास प्रसिद्ध झाला होता. लोक विश्वासाने रेडिओ नीट करायला द्यायचे आणि हा पण ते नीट करायचा. अर्थात भरपूर भाव खाऊन. स्वतःची हवा करून.

एकदा त्या भागातील प्रसिद्ध हॉटेल मधला रेडिओ बिघडला. त्या मालकाला कळले की कोणी रिचर्ड फाईनमन आहे जो रेडिओ नीट करेल. त्याने फोन करून बोलावून घेतले. तर हा आठ वर्षाचा सुपर हिरो हातात अवजारे घेऊन पोचला. जस्ट कल्पना करा मालकाची अवस्था काय झाली असेल. इंट्री तर बढिया झाली. पण क्लायमॅक्स नाय तर मजा नाय ना. त्याने मस्त रेडिओ खोलला आणि विनाकारण काही तरी विचार करतोय असे दाखवत हॉटेल मध्ये चकरा मारायला लागला.

सगळ्या लोकांच्या नजरा याच्याकडे. पुरेशी वातावरण निर्मिती झाली आणि मगच त्याने रेडिओ नीट केला. मग काय फुलं हवा. टाळ्याच टाळ्या.

जोअॅन ही त्याची ९ वर्षांनी लहान असलेली बहीण. ती आठवण सांगते.

‘आमच्या घरी एक कुत्रा होता. त्याला आम्ही काही गमती जमती करायला शिकवायचो. त्याचं शिकणं बघून रिचर्डला वाटलं की कुत्र्याचे पिल्लू ठीक पण आपण बहिणीला पण ट्रेन केलं पाहिजे. तेव्हा तीन एक वर्षांची असताना मला तो सोप्या सोप्या बेरजा वजाबाक्या करायला सांगायचा आणि उत्तर बरोबर आले तर बक्षीस काय? तर त्याचे केस मनसोक्त ओढायची मला परवानगी..”

भारी बक्षीस आहे ना! आईचा विरोध असला तरी भावाच्या सपोर्ट मुळे जोअॅन पुढे नासाच्या जेट प्रपल्शन लॅबमधे शास्त्रज्ञ झाली.

रिची कानाला इअरफोन लावून बिछान्यात रेडिओे ऐकत स्टाईलमध्ये झोपत असे. रात्री आई-वडील हळूच येऊन ते इअरफोन काढत असत. याची तर मोठी धमाल झाली. चोराने घरात प्रवेश केला, तर घंटा वाजावी असा अलार्म रिचीने स्वतःच बनवला. एक बॅटरी, घंटा अन् त्यांना एकमेकांशी जोडणारी तार ! जेव्हा खोलीचे दार उघडनार, तेव्हा ती तार मागे सरकून सर्किट पूर्ण होणार आणि अकार्म वाजणार अशी सोपी रचना. रात्री आई-वडील रात्री उशिरा आले इअरफोन काढायला पण तार मागे खेचली गेली अन् मोठ्याने घंटा वाजू लागली. आई वडील परेशान आणि पोरग मात्र बिछान्यात नाचतय !

रीच्याने प्रयोग करताना त्याच्या रेडियोला शक्तिशाली बनवले होते. त्यामुळे इतर कुणाकडे न लागणारे स्टेशन देखील ह्याचाकडे लागायचे.

त्याने हे पण शोधून काढले की, रहस्य कथांचा लोकप्रिय कार्यक्रम शेनेक्टडी रेडिओे स्टेशनवरून न्यूयॉर्कपेक्षा एक तास आधी प्रसारित होतो. मग हा एक तास आधी शेनेक्टडीवर कार्यक्रम ऐकून बसायचा आणि बाकीचे पोरं जेव्हा न्यूयॉर्क स्टेशनवर ऐकायला एकत्र जमायचे. तिथे हा पुढची स्टोरी सांगायचा. हा सांगेल अगदी तंतोतंत व्हायचे ना राव.

बाकीच्या पोरांची बोटे तोंडात आणि ह्याची कॉलर कडक !! आहे ना शायनर !

रिची चा iq १२५ असल्याचे त्याचा चरित्रकार सांगतो. कोडी सोडवायचा प्रचंड नाद. सोडवले नाही असे एक पण कोडे नाही. विज्ञान आणि गणितामध्ये रिचा प्रचंड हुशार होता. एका वर्षात दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करत त्याने गणित विषयाची न्यूयॉर्क विद्यापीठाची चॅम्पियनशिप सुध्दा जिंकली.. मात्र तरीही त्याला पुढचे शिक्षण घ्यायला संघर्ष करावा लागला. रिची लहानाचा मोठा जरी नास्तिक म्हणून झाला तरी त्याला जन्मजात मिळालेला धर्म त्याची पाठ सोडतं नव्हता.

जेव्हा त्याला महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा होता तेव्हा ज्यू लोकांसाठी असलेला कोटा भरला म्हणून त्याला अनेक ठिकाणी प्रवेश नाकारला गेला. शेवटी कसाबसा एमआयटी मध्ये त्याला प्रवेश मिळाला.

मॅसॅच्युसेटस् इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) मधून बी. एस्.सी. ही पदवी (१९३९) आणि प्रिन्स्टन विद्यापीठातून पीएच्. डी. ही पदवी मिळवली (१९४२). आधी त्याला गणित शिकायचे होते.. पण नंतर गणित खूप सोपे वाटत होते म्हणून विद्युत अभियांत्रिकी घ्यावे असे त्याला वाटले.मात्र नंतर या दोघांचा सुवर्णमध्य म्हणून त्याने भौतिक शास्त्र हेच निवडले. नंतर प्रिन्स्टन इथेच सैद्धांतिक भौतिकशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक म्हणून त्यानी काम केले. मॅनहटन येथे बोलावणे येई पर्यंत.

तिकडे जाण्याआधी थोडासा रूमानी.

वयाच्या तेराव्या वर्षापासून रिचीचे शेजारच्या अर्लीनवर प्रेम. दोघे लग्न करणार हे जवळपास सगळ्यांना माहित. मात्र अर्लीन ला झाला टी बी. १९४२ मध्ये डॉक्टरांनी सांगितले ती जास्तीत जास्त दोन वर्षे जगेल. रिच्या तर म्हणतोय काय फरक पडत नाही. लग्न तर करायचे. दोघांचे आईवडील आता मात्र लग्नाला विरोध करत होते. मग काय भाऊला सैराट व्हावे लागले. जेव्हा यांचे लग्न झाले तेव्हा ओळखीचा एक पण माणूस नव्हता आणि तिकडच्या प्रथे प्रमाणे वधूचे ओठांचे चुंबन नवरदेव घेऊ शकत नव्हता.

अमेरिकेचा अणूबाँब बनवण्याचा प्रकल्प मॅनहटन येथे ओपेनहेमरच्या नेतृत्वाखाली उभारला जात असताना ओपेनहेमरनं अमेरिकेतली सगळ्यात बुध्दिमान माणसांची जी निवड केली, त्यात फाइनमनची गणितज्ञ म्हणून निवड होणे अपरिहार्य होते.

फाइनमनने ओपेनहेमरला आर्लीनच्या आजाराविषयी सांगितलं. ओपेनहेमरनं लगेच दोघांची सोय केली. मग दोघे खुशी खुशी तिकडे शिफ्ट झाले. इन्फिनिटी नावाचा चित्रपट फाइनमन वर बनवला आहे. त्यात तुम्ही यांचा रोमान्स अनुभवू शकता.

मॅनहटन प्रोजेक्टमधे सगळ्या गोष्टींची सक्त गुप्तता पाळली जात असली तरी फाइनमन मात्र त्याच्या स्वभावानुसार फुलं टू कल्ला करत होता. दारू पिऊन टाईट झालेला फाइनमन मध्यरात्री डबे वाजवत दंगा करत फिरायचा. कोल्डड्रिंक वेंडींग मशीन हँग करून फुकट कोक पिणे त्याला आवडायचे. रिचा लहानपणा पासून कलाकार माणूस. कुठलंही कुलूप चटकन् शकत असे. मग काय. कुणाच्याही खोलीची कुलुपं उघड आणि त्यांच्या उघड्या दारावर ‘तुमच्या सुरक्षिततेची तुम्ही नीट काळजी घ्या’ अशी नोटीस लाव. कधी साहेबाच्या कपाटाचे कुलूप उघडून त्यातले महत्वाचे गुप्त कागद टेबलावर नेऊन ठेव… असे त्याचे अनुपद्रवी कीडे सुरू..

मॅनहटन प्रकल्पात त्याची कामगिरी खूप महत्त्वाची आहे. ज्या आकडेमोडीसाठी आधी महिना लागायचा ती फाइनमनच्या योगदानामुळे तीन दिवसात यायला लागली.

आणि अणुबॉम्ब तयार झाला. मात्र अणुबॉम्बचे जपान मधील परिणाम पाहिल्यावर त्या प्रकल्पात काम करणाऱ्या अनेक शास्त्रज्ञाप्रमाणे फाइनमनला देखील नैराश्य आले. १९४५ साली फाइनमनवर एकामागून एक आघात झाले. त्याची लाडकी आरलीन सुद्धा मृत्यू पावली होती. पाठोपाठ वडिलांचा मृत्यू झाला. इथे मात्र फाइनमन खचला.

त्याच्या जीवनाची नौका सैरभैर झाली. रोज रात्री नाईट क्लब मध्ये झिंगणे, विवस्त्र स्त्रियांचा डान्स पाहणे, मूड आला तर तिथे बाँगो वाजवणे आणि सडकछाप रोमिओ गिरी करणे अशी त्याची जीवनशैली झाली होती. याकाळात त्याने अनेक स्त्रियांसोबत संबंध ठेवले. फाइनमनच्या स्वैर लैंगिक वर्तनाची खूप चर्चा व्हायला लागली. एवढी की त्याचे व्याख्यान सुरू असताना निदर्शने केली गेली, त्यात त्याला कामपिसाट डुक्कर वगैरे संबोधले गेले.

या काळात एक प्रेयसी फाइनमनचे “आइन्स्टाईन मेडल” घेऊन पळून गेली. एक प्रेयसी “मे तेरे बच्चे की मा बनने वाली हू” बोलून ब्लॅकमेल करून गर्भपातासाठी भरपूर पैसे घेऊन गेली. वैतागून शेवटी पुन्हा संसार मांडायचे त्याने ठरवले.

फाइनमनने दुसरे लग्न १९५२ साली आपल्या जुन्या मैत्रिणी सोबत लग्न केले. मात्र चारच वर्षात त्यांचा घटस्फोटही झाला. ह्याचे तिसरे लग्न मात्र त्याचे शेवट पर्यंत टिकले. पगारी नोकर म्हणून आलेली ग्वेनेथ नंतर त्याच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनली. नोबेलचे मिळालेले पैसे खर्चून मस्त बीचहाऊस घेतले. एक मुलगा झाला, एक मुलगी दत्तक घेतली. त्याच्या या बायकोने फाइनमनचा आणि त्याच्या बाहेरख्यालीपणाचा चांगला संभाळ केला.

या रंगेल माणसाचे हे उद्योग आपण बाजूला ठेवूनच त्याचे विज्ञानातील योगदान पाहायला हवे.

पुंज विद्युत गतिकी शाखेचा (क्वांटम इले्ट्रॉ डायनॅमिक) विकास होत असताना अनेक सिद्धांताना निष्कर्ष संख्यात्मक पातळीवर सिद्ध करणे अवघड होत होते. तोवर केवळ गुणात्मकदृष्ट्या मांडले गेलेले निष्कर्ष संख्यात्मकदृष्ट्या मांडता येतात असे फाइनमन यांनी दाखवून दिले.

फाइनमन याला भेटलेले नोबेल तिघा जनात विभागून आहे. श्विंगर आणि टॉमॉनागा यांना फाइनमन सोबत गौरवण्यात आले होते. तिघांनी एकाच विषयावर काम केले मात्र फाइनमनची गणितीय समीकरणे सोडविण्याची पद्धत या दोघांपेक्षा अधिक सोपी आणि सुटसुटीत होती. एखाद्याला नोबेल पारितोषिक मिळाल्याचे समजले तर तो किती खुश होईल. पण हा विक्षिप्त माणूस पुणेकरांवर कडी करेल असा.

“ही काय वेळ आहे का फोन करायची? अजून चार पाच तासांनी केला असता तर काय बिघडले असते का?”

पहाटे डिस्टर्ब केले म्हणून फोन करणाऱ्यावर हा खेकसला होता!

कोणताही विषय सोप्या पद्धतीने मांडण्याची किंवा शिकवण्याची शैली फाइनमन यांना चांगलीच अवगत होती. समोरच्या व्यक्तीला एकदा सांगून समजले पाहिजे इतके तुम्ही सोपे सहज शिकवले पाहिजे असे त्याचे म्हणणे होते. इलेक्ट्रॉन व पॉझिट्रॉन यांच्यात घडून येणाऱ्या आंतरक्रिया अतिशय सोप्या आकृत्यांच्या आधारे त्याने स्पष्ट केल्या. या आकृत्या “फाइनमन फिगर्स” म्हणून प्रसिद्ध आहेत. या आकृत्या फाइनमनने त्याच्या गाडीवर रंगवून घेतल्या होत्या. त्याची गाडी चालती बोलती जाहिरात होती जणू.

download 1

अमेरिकेने फाइनमनच्या स्मरणार्थ काढलेला स्टँप आपण “सोबतच्या चित्रात” पाहू शकता त्यामध्ये फाइनमनच्या सोबत त्याच्या प्रसिद्ध आकृत्यांना पण स्थान दिले आहे.

एक दिवस वरिष्ठांनी फाइनमनला सेमिनार घ्यायला सांगीतलं. ते त्याचं पहिलच सेमिनार होते आणि चक्क आइन्स्टाईन ते ऐकायला येणार होता. ह्याची हवा आधीच फुस्स. मात्र आईनस्टाईनला त्याचे व्याख्यान प्रचंड आवडले आणि ही पद्धत सापेक्षतावाद मध्ये लागू कशी होईल हे पाहायला सांगितले. (पुढे फाइनमनची पद्धत वापरून जयंत नारळीकर यांनी फ्रेड होयल सोबत आइन्स्टाईनचा सापेक्षता सिध्दांत गुरुत्वाकर्षणशी जोडून होयल- नारळीकर सिद्धांताची मांडणी केली आहे.)

विद्यार्थ्यांसाठी फाइनमनचे व्याख्यान म्हणजे मेजवानी असे. जणू काही एकपात्री प्रयोग. त्याचे हावभाव, विनोद, त्यातलं नाटय़ आणि त्यातून ज्ञान पाजणे. १९६० च्या दशकात फायनमननं भरपूर तयारी करून दिलेली व्याख्याने प्रचंड गाजली. ‘फाइनमन्स लेक्चर्स’ म्हणून ती तीन खंडात प्रकाशित झाली आणि अजून ६० वर्षानंतरही ती तितकीच चांगली, सोपी आणि उपयोगी आहेत.

ही लेक्चर्स बिल गेट्सनी विकत घेऊन ऑनलाइन फ्री उपलब्ध केली आहेत. थॅन्क्स बिल

फाईनमनच्या वेडेपणाचे किस्से पण प्रसिद्ध आहेत. एकदा घराजवळच पाय अडखळून तो डोक्यावर पडला होता. तेव्हा डोक्याच्या आत रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा गझनी झाला होता. (आज अमीर खान चे जास्तच संदर्भ येत आहेत का) त्याला आजुबाजुची किंवा स्थलकालाची जाणीव राहिली नव्हती आणि आपण काय करतोय हे तो विसरून जायचा. सेक्रेटरीला सांगायचा मी घरी चाललो आणि परत ऑफिस मध्येच येऊन बसायचा. कधी पार्किंगमधे ठेवलेली स्वतःची गाडी सापडायची नाही.

नॅनो टेक्नोलॉजी चा आज खूप गवगवा आहे मात्र ही संकल्पना फाईन मन ने १९५९ मध्येच मांडली होती.

अमेरिकन फिजिकल सोसायटीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात फाईनमनने ‘देअर इज प्लेन्टी ऑफ रुम ॲट दि बॉटम.’ विषय मांडत पदार्थाच्या थेट अणूंची हाताळणी करण्याची शक्यता वर्तवली होती. फाइनमनच्या कल्पनेतून प्रेरणा घेत ड्रेक्सलरने इंजिन्स ऑफ क्रिएशन हे पुस्तक १९८६ साली प्रसिद्ध केले, आणि नॅनो तंत्रज्ञानाचा उदय झाला.

एक ज्यू संपादिकेने फाइनमनशी संपर्क साधून लेख देण्याची विनंती केली आणि सांगितले की मी सर्व नामांकित ज्यू लेखकांकडून लेख मागविले आहेत. याने तिला लेख तर दिला नाहीच. वर झाप झाप झापली. माझे ज्यू असणे ही माझी गुणवत्ता का ? तसे असेल तर सांगतो मी नास्तिक आहे. आणि मला अशी धर्माच्या नावावर गटबाजी करणे पसंद नाही.

फाईनमनकडे त्याचा मित्र आला, त्याने एक फुल दाखवलं आणि खिजवण्याच्या प्रयत्नात म्हणाला,

“तुम्ही विज्ञानात डूबलेली मुलखाची अरसिक असता. तुम्हाला ह्या फुलाचे सौंदर्य काय घंटा समजणार?”

फाइन मन त्याला बोलला,

”तू केवळ फुलांची सुंदरता पाहू शकतोस. ती तर मी पाहू शकतोच पण सोबत त्याच केशाकर्षण, त्याच परागसिंचन, फुलाचं फळ होणे इतके सगळे ‘फुलाच्या आतलं सौंदर्य’ सुद्धा बघू शकतो हे तुला नाही दिसू शकत. त्यासाठी तूला विज्ञान शिकावे लागेल.”

विज्ञान नक्कीच तुमची सौदर्य दृष्टी वाढवते.

फाइन मन बद्दल अजून माहिती हवी असेल तर http://www.feynman.com या साईट वर मिळेल याशिवाय मराठीत अच्युत गोडबोले, दीपा देशमुख यांनी लिहिलेल्या “जीनियस” चा पर्याय चांगला आहे. याशिवाय माधुरी शानभाग,सुधा रिसबूड यांची देखील पुस्तके आहेत.

रिचर्ड चे सर्वात गाजलेले पुस्तक “शुअर्ली यू आर जोकिंग मि. फाइनमन” याचा अनुवाद देखील माधुरी शानभाग यांनी केला आहे.

फाइनमन यांना १९५४ साली अल्बर्ट आइनस्टाइन पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

अमेरिकेच्या नॅशनल अकॅडेमी ऑफ सायन्सेस तसेच लंडनच्या रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. मात्र इतर शास्त्रज्ञ स्वतःला विविध समितीवर सेट करायला बघतात त्यात फाइनमनला रस नव्हता. मात्र जेव्हा नासाच्या चॅलेंजर या यानाचा स्फोट झाला तेव्हा त्याच्या चौकशी समिती मध्ये फाइनमनला बोलावण्यात आले. नील आर्मस्ट्राँगही या समितीमधे होता.

चॅलेंजर यान अंतराळात उडून फक्त ७३ सेकंदात स्फोट होऊन त्याच्या चिंध्या उडाल्या होत्या. यातील दोष शोधण्याचं काम फाइनमननं एकदम फिल्मी स्टाईलने केले. घटना घडली त्यादिवशी तेथील तापमान शून्य अंश सेल्सिअस होतं. त्यामुळे यानातील रबरी रिंग तुटली आणि कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला असा याचा दावा होता. अर्थात नासा अशी शुल्लक पण मूर्ख चूक मान्य करणार नाही याची पण त्याला कल्पना होती.

मग चॅलेंजरच्या चौकशी समितीच्या पहिल्या बैठकीत कॅमेऱ्यासमोर फाइनमन ने लाइव्ह डेमो दाखवला.

त्याने भांड्यात पाणी मागवलं आणि त्यात ती रबरी बांगडी टाकली आणि वरून बर्फाचे दोन खडे टाकले. आधी बाकीच्यांना बोलू दिले (शहाणपणा तर कोण.. भाऊच करणार ना). सगळ्यात शेवटी फाइनमन उठला, एकही शब्द न बोलता ती रबरी रिंग काढली आणि ताणली. त्याबरोबर ती चटकन तुटली. त्यानंतर ह्याला जास्त बोलायची गरज राहिली नाही.

अश्या महत्वाच्या आणि गुंतागुंतीच्या अपघाताचं रहस्य इतक्या चटकन आणि सोप्या पद्धतीने ओळखणं कसं शक्य आहे? असं सगळ्यांना वाटत होते. पुढची तारीख घेण्याबाबत प्रस्ताव आला. मात्र फाइनमन बोलला ’माझं काम आता झालंय. मी पुन्हा येणार नाही“ लगेच राजीनामा फेकून बाहेर ! नासाकडे तेव्हा आधीच पैश्याचा प्रोब्लेम त्यामुळे खराब हवामान असले तरी इज्जत का सवाल करून उड्डाणाची तारीख पुढे ढकलण्याचं टाळलं होतं आणि म्हणूनच हा अपघात झाला होता.

यावर फाईनमन म्हणाला होता

“निसर्गाला आपण फसवू शकत नाही.“

निसर्गाला खरचं कोणी फसवू शकत नाही. फाइन मन १९७८ पासून पोटाच्या कॅन्सरशी झगडत होता, आणि वरील बैठकीला जाण्यापूर्वी काही दिवस त्याला ‘बोन मॅरो’चाही कॅन्सर झाल्याचं लक्षात आलं होतं. जरी कॅन्सरचा जोर वाढत चालला होता, तरी त्याचं या विश्वाविषयीचं कुतूहल, विचार आणि संशोधन थांबलं नव्हतं. मृत्यूच्या काहीच दिवस अगोदर घेतलेल्या त्याच्या फोटोत तो खूपच आनंदी, उत्साही आणि हसराच दिसत होता.

शेवटी १५ फेब्रुवारी १९८८ रोजी रिचर्ड फाइनमन मरण पावला. एक प्रचंड बुद्धिमान, सदा आनंदी आणि विनोदी शास्त्रज्ञ, रसिक, रंगेल कलंदर मातीत विलीन झाला !

त्याचा देव, स्वर्ग, नरक यावर विश्वास नव्हता. मात्र जर देव असता आणि हा स्वर्गात पोचला असता.. तर देवाला याने “हाय बडी. मेलो रे मी खरचं” असे बोलले असते. आणि देव सुद्धा याचा आनंदी, निडर आणि ताजातवाना चेहरा पाहून म्हणाला असता, “शुअर्ली यू आर जोकिंग मि. फाइनमन”

  • डावकिनाचा रिच्या

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.