पब्जीचं काय सांगताय आमच्या पिढीला नोकियाच्या ‘ सापाच्या गेम ’ ने येडं केलं होतं !..

आज आपल्याला जे विकसित तंत्रज्ञान दिसत आहे, ते काय दहा वर्षांत सगळं अस्तित्वात आलेलं नाही. त्याला काही पिढ्यानपिढ्या गेलेल्या आहेत. म्हणजे प्राचीन काळापासून वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा विविध मार्गी प्रवास आहे.

अश्मयुगापासून जसा मनुष्य बदलत गेला, तसा त्यानेच स्वतःच्या बदलासोबत जगण्यासाठी उपयुक्त ठरणारे ही बदल केले.

१९९० च्या दशकात तर आधुनिकतेकडे घेऊन जाणारं तंत्रज्ञान विकसित व्हायला नुकतीच सुरुवात झाली होती. त्याकाळी संवादाचं माध्यम हे पोस्ट, टेलिफोन , यांद्वारे हाताळलं जायचं. पण जसा काळ बदलत जातो तसं जगणं जगण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींच्या गरजा ही बदलत जातात. संवादाच्या दळणवळणाच्या उपयुक्त सोयीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करून मोबाईल विकसित केला गेला.

तश्या जगामध्ये अनेक मोबाईल कंपन्या तंत्रज्ञानाच्या जगात उतरल्या होत्या. आपल्या भारत देशात मात्र नोकियाची खूप क्रेज वाढत चालली होती.

अश्यातच नोकियाने नातं घट्ट करून मनमोकळ्या संवादाला वाट मोकळी करून देण्यासाठी ‘ १९९७ ’ नोकिया ६११० या मॉडेलचा मोबाईल भारतीय बाजारपेठेत विक्रीस आणला. अल्प काळातच मोबाईल साऱ्या भारतभर पोहचला. वापरकर्त्यांच्या पसंतीस पडू लागला. कारण एकच होतं की नोकियाने ग्राहकांची नस पूर्णपणे अभ्यासु वृत्तीने ओळखली होती.

‘ मनुष्याला मनोरंजनाची जोड आसली की मग तो कशाचाही कंटाळा करत नाही. त्यात तो रमून जातो. पण इंटरनेटच्या मार्फत आत्ताच्या सारखं मनोरंजन देणं त्याकाळी अशक्य होतं. म्हणूनच नोकियाने काळाचा अंदाज घेऊन ६११० या मॉडेल मध्ये सापाची गेमिंग टाकली..’

अनेकांना आजही आठवत असेल की साधा सापाचा खेळ सुद्धा व्यसनाधिनतेला लागल्यासारखे आपण खेळायचो.

हातात चारपाच मोबाईल मावतील, एवढा तो लहान मोबाईल; पण किती लवकर आपुलीकी निर्माण करून गेला. चार्जिंगच्या त्या लहान मोठया पाच काडया, अंधारात उजेड करण्यासाठी असणारी छोटीशी बयाटरी, इतर फंक्शन्स आणि सापाचा खेळ, कुणालाही हाताळता येईल असा तो नोकिया ६११० मॉडेलचा मोबाईल.

सापाच्या खेळात स्क्रीनवर तो साप आधी लहान असायचा, मग हळूहळू ठिपके गिळत तो फुगायचा, म्हणजेच मोठा व्हायचा. एक स्तर संपला की दुसरा सुरु व्हायचा, असं करत करत आपण त्याच्यात गुंतून जाऊन कधी जिंकायचो तर कधी हारायचो.

१९९७ साली सापाच्या खेळासोबत बाजारात आलेला नोकिया ६११० या मॉडेलला अल्प काळातच भारतभर पसंती मिळाली.

मोबाईल युगामध्ये ही एक नव्या युगाच्या तंत्रज्ञानाची एक प्रकारची क्रांतीचं होती. एखादी गोष्ट लोकांना आवडली की लोकांचा त्या गोष्टीकडे जास्त ओढा राहतो. मग निर्माता ही त्याचं गोष्टीला केंद्रित करून अधिकाधिक चांगल्या प्रकारे ग्राहकांना गोष्ट उपलब्ध करून देतो. नोकिया कंपनीच्या बाबतीतही पुढे तसच झालं.

अवघ्या तीन वर्षांतचं म्हणजे २००० साली नोकियाने ३३१० या मॉडेल मध्ये सापाच्या खेळाला अपडेटिंग करून मोबाईल ग्राहकांच्या भेटीस आणला. आता सापाचा खेळ हा फक्त एका ओळीचा नव्हता तर त्यात बोनस होते, स्क्रीनवर सापाचे अडथळे निर्माण करणारे चक्र होते.

या ३३१० चा दगडासारखा दणकट सख्खा भाऊ ३३१५ हे मॉडेल मोबाईल ग्राहकांच्या खूप पसंतीस पडला आणि घराघरात पोहचला. 

त्याकाळी एका वर्षांत नोकियाच्या या उद्योगाने १० अब्ज डॉलर्स चा मोठा व्यवसाय केला होता. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांवरच सापाच्या खेळाची प्रचंड क्रेज निर्माण झाली होती. ती होणं ही त्याकाळी साहजिकच होतं. कारण आज जसं दर दिवसाला टेक्नोलॉजीच्या आधारे नवनवीन अपडेट्स होऊन बाजारात येणाऱ्या मोबाईलचे आपण जेवढे चाहते आहोत, तेवढे त्याकाळी नोकियाच्या मॉडेलचे होते.

अनेकजणांचं नोकियाच्या सापाच्या खेळाशी असलेलं अतुट नातं, हे आजही आठवणीच्या स्मृतीत आहे.

कुणी शाळेतून घरी येताना आईच्या मोबाईलवरून ही गेम खेळलेलं आहे, कुणी अभ्यास सोडून गुपचूप, तर कुणी घर भांडणात रुसून फुगून सुद्धा गेम खेळलेलं आहे. गेमच अॅडीक्ट होणे हा प्रकार स्नेक पासून सुरु झाला असावा. याच यश बघून नोकिया वाल्यांनी बेसिक ११०८ पासून N-70. N-90, N-gage  या हाय फंडू फोन पर्यंत सगळ्यात स्नेक गेम घातला.

गरीब असो की श्रीमंत, परभणी असो की जर्मनी जगातल्या करोडो लोकांनी हा सापाचा गेम नोकिया मोबाईलवर एकदा तरी खेळलेला आहे. 

सापाच्या खेळाची मनोरंजकता अशी आहे की साप जसा मोठा होत जातो, तसा त्याचा वेग वाढतो. त्यामुळे खेळणाऱ्यालाही तेवढयाच वेगाने खेळात सतर्क राहावं लागतं. नोकिया मात्र मोबाईल कंपन्याच्या गेममध्ये अपडेट राहू शकली नाही. ऐन मोक्याच्या क्षणी अँडरॉईड, अॅप्पलने त्यांना गाठलं आणि धुळीत मिळवल.

मात्र ते काहीही असल तरी आजही स्नेकचा गेम आजवरच्या गेमिंगच्या इतिहासातला सर्वात बाप गेम होता. आज हायफाय पब्जीने येडी झालेल्या पिढीला आपण नावे ठेवतो पण एकेकाळी आपल्याला ब्लॅक अँड व्हाईट दगड ३३१५ वरच्या स्नेकने खूळं करून सोडलेलं हे कोणाला सांगत नाही.

  • कृष्णा वाळके

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.