टिपू सुलतानची वंशज, जी थेट हिटलरच्या मागावर होती..
दीपिका पदुकोन आणि प्रियांका चोप्रा यांच्यानंतर आता राधिका आपटे आपल्या हॉलीवूड डेब्यूसाठी सज्ज झालीये. राधिकाचा नवीन हॉलीवूडपट येतोय ‘लिबर्टी: अ कॉल टू स्पाय’. जो माजी ब्रिटीश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्या दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यानच्या गुप्तहेरांच्या सिक्रेट आर्मीवर आधारित असणार आहे. या महायुद्धातील एक ‘वॉर हिरो’ म्हणून इतिहासात अजरामर झालेल्या नूर इनायत खान हिची भूमिका राधिका साकारणार आहे.
कोण होत्या नूर इनायत खान…?
श्रावणी बसू यांनी नूर इनायत खान यांच्या जीवनावर ‘द स्पाय प्रिन्सेस : द लाईफ ऑफ नूर इनायत खान’ नावाचं पुस्तक लिहिलंय. या पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात गुप्तहेर म्हणून केलेल्या धाडसी कामगिरीविषयी विस्तारपूर्वक लिहिलंय.
नूर इनायत खान या भारतीय वंशांच्या राजकुमारी होत्या, ज्यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आपला जीव धोक्यात घालून ब्रिटिशांसाठी हिटलरची हेरगिरी केली होती. मैसूरचे राजे टिपू सुलतान यांच्या त्या थेट वंशज होत्या.
१ जानेवारी १९१४ रोजी रशियातील मॉस्को येथे त्यांचा जन्म झाला होता. त्यानंतरच्या काही काळातच त्या आपल्या कुटुंबासोबत आधी लंडनमध्ये आणि नंतर फ्रांसची राजधानी पॅरीस येथे स्थायिक झाल्या होत्या. त्यांचं बालपण फ्रान्समध्येच गेलं. त्यामुळे फ्रेंच भाषेवर त्यांची घट्ट पकड होती.
संगीतावर त्यांचं विशेष प्रेम होतं आणि वीणा देखील वाजवायच्या. त्यांना लिखाणात देखील गती होती. त्यांनी लहान मुलांसाठी लिहिलेल्या कथांचं एक पुस्तक देखील प्रकाशित झालं होतं. सगळं काही ठीकठाक सुरु असतानाच दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली आणि नाझी सैन्याने फ्रांस आपल्या ताब्यात घेतलं. नूर इनायत यांना परत एकदा लंडनमध्ये विस्थापित व्हावं लागलं.
ब्रिटीश सैन्याशी जोडल्या गेल्या !
लंडनमध्ये आल्यानंतर काही दिवसातच स्वयंसेविका म्हणून त्या ब्रिटीश सैन्याशी जोडल्या गेल्या. सुरुवातीचे काही दिवस त्यांना वायरलेस ऑपरेटर म्हणून प्रशिक्षित करण्यात आलं, पण ही ट्रेनिंग पूर्ण होण्याआधीच फ्रांसमध्ये गुप्तहेरांचं एक युनिट पाठविण्याचा निर्णय तत्कालीन ब्रिटीश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी घेतला.
नूर इनायत खान यांची फ्रेंच भाषेवर पकड होतीच, शिवाय त्यांनी बराच काळ फ्रान्समध्ये घालवला होता. त्यामुळे या मिशनसाठी त्यांची निवड करण्यात आली. खरं तर अनेकांना या कामगिरीसाठी त्या पात्र आहेत याविषयी शंकाच होती, परंतु काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना मात्र त्यांच्याविषयी संपूर्ण खात्री पटली होती.
फ्रान्समध्ये जिवंत राहिलेल्या एकमेव गुप्तहेर
१९४३ साली आपल्या युनिटसह त्या फ्रान्समध्ये पोहोचल्या पण फ्रान्समध्ये पोहोचल्यानंतरच्या काही दिवसातच नाझी पोलिसांनी संपूर्ण युनिटला पकडलं आणि त्यांची हत्या करण्यात आली. परंतु नूर यांनी मात्र तिथून फरार होत आपला जीव वाचवला.
सुरुवातीच्याच काळात संपूर्ण युनिट मारलं गेलं असताना आता त्या फ्रान्समध्ये जिवंत असलेल्या ब्रिटीशांच्या एकमेव गुप्तहेर होत्या. अशा परिस्थितीत ब्रिटिशांनी त्यांना परत लंडनला निघून येण्याचा आदेश दिला. परंतु अतिशय जिद्दी आणि धाडसी असलेल्या नूर यांनी त्यासाठी नकार दिला. आपल्यावर सोपवण्यात आलेली कामगिरी पूर्ण करूनच आपण परत जायचं असा निश्चय त्यांनी मनाशी केला होता.
फितुरीमुळे नाझी सैन्याच्या ताब्यात
नूर इनायत खान फ्रान्समध्ये राहून आपलं काम करत होत्या. नाझी सैन्याच्या गुप्त हालचालीविषयीची माहिती ब्रिटिशांना पोहचवत होत्या, पान याचदरम्यान त्यांच्याच एका भूतपूर्व सहकाऱ्याचा बहिणीने त्यांची माहिती नाझी सैन्याला दिली आणि एका गेस्ट हाऊसमधून त्यांना पकडण्यात आलं.
श्रावणी बसू यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर नूर या फितुरीच्या शिकार झाल्या होत्या कारण त्यांच्याविषयी त्यांच्या सहकाऱ्याच्या बहिणीच्या मनात मत्सर होत्या. दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक असल्याने अनेक लोकांना त्या खूप आवडायच्या. याचीच किंमत त्यांना मोजावी लागली.
नाझी सैन्याकडून प्रचंड यातना
नूर इनायत खान पकडल्या गेल्यानंतर नाझी सैन्याकडून त्यांचा प्रचंड शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. त्यांच्याकडून ब्रिटीशांची गुप्त माहिती मिळवण्याचा नाझी सैन्याने खूप प्रयत्न केला परंतु आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी नाझी सैन्याला कसलीही माहिती दिली नाही.
दरम्यानच्या काळात त्यांनी जेलमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात त्या यशस्वी होऊ शकल्या नाहीत. शेवटी वर्षभराच्या कैदेनंतर मात्र नाझी सैन्याने गोळ्या घालून नूर यांची हत्या केली.
महायुद्धाच्या समाप्तीनंतर एक ‘वॉर हिरो’ म्हणून त्यांचं नाव समोर आलं. त्यांच्या सन्मानार्थ फ्रांसने त्यांना ‘वॉर क्रॉस’ हा सन्मान दिला तर ब्रिटिशांनी ‘क्रॉस सेंट जॉर्ज’ सन्मान देऊन त्यांच्या महायुद्धातील शौर्याचा गौरव केला. ब्रिटनच्या डाक सेवेने त्यांच्यावर तिकीट देखील काढलं आणि लंडनमध्ये त्यांचा पुतळा उभारण्यात आला.
हे ही वाच भिडू
- तिच्यावर बंदूक रोखून उभ्या असलेल्या 12 सैनिकांच्या दिशेने तिने ‘फ्लायिंग किस’ फेकले.
- हिटलरला मूर्ख बनवणारा भारतीय गुप्तहेर, ज्याने दुसऱ्या महायुद्धात ५ देशांसाठी हेरगिरी केली !!!
- भारताची गुप्तचर संघटनाचा जन्म या एकाच व्यक्तीच्या विश्वासातून झाला होता !!!
- शिवाजी राजांचा तिसरा डोळा !!!!