जेलमध्ये बसून कांड करणाऱ्यामुळे जॅकलिन आणि नोरा अडचणीत आल्यात, ईडी चौकशी चालू झालीय

मादक अवतार आणि भन्नाट डान्स स्टाइलसाठी ओळखली जाणारी नोरा फतेही केवळ एक अभिनेत्री आणि डान्सरच  नाही तर फॅशन सेंसेशन देखील आहे.नोरा आज बॉलिवूडची टॉप डान्सर म्हणून नावारूपास आलेली आहे. अभिनेत्री तिच्या आयटम साँग्ससाठी बरीच प्रसिद्ध आहे. डान्सर आणि अभिनेत्री असणाऱ्या नोराचा जन्म कॅनडामध्ये झाला होता. तिची स्टाईल पाहताच तिचे चाहते मंत्रमुग्ध होतात. हार्डी संधूच्या ‘नाह’  या गाण्याद्वारे नोरा फतेहीने इंडस्ट्रीमध्ये जोरदार एंट्री केली. या गाण्यातील नोराच्या अदा पाहून प्रत्येकजण तिचा दिवाना झाला. अभिनेत्रीचे हे गाणे हिट ठरताच, ती टी-सीरीजच्या अनेक गाण्यांमध्ये दिसू लागली.

आज नोरा फतेही  चर्चेत आलीये ती काय तिच्या डान्ससाठी किंवा तिच्या फॅशन साठी नव्हे. तर तिला ईडी म्हणजेच, अंमलबजावणी संचलनालयानं नोटीस बजावली आहे. त्यात नोराला दिल्ली येथील ईडीच्या कार्यालयात आज चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना करण्यात आली आहे.

 सुकेश चंद्रशेखर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आता बॉलिवूड सेलिब्रिटीही ईडीच्या रडारवर आल्याचं दिसत आहे. अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसनंतर आता नोरा फतेहीला ईडीनं नोटीस बजावली आहे. आज नोरा चौकशीसाठी दिल्लीतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाली होती.

याआधीही बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ला ह्याच सुकेश चंद्रशेखर प्रकरणात चौकशी साठी बोलवण्यात आलं होतं.तेव्हा असं सांगण्यात येत होतं कि जॅकलिन सुद्धा त्याच्या फसवणुकीला बळी पडली होती. साक्षीदार म्हणून तिला ईडी च्या कार्यालयात बोलवण्यात आले होते आणि उद्या सुद्धा जॅकलिन ला बोलवण्यात आलंय . एवढ्या सगळ्या टॉप च्या अभिनेत्रींना,सेलिब्रिटींना गोत्यात आणणारा हा सुकेश चंद्रशेखर आहे तरी कोण

आता ह्याच सुकेश कुमार ची अख्खी कुंडली तुम्हाला सांगणार आहे. याने आधी सुद्धा अनेक मोठ्या लोकांना गंडवलय.

सध्या अनेक प्रकरणात हा सुकेश चंद्रशेखर तिहार कारागृहात खडी फोडत आहे. याची स्टोरी पण फार फिल्मी आहे बरं का !

बंगळुरू, कर्नाटक येथून आलेला सुकेश चंद्रशेखर याच्या हायप्रोफाईल जीवन जगण्याच्या उत्कटतेमुळे एक ठग बनला आहे. तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल टाकताच त्याने फसवणूक करण्यास सुरूवात केली. जेव्हा सुकेशला बंगळुरू पोलिसांनी पहिल्यांदा पकडले तेव्हा तो फक्त १७ वर्षांचा होता. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या मुलाचा मित्र बनून एका कुटुंबाची १.१४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले होते.

बंगलोरमध्ये त्याची पाळेमुळे खोदायला सुरुवात केल्यानंतर तो पळून चेन्नईला गेला. याच सुकेश चंद्रशेखरला  बालाजी म्हणूनही ओळखले जाते. नोकरी देण्याच्या नावाखाली त्याने अनेक लोकांकडून पैसे उकळले. त्याने आपले राजकारणी नातेवाईक असल्याचे भासवून १०० पेक्षा जास्त लोकांची ७५ कोटी रुपयांची फसवणूक केली होती.

फसवणुकीच्या ह्या गुन्ह्यामध्ये त्याला अटक करण्यात आली होती. पण ह्या पठ्ठयाला जेल मध्ये सुद्धा शांत बसवत नव्हतं.

सरकारी कारवाईची भीती दाखवत ह्या सुकेश चंद्रशेखर ने  एका व्यापारी कुटुंबाला चक्क कारागृहातून ५० कोटी रुपयांची मागणी केली होती. त्या व्यापारी कुटुंबाने भीतीपोटी पैसे दिले सुद्धा. जेव्हा फसवणूक झाल्याचे लक्षात आले, तेव्हा त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. आठवड्यात तक्रार करण्यात आली. जेव्हा हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) गेले तेव्हा प्रकरण मोठं होऊन गाजावाजा झाला. आता अंमलबजावणी संचालनालयानेही या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. आजपर्यंत कारागृहाच्या आतून अशी खंडणी गोळा केली गेली नव्हती.

आता एवढ्या मोठ्या ठगाची  हि फिल्मी स्टोरी हिरोईन शिवाय कशी पूर्ण होणार ना,

ह्या सुकेश चंद्रशेखर ची एक गर्लफ्रेंड सुद्धा आहे. लीना मारिया पॉल हि मॉडेल असून चित्रपट अभिनेत्री सुद्धा आहे.लीनाचा सुकेसशी दीर्घकाळ संबंध आहे.२०१३ मध्ये, पोलिसांनी चंद्रशेखर आणि त्याची कथित मैत्रीण लीना मारिया पॉल यांना चेन्नईतील कॅनरा बँकेत फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली. दोघांनाही नंतर जामीन मिळाला. २०१७ मध्ये, तिच्या ब्युटी पार्लरमध्ये गोळीबार झाला होता तेव्हा सुद्धा ती चर्चेत आली.

सुकेश चंद्रशेखर हा तर तिहार मध्ये खाडी फोडत बसलाय. आज त्याच्याच प्रकरणात नोरा फतेहीला चौकशी साठी बोलवलं होतं. उद्या जॅकलिन ला बोलवणार आहेत. ह्या सुकेश ने आणखी कोणाकोणाला फसवलंय,कोणती मोठी नावे त्याच्या रडारवर होती हे बघणं सुद्धा आता महत्वाचं असेल.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.