ज्याने पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले, शेयर बाजार पडला तो रशिया युक्रेन वाद वाढतंच चाललाय

दुनिया गोल आहे याचा प्रत्यय कधी येऊ ना येऊ संकटाच्या काळात मात्र जरूर येतो. जगातल्या एवढ्या कोपऱ्यात एक घटना घडते आणि त्याचे परिणाम पूर्ण जगला सोसावे लागतात. आता  रशिया-युक्रेन वादाचंच घ्या ना.

या देशात सीमांवरून वाद चालू आहेत मात्र परवा आपल्याकडे झालेला शेयर बाजरातील पडझड (पडझड काय ब्लडबाथच म्हणा की), आणि त्यांनतर आंतरराष्ट्रीय बाजरात आता वाढणारी इंधनाची किंमत हे सगळे या वादाचेच परिणाम आहेत त्यामुळं आपल्याला याची थोडीफार तरी आयडिया ठेवावीच लागेल.

त्याआधी रशिया आणि युक्रेन यांच्यातल्या वाद थोडक्यात सांगतो. 

तर या दोन देशात स्थापनेपासूनच सुरु असलेला वाद पुन्हा बोकळला २०१४मध्ये जेव्हा रशियाने युक्रेनच्या क्रिमियाचा ताबा घेतला.  सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर हा प्रदेश युक्रेनकडे गेला होता जो रशियाचाच भाग असायला पाहिजे होता असं रशियाचं म्हणणं होतं. यापुढे जाऊन रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी युक्रेन आणि रशिया हा एकंच देश असल्याचं म्हटलं.

युक्रेनला आता त्याच्या स्वातंत्र्याची चिंता वाटू लागली होती. बलाढ्य रशियापुढं आपलं सार्वभौमत्व टिकवण्यासाठी युक्रेनला आता इतर राष्ट्रांची मदत घेणं गरजेचं वाटू लागलं होतं.

त्यानुसार युक्रेनच्या सरकारनं नाटो जॉईन करण्याच्या दिशेने हालचाली करायला सुरवात केली.

नाटो ही यूरोपातील देश आणि अमेरिका यांचं एक लष्करी अलायन्स आहे जे एका सदस्य देशावर  अटॅक म्हणजे नाटोच्या सर्व सदस्य देशांवर अटॅक या तत्वावर काम करतं. शीतयुद्धाच्या काळात सोविएत युनिअनच्या विरोधात उघडलेली ही आघाडी आता रशियाच्या विरोधात असल्याचं सांगितलं जातं.

 सोविएत युनिअनपासून वेगळे झालेले पूर्व यूरोपातील अनेक देश रशियापासून आपल्याला धोका आहे हे कारण देत नाटो जॉईन करत आहेत.

मात्र युक्रेन सारखा देश जो रशियाचा सख्खा शेजारी आहे त्याने जर नाटो जॉईन केलं तर आपले कट्टर विरोधक देश म्हणजे अमेरिका आणि इतर युरोपियन देश आपल्या दारावर सैन्य तैनात करतील अशी रशियाला भीती आहे. यातूनच रशियानं युक्रेनच्या सिमेवर सैन्य जमवाजमव सुरु केली आहे. अमेरिकेने तर रशिया युक्रेनवर कधीही आक्रमण करू शकते अशी चिंताही व्यक्त केलीय.

आता रशियाला युक्रेनवर हल्ला करण्यापासून थांबवण्यासाठी अमेरिकेने रशियाच्या सगळ्यात महत्वपूर्ण प्रोजेक्ट असणाऱ्या नॉर्ड स्ट्रीम २ या प्रोजेक्टला अप्रूव्हल देणार नाही असं म्हटलंय.

काय आहे हा नॉर्ड स्ट्रीम २ हा प्रोजेक्ट?

तर नॉर्ड स्ट्रीम २ ही पाण्याखालील गॅस पाइपलाइन आहे. बाल्टिक समुद्राच्याखालून पश्चिम रशियामार्गे ती ईशान्य जर्मनीपर्यंत पोहचते. या पाइपलाइनची लांबी सुमारे 1275 किमी आहे. ही पाइपलाइन रशियन सरकारी मालकीची कंपनी गॅझप्रॉम यांच्या मालकीची आहे.या पाइपलाइनचे काम सप्टेंबर 2021 मध्येच पूर्ण झाले आहे. 

मात्र आतापर्यंत युरोपातील एजन्सींनी त्याला मान्यता दिलेली नाही. ही पाइपलाइन कार्यान्वित झाल्यास दरवर्षी ५५ अब्ज घनमीटर वायू युरोपला पाठवला जाऊ शकतो.

ही पाइपलाइन तयार करण्यासाठी सुमारे ८२ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

नैसर्गिक गॅसची निर्यात हा रशियाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळं रशियसाठी हा प्रकल्प महत्वाचा आहे. त्याचबरोबर जर्मनीसारख्या देशालाही नैसर्गिक वायूची नीटन्ट गरज आहे. युरोपातील अनेक देशांत नैसर्गिक वायूच्या किमती सध्या टंचाईमुळे वाढू लागल्यात.

आत अमेरिकेच्या या दबावामुळं रशिया -युक्रेन वाद निवळेल का अजूनच पेटेल हे येणाऱ्या दिवसात कळेलच.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.