ते होते म्हणून आपल्यासह जगातील अब्जावधी नागरिकांचं पोट भरतंय

१९४५ मध्ये दुसरे महायुद्ध संपले तेव्हा जग पुन्हा एकदा जगाने विध्वंस पाहिला. आणि आता नंतर महायुद्ध नको अशी सार्‍या मानवतेचीच धारणा झाली होती. मनुष्य हानी, आर्थिक हानी या सारख्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. त्यामुळे नाही म्हटले तरी जगाला एक स्थैर्य प्राप्त झाले.

पण, स्थिर झालेल्या या मानवतेला अन्य समस्या भेडसवायला लागल्या.

त्यामधील पहिली समस्या होती जेवणाची आणि प्रामुख्याने धान्याची. जगाची लोकसंख्या वाढत चालली होती पण त्या प्रमाणात धान्याची उपलब्धता होत नव्हती. त्यामुळे गहू आणि तांदूळ या दोन पिकांच्या उत्पादनात मोठी वाढ होणे गरजेचे होते. या गरजेतून हरित क्रांतीची सुरुवात झाली आणि ही क्रांतीची बीजे रोवली डॉ. नॉर्मन अन्रेस्ट बोरलॉग.

सारे जग त्यांना प्रेमाने ‘प्रोफेसर व्हीट’ म्हणजे ‘प्राध्यापक गहू’ – गव्हाचार्य म्हणायचे.

नॉर्मन बोरलॉग यांचा जन्म अमेरिकेत आयोवामधील एका सामान्य कुटुंबात झाला होता. १९४२ साली मिनिसोटा विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवल्यावर ड्यूपॉन्ट येथे परमनंट नोकरीवर रुजू झाले. मात्र १९४४ मध्ये राजीनामा देवून ते मॅक्सिकोमध्ये आले आणि इथे त्यांनी गव्हांच्या वाणावर काम सुरु केले.

यामध्ये त्यांना वेगवेगळ्या वातावरणात उगवू शकतील, ज्यांची रोपे लहान असतील; मात्र या रोपातील लोंब्या आणि त्यातले दाणे जास्त असतील, तसेच रोगप्रतिकारक असतील अशा गव्हाच्या जातींची निर्मिती त्यांना करायची होती.

प्रयोग करण्यासाठी त्यांनी एकमेकांपासून एक हजार किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असलेली आणि दोन्ही ठिकाणची उंची, मातीची संरचना, तापमान आणि प्रकाश इत्यादी बाबींच्या दृष्टिकोनातून वेगवेगळी असतील अशी मेक्सिकोमधली दोन ठिकाणे निवडली.

या दोन्ही ठिकाणी त्यांनी सातत्याने दहा वर्ष गव्हावरील संकरणाचे प्रयोग केले.

या प्रयोगांच्या आधारे त्यांनी गव्हाच्या काही संकरित जाती निर्माण केल्या. उदाहरणार्थ, ओरविले योगेल यांनी निर्माण केलेल्या नौरिक-१० या जपानी जातीचा संकर जास्त उत्पादन देणाऱ्या ब्रेबर-१४ या अमेरिकन गव्हाच्या जातीशी करण्यात आला. अशा प्रयोगांमुळे मेक्सिकोतल्या कृषी उत्पादनाचे स्वरूपच बदलले.

१९६३ पर्यंत गव्हाच्या उत्पादनाच्या बाबतीत मेक्सिको स्वयंपूर्ण तर झालाच, पण गव्हाची निर्यातही करू लागला.

सोबतच त्यांनी कृषी विज्ञानात आधुनिक तंत्र आणली ज्यामुळे गव्हाच्या उत्पादनात तब्बल ७०० पट वाढ झाली. मानवाला अधिक धान्य देणार्‍या आणि शेतकऱ्याला अधिक फायदा मिळवून देणाऱ्या हव्या असलेल्या बुटक्या (म्हणजे न लोळणार्‍या) तसेच रोगांना बळी न पडणार्‍या जातीही त्यांनी शोधल्या.

१९६०च्या दशकात आपला भारत देश अन्न समस्येशी झुंजत होता.

काही भागात तर दुष्काळाची भीषण स्थिती होती. भारताच्या कृषिमंत्रालयाचे तत्कालीन सल्लागार डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांनी नॉर्मन बोरलॉगना भारतात बोलावले. बोरलॉग यांच्या सहकार्याने १९६६ साली अधिक उत्पन्न देणारी सुमारे अठराशे टन बियाणे मेक्सिकोतल्या मका व गहू विकास केंद्रातून आयात करण्यात आली.

या बियाणांचा वापर केल्याने आपल्या देशात गव्हाच्या उत्पादनात साधारणत: दुपटीने वाढ झाली. १.२३ कोटी टनांवरून हे उत्पादन २.१ कोटी टनांपर्यंत वाढले.

भारतात ‘हरितक्रांती’ झाली आणि १९७४ सालापर्यंत धान्य उत्पादनात आपण स्वयंपूर्ण झालो.

लिऑन हेसर यांनी आपल्या ‘द मॅन हू फेड वर्ल्ड’ या पुस्तकात बोरलॉग यांच्या भारत भेटीचे वर्णन केले आहे. त्यावेळी अशोक मेहता इंदिरा गांधी सरकारमध्ये नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते. ते सरकारमधील दुसरे शक्तिशाली व्यक्ती होते. बोरलॉग भारतात त्यांनाच भेटणार होते.

या भेटीमध्ये ते दुष्काळास जबाबदार असलेल्या चुकीच्या धोरणांवर आपली मते प्रामाणिकपणे सांगणार होते.

मात्र त्यांना हे देखील माहित होते की ही मत व्यक्त केल्यानंतर त्यांना भारतामधून परत जायला सांगितले जाणार. परंतु तरी ही भीती त्याला शांत ठेवू शकली नाही आणि अशोक मेहता यांच्याकडे त्यांनी सरकारी धोरणांबद्दल प्रामाणिक मत व्यक्त केले. यानंतर सरकारने आपल्या धोरणांवर बोट ठेवले म्हणून देश सोडण्यास न सांगता स्वतःच धोरणांमध्ये आमूलाग्र बदल केले.

त्यांच्यामुळे काही वर्षांत दुष्काळासारखी परिस्थिती संपली.

बोरलॉग यांच्या मदतीने पाकिस्तान देखील गव्हाच्या उत्पादनात स्वयंपुर्ण देश बनला. १९६५ मध्ये पाकिस्तानात गव्हाचे उत्पादन ४६ लाख टन होते. १९७० मध्ये ते वाढून ८४ लाख टन झाले.

आज, जगभरातील सुमारे ६० दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर गहू आणि भात यांचे बियाणे पेरले जाते, हे बोरलॉग यांनीच विकसित केलेल्या जाती आहेत. जर कदाचित ते नसते तर दक्षिण अमेरिका आणि चीनचा बराचसा भाग आपल्या लोकसंख्येसाठी धान्य पुरवठा करू शकला नसता.

आज चीन आणि भारत आपल्या लोकसंख्येसाठी आणि निर्यातीसाठीही पुरेसे गहू पिकवतात.

पाकिस्तानचे अध्यक्ष अय्यूब खान यांनी १९६८ मध्ये बोरलॉग यांना सितारा-ए-इम्तियाज पुरस्कार जाहीर केला.१९६८ मध्ये इंडियन सोसायटी ऑफ जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंगचे ते मानद सदस्य म्हणून निवडले गेले; तर १९७० मध्ये त्यांना सर्वोच्च नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासह, ते अशा सहा खास लोकांपैकी एक बनले ज्यांना नोबेल सोबतच अमेरिकन कॉंग्रेसनल गोल्ड मेडल आणि अमेरिकन प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रिडम देण्यात आला.

१९७८ मध्ये बोरलॉग यांना बांग्लादेश बोटॅनिकल सोसायटी आणि बांग्लादेश असोसिएशन फॉर अ‍ॅडव्हान्समेंट ऑफ सायन्सचे पहिले मानद सदस्य बनविण्यात आले. हे ११ देशांच्या कृषी विज्ञान अकादमीचे सदस्यही होते आणि त्यांना ६० पेक्षा जास्त मानद डॉक्टरेट डिग्री देखील मिळाली.

बोरलॉग यांना २००६ मध्ये भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

२००९ मध्ये वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. ते आज या जगात नाही, परंतु त्याचा वारसा आपण रोज वापरत असलेल्या धान्यात आहे. हा वारसा विकसित कृषी पद्धतींच्या रूपात आपल्याबरोबर आहे ज्यातून आपण हे धान्य पिकवितो आणि हा वारसा अजूनही या जगात आहे कारण बोरलॉगच्या प्रयत्नांमुळे कोट्यवधी लोकांचे प्राण वाचले.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.