उद्यापासून बापाचा घोडा चार्जिंग वर पळणार. “बजाज चेतक” परत आली आहे.
बजाज स्कूटर, आपल्या घरातली पहिली गाडी. बँकेत क्लार्क असलेला बाबाला चार महिन्याच्या वेटिंग नंतर जेव्हा गाडी ताब्यात मिळाली तेव्हा त्याला गड जिंकल्याचा आनंद झालेला. आईनं राजेंना आणि त्यांच्या या चेतक घोड्याला ओवाळलं होतं.
अनेक आठवणी या चेतक बरोबर जोडल्या होत्या. आमचं चार जणांना अख्खं कुटुंब स्कूटरवर बसायचं. घरातल्या शेंडेफळाला सर्वात पुढे उभं करून बजाज की सवारी निघायची.
काळ सरला आणि घरात चेतकचं पेट्रोल पिणं परवडणा झाल आणि अव्हरेज देणारी स्पेंडर आली.
मागोमाग स्टायलिश पल्सर आली. अस करता करता चारचाकी गाडी आली. आज त्याच बापाची पोरगी नवीन लाल वेस्पा पळवते. मध्यमवर्गातून उच्च मध्यमवर्गात आता आपली गणना होते.
तरी बाप आजही थरथरत्या हातांनी आपली जुनी चेतक पुसत असतो. त्याच्या आयुष्यातली पहिली गाडी म्हणून बाप दसऱ्याला स्कुटर पहिला पूजतो.
मागच्या दसऱ्याच्या दिवशी बजाजनं चांगली बातमी दिली. बजाज आत्ता मार्केटमध्ये परत स्कुटर येणार म्हणून. तब्बल चौदा पंधरा वर्षांनी ती परत येणार.
सुटसुटीत मध्यमवर्गीय कुटुंबाची गाडी म्हणून बजाज स्कूटर हिट झाली होती.
बजाज घराण्याला स्वातंत्र्यलढ्याचा वारसा होता. जमनालाल बजाज हे गांधीजींचे विश्वासू सहकारी आणि मानसपुत्र. त्यांनी १९२६ साली बजाज ग्रुप ची स्थापना केली होती.
इंग्रजांच्या विरोधातल्या प्रत्येक सत्याग्रहात ते पुढे होते. १९४२साली झालेल्या त्यांच्या निधनानंतर त्यांचा वारसा त्यांचे सुपुत्र कमलनयन बजाज यांनी चालवला. स्वातंत्र्यानंतर देशाची सेवा करायचं व्रत बजाज कुटुंबीयांनी सोडलं नाही.
१९४४ साली फिरोदिया आणि बजाज हे स्वातंत्र्यसैनिकांची दोन घरे एकत्र येऊन बचराज ट्रेडिंग कोर्पोरेशन नावाच्या कंपनीची स्थापना केली होती जीलाच पुढे बजाज ऑटो असं ओळखण्यात येऊ लागलं. देशाच्या उभारणी मध्ये या बजाज ऑटोने देखील मोठा वाटा उचलला. फिरोदियांना ऑटोरिक्षा बनवण्याचं तर बजाजला दोन चाकी स्कूटर बनवण्याचं लायसन्स सरकार कडून मिळालं.
पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये बजाजचे कारखाने उभे राहिले. इटलीच्या वेस्पाबरोबर बजाजने स्कूटर बनवण्याच्या तंत्रज्ञान सहकार्याचा करार केला. भारतीयांची स्वतःची स्कूटर प्रत्यक्षात आली.
१९६५ साली बजाजची पुढची पिढी म्हणजे हार्वर्ड विद्यापीठातून मनेजमेंट शिकलेले राहुल बजाज यांनी कंपनीची सूत्र हाती घेतली. हा बजाजच्या बदलाचा नवीन टप्पा होता. राहुल बजाजनी बजाजची स्वतःची स्कूटर बनवण्याचं स्वप्न बघितलं. १९७२ साली अशी गाडी प्रत्यक्षात आली. तीला नाव देण्यात आलं बजाज चेतक.
चित्तोडच्या महाराणा प्रताप यांच्या घोड्याच्या नावावरून चेतकला नाव देण्यात आलं होत. सोळाव्या शतकातला गौरवशाली इतिहासाला विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानशी जोडण्यात आलं होत.१४५सीसी टूस्ट्रोक बजाज चेतक सुपरहिट झाली. विशेषतः मध्यमवर्गीयांमध्ये या गाडीने जादू केली. सामान टाकायला सोपी , मेंटेनन्स कमी, अव्हरेज चांगली आणि विशेष म्हणजे अख्खं कुटुंब एका गाडीवर बसून जाऊ शकत होत.
बजाज चेतक लॉंच झाल्यानंतर त्याच्या बुकिंग साठी झुंबड उडाली. मोठमोठ्या रांगा लागल्या. रेशनवरून धान्य खरेदी करण्याच्या काळात लोकांना रांगेच काही कौतुक नव्हत म्हणा. पण बुकिंग केल्यानंतर महिनोंमहिने गाडी मिळायची नाही.
असं म्हणतात खुद्द सुभाषचन्द्र बोस यांच्या नातवाला अमित मित्रा यांना दोन वर्षांनी चेतकची डिलिव्हरी मिळाली होती.
स्कूटरचा विशिष्ट आवाज होता. त्याचा बारीक वाजणारा हॉर्न, हातातले गेअर, पाठीमागे दिलेली स्टेपनी हे सगळच वैशिष्ट्यपूर्ण होत. गाडी झुकल्याशिवाय सुरूच व्हायची नाही.
बाबाच्या गाडीचा आवाज बरोबर ओळखू यायचा. गाडी घराजवळ आली की घरातली पोर भांडण मिटवून पुस्तकं उघडून बसायची. स्कूटरचा पण त्याकाळात धाक होता.
जागतिकीकरण आले. मोटारसायकली बाईक बनल्या. स्कूटरला कॉम्पीटीशन वाढलं. पण चेतकची धाव अखंड होती. १९९०च्या दशकात बजाज दर महिन्याला एक लाख स्कूटरची विक्री करत होते.
याच काळात एक जाहिरात आली, सांगत नाही क्लिक करून बघा.
“ये जमीं ये अस्मान हमारा कल हमारा आज बुलंद भारत की बुलंद तस्वीर….हमारा बजाज”
एखाद्या देशभक्तीपर गीत ऐकल्यावर जसं अंगावर काटे उभे राहतात तसंच आजही हमारा बजाज ऐकताना वाटत.जाहिरात बनवणाऱ्यानी देशाच्या प्रगतीची धाव बजाज स्कूटरशी जोडली होती.
चाळीस वर्ष भारताच्या मध्यमवर्गीयाला आपल्या पाठीशी घेऊन फिरल्यावर कधी ना कधी स्कूटरला थांबण अपरिहार्य होत. शेवटची बजाज चेतक २००५ ला बजाजच्या कारखान्यातून बाहेर पडली. पण भारतीयांच्या मनातून स्कूटर गेली नाही.
म्हणूनच बजाजने संक्रांतीच्या गॉड मुहूर्तावर चेतकला परत आणायचं ठरवलं.
फक्त नव्या काळाच्या नव्या रुपात. आता हा घोडा पेट्रोल पित नाही तर चार्जिंग वर पळतो.
त्याला रिव्हर्स गियर आहेत, नेटवर त्याच लोकेशन सुद्धा सापडू शकतं. आणि भारी काय तर याला बुकिंग ला 4-4 महिने वेळ लागणार नाही, बजाजच्या साईटवर ऑनलाइन बुकिंग सुरू आहे.
हे ही वाच भिडू.
- जगभरात ऑटो रिक्षा अशी ओळख अस्सल नगरी माणसामुळे मिळाली.
- भावानों! जावा आली रे !!!
- राजदूत, RD350 आणि बॉबी निर्माण गाड्या काढून त्यांनी एका पिढीवर उपकार केलं.
- पद्मिनीच्या मोहापायी लालबहादूर शास्त्रींनी देखील कर्ज काढलं होतं.