पबजीच्याही आधी दोन पिढ्यांची मेहबूबा GTA Vice City होती…
आमच्या चाळीतल्या रम्याचा बारीक भाऊ आता दहावीत ए. सदानकदा पोरगं हातात मोबाईल घेऊन गोळीबार करत असतंय.. पबजी ओ दुसरं काय. एक दिवस गडी आम्हालाच ज्ञान द्यायला लागला, ही गेम अशी ही गेम तशी… तुम्हाला काय कळणार मजा? आम्ही त्याच्याकडून १५ गेम्सची नावं ऐकली आणि त्याला फक्त एकाच गेमचं नाव सांगून गप केलं.
कारण त्या नावात तेवढी ताकद होती. शप्पथ सांगतो ती गेम म्हणजे आपली मेहबुबा.
दोन पिढ्यांनी कॉम्प्युटरसमोर बसून सगळ्यात जास्त वेळ कशात घालवला असेल, तर ती गेम खेळण्यात. घरातनं पैशे चोरणं, खोटं बोलणं, घरी कॉम्प्युटर असलेल्या मित्राला लोणी लावणं या सगळ्या लचांडी त्या गेमपायी केल्या…
ती गेम म्हणजे GTA Vice City.
भिडू लोक, इमॅजिन करा, की तुम्ही २० रुपये तासानी असलेल्या सायबर कॅफेमध्ये बसलायत किंवा घरच्यांनी हजार लडतरी करुन आणलेल्या कॉम्प्युटरसमोर. त्यात एमएस पेंट आहे, पत्त्यांच्या गेम्स आहेत, मित्राकडून आणलेल्या कसल्या कसल्या सिड्या आहेत. पण तुम्ही उघडणार काय तर Vice City.
आता गेम ओपन होईपर्यंत स्क्रीनवर जी काही चित्रं दिसायची, ती जाईपर्यंत घरातल्यांनी कॉम्प्युटरकडे बघितलं असतं, तर आपला बल्ल्या फिक्स होता.
एकदा का गेम सुरू झाली, की सायबर कॅफेवाल्याकडं उधारी लागली तरी पोरं किमान तीन तास उठायची नाहीत. घरचा पीसी असेल, तर संपला विषय. ही गेम मार्केटमध्ये आली होती २००२ मध्ये. रॉकस्टार गेम्सच्या ग्रँड थेफ्ट ऑटो सिरीजमधली वाईस सिटी ही चौथी गेम. तिचं विंडोज व्हर्जन आलं २००३ मध्ये आणि गेम हळूहळू आपल्याकडेही आली.
लेसली बेन्झिस, डॅन आणि सॅम हाऊझर या तीन कार्यकर्त्यांचा ही गेम आपल्यापर्यंत आणण्यात मोलाचा वाटा होता. पाच मिलियन यूएस डॉलर्सचं बजेट लावून रॉकस्टारनं ही गेम मार्केटमध्ये आणली होती. त्यांना थँक यु म्हणू आणि पुढं सरकू.
आता या गेम मध्ये काय होतं?
तुम्ही म्हणाल आम्हाला काय माहीत नाय का भिडू? पण एकदा उजळणी करायला काय जातंय. तर हा, ही गेम तयार करण्यात आली होती १९८६ मधल्या मायामी शहराला डोळ्यांसमोर ठेवून. इथं समुद्र होता, ललना होत्या, गाड्या तर अगदी रावस, पण लय निरखून बघितलं तर गेममध्ये कामगारांचं आंदोलनही दाखवलं होतं.
ही गेम आवडण्याचं कारण म्हणजे यातली स्टोरी. आता प्लॉट असा होता, की टॉमी व्हर्सेटी नावाचा एक कार्यकर्ता व्हाईस सिटीमध्ये ड्रग्जचा व्यापार करायला येतो. मग तिकडं आधीच बिझनेस करणारे डियाझ, लान्स असे कार्यकर्ते असतात.
पण सगळे नवे जुने संपवून प्रत्येक चौकात मीच टिकणार म्हणत, आपला टॉमीभाऊ व्हाईस सिटीचा राहुल्या ठरतो.
पण हा व्हाईस सिटी पॅटर्न काय सोपा नसतो. इथं आपण टॉमी म्हणून खेळतो आणि बादशहा बनण्यासाठी आपल्याला मिशन्स पूर्ण करावी लागतात. आता हि मिशन्स कशी असतात? तर सुरुवातीला एखाद्या माणसाला टाकायचं. मग हळूहळू ही संख्या वाढते आणि मारायचा टास्क अवघड होतो. काय काय मिशन्स सोपी असायची, म्हणजे ड्रग माफियाच्या पोरीला पार्टीतून उचलायचं आणि घरी नेऊन सोडायचं. नंतर लक्षात आलं, फ्रेंडझोन व्हायची ती आपली पहिली वेळ होती.
या मिशन्समध्ये सगळ्यात बेक्कार म्हणजे हेलिकॉप्टर मिशन. गाड्या कितीही फास्ट रींगवता येतील पण हेलिकॉप्टर मिशन म्हणलं, की आपला गंडेलशहा व्हायचा. पोरांच्या हातापाया पडून त्यांच्याकडून हे मिशन पूर्ण करुन घेतलेली लय जण आहेत, तुमच्या भिडूसकट.
मिशन पूर्ण केली की पैसे मिळायचे आणि त्यातून आपण वेगवेगळ्या प्रॉपर्टी विकत घेतल्या, की तिथली मिशन्सही असायची. पिझ्झा बॉय, टॅक्सी, पीसीजे, अँब्युलन्स आणि पोलिस यांची मिशनही टाईमपास म्हणून बरी असायची. घरच्यांच्या शिव्या खाल्ल्या किंवा नेटकॅफेवाल्यानं निघायची गोळी दिली, की विकत घेतलेल्या घरापाशी जाऊन गेम सेव्ह करायची.
ही मिशन्स करताना चीटकोड लागायचे. म्हणजे तुम्हाला वेपन्स घ्यायचे असतील, तर नटरटूल्स, हेल्थ पूर्ण करायला ॲस्पिरिन, गाडी हवेत उडवायची असेल तर कम फ्लाय विथ मी आणि पाण्यात चालवायची असेल, तर सी वेज. पोलिस मागे लागले की लिव्ह मी अलोन आणि रणगाडा चालवायचा मूड झाला की पँझर.
लिस्ट लय मोठी आहे, पण सगळ्यात आवडता चीटकोड कुठला होता… तर फॅनी मॅग्नेट. आता त्याचा वापर काय व्हायचा हे आम्ही सांगायची गरज नाय, माहीत नसलाच तर हुडकून बघा. आमचे आभार मानाल फिक्स.
मिशन्स, चिटकोड यापेक्षा व्हाईस सिटीमधली भारी गोष्ट म्हणजे गाड्या. आपलं वय असं होतं की, हातात सायकल असणं ही पण मोठी गोष्ट असायची. तिथं व्हाईस सिटीनं आपल्याला गाड्यांचं येड लावलं. टू व्हीलरचं म्हणाल तर त्यातली सँचेझ म्हणजे आरएक्स १०० होती, एक व्हेस्पासारखी गाडी आणि पल्सरसारखी पीसीजे ६००, एंजल. फ्रीवे म्हणजे तर प्रेम होतं. फोर व्हीलरची अक्षरश: जन्नत होती, चिताह, बॅनशी या गाड्या इतक्या फास्ट पळायच्या, की दिवसभर फक्त गाड्या चालवल्या तरी कंटाळा यायचा नाही. पोलिस मागे लागले, की सगळे स्टार पूर्ण करण्यात आणि मग पँझर टाकून रणगाडा फिरवण्यात एक वेगळीच किक होती.
आता सगळी मिशन्स पूर्ण करुन गेम संपवलेले फार कमी कार्यकर्ते असतील. बाकी आपल्यासारख्या पोरांनी गाड्या फिरवल्या, तोडफोड केली, हजारवेळा फॅनी मॅग्नेट टाकलं, थोडक्यात मजा केली. या गेममध्ये ८००० रेकॉर्डेड डायलॉग्स होते, अनेक कॅरॅक्टर्स होती, छोट्यातली छोटी गोष्टही डिटेलमध्ये दाखवलेली असायची.
व्हाईस सिटीनंतर जीटीएनं सॅनएन्ड्रीयस नावानं सिक्वेलही काढला, ती गेम लय हायटेक होती पण ओरिजिनल व्हाईस सिटीचा फील नव्हता. आत्ताची पोरं बॅटलग्राउंड, फ्रीफायर असल्या गेम्सपायी येड लावून घेतात, पण आपलं बालपण व्हाईस सिटीमुळं लय भारी झालेलं.
आजही कधी कधी इच्छा होते, लॅपटॉप किंवा पीसीवर व्हाईस सिटी डाऊनलोड करावी, गेम ओपन होताना एकदा आजूबाजूला बघावं आणि कानात हेडफोन्स टाकून निवांत गाड्या पळवाव्यात. यावेळी हेलिकॉप्टरचं मिशन स्वतः पूर्ण करावं. लय भारी वाटेल.. पण राव सायबर कॅफेचा आणि शेजारी बसून कसं खेळायचं सांगणाऱ्या मित्राचा फील नाय येणार…
हे ही वाच भिडू:
- बोर्डाच्या पेपरपासून पहिल्या लव्हलेटरपर्यंत, ट्रायमॅक्स पेन आपला खरा जिगरी होता…
- दोघांमधलं ‘प्रॉमिस’ टिकण्यामागचं कारण ‘युनिनॉर’चं सिमकार्ड होतं…
- आपला विकेंड भारी करण्यासाठी अनुप जलोटा ऐकणं मस्ट ए भिडू…