एवढ्याश्या डबीतून हजार गाणी ऐकवणारा आयपॉड बंद झाला, पण आठवणी जाग्या करुन…

आपल्या जीवनात बातमी ही लय महत्त्वाची गोष्ट आहे, आमचं तर त्याच्यावरच पोट चालतं म्हणा. पण एखाद्या बातमीमुळं आपल्याला टेन्शन येतं, एखादी वाचून आनंद होतो, पण एखादी बातमी अशी असते की, लय काय काय वाटतं पण सांगता येईना. म्हणजे वाईट वाटत असतंय, पण भारीही वाटतं. गोष्ट वाचून माणूस फ्लॅशबॅकमध्ये गेलाय हे होईल, पण बातमी वाचून माणसं फ्लॅशबॅकमध्ये जातात म्हणजे विषय खोल असतोय.

आधी बातमी सांगतो, ॲपलनं जवळपास २१ वर्षांपासून सुरू असलेलं आयपॉडचं प्रॉडक्शन बंद करण्याचा निर्णय घेतलाय. आता वेळ फ्लॅशबॅकची, कारण आयपॉड म्हणजे आपल्या वयाच्या एका टप्प्यावरचा सगळ्यात जास्त चर्चेतला विषय होता.

सध्या सोशल मीडियावर ब्लु टिक असणाऱ्या, लेटेस्ट आयफोन असणाऱ्या आणि बेडला लागूनच चार्जर असणाऱ्या लोकांपेक्षा जास्त हवा त्याकाळी आयपॉड असणाऱ्या लोकांची होती.

आयपॉड म्हणजे आपल्या खिशात आलेलं पहिलं गॅजेट. जगाला नादाला लावणाऱ्या ॲपलनं केलेली क्रांती. इतिहास बघायचा झाला, तर २३ ऑक्टोबर २००१ ला ॲपलनं पहिला आयपॉड मार्केटमध्ये आणला. आपल्या तळहातापेक्षा कमी उंची आणि त्यात गाणी बसायची किती, तर हजार. घरातले स्पीकर, रेडिओ सोडून दुसऱ्या कशावर तरी गाणी ऐकता येतायत आणि कुठंही हिंडताना हे गॅजेट सोबत ठेवता येतंय ही गोष्टच लोकांना लय बाप वाटली. 

चार बटनं, बारकी स्क्रीन, स्क्रोल व्हील आणि एकदा हेडफोन लाऊन कानात टाकलं की थेट चंद्रावर.

एकदा नस पकडल्यावर मग काय ॲपलनं सुट्टी दिली नाही, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन आयपॉड तर दोन वर्षात आले. फोर्थ जनरेशन आयपॉडमध्ये फोटो दिसू लागले, डिस्प्ले कलरफुल झाला, पण गाणी ऐकणं ही मेन लक्झरी कायम असल्यानं आयपॉड लोकप्रियतेच्या चार्टमध्येही दणक्यात वाजत होता. 

याच दरम्यान ॲपलनं आणखी एक चाल खेळली, त्यांनी मार्केटमध्ये आणला आयपॉड मिनी. याची साईज कमी होती, पण गाणी दणकून बसायची. आयपॉड मिनीला कलर्स होते. ॲपलवाल्यांनी याच्यात पण सेंकड जनरेशन आणली, जिचा साईज थोडा वाढवला, आणखी ब्राईट कलर आणले. आयपॉड मिनीनं सगळ्या जगात हवा केली.

आयपॉड मिनीला रिप्लेस मारलं ते आयपॉड नॅनोनं. याच्या तब्बल ७ जनरेशन्स ॲपलनं आणल्या. भारतात सुपरहिट झालेले आयपॉड म्हणजे आयपॉड क्लासिक आणि आयपॉड शफल. हे आयपॉड शफल म्हणजे लय भारी प्रकरण होतं. याच्या चार जनरेशन्स आल्या, पण यांना स्क्रीन नव्हती. साईज एकदम बारीक, खिशाला अडकवता येईल अशी. या आयपॉडच्या जोरावर कित्येक क्रश इम्प्रेस झाल्या असतील, याची गिणतीच नाही.

मग बोलायला पाहिजे आयपॉड टचबद्दल. २००७ मध्ये पहिला आयपॉड टच आला. वायफाय असलेला हा पहिलाच आयपॉड, याच्यात सफारी ब्राउझर होतं, युट्युब आणि आय ट्यून्सचा ऍक्सेस होता. याच्या फोर्थ जनरेशन मॉडेलला ॲपलनं कहर केला. दोन कॅमेरे, फेसटाईमची सोय, हा आयपॉड म्हणजे डिट्टो आयफोन 4G होता.

आता आपल्याला प्रश्न पडतो, शेवटचा आयपॉड कुठला ?

तर उत्तर आहे, आयपॉड टच सेवन्थ जनरेशन. २८ मे २०१९ ला हे मॉडेल मार्केटमध्ये आलं. या आयपॉडनं एखाद्या अँड्रॉईड मोबाईलला टक्कर दिली असती, कारण इथं प्रोसेसर भारी, मेमरी २५६ जीबी, प्लेबॅक टाईम ४० तास ऑडीओ आणि ८ तास व्हिडीओ. एकदम विषय खोल.

आयपॉडचे भरपूर मॉडेल्स आले, त्याची चर्चाही कायम झाली. आपल्यातल्या कित्येक जणांनी शौक म्हणून आयपॉड वापरले, कित्येकांनी हट्ट करुन घेतले तर कित्येकांनी मित्राच्या आयपॉडवर गाणी ऐकण्यात समाधान मानलं.

हे आयपॉड असणारे मित्रही भारी होते. ही अशी जनता ज्यांना क्रिकेटपेक्षा फुटबॉल जास्त आवडायचं, क्रिकेट आवडलंच तरी त्यांची आवडती टीम ऑस्ट्रेलिया असायची, आपण सायकलवर हवा करत होतो, तेव्हा यांच्याकडे बाइक आलेली आणि पोरगीचा विषय तर जाउच द्या.

त्यांच्या आणि आपल्या कानात वाजणारा आयपॉड हाच काय तो कॉमन फॅक्टर.

पुढं मोबाईलमध्ये प्रचंड क्रांती झाली. नुसती गाणी ऐकायची म्हणलं तरी पन्नास ॲप आहेत. फोनमध्ये नसलेलं गाणं शून्य मिनिटात ऐकता येतंय. या दुनियादारीत आयपॉड अडगळीत गेला. नुसती गाणी ऐकायला वेगळं डीव्हाइस घेणंही परवडण्याच्या पलीकडे गेलं. साहजिकच खप कमी झाला आणि आयपॉडला एक्सिट घ्यावी लागली.

अजुनपण ड्रॉवरमध्ये आयपॉड असला तर, बाहेर काढा. कानात हेडफोन्स टाका आणि ज्या जमान्याची गाणी असतील त्या जमान्यात जा… डिस्टर्ब करायला ना कुणाचा मेसेज येईल, ना कुणाचा कॉल… फक्त तुम्ही, गाणी आणि कुणाच्या तरी आठवणी… ही लक्झरी फक्त आयपॉडमध्ये आहे.

ज्याची किंमत आयपॉडचं प्रॉडक्शन बंद झाल्यावर समजली.. इतकंच!

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.