असा मोगली होणे नाही..

आजकाल इंटरनेटवर जिकड बघावं तिकड नॉस्टॅल्जिकचं पीक आलं आहे. सत्तरीतल्या म्हाताऱ्याप्रमाणे ९० चे किड्स म्हणवून घेणारे बाप्ये आठवणी उगाळत बसतात असं आपलं मत आहे. त्यामुळे त्यावाटेला सहसा आपण जात नाही.

तरी काही दिवसापूर्वी डिस्नेची जंगल बुक फिल्म आली होती. बायकोपण ९०ज किड असल्यामुळे तिच्या आग्रहाखातर कोथरूडच्या एका मल्टीप्लेक्समध्ये सिनेमा पाहायला गेलो. पिक्चर 3D होता म्हणून त्यांचा 3D चष्मा डोळ्यावर चढवला. सिनेमा तसा चांगला होता. संपल्यावर उठणार इतक्यात एक ओळखीची धून सुरु झाली.

“जंगल जंगल बात चली है पता चला है…अरे चड्डी पहन के फुल खिला है फुल खिला है.”

अंगावर शहारे उभे राहिले. काही समजायच्या आत मीपणाचा सगळा माज गळाला होता. परत तो 3D गॉगल चढवून ओलावलेले डोळे लपवले. झटदिशी जुन्या दिवसामध्ये पोहचलो होतो.

सत्तरीतल्या म्हाताऱ्याप्रमाणे बायकोला म्हणालो,

“कितीपण 3d पिक्चर काढा, जुन्या सिरीयलच्या गुलजार साहेबांच्या गाण्यात जी जादू होती ती पूर्ण पिक्चर मध्ये नव्हती.”

आठवड्यातून एकदा लागणारी सिरीयल पाहायला रविवारची वाट बघायचो. मोगली बघिरा भालू आकडू पकडू हे कोणी वेगळे नसून आपलेच मित्र आहेत असं वाटायचं आणि शेरखान. शेरखान म्हणजे नाना पाटेकरचा आवाज आहे असं मोठ्या भावाने सांगितलेलं. आजही नानाला पाहिलं की शेरखानची जरब आठवते.

सगळ्या भारताला वेड लावणारी ही सिरीयल खर तर जापनीज होती.

भारत-जपान परराष्ट्रसंबंध सुधारावेत यासाठी जे काही प्रयत्न नरसिंहराव यांच्या काळात सुरु होते त्याचाच एक भाग म्हणून सांस्कृतिक देवाणघेवाणीवर ही भर दिला होता. जपानचे काही चित्रपट भारतात आणि भारतातल्या काही फिल्म्स तिकडे डब करण्यात आले. यातच होता अॅनिमेशन सिरीयल जंगल बुक.

ही जापनीज सिरीयल रुडयार्ड किपलिंग या इंग्लिश साहित्यिकाच्या जंगलबुक या कादंबरीवर आधारित आहे.

रुडयार्ड किपलिंग हे ब्रिटीशभारतात जन्मले. त्यांचे वडील सरकारी नोकरीमुळे इंग्लंडहून भारतात आले होते. शिक्षणासाठी रुडयार्डला इंग्लंडला पाठवण्यात आलं मात्र कॉलेज पूर्ण झाल्यावर तो परत भारतात नोकरीसाठी आला. अनेक वर्ष भारतात लोकल वर्तमानपत्रात पत्रकारिता केली. पैसे कमवून आपल्या मायदेशी निघून गेला. भारतातल्या आठवणीवर त्याने पुस्तके लिहिली. यातलंच एक जंगल बुक.

काहीजण म्हणतात की मध्यप्रदेशमधल्या कान्हा जंगलात खरोखर असा एक मुलगा लांडग्यांच्या कळपात वाढला होता आणि ते रुडयार्डच्या वडिलांनी पाहिलं होत. खरंखोटं काय माहित? पण रुडयार्ड आपल्या मुलीला भारतातल्या जंगलाच्या गोष्टी सांगायचा आणि यातूनच जंगल बुकचा जन्म झाला.

वरवर पाहिलं तर ही एका जंगलात अडकलेल्या लहान मुलाची कथा पण आज विचार केला तर लक्षात येत ही तर माणूस विरुद्ध जंगल या संघर्षाची कथा आहे. रुडयार्ड किपलिंगला नोबेल मिळवून देणारी ही कादंबरी ठरली.

जगभरातली छोटी मूलं भारतीय मोगलीच्या कथा ऐकत मोठी झाली .

काहीजन म्हणतात की टारझनसुद्धा मोगलीची कन्सेप्ट ढापून बनवला आहे. मोगली की टारझन हा वाद खेळणारे महाभाग पण खूप आहेत. मोगली आणि जंगल बुकचे हजारो अॅडाप्टेशन आले. डिस्नेने बनवलेला १९६७चा सिनेमाने तर अनेक रेकॉर्ड बनवले होते.

पण भारताच्याच मोगलीची भारतीयांशीची ओळख करून द्यायला शंभर वर्षांनी जपानची सिरीयल आणि गुलजार विशाल भारद्वाजचं जंगल जंगल पता चला है गाणं यावं लागलं. ही जापनीज अॅनिमेशन सिरीयल भारतात फक्त लहान मुलांच्यातच नाही तर मोठ्या माणसांच्यातही तुफान गाजली.

या सिरीयलच्या गाण्यावरून त्याकाळात राजकीय वाद ही झाले होते. चड्डी पहन के फुल खिला है अशा भाजपाच्या प्रचाराविरुद्ध काँग्रेस निवडणूक आयोगाकडे पोहचली होती.

असा हा एक काळ गाजवलेला भल्या भल्यांच्या नॉस्टॅल्जियाला हात घालणारा मोगली उद्या परत येतोय. आजच्या पिढीच्या लाडक्या नेटफ्लिक्सवर. नक्की बघा आणि आमच्या मोगली सारखा मोगली पुन्हा होणे नाही हे टिपिकल सत्तरीच्या म्हातारयांच वाक्य दोनचार जणांना तरी ऐकवा.

हे ही वाच भिडू.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.