वन साईड लव्हचा कॉन्फिडन्स आर्या ने दिला.

साल होत २००४. म्हणजेच आम्ही शाळेत होतो.

पोरापोरींची शाळा असून पण पोरी एका वेगळ्या जगात आणि आम्ही वेगळ्या जगात. त्यांच्याशी बोलण्याचा विषयच नव्हता. म्हणजे आपल्याला कोणाबद्दल क्रश नव्हत असं नाही. पोरींच्या बापाच्या नावाने डिरेक्टरीमध्ये सेव्ह असलेल्या नंबरवर कॉईन बॉक्सवर फोन करण्यापर्यंत आपली मजल होती. पण तेव्हा पण हॅलो हॅलो चा आवाज ऐकून फोन ठेवून द्यायचा.

वन साईड प्रेम ओ. या वन साईड लव्हच्या इंफेरीओरिटी कॉम्प्लेक्स मधून जर कोणी बाहेर काढलं असेल तर तो होता “आर्या”.

सगळ्यात आधी गाण आलं “आ अन्टे अमलापुरा”. इंजिनियरिंग साठी कोल्हापुरात आलेल्या मराठवाड्यातल्या कुठल्या तरी पोराने हे तेलगु गाण आमच्या भागात आणलं असाव. रेल्वेच्या टपावर नाचणाऱ्या हिरो आणि हिरोईन ला पाहून अभिजनांनी “गरीबांचा छैंय्या छैंय्या” असा उपहास करत नाकं मुरडली. पण का कुणास ठाऊक गाण लई सुपरहीट झालं.

गाण हिट झालं मग लोक सिनेमाच्या सीडीच्या शोधात लागले. त्याचा सुगावा लागल्यावर सांगली कोल्हापूरच्या थिएटर मालकांनी आर्या आणला. तसं आमच्या भागात दाक्षिणात्य सिनेमे लागत नव्हते असं नाही. पण लागले तर देवाचे कन्नड सिनेमे पण आम्हाला कळतय तसा हा पहिला तेलगु सिनेमा असावा. अजून पण आठवतय इचलकरंजी मध्ये भाग्यरेखा टाॅकीला हा सिनेमा लागलेला.

संध्याकाळच्या शो ला आम्ही दोस्त मंडळी गेलो तर ही भली मोठी लाईन. विशेष म्हणजे त्या चेंगराचेंगरीत खूप वेळ राहावं लागलं नाही कारण तिकीट खिडकी दोन मिनिटासाठी उघडली आणि बंद झाली. आता तिकीट ब्लॅकन घ्यायचं. घरातन मोजून पैसे आणलेले परत जायची नामुष्की येणार होती. आमच्या बॉलीभाईने काय तरी झिंगाट लढवलं आणि स्टॉलची तिकीट मिळवली.

आत गेलो, तर सिनेमा सुरु झालेला. नुसता शिट्ट्यांचा आवाज घुमत होता. एक सुंदर पोरगी कन्याकुमारीच्या बीचवर नाजूक पैंजण घालून लाटेशी खेळत असते, तिथ तिला मोरपीस सापडत. तीच पैंजण समुद्रात पडत ते काढायला एक पोरग समुद्रात उडी मारत, त्याचं तोंड दिसत नाही आणि विशेष म्हणजे हे स्वप्न असत वगैरे वगैरे.

पिक्चर मध्ये नेमकं काय बोलत आहेत ते कळत नव्हत पण जस इंग्लिश सिनेमा बघत होतो तस अंदाजपंचे हा सिनेमा बघायला काय हरकत नव्हती. तसाही थेटरातल्या दंग्यात ऐकू कुठे काय येणार होत?

तर विषय असा होता की गीता ही कॉलेजच्या हॉस्टेल मध्ये राहणारी टिपिकल साधी घाबरट गरीब गोरी गोंधळलेली पोरगी. तिला एकदा कॉलेज मधला टग्या उर्फ अजय (टिपिकल मिशावाला कॉलेजच्या वयाचा न वाटणारा उगीचच ताठ उभा राहून तिरक बघणारा व्हिलन ) बघतो. या अजयचा बाप कोणी तरी राजकारणी कॉलेजचा ट्रस्टी असतो.(असायलाच पाहिजे त्याशिवाय स्टोरीला मजा नाही). आणि हा सोबत चमच्यांची गँग बाळगून येणाऱ्या जाणाऱ्याला उगाचच ठोकत असतो.

अजयची नजर आपल्या गीता वर पडते आणि तो तिला प्रपोज टाकतो. (त्याच ताठलेल्या स्टाईलमध्ये) ती नाही म्हणाल्यावर कॉलेजच्या छतावर जाऊन उडी मारायची धमकी देतो. (त्याच ताठलेल्या स्टाईलमध्ये) ती घाबरून बाकीच्या पोरींच्या प्रेशरला बळी पडून त्याला आय लव्ह यु म्हणते. झाल एवढ्यावर असं ठरत की गीता आता अजयची गर्लफ्रेंड आहे.

सगळ ठीक आहे पण हिरो कुठे आहे? या आय लव्ह यु प्रकरणावेळी अजून एक जण सायकल वर बसून गीताच आय लव्ह यु एन्जोय करत असतो. तो असतो आपला हिरो आर्या. दिसायला एकदम आपल्या सारखा. केस विस्कटलेले, दाढी, सावळा वर्ण.

त्याची एंट्रीच मुळात गटारीतून कुत्र काढण्याच्या सिनमधून झालेली असते.

आता हे आर्या पण गीताच्या प्रेमात पडतय. प्रेमात पडलय तर गप्प बसावं की नाही तर सरळ गीता आणि अजय रोमांटिक वॉकला गेलेले असतात तिथ सायकलवरून जाऊन डेंजर अजयच्यासमोर (अजय मोबाईलवर बोलण्यात बिझी असतय) गीताला आयलव्हयु म्हणून जरबेराच फुल देतय आणि लगेच तिथन सटकतय. अजय भावाच टाळकच सटकतय. पण बाकीचे त्याला समजावून घालवून देत्यात.

गीताबाई टेन्शनमध्ये येत्यात. हा कोण नवा गडी जो ना ओळख ना पाळख आपल्याला व्हिलन च्या समोर प्रपोज करून गेला? (पोरींबरोबर साध बोलायला फाटत होती तेव्हा हा आर्याचा स्टंट आपल्याला लई आवडला.) गीता आणि तिच्या मैत्रिणी गहन चर्चा करतात. तिच्या मैत्रिणी अर्याची परीक्षा पण घेतात पण आर्याचा एकच डिफेन्स असतो,

“तुझ अजयवर प्रेम आहे मला मान्य आहे. तू माझ्यावर प्रेम कर असं मी म्हणतच नाही JUST FEEL MY LOVE “

आता हे भाषांतर असंच आहे का आम्हाला माहित नाही पण  अंदाजे असच काही तरी असाव. आर्या होत तर आडव्या टाळक्याचं पण उगीच हॅप्पी गो लक्की सारखं हसत हसत गीताच्या बरोबर तिच्या मैत्रीणीना गुंडाळून टाकतंय. ते रोज गीताच्या हॉस्टेलच्या नोटीसबोर्डवर आपल्या जिलेबीसारख्या गोल गोल भाषेत तिला प्रेमसंदेश लिहून ठेवत असतंय.

आर्याचे सल्लागार असतात छोट्या मुलांची एक टीम. त्यांच्या बरोबर चर्चेत माउथ ऑर्गन वर रोमांटिक म्युजिक वाजवनारा आर्या गात असतो ,

“ना प्रेमनु गोपंगानम सखिया फील माय लव्ह “

आणि अजय? अजय गावाला गेलेलं असतय. ते परत येई पर्यंत त्याचे चमचे हॅप्पी गो लक्की आर्याचा अवतार अनुभवतात. चिडून ते सनी देओल स्टाईलं मध्ये बोर तोड्तंय. अजय आल्यावर मात्र परत आपल्या चेहऱ्यावर हसू आणून त्याला पण त्याच्या जिलेबी स्टाइल मध्ये गुंडाळून टाकत. अजयला त्याची बडबड जरा जडच जाते. पण त्याची लव्ह स्टोरी सुरूच असते.

या स्टोरीत ट्विस्ट येतो  तो म्हणजे त्याचा राजकारणी बाबा अजय गीता स्टोरीमध्ये मोठा व्हिलन बनून येतो. ते दोघे पळून लग्न करायचा निर्णय घेतात.(निर्णय अजय एकटाच घेत असतो). आणि त्यांना पळून जायला मदत कोण करत माहित आहे? आपला हिरो आर्या. एकतर्फी प्रेमाच्या उत्कटतेचा हे टोक आहे असं आम्हाला वाटलं. आर्या म्हणत होता,

” ओ माय ब्रदरू टूंटूंटूंटूं वन साईड लव्हूरा येण्टो बेटरू”

भारी रे भावा. पहिल्या ओळीत बसलेले प्रेक्षक नाचून नाचून त्याला दाद देत होते. या FEEL MY LOVE ने अख्ख्या दक्षिण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली. शाळा कॉलेजमधली पोरं बेंचवर बाण मारलेल्या हृदयात  FEEL MY LOVE कोरत होती. काही धाडसी लोक आपल्या सायकलच्या माग किंवा गाडीच्या नंबरप्लेटवर  FEEL MY LOVE लिहून घेत होते.

आता तुम्ही म्हणणार स्टोरी निम्मीच सांगितला की. अहो पुढ्च काय महत्वाच नाही. त्यात काय आर्याचा रेल्वे वरचा आ अन्टे डान्स, साउथ स्टाईलं मधली फायटिंग आर्याच जंगलातल्या एकांतात गीताला इम्प्रेस करन तरी पण तिचं अजय बरोबरच लग्न. आणि लग्नातून पळून येऊन आर्याला मिठी मारण. शेवटी वळणाच पाणी वळणावर. त्यात काय सांगण्यासारखं.

एकंदरीत आर्या तुफान चालला. तो आंध्रप्रदेशमध्ये किती चालला होता माहित नाही पण आमच्याइकड तर ब्लॉकब्लस्टर होता. जिकड जाईल तिकड प्रत्यकाच्या पीसीवर मोबाईलमध्ये हीच गाणी.

पण आर्याच यश फक्त एका माणसाला मिळालं तो म्हणजे हिरो “अल्लू अर्जुन.” या सिनेमाचा डायरेक्टर कोण होता तेव्हा पण कोणी विचारलं नाही आता पण माहिती करून घेतल नाही. गाणी एवढी भारी होती पण म्युजिक डायरेक्टर देवीश्री प्रसाद पण असाच अज्ञात राहिला. आणि हिरोईन? अनुराधा मेहता ही फक्त आमच्या पीसीचा वाॅलपेपर एवढीच ओळख राहिली.

तुमच्या आमच्यातला वाटणारा फक्त जरा जास्त भारी डान्स करणारा अल्लू अर्जुनची हवा झाली होती त्याकाळात. त्याच्या प्रेमापोटी लोकांनी त्याचे पुढचे बन्नी, आर्या २ असे फालतू सिनेमे पण बघून घेतले. दाक्षिणात्य सिनेमांची लाट आली तशी गेली पण आर्या सिनेमा पाहून मिळालेल्या कॉन्फीडन्समध्ये प्रेमाच्या वेडया धाडसाच्या आठवणी मात्र तशाच ताज्या आहेत.

हे ही वाच भिडू.

2 Comments
  1. vaibhav shetkar says

    हे ज्यान लिहिलंय तो २००४ साली शाळेत होता आणि मी तेव्हा नुकताच गावातंन मुंबईला आलेलो…
    GF गावीच राहिली म्हणाली मी शिकते तुला नोकरी लागेपर्यंत आणि शिकायला गेली कोल्हापूरला सायबर युनिव्हर्सिटीत
    एक दिवस रोजच्या ठरलेल्या वेळी अजिबात फोन नाही. फोन लागत पण नव्हता. तिथल्या तिच्या सगळ्या मित्र मैत्रिणींचे नं. होते माझ्याकडं…
    ते पण उचलत नव्हते. ४ तासांनी फोनवर बोलणं झालं तेव्हा कळलं सायबर युनिव्हर्सिटीत कॉमन ऑफ घेऊन पोरं ‘आर्या’ बघायला गेलेली…

    तेव्हाच ठरवलं ‘आर्या’ बघायचा आणि त्यानंतर साऊथ चे जवळ जवळ सगळेच चांगले सिनेमे बघायची सवय लागली.
    अल्लू अर्जुनला नाही भेटलो पण चियान विक्रमला भेटलो तेव्हा त्याला हा किस्सा सांगितला…

    तामिळ, मल्ल्यालम, तेलुगू उत्तमोत्तम सिनेमे बनत असतात.

    आर्याची हिरोईन एका जाहिरातीत दिसली नंतर
    आणि स्टायलिस्ट सुपरस्टार अल्लू अर्जुन चा तर प्रत्येक सिनेमा पाहतो त्या दिवसापासून.

    हे सगळं आठवून दिल्याबद्दल धन्यवाद!

  2. राहुल इंगवले, कोल्हापूर says

    बोल भिडू चे लेख अगदी खरे खुरे आणि वाचनीय असतात…आर्या हा सिनेमा मी स्वतः १२ वेळा पाहिला आहे तरी सुध्धा हा लेख आणि त्याची सगळी कथा वाचून काढली…वाचताना एक गोष्ट लक्षात आली ते म्हणजे तुम्ही तर आमच्या कोल्हापूर चे वाटता राव…बर असो आम्ही पण शाळेत असतानाच हा सिनेमा आला होता आणि तुम्ही जे काही बोललात ते सगळे कांड आम्ही पण केले आहेत म्हणून लेख वाचताना आपल्या बद्दलच आहे असं सारखं वाटतं होत आणि जुन्या आठवणींनी हळूच मन लाजत सुध्धा होत

Leave A Reply

Your email address will not be published.