१९ वर्षे झाली अजूनही इंडियाज मोस्ट वॉन्टेडची केस क्लोज झालेली नाही.

नव्वदचं दशक म्हणजे खूपच इनोसंट होत, किंवा आपणच अजून खूप निरागस होतो. आपला टीव्ही पण निरागस होता. आपल्याबरोबर तो पण हळूहळू वयात येत होता. कित्येक घरात अजून रंगीत टीव्ही येत होते. केबल जोडली जात होती. सरकारी दूरदर्शनला फाईट द्यायला झी, सोनी हे खाजगी चॅनल आले होते. लालफितीचा कारभार नसल्यामुळे त्यांनी वेगवेगळे चांगले वाईट प्रयोग करायला सुरवात केली होती. आपण भारतीय प्रेक्षक हळूहळू त्याला स्वीकारत चाललो होतो.

अशातच आला इंडियाज मोस्ट वॉन्टेड !! 

झी टीव्हीवर रात्रीच्या शो मध्ये एक कोट घातलेला चिकना यायचा आणि तोंडावर मक्ख एक्स्प्रेशन ठेवून ठसठशीत  आवाजात  म्हणायचा,

“मै सुहेब इलीयासी आप सभी हजारत का इंडियाज मोस्ट वॉन्टेड मै स्वागत है. देश का वो पहिला और अकेला शो जो फरार अपराधीयोंका चेहरा दिखाकर उनको गिरफ्तार करने मै मदद करता है.”

थोड्याच दिवसात हा शो पॉप्युलर झाला. खरचं या शो ने भारतीय टीव्हीवर एक आगळीवेगळी क्रांती आणली. आज आपण बघतो त्या सावधान इंडिया, क्राईम पेट्रोल अशा सिरीयलचा तो बाप होता. छोट्या छोट्या स्कीटसच्या माध्यमातून ते गुन्हेगारी प्रसंग उभे केले जायचे. तेव्हा वाटायचं की ते खरेच होते. एका एपिसोड मध्ये शक्तिमान मधला कपाला दाखवलेला आठवतोय. खरोखर तो गुन्हेगार होता की त्या एपिसोड मध्ये त्याने अक्टिंग केलेली आता नक्की आठवत नाही. पण आपल्याला सिरीयल भरपूर आवडलेली.

सुहेब इलीयासी हे नाव या निमित्ताने घराघरात पोहचल. तेव्हा वाटायचं की गुन्हेगारांचा हा कर्दनकाळच आहे. तोच या सिरीयलचा होस्ट, निर्माता, दिग्दर्शक सगळ काही होता. या सिरीयलमुळे पोलिसांना देखील बराच फायदा झाला. सुहेब इलीयासीच्या टीमचा रिसर्च बाप होता. श्रीप्रकाश शर्मा सारख्या खतरनाक गुन्हेगाराला पकडायला मदत झाली.

पण इतक्यात एक दिवस बातमी आली सुहेब इलीयासीच्या बायकोने आत्महत्या केली आहे. पण दोनचं महिन्यात समोर आले की ही आत्महत्या नसून तो खून होता. आणि तो खून केला होता सच्चाई का साथ, गुनेह्गारो का परदाफाश असे शब्द टीव्हीवर फेकणाऱ्या सुहेब इलीयासीने.

तो मुळचा दिल्लीचा. त्याचे वडील एका मस्जिदमध्ये इमाम होते. पण पोरगा स्मार्ट निघाला. त्याला इंग्लिश मिडीयम मध्ये घातल होत. पुढ जामिया इस्लामिया विद्यापीठात मास कम्युनिकेशन शिकायला गेला. तिथे त्याच अंजू सिंह नावाच्या मुलीशी जुळून आलं.

आईवडिलांच्या विरोधात जाऊन दोघांनी लंडनमध्ये लग्न केले. दोघे पण पत्रकार, मास मिडियाचे विद्यार्थी. या क्षेत्रातचं काही तरी करायचं त्यांच्या डोक्यात होत. याच दरम्यान इंग्लंडमध्ये एक शो फेमस झाला होता, क्राईमस्टॉपर्स. सुहेब आणि अंजूला तो खूप आवडला. भारतात सुद्धा असाच शो करायचा त्यांनी ठरवलं. दोघे नवरा बायको भारतात परत आले.

त्यांनी एक दोन पायलट एपिसोड शूट देखील केले होते. यात अँकर होती अंजू. या शोजचे रेकोर्डिंग घेऊन सुहेब चनलच्या दारोदरी भटकू लागला. बऱ्याच स्ट्रगलनंतर अखेर झी टीव्हीवाले तयार झाले. सुहेब इलीयासीने या शोचं नाव ठेवलं इंडियाज मोस्ट वॉन्टेड.

शो सुपरहिट होता. फक्त मोठ्या शहरातच नव्हे तर कानाकोपऱ्यातल्या खेडोपाड्यात ही लोक हा शो बघत होते. यापूर्वी भारतात एक तर पारिवारिक सिरीयल नाही तर रामायण महाभारत सारखे सिरीयल यांचीच चलती होती. पण क्राईम सिरीयलला एवढा प्रतिसाद मिळेल याची कोणी कल्पना ही केली नव्हती. पण याच श्रेय सुहेबच्या नाट्यमय अँकरिंग ला जात होत हे ही तेवढचं खरं. त्याला रोज धमक्याचे फोन येत होते त्याच्या यशाची ही पोचपावतीच होती. पुढे हा शो झी वरून दूरदर्शनला शिफ्ट झाला. तिथे सुहेबला कॉपीराईटमुळे फ्युजीटिव्ह मोस्ट वॉन्टेड हे नाव घ्यायला लागले. पण पैसे मात्र तो प्रचंड छापत होता.

तो सक्सेसच्या शिडी चढत चालेला पण त्याच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र बरीच उलथापालथ घडत होती.

अंजू आणि तो सुरवातीपासून बरेच भांडायचे. बऱ्याचदा अंजू त्याला सोडून निघून जायची, त्यांची भांडणे डिव्होर्स पर्यंत पोहचायची. पण नंतर काही तरी करून सुहेब तिची समजूत काढून तिला घरी आणायचा. यातच त्यांना एक गोड मुलगी देखील झाली होती पण दोघांची भांडणे काही थांबली नव्हती.

१० जानेवारी २०००.

दिल्लीच्या मयूर विहार भागातील एक अलिशान अपार्टमेंट. रात्रीचे साडे अकरा वाजत आले होते.  सुहेब आणि अंजूच्या भांडणाचे आवाज बाहेर पर्यंत ऐकू येत होते. शेजाऱ्यांना हे काही नवीन नव्हते. त्यांना वाटलं सहा दिवसांनी अंजूचा तिसावा वाढदिवस आहे त्याच्या पार्टीवरून दोघांचे नेहमीप्रमाणे वाद सुरु असतील.

एवढ्यात जोरात किंकाळी ऐकू आली आणि भांडण शांत झालं. सुहेब गडबडीत धावत बाहेर आला. त्याला धमक्यापासून संरक्षणासाठी पोलिसांनी दोन हवालदार नियुक्त केले होते. सुहेबने त्यांना सांगितलं की माझ आणि माझ्या बायकोच भांडण झालं आणि तिने रागाच्या भरात चाकू खुपसून घेतली आहे. त्यांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. पण तिथे नेईपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.

सगळ्यांनाचं वाटलं गेली काही दिवस डिप्रेशनमध्ये असलेल्या अंजूने आत्महत्याचं केली आहे. पण पुढे दोन महिन्यांनी अंजूच्या बहिणीने तक्रार नोंदवली की हा खून होता आणि हा खून हुंड्यासाठी सुहेबने केला होता. दुसऱ्या दिवशी सगळ्या पेपर मध्ये ठळक बातमी होती

“इंडियाज मोस्ट वॉन्टेडवाल्या सुहेब इलीयासीला बायकोच्या खून प्रकरणी अटक झाली.”

असं म्हणतात की सिरीयल मध्ये गुन्हेगाराना दाखवून दाखवून त्याला पोलिसी कारवाईपासून पळून जायचे फंडे अवगत झाले होते. त्याचा अभ्यास मोठा होता म्हणून तो या केसला आत्महत्या दाखवण्याच्या प्रयत्नात यशस्वी झाला होता पण अंजूच्या घरच्यामुळे त्याची सगळी हुशारी बाहेर पडली.

पुढे अनेक वर्ष ही केस चालली. सुहेबला त्यातून जामीनही मिळाला. एकीकडे त्याची सिरीयल दूरदर्शन वर चालूच होती, कालांतराने ती इंडिया टीव्हीवर शिफ्ट झाली. त्याने काही सिनेमे देखील बनवले पण जुनं यश त्याला परत कधीच मिळालं नाही. सुहेबने केलेल्या विश्वासघातामुळे त्याच्यावर लोकांनी त्याला परत स्वीकारलचं नाही. पुढे त्याची केस सीबीआय कडे गेली. त्याच्यावरचा गुन्हा सिद्ध झाला, कोर्टाने त्याला जन्मठेपेची शिक्षा दिली. पण दिल्ली उच्च न्यायालयात हा निर्णय रोखला गेला. सध्या ही केस सर्वोच्च न्यायालयात गेली आहे.

१९ वर्षे झाली अजूनही या इंडियाज मोस्ट वॉन्टेडची केस क्लोज झालेली नाही. न्याय अजून प्रतीक्षेतच आहे!!

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.