राहुलमुळे नाही नेहरुंमुळे पराभव झाला !


चार राज्यात बीजेपीचा पराभव का झाला? खरंतर बीजेपीच्या चुका काढायला ही योग्य वेळ नाही. कारण अजूनही लोकसभेसाठी कॉंग्रेसकडे उत्तम पर्याय नाही. ज्यांना कुणाला असं वाटत असेल की लोकांनी राहुल गांधी यांच्याकडे बघून कॉंग्रेसला जिंकून दिलंय त्यांना त्या आनंदात राहू द्या. पण राजस्थान, मध्यपरदेश, छत्तीसगडचा निकाल म्हणजे राहुल गांधी यांना दिलेला कौल आहे असं नाही. हा सामान्य जनतेने योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या नेत्यांच्या बेताल वक्तव्यांना दिलेला प्रतिसाद आहे. वसुंधरा राजेंच्या मनमानी कारभाराला दिलेला धडा आहे. शिवराजसिंग चौहान यांच्यावरची नाराजी आहे. ही नरेंद्र मोदी यांच्यावरची नाराजी आहे असं जर विरोधक समजत असतील तर ते गाफील आहेत. किंवा हा निकाल विरोधकांना अतिआत्मविश्वास देत असेल तर मग पुढची निवडणूक मोदींना अजून थोडी सोपी होऊ शकते.

शेतकरी नाराज आहे यात दुमत नाही. देशभरात शेतकरीवर्गात असंतोष आहे. पण अशावेळी धार्मिक राजकारण करण्याला जनता वैतागली आहे. कारण ज्या हिंदूं धर्माच्या नावे हे राजकारण चालू आहे त्या हिंदू धर्मातलीच माणसं मारली जात आहेत. कारण गाय असो, ऑनर किलिंग असो किंवा अफवा असो. उत्तर परदेशात गाईच्या कारणावरून मारला गेलेला इन्स्पेक्टर किंवा तरुण असोत सगळे हिंदूच आहेत. मोदी आणि अमित शहा यांची राजकीय भाषणे पुरेशी आक्रमक असतात. त्यात योगी आदित्यनाथ यांची भडकाऊ भाषणं काहीच गरजेची नव्हती. विकासावर मत मागणाऱ्या बीजेपीने अचानक मोदी आणि शहा यांच्यापेक्षा जास्त योगी आदित्यनाथ यांचा प्रचारासाठी वापर करायची काहीच गरज नव्हती. बरं योगी आदित्यनाथ यांच्या कारकिर्दीत विकासकामाचा अजून पत्ताच नाही. केवळ शहरांची नावं बदलणारा मुख्यमंत्री अशी प्रतिमा त्यांनी स्वतःच करून घेतलीय. त्यात हिंसाचाराच्या घटना चालूच आहेत.

रस्ते, कर्जमाफी, रोजगार या विषयावर निवडणूक लढण्याची अपेक्षा असताना ती भलत्याच मुद्द्यावर गेली. त्यात खुद्द मोदींनी सोनिया गांधींच्या विधवा असण्याचा उल्लेख करून मोठी चूक केली. बऱ्याच सोनिया गांधी यांच्याविषयी सहानुभूती नसणाऱ्या लोकांनाही त्यांच्याविषयी सहानुभूती वाटून गेली. 

मोदी शहा यांच्यापेक्षा ही निवडणूक ट्रोल्सने ताब्यात घेतली. दोन तीन वर्षांपूर्वी राहुल गांधी मोदींच्या आसपास पण फिरकू शकतील असं वाटत नव्हतं. पण बीजेपीच्या ट्रोल gang ने त्यांना सतत चर्चेच्या केंद्रस्थानी ठेवलं. राहुल गांधी यांचे ट्वीट कुणी बघायचं सुद्धा नाही. पण आता मोदी यांच्याएवढेच राहुल गांधी यांचे ट्वीट वाचले जातात. रीट्वीट होतात. यात राहुल गांधी यांचं योगदान तीस टक्के असेल तर सत्तर टक्के योगदान बीजेपीच्या ट्रोलचं आहे. राविश कुमार खूप पूर्वीपासून मोदींवर टीका करताहेत. पण त्यांना फार फॉलोअर्स नव्हते. ट्रोल gang रविश कुमारांना टार्गेट करायला लागली आणि रविश कुमार अचानक युट्यूबवर प्रचंड लोकप्रिय झाले. तेच कन्हैया कुमार सारख्या नेत्यांच्या बाबतीत होतंय. तेच गुजरातमध्ये हार्दिक पटेलच्या आणि जिग्नेश मवानीच्या बाबतीत झालं. या लोकांना ट्रोल्स सडेतोड उत्तरं पण देऊ शकत नाही. केवळ या लोकांना शिवीगाळ करण्यात धन्यता मानली जाते. आणि मग यांच्या पोस्ट आणि त्याखालच्या कमेंट वाचणार्या माणसाला रविश कुमार सारखे लोक जास्त योग्य वाटू लागतात.

गांधी नेहरुंना बदनाम करण्यात नेमकं कुणाचं भलं आहे? ट्रोल्सना आणि बीजेपीच्या नेत्यांना एका गोष्टीचा विसर पडलाय की कॉंग्रेसनंतर या देशात सर्वाधिक काळ सत्तेवर राहिलेला पक्ष बीजेपी आहे. दहा वर्षाची सत्ता उपभोगली आहे. आता प्रश्न विचारले जाणार आहेत. पण दुर्दैव हे आहे की विरोधकांना प्रश्न विचारायची गरजच पडत नाही. बीजेपी स्वतःच अडचणी वाढवत आहे. गोव्यात पर्रीकर यांना मदत म्हणून हंगामी मुख्यमंत्री म्हणून एकही नेता कर्तव्य बजावू शकत नाही का? बिप्लव कुमार यांच्यासारखे मुखमंत्री कितीकाळ वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणार? हरयाणाचे मुख्यमंत्री पण या शर्यतीत मागे नाहीत. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे अपवाद सोडले तर प्रत्येकाने वादग्रस्त विधानं करायचा सपाटा लावलाय. पण तरीही या राज्यांच्या निवडणुका म्हणजे लोकसभेची झलक नाही. 

देशात आजही मोदी सगळ्यात जास्त लोकप्रिय नेते आहेत. राहुल गांधी आता कुठे शर्यतीत आलेत. पण ते अजूनही खूप मागे आहे. मोदींचा आणि बीजेपीचा विरोधक असलेला एक खूप मोठा वर्ग आहे ज्याला राहुल यांच्या नेतृत्वाबद्दल खात्री नाही. असण्याचं काही कारणही नाही. कॉंग्रेसकडे पर्यायी मंत्री खूप आहेत. पण दुर्दैवाने पंतप्रधान नाही. ही कॉंग्रेसची सगळ्यात लंगडी बाजू आहे. लोकसभेला मतदान करताना लोक या गोष्टीचा जास्त विचार करणार. त्यात बीजेपीच्या आतल्या गोटातून आतापासूनच नितीन गडकरी यांचे नाव हुशारीने पर्याय म्हणून पुढे आणलं जातंय. नितीन गडकरी यांचं कामही लोकांना आवडतं. कॉंग्रेस मात्र चुकुनही राहुल गांधीना पर्यायी नाव पुढे आणत नाही. येऊ देत नाही. जरी नावाची चर्चा झालीच तर ती थेट प्रियंका गांधी यांच्या नावाची होते. हे कॉंग्रेससाठीच नाही तर देशासाठीही दुर्दैवी आहे. राहुल गांधी यांनी बरीच प्रगती केली आहे. पण ती देशाचा पंतप्रधान म्हणून पुरेशी नाही. त्यांनी याक्षणी मोदींसमोर आव्हान उभं केलंय अशी हवा मात्र या निकालाने नक्कीच झालीय. पण… 

बीजेपीचा एक नंबरचा शत्रू कॉंग्रेस नाही. स्वतः बीजेपी आहे. बीजेपीचे वाचाळ नेते आहेत. बीजेपीने जोपासलेली ट्रोल gang आहे. या ट्रोल gang मुळे बीजेपी बद्दल सुसंस्कृत लोकांना एक विनाकारण अढी निर्माण झालीय. कुणालाही त्यांची घाणेरडी भाषा सहन होणार नाही. नरेंद्र मोदींनी विकासाचं स्वप्न दाखवलं, शिस्त आणायचा प्रयत्न केला, स्वच्छ भारताची आशा निर्माण केली, गंगा शुध्द होईल असा विश्वास निर्माण केला. ही सगळी कामं झाली नसती तरी त्यांच्या चाहत्यांनी तक्रार केली नसती. भारत स्वच्छ झाला नाही तरी चालेल पण सोशल मिडीयावरची घाण थांबवा असा प्रकार झाला. आणि यात सगळ्यात दुर्दैवी गोष्ट होती की यातले काही ट्रोल्स असे आहेत ज्यांना ट्वीटरवर खुद्द मोदी फॉलो करतात. अशाने या बोलबच्चन लोकांना खूप चेव येतो. यातून फक्त द्वेष निर्माण होतो. आधी तो कॉंग्रेस बद्दल निर्माण झाला होता पण आता तो बीजेपी बद्दल निर्माण होतोय हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. या ट्रोलमुळे बीजेपीच्या नेत्यांचा पण गैरसमज होतोय. एकतर ही काही हजार तीच तीच मंडळी आहेत. जिकडे तिकडे ही ठराविक मंडळी शिवीगाळ करत असतात. पण त्यामुळे खूप लोकांचा असा समज होतो की जनमानस असं आहे. किंवा सगळेच कॉंग्रेसला शिव्या देताहेत. पण वातावरण तसं नसतं.

नेहरुंना सतत नावं ठेवल्याने आज नेहरूंच काही बिघडणार नाही. बिघडणार आहे ते बीजेपीचं.

मोदींच्या कामाबद्दल बोलायचं सोडून ट्रोल नेहरुंबद्दल बोलत बसले. बीजेपीचे मंत्री आणि प्रवक्ते सुद्धा नेहरुंचं नामस्मरण करत बसले. संबीत पात्रा आता विनोदाचा विषय झालेत. भरवशाचा अर्णव गोस्वामी आता फक्त मिमचा विषय झालाय हे बीजेपीने आतातरी मान्य करायला हवं. मनमोहनसिंग यांची बदनामी करून विजय मिळवता येतो. पण नेहरूंची बदनामी करून पराभवच वाट्याला येतो हे आता बीजेपीने लक्षात घ्यावे. या देशाला गांधी नेहरू घराण्याचं अजीर्ण झालं म्हणून तुम्हाला निवडून दिलंय. तुम्ही पण गांधी नेहरूंचंच नाव घेत बसणार असाल तर मग बदल काय झाला? आता नेहरुंमुळे नाही जे काय झालं ते माझ्यामुळे झालं आणि जे काय होईल ते माझ्यामुळे होईल अशी कणखर भाषा मोदींकडून अपेक्षित आहे.

दोन तीन राज्य गेलेत पण अजूनही वेळ गेलेली नाही. फक्त एक गोष्ट बीजेपी आणी ट्रोल gang ने लक्षात ठेवली पाहिजे हा पराभव नेहरुंमुळे झालाय. हा विजय जसा राहुल गांधींचा नाही तसा हा पराभव पण मोदींचा नाही. एक मात्र खरं कॉंग्रेसच्या विजयाचे नसले तरी बीजेपीच्या पराभवाचे कारण मात्र नेहरू आहेत. ट्रोल gang ला लवकरात लवकर समजायला हवं की सारखं दुसऱ्याच्या नवऱ्याचं नाव घेऊन संसार जास्त दिवस टिकत नाही. ज्याचं कुंकू लावलंय त्याचंच नाव घेत रहावं.   

Leave A Reply

Your email address will not be published.