नुसतं फराळ, फटाके आणि अंक नाहीत, दिवाळीच्या निमित्तानं हे ५ सिनेमेही येत आहेत…

दिवाळी आणि सिनेमा यांचं कनेक्शन आहे. दिवाळीला सिनेमा सिनेमाचं फळफळत असा बॉलिवूडचा इतिहास सांगतो. सलमान- शाहरुख आणि दिवाळी यांचं तर वेगळं समीकरण आहे. मागच्या काही वर्षात दिवाळीला सलमान किंवा शाहरुखचा एक तरी सिनेमा असतोच. मग तो २०१५ सालचा प्रेम रतन धन पायो असेल किंवा पुढच्या दिवाळीत येणारा टायगर ३ असेल. शाहरुखचे तर ओम शांती ओम, रा-वन, हॅपी न्यू ईअर असे अनेक सिनेमे दिवाळीच्या दरम्यान रिलीज झालेत.

दिवाळीला सिनेमे रिलीज करायचं एक कारण असतं सिनेमाचं ओपनिंगच दणक्यात होतं आणि हवा तयार वेगळंच.

एरवी फ्रायडे फाईट मध्ये सिनेमांचं ओपनिंग गंडत आणि सुरुवातच चांगली झाली नाही की सिनेमाच्या एकूण कलेक्शनवर त्याचा फरक पडतो. या दिवाळीत फ्रायडे सोडून सिनेमे मंगळवारीच म्हणजे २५ ऑक्टोबरला रिलीज होणार आहेत. यावेळी सुद्धा हिंदी, मराठी आणि साउथचे बरेच सिनेमे एकत्र रिलीज होणार आहेत. ते कोणते आहेत पाहुयात.

१. राम-सेतू

सध्या या सिनेमाची जबरदस्त चर्चा होतेय. कारणही तसंच आहे सिनेमाचा विषय आणि खिलाडी अक्षय कुमार. २५ ऑक्टोबरला या सिनेमाची कथा आहे एका पुरातत्व शास्त्रज्ञाची म्हणजे आर्किओलॉजिस्टची. हा स्वभावाने नास्तिक आहे पण त्याला मिळालेल्या एका प्रोजेक्टमुळे त्याची देवावर श्रद्धा कशी दृढ होत गेली हे दाखवणारा हा सिनेमा असणार आहे.

त्याला मिळालेला प्रोजेक्ट असतो पौराणिक रामसेतूचं अस्तित्व सिद्ध करणं आणि ते ही ३ दिवसात. सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस पडलाय असं म्हणायला हवं शिवाय राम सेतूचं थीम सॉंग सुद्धा प्रचंड गाजताना दिसतंय. जय श्रीराम अँथम असं या गाण्याचं नाव आहे ज्यात प्रभू रामचंद्रांची स्तुती उत्तम पद्धतीने केली आहे. प्रमोशन दरम्यान अक्षय कुमारने सिनेमाचं हे गाणं गायलं आणि त्याचे असंख्य विडिओ viral झाले. त्याचं झालं असं की अक्षयने स्टेजवर जाण्याआधी पायातून चपला काढल्या आणि पुढे हे अँथम अगदी जोशात गायलं.

त्याच्या या कृतीचं खूप कौतुक झालं. अक्षय सध्याचा असा चर्चित स्टार आहे. पण बॉयकॉट बॉलिवूडची झळ त्याच्याही सिनेमांना बसलीच. अक्षयचे सलग ४ सिनेमे फ्लॉप गेले असल्याने त्याला रामसेतू सिनेमाकडून खूप अपेक्षा आहेत. त्याचे सिनेमे न चालण्यासाठी त्याने स्वतःलाच जबाबदार ठरवलं होतं आणि अपशयची जबाबदारी घेतली होती.

हे वर्ष मोठ्या मोठ्या अभिनेत्यांसाठी आणि त्यांच्या सिनेमांसाठी विशेष राहिलेलं नसल्याने दिवाळीत तरी अक्षयच नशीब बदलणार का आणि त्याचा हा सिनेमा तरी सुपरहिट सिनेमांच्या ट्रॅकवर आणणार का हे बघावं लागेल. ट्रेलर येण्याआधी रामसेतू हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करत होता आणि ट्रेलर आल्यावर सुद्धा प्रेक्षकांचा भर्मनिरस झाला नसल्याचं दिसून आलंय. या सिनेमात अक्षयबरोबर नुसरत भरुचा, जॅकलिन फर्नांडिस, सत्यदेव, नासिर, प्रवेश राणा असे कलाकार आहेत.

२. हर हर महादेव

हा एक पिरियड ड्रामा असणार आहे. मराठी योध्यांचा गौरवशाली इतिहास दाखवणारा हा सिनेमा असणार आहे. अर्थात मराठी योद्धे म्हणले की येतात हे छत्रपती शिवाजी महाराज. पावनखिंड युद्ध आणि त्यात बाजीप्रभू देशपांडे यांनी गाजवलेल्या शौर्याची कथा सांगणारा हा सिनेमा असणार आहे. मराठीत तयार झालेला पहिला बहुभाषिक सिनेमा म्हणून या सिनेमाकडे पाहिलं जातय.

यामध्ये अभिनेता सुबोध भावे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे तर बाजीप्रभुंची भूमिका शरद केळकर निभावताना दिसणार आहे.

सिनेमाचा ट्रेलर बघून अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही हेच खरं. याआधी सुद्धा पावखिंडीच्या युद्धाबद्दल अनेकदा वाचनात आलं असेल, त्यावरचे सिनेमे पाहिले असतील किस्से ऐकले असतील पण बांदल, मावळ प्रांत स्वराज्यात कसे आले, बाजीप्रभू आणि शिवाजी महाराज यांची भेट कशी झाली इथपासून ते स्वराज्यासाठी बाजीप्रभूंनी गाजवलेलं शौर्य ही सगळी गोष्ट मोठ्या पडद्यावर बघताना नक्कीच धमाल येणार आहे.

सुबोध भावेंचा कट्यार काळजात घुसली हा सिनेमा सुद्धा काही वर्षांपूर्वी दिवाळीत रिलीज झालेला तसच २०१८ साली आलेला … आणि डॉ. काशिनाथ घाणेकर सुद्धा दिवाळीच्याच दरम्यान प्रेक्षागृहात दाखल झाला होता. या दोन्ही सिनेमांना घवघवीत यश मिळालं त्यामुळे अभिजित देशपांडे यांनी दिगदर्शित केलेल्या या सिनेमाबद्दल बरीच उत्सुकता बघायला मिळतेय.

सुबोध भावे आणि शरद केळकरसह सिनेमात अमृता खानविलकर, सायली संजीव असे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सिनेमा मराठी, हिंदी, कन्नड, तमिळ आणि तेलगू भाषेत रिलीज होणार आहे त्यामुळे महाराष्ट्राबाहेरच्या प्रेक्षकांना सुद्धा त्यांच्या मातृभाषेत महाराजांचा इतिहास बघता येणारे. हा सिनेमा २५ ऑक्टोबरला रिलीज होईल.

३. थँक गॉड

बॉलिवूडमध्ये रामसेतू आणि थँक गॉड या सिनेमाची टक्कर होणार आहे. अर्थातच दिवाळी म्हटल्यावर कलाकारांना आपल्या सिनेमानं जास्त कलेक्शन करून द्यायचं आहे आणि त्याचमुळे अक्षय कुमार आणि अजय देवगणचा यांचे दोन सिनेमे एकाच दिवशी २५ ऑक्टोबरला धडकताना दिसणार आहेत.

थँक गॉडची कथा एकदम वेगळी आणि हटके आहे. आपल्याकडे मृत्यू या गोष्टीला वाईट आणि गंभीर समजलं जातं. तसंच माणूस मेला की त्याच काय होतं हे कोणालाच माहित नाही. आफ्टरलाईफ म्हणजे मृत्यूनंतरच आयुष्य ही संकल्पना खूप वेगळी आहे आणि हीच संकल्पना थँक गॉड सिनेमात विनोदी पद्धतीने दाखवली आहे.

सिनेमात अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा, सीमा पहावा आणि रकुलप्रीत हे कलाकार बघायला मिळणार आहेत. सिनेमाच्याच्या ट्रेलरमध्ये असं वाटतंय की सिद्धार्थ मल्होत्राचा मृत्यू झालाय आणि तो येऊन पोहोचलाय यमलोकात जिथे सुटाबुटात चित्रगुप्त दिसतोय ज्याचं काम आहे माणसाने केलेल्या पाप पुण्याचा हिशोब ठेवणं. हा चित्रगुप्त म्हणजे अजय देवगण. पण कहानी में ट्विस्ट असाय की सिद्धार्थ मल्होत्राचं पात्र ना जिवंत आहे ना धड मेलं आहे मधेच कुठेतरी अडकलंय आणि आता त्याच्या सगळ्या पापांचा पाढा त्याच्यासमोर वाचला जातोय.

काम, क्रोध, भ्रम, मत्सर अशा गोष्टी माणसाला नरकाकडे घेऊन जातात असं म्हटलं जातं.

याचा पुरेपूर प्रयत्य या सिनेमात बघायला मिळणार आहे. ट्रेलरमधला एक डायलॉग प्रचंड गाजतोय, त्यात अजय देवगण असं म्हणतो, ‘तुम भगवान में तो मानते हो मगर भगवान की एक नही मानते’ म्हणजे माणूस देवाला तर मानतो पण देवाचं काहीच ऐकत नाही. या सिनेमात पाप, पुण्य, देव, स्वर्ग नरक अशा संकल्पना एकदम कॉमेडी पद्धतीने दाखवल्या आहेत.

असे जड आणि गूढ विषय हलक्या फुलक्या पद्धतीने दिसले की ते समजायला सोपे जातात आणि विनोद असल्याने भरपूर मनोरंजन होतं त्यामुळे या सिनेमाची कथा प्रेक्षकांना आवडली असल्याचं ट्रेलरला आलेला प्रतिसाद बघून कळू शकतं. तसंच सिनेमात मानिके मके हिथे हे सिंहली भाषेतलं गाणं सुद्धा हिंदीमध्ये दिसणार आहे. मागच्या वर्षी हे गाणं खूप ट्रेंड झालं होतं. या गाण्यावर नोरा फतेही आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची केमिस्ट्री दिसणार आहे.

४. सरदार

सध्या मार्केटमध्ये साऊथ इंडियन सिनेमांची चलती आहे. अचानक हे छोट्या बजेटचे साऊथ सिनेमे कानामागून येऊन तिखट होत असताना साऊथच्या सिनेमांची दखल न घेता ही माहिती पूर्ण होऊ शकत नाही. दिवाळीच्या मुहूर्तावर तामिळ भाषेतला सरदार हा सिनेमा रिलीज होणार आहे. हे एक रहस्याने भरलेला स्पाय सिनेमा आहे ज्याचं दिग्दर्शन पी.एस मिथरन यांनी केलं आहे.

सिनेमामध्ये कार्थी हे विजय प्रकाश नावाच्या पोलिसांची भूमिका साकारत आहेत.

हा विजय प्रसिद्धीसाठी हपापला आहे आणि एका केसचा तपास करताना त्याला भारतीय सैन्याच्या काही टॉप सिक्रेट फाईलबद्दल माहिती मिळते. अजून खोलात शिरल्यावर त्याला सरदार या स्पायबद्दल समजत ज्याचं नेमकं विजय आणि इंडियन आर्मीशी काय कनेक्शन आहे हे सिनेमात बघायला मिळतं. सिनेमा ऍक्शन आणि रहस्याने भरलेला आहे आणि २१ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. सिनेमात कार्थीसह राशी खन्ना, राजिशा विजयन आणि चंकी पांडे सुद्धा दिसणार आहेत.

५. मॉन्स्टर

साऊथ स्टार मोहनलालची मुख्य भूमिका असणारा हा एक क्राईम-थ्रिलर सिनेमा आहे. यामध्ये मोहनलाल हा एक शीख ऑफिसर साकारताना दिसणार आहे. मल्याळम भाषेतला हा सिनेमा असून मोहनलालचं पात्र पंजाबी- शीख पुरुष डोक्यावर घालतात तशी पगडी घालून प्रेक्षांसमोर येणार आहे. सिनेमा २१ ऑक्टोबरला रिलीज झाला असून मोहनलालबरोबर लक्ष्मी मंचू, हनी रोज असे कलाकार सुद्धा दिसणार आहेत.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.