लोकांनी क्रेडिट ललित मोदीला दिलं, पण आयपीएलची आयडिया पियुष पांडेंची होती

आयपीएलच्या एकदम पहिल्या वर्षी लोकांना वाटलेलं २० ओव्हरच्या मॅचेस, आपलेच प्लेअर एकमेकांविरुद्ध खेळणार हे गणित काय पचायचं नाय. पण पहिल्यावर्षी ‘क्रिकेट का कर्मयुद्ध’ म्हणत मार्केटमध्ये आलेली हि स्पर्धा आता पद्धतशीर सुपरहिट झालीये.

नाही म्हणायला आयपीएलमध्ये फिक्सिंगचे आरोप झाले, चिअरलीडर्सचे राडे झाले, पैशांची लफडी तर लय झाली… पण या सगळ्यातही खेळाडूंना मिळणारं व्यासपीठ आणि जबरदस्त मनोरंजनामुळं आयपीएलचा फॅनबेस काय कमी झाला नाही.

आयपीएलचा विषय निघाला की, एका माणसाची आठवण हमखास येते. हा माणूस कोण? तर ललित मोदी.

समस्त तरुणाई ललित मोदीची दोन गोष्टींसाठी आयुष्यभर आभारी आहे. आपण वयात येताना त्यानं आपल्याला फॅशन टीव्ही नावाचा खजिना उघडून दिला आणि आयपीएल सुरू करत क्रिकेट आणि मनोरंजनाचा तडका एकत्र आणला.

आयपीएल ही कुणाच्या डोक्यातली आयड्या आहे? हे कुणालाही विचारलं तर, ललित मोदी हेच उत्तर येईल. पण सत्य परिस्थिती वेगळी आहे.

आयपीएलनं जन्म घेतलेला मेंदू होता पियुष पांडे यांचा.

आता पियुष पांडे कोण? तर जाहिरात क्षेत्रातला सचिन तेंडुलकर. सचिनच्या स्ट्रेट ड्राईव्हमध्ये जशी ताकद होती, अगदी तशीच पांडेंच्या बुद्धीत. दोन्ही गोष्टी लोकांना खिळवून ठेवायच्या. फेविकॉल, डेअरीमिल्कपासून असंख्य जाहिराती या माणसानं बनवल्या आणि एक जमाना गाजवला.

पियुष पांडे आणि जाहिरात हे कनेक्शन तसं बऱ्याच लोकांना माहीत असेल. पण पांडे स्वतः क्रिकेट प्लेअर होते, हे गुपित मात्र स्कोअरबोर्डमध्येच दडून आहे. करिअरच्या नादात क्रिकेटपासून लांब गेल्यानंतर आयपीएल आणि पियुष पांडे हे कनेक्शन कसं जुळलं याची स्टोरी मात्र इंटरेस्टिंग आहे.

पियुष आपल्या गोव्याच्या घरात निवांत कॉफी पित होते. त्यांनी घरासमोरच्या फुटबॉल ग्राऊंडवर क्रिकेट नेट लाऊन एक मुलगा प्रॅक्टिस करत असल्याचं पाहिलं. पियुष त्या मुलाशी जाऊन बोलले. त्यादिवशी त्यांना एक गोष्ट समजली, ”तुम्ही कितीही छोटे असलात, तरी आपल्या भारतात क्रिकेट खेळण्याचं स्वप्न हे सगळ्यात मोठं असतं. कित्येकदा तेच एकमेव स्वप्न असतं.”

पियुष यांनी आपली कल्पना अरुण लाल आणि अमृत माथूर या आपल्या मित्रांना सांगितली. मग हि तिकडी मिळून वॉल्ट डिस्ने पिक्चर्ससोबत काम करणाऱ्या ‘मोदी एन्टरटेन्मेंट नेटवर्क्स’चे सर्वेसर्वा ललित मोदी यांना सांगितली.

मोदी यांचा मेंदू व्यवसायात सुपरफास्ट पळायचा. फॅशन टीव्हीनं हे दाखवून दिलं होतंच. आता त्या पलीकडे जात मोदींनी क्रिकेटमधलं मार्केट मारायचं ठरवलं. त्यांनी पियुष पांडे, अरुण लाल आणि अमृत माथूर यांच्या मदतीनं १९९६ मध्ये ‘इंटरसिटी ५० ओव्हर्स कप’ची कल्पना बीसीसीआयसमोर मांडली. यात पण लोकल प्लेअर्स, भारतीय स्टार्स आणि परदेशी खेळाडू यांचा समावेश होता.

पण बीसीसीआयनं हि कन्सेप्ट फार किरकोळीत घेतली आणि १९९६ मध्येच क्रिकेटचं मार्केट बदलता बदलता राहिलं.

पण हा अपमान मात्र ललित मोदींच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. त्यांनी ठरवलं, सिस्टीम बदलायची, तर सिस्टीमचा भाग व्हायला पाहिजे. हिमाचल क्रिकेट असोसिएशनमध्ये एंट्री मारत त्यांनी नवी दुनियादारी करायला घेतली. पुढं त्यांनी राजस्थान क्रिकेटमध्ये आपलं साम्राज्य तयार करत आपल्या शब्दांना आणि कल्पनांना वजन मिळवलं.

साल होतं २००७, झी ग्रुपनं इंडियन क्रिकेट लीग मार्केटमध्ये आणली. त्यांच्याकडेही फेमस प्लेअर होते, फॉरमॅट पण बऱ्यापैकी आयपीएलसारखाच होता. पण आयसीएल यशस्वी काय झाली नाही.

पुढच्याच वर्षी क्रिकेटच्या मार्केटमधले (तत्कालीन) बिग बुल अर्थात ललित मोदी यांनी आयपीएलचं पिल्लू सोडलं. जाहिरातींचे हक्क, टीमचे हक्क, कपड्यांवर जाहिरात लावायचे हक्क अशा सगळ्या गोष्टी लई पैशांमध्ये विकल्या गेल्या. हक्क सोडा, मोठमोठे क्रिकेटर्सही कोटींमध्ये विकले गेले.

चिअरलीडर्स, बॉलिवूडचा राडा आणि तडकतं फडकतं क्रिकेट, यामुळं लोकांनी आयपीएलला डोक्यावर उचलून घेतलं.

मात्र दुसऱ्या बाजूला लोकं आणि माध्यमं म्हणत होती, की ललित मोदींनी आयसीएलची आयडिया ढापली आणि त्यांना बॅन करुन स्वतःची लीग सुरू केली. पण ललित मोदींनी स्वतःच सांगितलं, ‘आयपीएलची आयडिया आणि आयसीएलचा काही एक संबंध नाही. आमच्या डोक्यात ही आयडिया फार आधीपासून होती.

लोकं मला श्रेय देत असली, तरी ही कन्सेप्ट लिहून ठेवलेली पियुष पांडे, अरुण लाल आणि अमृत थापर यांनी.’

पियुष पांडे आणि त्यांची ऑगिल्व्ही कंपनी फक्त आयडिया देण्यावरच थांबली नाही. तर फक्त ४८ तासांच्या वेळात त्यांनी ‘क्रिकेट का कर्मयुध्द’ ही आयपीएलच्या पहिल्या सिझनची जाहिरात बनवली. मुंबई इंडियन्स, डेक्कन चार्जर्स आणि राजस्थान रॉयल्ससाठीही काम केलं.

पांडेंनी आपल्याला कित्येक वर्ष टीव्हीसमोर खिळवून ठेवलं, आधी फेव्हिकॉलच्या जाहिरातीमुळं आणि नंतर आयपीएलमुळं.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.