महेशबाबूनं बॉलिवूडला फाट्यावर मारण्याची ही पहिलीच वेळ नाहीये
आम्ही थिएटरला केजीएफ टू बघत होतो, बघता बघता रॉकीनं नेपोटीझमवर डायलॉग हाणला आणि सगळं थिएटर हसायला लागलं. नेपोटीझम म्हणल्यावर लोकांना आठवतं बॉलिवूड, त्यात सध्या बॉलिवूड विरुद्ध साऊथ फिल्म इंडस्ट्री अशी काटे की टक्कर सुरू आहे. आधी फक्त डब झालेले किंवा रिमेक झालेले दाक्षिणात्य सिनेमच बॉलिवूडचं मार्केट खात होते, पण आता बाहुबली, केजीएफ, आरआरआर, पुष्पानं बॉलिवूडचा सपशेल बाजार उठवलाय.
बॉलिवूडचा पिक्चर आठवड्यात कमवत नाही, तेवढी कमाई टॉलिवूडवाले दिवसात करतायत आणि पार महाराष्ट्रातही मार्केट खातायत.
हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत येण्यासाठी कारण ठरलंय, अभिनेता महेशबाबूचं एक वक्तव्य. एका कार्यक्रमात बोलताना तो म्हणाला, “मला बॉलिवूडमधून भरपूर ऑफर्स येतात, पण मला वाटत नाही की त्यांना मी परवडेल. ज्या इंडस्ट्रीला मी परवडणारच नाही, तिथं काम करुन माझा वेळ का वाया घालवू. मला इथं मिळणारं स्टारडम आणि आदर प्रचंड आहे, त्यामुळं मी टॉलिवूड सोडण्याचा कधी विचारही केला नाही.”
आता आकडेवारी बघितली, तर माध्यमांमध्ये असलेल्या वृत्तांनुसार महेशबाबू एका पिक्चरसाठी साधारण ७० कोटी रुपये घेतो. अक्षय कुमार, शाहरुख, सलमान हे बॉलिवूड अभिनेतेही जवळपास तेवढेच पैसे घेतात.
पण तरीही महेशबाबू बॉलिवूडच्या फ्रेममध्ये बसत नाही, याचं कारण म्हणजे त्याचं वागणं, राहणं आणि काम करणं.
गेल्या महिन्यात बोलताना महेशबाबू म्हणाला होता, ”मी तेलूगू पिक्चरमध्ये काम केलं की तो पिक्चर जगभरात पाहिला जातो. त्यामुळं मला इतर कुठल्या इंडस्ट्रीमध्ये विशेषतः बॉलिवूडमध्ये काम करण्याची अजिबातच गरज नाही.”
इतकंच नाही, तर २०२० मध्ये झालेल्या एका मुलाखतीत महेशबाबू म्हणाला होता, “मला बॉलिवूडच्या रॅट रेसमध्ये येण्याची अजिबात इच्छा नाहीये. मला तेलुगू पिक्चरचा प्रिन्स म्हणून ओळखलं जातं, ते सोडून मी बॉलिवूडमध्ये फिल्म्सची भीक का मागावी?” थोडक्यात महेशबाबूनं बॉलिवूडला फाट्यावर मारण्याची ही पहिलीच वेळ नाहीये.
महेशबाबूनं आपले वडील सुप्रसिद्ध अभिनेते कृष्णा यांच्या पावलावर पाऊल ठेवत वयाच्या चौथ्या वर्षीच चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं. तो मूळचा तेलुगू असला तरी शिक्षण तमिळनाडूमध्ये आणि त्यातही कॉन्व्हेंटमध्ये झाल्यानं त्याला तेलुगू लिहिता, वाचता येत नव्हतं. जेव्हा पिक्चरमध्ये डबिंगची वेळ यायची तेव्हा तो डायरेक्टरकडून डायलॉग ऐकून मग डब करायचा.
त्यानं तेलुगू शिकली, अभिनयात राडा केला आणि टॉलिवूड हिरोंची अँग्री यंग मॅन इमेज भेदत ‘हँडसम हंक’ म्हणून ओळख कमावली.
त्याचा हिरो म्हणून पहिला पिक्चर आला, राजा मुदरु. या पिक्चरमुळे महेशबाबूची हवाही झाली आणि त्याला टोपणनाव मिळालं ‘प्रिन्स.’ एखाद्या युवराजाप्रमाणं टॉलिवूडचे चाहते त्याला आजही मानतात.
मराठमोळ्या नम्रता शिरोडकरशी लग्न केल्यानंतर तो महाराष्ट्राचा जावई झाला. सुपरफास्ट सुरू असणारं महेशबाबूचं करिअर बॅडपॅचमध्ये अडकलेलं, २००६ मध्ये त्यानं कमबॅक केलं ते ‘पोकिरी’मधून. पोकिरी बॉक्स ऑफिसवर इतका गाजला, की त्याचे तमिळ आणि हिंदीत रिमेकही झाले.
पोकिरीमुळं फक्त महेशबाबूचीच गाडी रुळावर आली असं नाही, तर सलमान खानच्या गटांगळ्या खाणाऱ्या करिअरला पोकिरीचाच आधार मिळाला.
पोकिरीच्या हिंदी रिमेकमध्ये म्हणजेच वॉन्टेडमध्ये सलमाननं राधेचं काम केलं आणि सलमानचं करिअर वाचलं. बॉलिवूडच्या सुपरस्टारला टॉलिवूडच्या सुपरस्टारच्या पिक्चरनं हात दिला.
महेशबाबू बॉलिवूडच्या फ्रेममध्ये का बसत नाही, याची कारणं बघुयात.
महेशबाबूला कधीही पाहा, त्याचे कपडे झकपक नसतात. त्याच्या वागण्यात माज नसतो, आजच्या घडीला रजनीकांत, प्रभास यांच्या लेव्हलची कमाई आणि स्टारडम असूनही महेशबाबू साधाच राहतो.
त्याच्या कमाईतला जवळपास ३० टक्के भाग चॅरिटीला जातो. लहान मुलांच्या उपचारांसाठी आर्थिक मदत करणाऱ्या हील अ चाईल्ड संस्थेचा तो ब्रँड अँबॅसिडर आहे. सोबतच त्यानं याचवर्षी हृदयरोगाशी लढणाऱ्या लहान मुलांना आर्थिक मदत करण्यासाठी प्युअर लिटिल हार्ट्स फाऊंडेशनची स्थापना केली.
२०१४ मध्ये चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या गावांसाठी त्यानं २५ लाखांची मदत केली होती. तर आपल्या वडिलांचं मूळ गाव असलेलं बुर्रीपालेम त्यानं दत्तक घेतलं आहे. आतापर्यंत त्यानं १०१० जणांच्या हार्ट सर्जरीसाठी आर्थिक मदतही केली आहे.
खरंतर महेशबाबू सारख्या मोठ्या सुपरस्टारला एका बॉलिवूड पिक्चरसाठी कुणीही ७०-८० कोटी देईल. त्यानं जास्त पैसे मागितले, तर ते सुद्धा मिळतील. पण तरीही महेशबाबू आपली तेलुगू पिक्चरशी जोडलेली नाळ तोडायला तयार नाहीये. त्याच्यासाठी त्याची मातृभाषा, त्याचे तेलुगू चाहते आणि दर्जा राखून असलेली तेलुगू फिल्म इंडस्ट्री जास्त प्रिय आहे.
आपल्या पिक्चरचा रिमेक सलमानसारख्या सुपरस्टारचं करिअर वाचवू शकतो, तर आपण काय कमाल करू शकू… हे माहित असूनही महेशबाबू बॉलिवूडच्या नादी लागला नाही, अगदी २०१२ पासून त्यानं बॉलिवूडमध्ये काम करावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत… पण टॉलिवूडच्या प्रिन्सला इकडच्या गर्दीत आणणं कुणालाच जमलं नाही.
तिकडे महेशबाबू मात्र, आपला महर्षीमधला डब झालेला डायलॉग म्हणत थाटात उभाय. तो डायलॉग कुठला? तर… “जो पाना चाहते हो, उसके लिए डटे रहो….जीत खुद ब खुद तुम्हारे पैरो मे आकार गिरेगी.”
हे ही वाच भिडू:
- सध्या जगात गाजणाऱ्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा पाया आपल्या कोल्हापुरातून रचला गेलाय…
- 1989 साली दिल्लीत “साऊथ फिल्मचा अपमान केलेला” आज सिद्ध झालय तेच बाप आहेत
- टॉलिवूडचं सगळं मार्केट या दोन फॅमिलीच्या बापजाद्यांचं आहे…