एखाद-दुसरा सिन किंवा गाणं नाही, तर पाकिस्ताननं भारतातला अख्खा सिनेमाच चोरला होता
सिनेमाच्या जगतात दुसऱ्याची कॉपी करणे हा फार मोठा आजार आहे. कारण कॉपी करताना बरेच जण आम्ही फक्त इन्स्पिरेशन घेतले असं सांगून आपली सुटका करण्याचा प्रयत्न करत असतात. विशेषत: ज्या वेळेला गाण्याच्या ट्यूनची कॉपी होते त्यावेळेला त्याला इन्स्पिरेशन म्हणण्याचा प्रकार सर्रास घडतो. हा कॉपीचा प्रकार देशांतर्गत होतोच म्हणजे प्रादेशिक चित्रपटातील संगीत हे दुसऱ्या भाषेत ज्यावेळी निराळी निर्मिती होते त्यावेळेला वापरली जाते.
अनेक बंगाली गाणी हिंदी मध्ये आलेली आहेत किंवा काही वेळा उलट देखील झालेलं आहे. ज्या वेळेला एखादा संगीतकार दोन-तीन भाषांमध्ये संगीत देत असतो त्या वेळेला तो आपलीच लोकप्रिय ट्यून दुसऱ्या भाषेत देखील तशीच वापरत असतो. अशी अनेक उदाहरणे आहेत.
आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील असे ढापाढापी चोरीचे प्रकार खूप होतात.
पाश्चात्य संकल्पना, पाश्चात्त्य संगीत हे आपल्याकडे अगदी जुन्या काळापासून वापरले जाते. बॉलीवूडच्या थीम, ट्यून देखील इतर देशातील संगीतामध्ये जशाला तशा वापरल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे हा प्रकार काही नवा नाही.
पण पाकिस्तानने आपला एक अख्खा सिनेमा जशाला तसा ढापला होता आणि काही जुजबी बदल करून तो पाकिस्तान मध्ये प्रदर्शित केला होता हे तुम्हाला माहित आहे कां? शंभर टक्के जसाचे तसा असा हा कॉपी असलेला सिनेमा होता. हे कॉपी प्रकरण पुढे खूप गाजलं. त्याचीच ही इंटरेस्टिंग स्टोरी!
सुरुवातीला आपण ज्या सिनेमावरून पाकिस्तान मध्ये एवढा गदारोळ झाला तो ओरिजनल हिंदी सिनेमा कोणता होता आणि काय होता त्याबद्दल थोडीशी माहिती घेऊत.
फिल्मीस्तान या संस्थेने १९५४ साली ‘जागृती’ नावाचा एक चित्रपट बनवला होता.
या सिनेमाचे दिग्दर्शन सत्येन बोस यांचे होते तर चित्रपटाला संगीत हेमंत कुमार यांचे होते. यातील गाणी कवी प्रदीप यांनी लिहिली होती. अतिशय देशभक्तीपर भावना जागृत करणारा हा चित्रपट होता. यातील गाणी त्या काळात प्रचंड गाजली. सिनेमा देखील सुपरहिट ठरला. या चित्रपटात अभी भट्टाचार्य, बिपिन गुप्ता, रतन कुमार, राजकुमार गुप्ता यांच्या भूमिका होत्या.
देशाला स्वातंत्र्य म्हणून पाच-सात वर्षे झाली होती देशात सर्वत्र देशप्रेमाची भावना नांदत होती. पंडित जवाहरलाल नेहरू सारखा द्रष्टा रसिक पंतप्रधान देशाला लाभला होता. मिळालेलं स्वातंत्र्य चिरायू व्हावं या साठी यावेळी एकात्मतेची देश भावना टिकवण्यासाठी या चित्रपटाची निर्मिती केली होती.
या चित्रपटात ‘दे दी हमे आजादी बिना खडग बिना ढाल साबरमती के संत तुने कर दिया कमाल’,’ हम लाये है तुफान से किश्ती निकाल के इस देश को रखना मेरे बच्चे संभालके’,’ आओ बच्चो तुम्हे दिखाये झाकी हिंदुस्तान की इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की वंदे मातरम ‘ ही देशभक्तीपर गाणी या चित्रपटात होती.
संपूर्ण चित्रपट देशभक्तीने व्यापलेला होता. या सिनेमाला फिल्मफेअर चे सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पारितोषिक मिळाले. तसेच या सिनेमाल सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. आज देखील हा सिनेमा आणि या सिनेमातील गाणी प्रचंड लोकप्रिय आहे. भारतीय स्वातंत्र्याला ७० वर्षे पूर्ण झाले त्या वेळेला १५ ऑगस्ट २०१६ रोजी हा चित्रपट पुन्हा एकदा सर्वत्र दाखवण्यात आला होता. इथपर्यंत सर्व ठीक आहे.
आता बघूयात याच सिनेमाची कॉपी करून पाकिस्तानने १९५६ साली ‘बेदारी’ नावाचा एक चित्रपट बनवला!
‘जागृती’ या सिनेमात काम केलेला बालकलाकार रतनकुमार याचं खरं नाव सय्यद नजीर अली असे होते. हा रतन कुमार ‘जागृती’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्या कुटुंबासहित पाकिस्तानात निघून गेला. तिकडे गेल्यानंतर त्याच्या कुटुंबाने रतन कुमार यांच्या भारतात गाजलेल्या ‘जागृती’ या सिनेमाचा रिमेक करायचे ठरवले. पाकिस्तानात रिमेक करताना त्यांनी शब्दशः हा चित्रपट उर्दूमध्ये अनुवादित केला.
फक्त गाणी बदलताना महात्मा गांधीच्या जागी मोहम्मद अली जिना आणि हिंदुस्तान /भारत याच्या जागी ‘पाकिस्तान’ असे शब्द टाकले.
हिंदी सिनेमातील गाण्याच्या मूळ चाली जशाला तशाच ठेवल्या. आता यांनी काय बदल केले ते पहा. आपल्याकडे ‘दे दी हमे आजादी बिना खडग बिना ढाल साबरमती के संत तुने कर दिया कमाल’ हे गाणं होतं. ‘बेदारी’ या पाकिस्तानी सिनेमा या गाण्यात बदल त्यांनी असे केले’ यू दी हमे आजादी की दुनिया हुई हैरान ऐ कायदे आजम तेरा एहसान तेरा अहसान…’ ‘जागृती’ मध्ये या गाण्याच्या वेळेला भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील महात्मा गांधी यांची काही दृश्य दाखवली होती. तर तिकडे ‘बेदारी’ चित्रपटात मोहम्मद अली जिना यांचा फोटो आणि त्यांचे काही दृश्य दाखवले.
गाण्याची चाल सारखीच होती.
आपल्याकडे हे गाणे आशा भोसले यांनी गायले होते तिकडे हे गाणे मुनव्वर सुलताना हिने गायले! ‘जागृती’ सिनेमातील ‘हम लाये है तुफान से किश्ती निकाल के इस देश को रखना मेरे बच्चो संभाल के..’ या गाण्यात त्यांनी फक्त देश च्या जागी ‘मुल्क’ हा शब्द टाकून गाणं जशाला तसेच ठेवलं. आपल्या सोयीनुसार कडव्यामधील शब्द ते बदलत गेले.
सगळ्यात कहर केला ते ‘आओ बच्चो तुम्हे दिखाये झाकी हिन्दुस्थान की…’ या गाण्यात! ‘बेदारी’ या चित्रपटातील गाण्यात बदल करताना त्यांनी ‘आओ बच्चो तुम्हे सैर कराये पाकिस्तान की जिसके खातिर हमने कुर्बानी दी लाखो जान की पाकिस्तान जिंदाबाद पाकिस्तान जिंदाबाद…’ सगळाच चोरीचा मामला होता.
ओरिजनल असं तिथे काहीच नव्हतं. हा चित्रपट पाकिस्तानात १९५६ साली प्रदर्शित झाला. सुरुवातीला या सिनेमावर प्रचंड गर्दी झाली. पण हळूहळू तेथील पत्रकारांमध्ये राजकारण्यामध्ये याची चर्चा सुरू झाली आणि हा सिनेमा कम्प्लीट कॉपी केलेला सिनेमा आहे हे त्यांच्या लक्षात आलं.
त्यांनी तशी रीतसर तक्रार पाकिस्तान सरकारकडे केली आणि पाकिस्तान सिनेमा सेंसर बोर्डाने ‘बेदारी’ या सिनेमावर बंदी आणली! ‘बेदारी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन रफिक रिजवी यांनी केले होते तर या सिनेमाला संगीत (कसलं डोंबलाचं संगीत? सगळं कॉपी होतं!) फतेह अली खान यांनी दिले होते.
पाकिस्तान मध्ये या ‘बेदारी’ सिनेमावर बंदी घातल्याने त्यातली गाणी तिकडच्या रेडीओ, टीव्ही वर पण दाखवली जात नव्हती.
१९९० साली तिकडे पण रिमिक्स ची लाट आली. कुणीतरी यातील गाण्याचे रिमिक्स करून पुन्हा माध्यमात आणले पण सय्यद जी बी शाह बुखारी जे पाकिस्तान फेडरल फिल्म बोर्ड ऑफ सेन्सॉर चे माजी सदस्य होते त्यांनी पुन्हा कोर्टात धाव घेतली आणि या रिमिक्स वर बंदी घातली. तरी ही अजूनही पाकिस्तानातील निम शहरी आणि ग्रामीण भागात चोरी छुपे हि गाणी वाजवली जातातच! कारण गुगल वर यु ट्यूब वर हि गाणी सहज उपलब्ध आहेत..
– भिडू धनंजय कुलकर्णी
हे ही वाच भिडू
- पाकिस्तानला शिव्या देणारी कंगना आपला सिनेमा तिथून काढत नव्हती…
- २ भारतीय सैनिकांच्या भीतीमुळे पाकिस्तानी सैनिक रणगाड्यांना आग लावून पळाले होते
- सिंधू पाकिस्तानची लाइफलाइन आहे, तरी भारत पाणी अडवून धरत नाही कारण…