स्टीकफास्टचं व्यसन पार आपल्या नांदेड पर्यन्त पोहचलय…
अंमली पदार्थांचे व्यसन हे एक मोठी जागतिक समस्या होऊन बसलीये जी तरुणांमध्ये सातत्याने वाढतेय.
व्यसनांच्या प्रकारात तंबाखू, सिगारेट, दारू, ड्रग्ज यांसारख्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील मात्र तुम्ही कधी हे ऐकलं नसेल की, ‘स्टिकफास्ट’ ची देखील नशा केली जाते.
हो असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे तो मराठवाड्यातील नांदेड शहरात. नांदेडशिवाय हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार गावच्या शाळेतले लहान विद्यार्थी या प्रकारची नशा करतांना आढळून आले.
जेंव्हा जिल्हा पोलिसांनी नांदेड परिसरातील नशेखोरीच्या बाबतीतचा मागोवा घेतला जात होता. तेंव्हा नांदेडच्या बाजारातून स्टीकफास्टची मागणी वाढल्याचं समजलं. त्यामुळे त्याची छुप्याने विक्री होत होती.
असं पहिल्यांदाच ऐकायला मिळालं की, स्टीकफास्टद्वारे देखील नशा होऊ शकते.
पण या गरीब मुलांना नशा करणं कसं काय परवडते ?
आजच्या दुनियेत रेल्वे प्लॅटफॉर्मपासून ते फुटपाथवर राहणारी मुलेही ड्रग्जच्या आहारी गेली आहेत. आपल्यापैकी अनेकांना असे वाटते की अशी गरीब मुले ज्यांना एकवेळेच्या जेवणाची भ्रांत असते ती मुलं ड्रग्ज कसे मिळवतात ?
एक तर तुमचा मोठा गैरसमज आहे की, नशा करण्यासाठी फक्त ड्रग्सच लागतात…नशा करायचे तसे अनेक स्वस्त स्वस्त प्रकार उपलब्ध आहेत.
या प्रकारात जे स्टिफफास्टचा वापर करण्यात आला ते जनरल स्टोर मध्ये १० रुपयांना मिळते. पण अचानक बाजारात त्याची मागणी वाढतच चालली आणि १० रुपयांना मिळणारं स्टीकफास्ट ४० रुपयांपर्यंत जास्त किमतीने विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
कदाचित तुमच्या कानावर आलंही असेल की काही नशेबाज लोकं सुलोचन म्हणजेच गाडीच्या चाकाला वापरलं जाणारं सोल्युशनद्वारे देखील नशा करतात.
नेलपॉलिश, पेट्रोल इत्यादी पदार्थांचे सेवन करून, ब्रेडसोबत विक्स, झंडू बाम असे पदार्थ खाऊन युवक स्वतः व्यसनाधीन होत आहेत.
तर काही जण व्हाईटनरचा नशा करतात.
व्यसनाधीन व्यक्ती आपली गरज पूर्ण करण्यासाठी कोणतीही मर्यादा पार करतात. पण यामुळे तरुण वयात येण्याआधीच लहान मुलं नशेमुळे जीवघेण्या आजारांच्या विळख्यात सापडत आहेत.
शाळकरी मुलांमध्ये व्यसनाधीनतेचा वाढता कल पाहता व्हाइटनरवर बंदी आणली गेली होती. मात्र व्यसनी लोकांनी आणखी त्यावर उपाय शोधले.
आजही निर्जन ठिकाणी शाळकरी मुले सोल्युशन, नेलपॉलिश, बूट पॉलिशचा वास घेऊन नशा करतांना दिसतात. केमिस्टच्या दुकानात वैद्यकीय सल्ल्याशिवाय विकल्या जाणार्या आयोडेक्स, मूव्ह आणि अल्कोहोलिक सिरप आणि झोपेच्या गोळ्यांचाही नशा म्हणून मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.
पण याच गोष्टी नशेसाठी का वापरल्या जातात ?
थोडक्यात उत्तर द्यायचं तर सोल्युशन, नेल पॉलिश, बूट पॉलिश या सर्व गोष्टी बाजारात सहज उपलब्ध होतात आणि त्या परवडणाऱ्या असतात.
बूट पॉलिशमध्ये एसीटोन असते. त्याचा वास आल्यावर व्यक्तीला नशा येते. यामुळे हळूहळू झोप येते आणि हृदयाची गती मंदावते. त्याचा प्रभाव थोडाफार अल्कोहोलसारखाच असतो.पण या गोष्टींचं सेवन जास्त प्रमाणात घेतल्यास मृत्यूचाही धोका असतो.
याबद्दल डॉक्टर काय सांगतात ?
इंडियन मेडिकल असोशिएशन ऑफ महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे सांगतात,
कुठल्याही नशा करणे ही प्रवृत्ती आहे. तसेच, मानसिक आणि शारीरिक आजार आहे. ज्या पदार्थाची तुम्ही नशा करता त्यातील विषारी पदार्थ असतात त्यातून मेंदूला एक प्रकारची उत्तेजना मिळते. डोकं हलकं होतं, मजा येते. हा अनुभव पुन्हा पुन्हा घ्यावासा वाटणे म्हणजेच व्यसन.
लहान मुलांमध्ये व्यसन लागणे हे अत्यंत घटक आहे कारण एकदा का त्यांच्या मेंदूवर एकदा का इजा झाली कि ती कायमस्वरूपी राहते.
आता याचे दुष्परिणाम म्हणजे,
“ताणतणाव वाढतो, नैराश्य येतं, वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक आजारही होतात. व्यसन अती झालं की, आत्महत्येची प्रवृत्ती येते. त्यामुळे हे गंभीर आहे.
स्टीफफास्टची नशा ही शरीरासाठी गांजा आणि दारूच्या नशेपेक्षा घातक आहे.
१५ वर्षांपूर्वी एक प्रकार उघडकीस आला होता,
“खोकल्याची जी औषधं होती त्यातच कोडीन नावाचं औषध होतं. ते घेतलं की, खोकला कमी व्हायचा पण त्याची नशा यायची आणि त्याचं व्यसन लागायचं. तेंव्हा असं आढळलं की, सार्वजनिक मुताऱ्यांमध्ये कितीतरी या औषधाच्या बाटल्या पडलेल्या मिळायच्या. बरं फक्त हे ठराविक एका भागातच आढळत नव्हतं तर संपूर्ण भारतातच हे चित्र होतं. अनेक दुकानदारांनी देखील सांगितलेलं की, कोडीन नावाच्या औषधाची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे.
मग अन्न आणि औषध प्रशासनाने त्या औषधांच्या कंपन्यांना ठराविक तो घटक काढून टाकायला लावला. डिस्क्रिप्शन शिवाय औषधं देऊ नये हा कायदा कडक केला.
आता स्टिकफास्ट, फेव्हिकॉल सारख्या गोष्टी वापरात येणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे या प्रॉडक्टमध्ये नशा येणारे घटक नसावेत, ते बनत्या शिवाय ते बनवलं जाणं गरजेचं आहे. त्यानुसार शासनाने उपाययोजना केली पाहिजे असं देखील डॉ. भोंडवे यांनी सांगितलं.
बोल भिडूच्या मुलाखतीत व्यसनमुक्ती केंद्र मुक्तांगणच्या संचालिका डॉ. मुक्ता पुणतांबेकर सांगतात की,
“ड्रग्जच्या सेवनात फक्त सेलिब्रिटिजची मुलं असतात का तर नाही. व्यसन हे अगदी गावखेड्यापर्यंत पोहचलं. अगोदर व्यसनी रुग्ण जी असायची ती तिशी जवळची असायची. पण आता झपाट्याने याचं प्रमाण १५ वयोवर्षांमध्ये आढळत चाललं आहे.
आपल्याकडे तंबाकूचं सर्वात मोठं व्यसन आहे जे मोठ्या प्रमाणात आढळून येतं. लोकांना ते साधारण, किरकोळ वाटत असेल मात्र तंबाकू हे सर्वात घातक आहे. त्या खालोखाल दारू आणि वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्स. कॉमन ड्रग्स म्हणजे ज्याचा औषधं म्हणून वापर केला जातो त्यात झोपेच्या गोळ्या असतील, अँटी डिप्रेशनच्या गोळ्या असतील, खोकल्याची औषधं असतात याचाही लोकं व्यसनासाठी उपयोग करतात.
आपल्याकडे १९८० च्या दरम्यान जेंव्हा ड्रग्सचं प्रमाण खूप वाढायला लागलं. तेंव्हा हेरॉईन आलं म्हणजेच ब्राऊन शुगर म्हणलं जातं ते. एलएसडी, कोकेन, फेड्रॉन इत्यादी. गांजाचं व्यसन खूप मोठ्या प्रमाणात वाढतंय. याशिवाय वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं आपल्या देशात आढळतात. व्यसनाधीन झालेल्या लोकांना कोणत्या उपचारांची गरज असून, त्यातल्या त्यात शाळकरी मुलांना अशा व्यसनांपासुन लांब ठेवण्यात पालकांची भूमिका महत्वाची ठरते असंही डॉ. मुक्ता पुणतांबेकर सांगतात.
डॉक्टर्स सांगतात त्याप्रमाणे कुठल्याही प्रकारची नशा करणे ही प्रवृत्ती आहे. तसेच, मानसिक आणि शारीरिक आजार आहे ज्यावर कंट्रोल आणणं आजच्या काळाची गरज आहे.
हे ही वाच भिडू :
- अशोक सोलोमनने केलेले ड्रग्स कांड भारतातच नाही तर अमेरिकेतही चर्चेचा विषय आहेत….
- ड्रग्सची तस्करी सोडा, आता भारताच्या सीमेवरून कफ सिरपचीही तस्करी सुरूय!
- आठवले नवीन कायदा करणार आहेत, ड्रग्स घेणाऱ्याला आता जेल होणार नाही.