फक्त पिक्चरच नाही, तर राजकारणातही राजेश खन्ना बाप ठरला होता…

बॉलिवूड आणि पॉलिटिक्स यांचा एक वेगळाच ताळमेळ आहे. म्हणजे अनेक बॉलिवूड स्टार्स आज आपल्याला निवडणुकच्या रिंगणात उतरलेले पाहायला मिळतील. पक्षही त्यांच्या फेममुळे त्यांना आपल्या पक्षात घ्यायला एका पायावर उभे असतात. पण बऱ्याचदा बॉलिवूडचा फेम राजकारणात टिकत नाही, अशी अनेक उदाहरण आपल्याकडे आहेत. पण काही स्टार्स नेतेही मैदान मारतात.

असेच दोन अभिनेते म्हणजे राजेश खन्ना आणि शत्रुघ्न सिन्हा ज्यांनी बॉलिवूडचं मैदान तर मारलचं  सोबतच राजकारणात सुद्धा आपला जम बसवला. आता राजेश खन्ना तर आपल्यात नाहीत पण त्यांच्या राजकारणातला किस्सा आजही चर्चित आहे. ज्यामुळे खन्ना आणि सिन्हा यांच्यातली मैत्री पणाला लागली होती.  

१९९२ चं ते सालं. चित्रपटातून अफाट फेम मिळवलेले राजेश खन्ना राजकारणात उतरले होते. काँग्रेस पक्षानं सुद्धा त्यांना लगेच उचललं आणि नवी दिल्लीतून उमेदवारी दिली. आता काँग्रेसने एवढा मोठा चेहरा उभा केलाय म्हंटल्यावर भाजपला हात पाय हलवणं भाग होत. आता एवढ्या लोकप्रिय चेहऱ्याच्या विरोधात आपल्याला सुद्धा कोणी मोठा चेहराचं पाहिजे.

या अर्थानं भाजपनं राजेश खन्ना यांच्या विरोधात उभे केले बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा. शत्रुघ्न सिन्हा जरी राजेश खन्ना यांच्यासारखे चॉकलेट बॉय नव्हते पण व्हिलनमध्ये ते सगळ्यांचेच बाप होते. म्हणजे कोणा व्हिलनला एवढी लोकप्रियता क्वचितचं मिळाली असेल.

आपल्या बॉलिवूड इंडस्ट्रीत राजेश खन्ना आणि शत्रुघ्न सिन्हा हे दोघेही चांगलेच प्रसिद्ध होते, पण त्याहून जास्त त्यांच्यातली मैत्री सुद्धा तितकीच घट्ट होती. पण या निवडणुकीमुळे परिस्थिती बदलली आणि यांच्यात चुरस निर्माण झाली. याचा खुलासा स्वतः शत्रुघ्न सिन्हा यांनी केलाय.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत शत्रुघ्नसिन्हा यांनी सांगितलं कि, “जेव्हा मी निवडणुकीत राजेशच्या विरोधात उभा राहिलो तेव्हा त्यांना या गोष्टीचे खूप वाईट वाटले होते.”

शत्रुघ्न सिन्हा पुढे म्हणाले, “खरं सांगायचं तर मला ती निवडणूक लढवायची नव्हती, पण मी लालकृष्ण अडवाणीजींना ते पटवून देऊ शकलो नाही. मी राजेशलाही हे समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याला ही गोष्ट अजिबात आवडली नाही.”

अखेर उमेदवारी फायनल झाली आणि दोघेही एकमेकांच्या विरोधात उभे राहिले. सरकारांवर आरोप करता करता दोघे एकमेकांवर आरोप करायला लागले. राजकारणाचं मैदान मारण्याच्या नादात ते बहुधा आपली इतक्या वर्षांची मैत्री सुद्धा विसरले होते. त्यावेळेस संपूर्ण भारताचं लक्ष या दोघांकडे लागून होतं.

प्रचाराच्या धामधुमीनंतर मतदान झालं आणि निकालाचा दिवस उजाडला. कोण जिंकेल याचा कोणालाच अंदाज बांधता येत नव्हता.  पण अखेर बाजी मारली ती राजेश खन्ना यांनी. राजेश खन्ना यांनी शत्रुघ्न सिन्हा यांचा सुमारे २५ हजार मतांनी पराभव केला.

राजेश खन्ना यांनी निवडणूक जिंकली खरी पण आपल्या मैत्रीत यामुळे फूट पडली याच दुःखही त्यांना वाटू लागलं. राजेश खन्ना यांनी त्यांच्या मुलाखतीत सांगितलं होत कि, १९९२ ते १९९६ पर्यंत खासदार राहिल्यानंतर पक्षाने त्यांना पुन्हा निवडणूक लढवायला सांगितलं होत. पण त्यांना आता लोकसभेऐवजी राज्यसभेत जायचे होते. मात्र पक्षाने त्यांची मागणी पूर्ण केली नाही.

राजेश खन्ना कित्येक वर्षे काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक होते, पण २०१२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पक्षाने राजेश खन्ना यांना विचारलं सुद्धा नाही. यामुळे राजेश खन्ना यांना सुद्धा धक्का बसला होता.

या निवडणुकी दरम्यान आणि त्या नंतर सुद्धा बरेच दिवस दोघेही एकमेकांशी बोलले नव्हते. पण, काही वर्षांनी त्यांच्यात पुन्हा मैत्री झाली.शत्रुघ्न सिन्हा सांगतात, जेव्हा राजेश हॉस्पिटलमध्ये होता तेव्हा मला त्याची माफी मागायची होती, त्याला मिठी मारायची होती. पण मी ते करू शकण्यापूर्वीच तो निघून गेला.”

हे ही वाचं  भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.