संभाजीराजेच नाही तर खैरे, गितेंचा पण गेम ; “संजय पवारच” का ही आहेत 5 कारणं…

अखेर शिवसेनेनं राज्यसभेसाठीच्या सहाव्या जागेचा उमेदवार घोषीत केला. अद्याप पक्षाकडून अधिकृत घोषणा झाली नसली तरी संजय राऊत यांनी संजय पवारांची उमेदवारी घोषीत केल्यामुळे आत्ता शिवसेनेचा सहावा उमेदवार संजय पवारच असतील यावर शिक्कामोर्तब झाले आहे. 

एकेकाळच्या नगरसेवक असणाऱ्या व्यक्तीला थेट राज्यसभेच्या खासदारकीसाठी मैदानात उतरवल्याने राजकीय विश्लेषकांकडून देखील आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

कोण आहेत संजय पवार 

संजय पवार हे १९९०, १९९६ आणि २००५ या साली कोल्हापूर महानगरपालिकेत नगरसेवक झाले. सामान्य घरातून आलेला शिवसैनिक म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात त्यांची ओळख आहे. तालुका प्रमुख ते जिल्हाप्रमुख असा त्यांचा चढता क्रम राहिलेला आहे. २००८ पासून ते कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख आहेत. सोबतच २०१८ ते २०२० च्या काळखंडात त्यांच्याकडे अण्णासाहेब विकास महामंडळाचे उपाध्यक्ष पद देखील देण्यात आले होते. 

थोडक्यात काय तर राज्यसभेचा उमेदवार म्हणून नेहमीच बड्या नावांची चर्चा असते. अस असताना अत्यंत सामान्य घरातून आलेल्या व्यक्तीला शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. त्यामुळेच यामागे अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. 

यातीलच प्रमुख पाच कारणं… 

 

1) संभाजीराजेंनी केलेला डॅमेज कंट्रोल करणं.. 

वास्तविक संभाजीराजेंना शिवसेनेनं उमेदवारी द्यावी हा प्रश्नच उद्भवत नव्हता. संभाजीराजेंची राज्यसभेची पहिली टर्म संपल्यानंतर दूसरी टर्म त्यांना भाजपकडूनच मिळणे अपेक्षित होते. 

मात्र अपक्ष उभा राहणार व यासाठी महाविकास आघाडी पाठींबा देईल अशी अपेक्षा व्यक्त करून संभाजीराजेंनी “शिवसेनेला” आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. त्यातूनच मराठा व्यक्तीला खास करून मराठा समाजाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला शिवसेना मदत करत नाही असा मॅसेज लोकांमध्ये जावू लागला. अशा वेळी मराठाच उमेदवार त्यातही सरंजामी पार्श्वभूमी नसलेला उमेदवार शोधणं शिवसेनेला गरजेचं वाटू लागलं. 

कोल्हापूरचे संजय पवार या निकषावर एकदम फिट बसत होते. मराठा, कोल्हापूर पार्श्वभूमी व सर्वसामान्य मराठा हा निकष ठरल्याने संभाजीराजेंनी केलेला डॅमेज भरून काढता येणं शक्य होणार आहे. 

2) शिवसेनेतील प्रस्थापित नेत्यांना मॅसेज देणं.. 

महाविकास आघाडीची स्थापना झाल्यानंतर चंद्रकांत खैरे असोत की अनंत गिते असतो, शिवाजीराव आढळराव असोत की विजय शिवतारे असोत. या सर्व सेनेतील प्रस्थापित नेतेमंडळीची अडचण झाली आहे. यातील अनेक नेत्यांनी महाविकास आघाडीचे मार्गदर्शक असणाऱ्या शरद पवारांवर टिका देखील केलेली आहे. 

अशा वेळी या नेत्यांच्या पुर्नवसनाचा प्रश्नच उद्भवणार नाही हा मॅसेज उद्धव ठाकरेंनी संजय पवार यांना उमेदवारी देवून दिला आहे. नेतेमंडळींना कार्यकर्त्यांचा सक्षम पर्याय उभारता येवू शकतो व त्यातून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करता येवू शकतो हे या उमेदवारीमुळे सिद्ध होत आहे. 

3) पश्चिम महाराष्ट्र व कोल्हापूर व कर्नाटकचं राजकारण

पश्चिम महाराष्ट्रातून शिवसेनेकडे ठाम अस नेतृत्त्व नाही. 2014 साली कोल्हापूर जिल्ह्यातून शिवसेनेचे 6 आमदार निवडून आले होते. मात्र 2019 च्या निवडणूकीत यांची संख्या 1 वर गेली. अशा वेळी कोल्हापूरात विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातून मराठा नेतृत्व उभा करण्यावर सेनेचा भर राहणार आहे. 

दूसरीकडे पुढील वर्षी कर्नाटकच्या निवडणूका आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा मराठी एकिकरण समितीचं राजकारण चर्चेत येणार आहे. बेळगावच्या प्रश्नावर बाजू घेणारा व कर्नाटक व सत्ताधारी असणाऱ्या भाजपला विरोध करणारं नेतृत्व सेनेला आवश्यक होतं. संजय पवारांना ताकद देवून शिवसेना ती गोष्ट देखील साध्य करणार आहे. 

4) क्रॉस वोटिंग टाळण्याचा प्रयत्न

पक्ष कोणताही असो राज्याच्या राजकारणात “मराठा” हा फॅक्टर सदैव कार्यरत असतो. मनोहर जोशींना काढून राणेंना मुख्यमंत्रीपद देण्यामागे देखील सुद्धा हाच मराठा फॅक्टर कारणीभूत असल्याचं सांगितलं जातं. अशा वेळी मराठा फॅक्टर वरून शिवसेनेची मतं “संभाजीराजेंना” पडण्याचे चान्स अधिक होते. 

ही गोष्ट टाळण्यासाठी भावनिकतेला उत्तर म्हणून सर्वसामान्य मराठा शिवसैनिक ही गोष्ट शिवसेना प्रकर्षाने प्रचारात आणण्याची शक्यता आहे. भावनिकतेचा सामना करण्यासाठीच संजय पवार यांना तिकीट देण्याची खेळी शिवसेनेनं केली आहे. 

5) “जुनी शिवसेना नवी शिवसेना” हे डॅमेज कंट्रोल करणं.. 

महाविकास आघाडीची स्थापना झाल्यापासून शिवसेनेवर बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही अशी सातत्याने टिका केली जात आहे. नुकतीच शिवसेनेमार्फत प्रियंका चतुर्वेदी यांची निवड करण्यात आली होती. अशा वेळी जुन्या कार्यकर्त्यांमार्फत बाळासाहेब सर्वसामान्य शिवसैनिकांना कशाप्रकारे मोठ्ठी पदे देत असत याची तुलना होत होती.

ही तुलना टाळून शिवसैनिकांना परत ॲक्टिव्हेट करणं, कार्यकर्त्यांना पुन्हा चार्ज करणं व सोबतच शिवसेना आजही सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विचार करते हे लोकांना बिंबवण यासाठी संजय पवार यांची उमेदवारी महत्वाची ठरणार असल्याचं दिसून येत.. 

थोडक्यात शिवसेनेमार्फत संजय पवार यांना उमेदवारी देवून एका उमेदवारीत अनेक गोष्टी साफ करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला अजून कोणती कारणं यामागे आहेत अस वाटतं. कमेंट करुन नक्की सांगा. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.