फक्त सध्याच्या बंदीची मागणी नाही तर बजरंग दलाला इतिहासही मोठाय…

येत्या १० मे ला होणाऱ्या कर्नाटक निवडणुकीच्या प्रचाराने आता जोर धरलेला आहे. भाजप-काँग्रेस दोघंही एकमेकांवर जबरदस्त आरोप करत आहेत. सध्या आरोप प्रत्यारोपाचं कारण ठरतंय बजरंग दल. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात बजरंग दलावर बंदी घालण्याचे आश्वासन दिले आहे. तर भाजपने मात्र याला कडाडून विरोध केला आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुद्याला हात घातला आहे.

काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा आधार घेऊन, काँग्रेस पक्ष बजरंग दलावर बंदी घालतोय म्हणजे भगवान हनुमानाला बंदी करण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप मोदींनी केला. त्याचबरोबर

“काँग्रेसने या अगोदर प्रभू रामांना बंद केले होते. त्यानंतर आता त्यांनी ‘बजरंग बली की जय’ म्हणणाऱ्यांना तुरुंगात टाकण्याची शपथ घेतली आहे”

असेही मोदी पुढे म्हणाले.

त्यामुळे बजरंग दल पुन्हा चर्चेत आला आहे. याआधी व्हॅलेन्टाईन्स डे, गोरक्षा आणि इतर कारणांमुळे बजरंग दल चर्चेत असायचा. त्यामुळे या बजरंग दलाचा इतिहास काय आहे तेच पाहूया.

तर बजरंग दलाच्या स्थापनेलाही वादाची किनार आहे….

बजरंग दलाची स्थापना झाली, ती रामजन्मभूमीवरुन झालेल्या वादादरम्यान. ऑक्टोबर १९८४ मध्ये विश्व हिंदू परिषदेनं अयोध्येतून ‘श्रीराम जानकी रथयात्रा’ काढली होती. त्यावेळी तत्कालीन सरकारनं या यात्रेस सुरक्षा न दिल्यानं विश्व हिंदू परिषदेनं तिथं उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना यात्रेचं रक्षण करण्याचं आवाहन केलं. त्या कार्यकर्त्यांमधूनच बजरंग दलाची स्थापना झाली. अयोध्येतून सुरू झालेल्या यात्रेमुळं पुढं जोरदार राजकारण तापलं होतं.

पुढं बाबरी मशिद पाडण्यात आली, तेव्हाही बजरंग दलाचा सक्रिय सहभाग होता. १९९३ मध्ये बजरंग दलाला संघटनात्मक रुप देण्यात आलं. देशातल्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये बजरंग दलाच्या शाखा उघडण्यात आल्या. विशेषत: २०१० नंतर बजरंग दलाचं प्राबल्य आणखी वाढायला सुरुवात झाली. सध्या मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या संख्येनं बजरंग दलाचे कार्यकर्ते आहेत.

सुरवातीला गणवेश नसल्यामुळे बजरंग दलाच्या सदस्य एकमेकांना फक्त एका चिन्हाने ओळखायचे ते म्हणजे भगव्या रंगाचा फेटा ज्यावर त्यांनी “राम” हा शब्द लिहिला होता. १९९३ मध्ये संघ परिवाराने बजरंग दलाला थोडी शिस्त लावण्याचे ठरवले आणि त्यांना एक गणवेश ज्यामध्ये निळा चड्डी, पांढरा शर्ट आणि भगवा स्कार्फ याचा समावेश होता आणि एक प्रशिक्षणासाठी हँडबुक देण्यात आले होते. मात्र त्यानंतरही बजरंग दलाचे कार्यकर्ते केवळ भगवा स्कार्फ घातलेलेच दिसतात.

बजरंग दल नेमकं काय काम करतं?

तर विश्व हिंदू परिषदेची युथ विंग अशी ओळख असलेल्या बजरंग दलाच्या कामाबाबत त्यांच्या वेबसाईटवर लिहिण्यात आलंय, की आपत्कालीन घटनांवेळी नागरिकांची मदत करणं, रक्तदान, वृक्षारोपण, आरोग्य शिबीर असे विधायक उपक्रम राबवण्याचं काम बजरंग दल करतं. हिंदू मंदिरं आणि हिंदू धर्मियांच्या रक्षणासाठी बजरंग दलाचे कार्यकर्ते तत्पर असतील, असंही विश्व हिंदू परिषदेच्या संकेतस्थळावर नमूद करण्यात आलंय.

बजरंग दलामध्ये संयोजक नेमून दिलेले असतात, त्या त्या विभागाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात येते. ते हनुमानाचा जन्मदिवस ‘बल-उपासना दिवस’ म्हणून साजरा करतात. बजरंग दलाचे कार्यकर्ते ‘बल उपासना केंद्र’ याच्या अंतर्गत व्यायाम आणि इतर ड्रिल्स करतात. सोबतच दर आठवड्याला त्यांचा संस्कार दिवस असतो, ज्यात ते मंदिरात एकत्र येऊन हनुमान चालीसा वाचतात.

प्रत्येक विभागात सहा ते सात जणांवर जबाबदारी दिलेली असते, ज्यात चालीसा प्रमुख, आखाडा प्रमुख, सुरक्षा प्रमुख आणि प्रशिक्षण प्रमुख असतात. चालीसा प्रमुखाला संस्कार दिवसाला हनुमान चालीसा पठण होतंय ना हे पाहावं लागतं, आखाडा प्रमुख व्यायामाकडे लक्ष देतो, सुरक्षा प्रमुख बजरंग दल आंदोलन वगेरे करणार असेल, तर त्याची माहिती राज्य आणि केंद्र विभागाला देतो. प्रशिक्षण प्रमुखाकडे कार्यकर्त्यांच्या वर्षभराच्या प्रशिक्षणाची जबाबदारी असते. सध्या त्यांच्या पक्षाचे सुमारे २७ लाख सदस्य असल्याचा बजरंग दलाचा दावा आहे. बजरंग दलाच्या म्हणण्यानुसार, देशभरात सुमारे २५०० आखाडे कार्यरत आहेत.

व्हॅलेंटाईन डेला बजरंग दलाचा कायम विरोध राहिला आहे.

व्हॅलेंटाईन डे साजरा करणाऱ्यांविरोधात त्यांनी अनेकदा आंदोलन केलंय. त्यामुळं ते चर्चेत असतात. २०१५ पासून, बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेवर गोरक्षणवादाला प्रोत्साहन आणि त्यात सहभागी झाल्याचा आरोप झाला होता.

धार्मिक स्थळांचे नूतनीकरण करणे, गोसंरक्षण, हुंडाबळी, अस्पृश्यता इत्यादी सामाजिक दुष्कृत्ये यांच्या विरोधात आणि हिंदू परंपरा आणि श्रद्धा इत्यादींच्या अपमानाच्या विरोधात निषेध; टीव्हीवरील जाहिरातींवर आणि सौंदर्य स्पर्धांद्वारे दाखवल्या जाणार्‍या अश्लीलता आणि अश्लीलतेविरुद्ध निषेध; बेकायदेशीर घुसखोरीला विरोध, अशी कामे बजरंग दलकडून केली जातात असं त्यांचं म्हणणं आहे

आत्मरक्षा कॅम्पही सापडलेला वादात…

मे २०१६ मध्ये, बजरंग दलानं आपल्या कार्यकर्त्यांसाठी अयोध्येमध्ये ‘आत्मरक्षा कॅम्प’चं आयोजन केलं होतं. यामध्ये कार्यकर्त्यांना स्व-संरक्षणाचं प्रशिक्षण देण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं. मात्र या कॅम्पमधले काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यात काही कार्यकर्त्यांनी मुस्लिम समुदायात घालतात, तशा टोप्या घातल्या होत्या, तर कार्यकर्त्यांचा दुसरा गट त्यांच्यावर हल्ला करत होता. या व्हिडीओमुळं देशातलं राजकीय वातावरण पेटलेलं आणि त्यावरुन बजरंग दलावर गुन्हाही दाखल झाला होता.

बजरंग दलावर या आधी कधी बंदी घालण्यात आली होती?

होय, बाबरी मशीद पाडल्यानंतर नरसिंहराव सरकारने ही बंदी घातली होती. मात्र, वर्षभरानंतर ही बंदी मागे घेण्यात आली. तसेच २०१३ मध्ये बसपा नेत्या मायावती आणि २००८मध्ये लोक जनशक्ती पक्षाचे दिवंगत नेते रामविलास पासवान यांनी बंदी घालण्याची मागणी केली होती. २००२ मध्ये, तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी २००८ मध्ये बजरंग दलाला आवाज दाबण्याचे प्रयत्न केले असंही बोललं जातं. आतासारखेच २००८ मध्येही काँग्रेसनेही बजरंग दलावर बंदी घालण्याची मागणी केली होती.

आता कर्नाटकमधल्या वादात बजरंग दल काय भूमिका घेणार आणि त्यामुळं राज्यातलं आणि पर्यायानं देशातल्या वातावरणावर काय परिणाम होणार हे पाहावं लागेल.

हे ही वाच भिडू :

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.