फक्त जगदंबा तलवार आणि वाघनख्याच नाही तर, भारताची ही मौल्यवान संपत्ती अजूनही परदेशात आहे

२०२४ मध्ये शिवराज्याभिषेकाला साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहेत. त्यापार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून एक आराखडा तयार करण्यात येत आहे. या सर्व कार्यक्रमात ब्रिटनकडून ‘जगदंबा तलवार’ मिळवण्याचा राज्य सरकारच्या वतीने प्रयत्न करण्यात येतोय.

शिवाजी महाराज यांची जगदंबा तलवार भारतात आणली जाणार अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलीय. माजी मुख्यमंत्री ए.आर अंतुले यांच्या कार्यकाळातही ही तलवार परत आणण्याची प्रयत्न झाले होते. आता यामध्ये शिवाजी महाराजांच्या वाघनख्यांची देखील भर पडली आहे. 

मात्र जगदंबा तलवार आणि वाघनख्याचच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्मिळ चित्रे आणि इतर ऐतिहासिक मौल्यवान संपत्ती अजूनही परदेशात आहे..

ही संपत्ती भारतात परत आणण्याचे अनेकदा प्रयत्न झालेत.

जगदंबा तलवार –  

छत्रपती शिवाजी महाराजांची महत्वाची म्हणजे जगदंबा तलवार. सध्या हि तलवार लंडनच्या ‘रॉयल कलेक्शन’ मध्ये आहे. लंडन मधील Marlborough House मध्यल्या इंडिया हॉल मधील Case of Arms मध्ये ठेवण्यात आलेली आहे. या म्यूजियम मध्ये तलवारीचा क्र. २०१ असून कॅटलॉगमध्ये ‘शिवाजी महाराजांची तलवार’ अशी नोंद या तलवारीची आढळते.  

तसेच, कोल्हापूरच्या शस्त्रागारात असलेल्या कागदपत्रामध्ये या तलवारीविषयी  बराच तपशील आहे. आणि या कागदपत्राचा उल्लेख कोडोलीकर यांच्या ‘शिवाजीच्या तलवारीची गोष्ट’ या पुस्तकात आढळतो. जगदंबा लंडनला गेली कशी? ऑक्टोबर १८५७ मध्ये प्रिन्स ऑफ वेल्स एडवर्ड सातवा भारतभेटीवर आला तेंव्हा, त्याला भारतातील राजेरजवाड्यांनी अत्यंत मौल्यवान वस्तू भेटस्वरूपात दिल्या. कोल्हापूरच्या गादीवर तेव्हा ‘छत्रपती शिवाजी महाराज चौथे’ विराजमान होते. 

इतिहासकार इंद्रजित सावंत यांच्या ‘शोध भवानी तलवारीचा’ यातही जगदंबा तलवारीचा उल्लेख आहे. आता ही तलवार भारतात परत आणायचे प्रयत्न महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले’ यांच्या कार्यकाळात झालेले मात्र दुर्दैवाने ही तलवार आजवर भारतात येऊ शकली नाही. 

जगदंबा तलवार इंग्लडच्या राणीच्या बकिंगहॅम पॅलेस इस्टेटमध्ये पर्सनल कलेक्शनमध्ये आहे. त्यामुळे इतर संग्रहालयांना लागू होणारे नियम इथं लागू होत नाहीत त्यामुळे जगदंबा तलवार भारतात आणणं अवघड असल्याचं म्हणलं जातंय.

शिवाजी महाराजांची मूळ चित्रे

सतराव्या शतकातील छत्रपती शिवाजी महाराजांची तीन दुर्मिळ चित्रे पुण्यातील इतिहास अभ्यासक प्रसाद तारे यांनी शोधलीत. हि तिन्ही दुर्मिळ चित्र जर्मनी येथील स्टेट आर्ट वस्तुसंग्रहालय, पॅरिस येथील एक खासगी वस्तुसंग्रहालय आणि अमेरिकेतल्या फिलाडेल्फिया संग्रहालयात असल्याची माहिती सांगितलं जात. 

ही चित्रं दख्खनी गोवळकोंडा चित्रशैलीत काढलेली असल्यामुळे शिवाजी महाराज गोवळकोंड्याला गेले होते तेंव्हा गोवळकोंड्याच्या कुतुबशाहच्या दरबारातील चित्रकाराने महाराजांचे चित्र काढले असावे असं इतिहासकारांचं म्हणणं आहे. त्यानंतर महाराजांच्या चित्रांच्या प्रती ईस्ट इंडिया कंपनी, डच इंडिया कंपनी, पोर्तुगाल इंडिया कंपन्यांच्या व्यापाऱ्यांनी बनवल्या. 

इतिहासकार वासुदेव सीताराम बेंद्रे यांनी १९३३ साली छत्रपती शिवाजी महाराज यांचे डच चित्रकाराने रेखाटलेले चित्र जगासमोर आणले होते. 

 वाघनखे 

 छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध करताना वापरलेली वाघनखे इग्लडंच्या व्हिक्टोरिया म्यूजियममध्ये असल्याचं सांगितलं जातं. बाबासाहेब पुरंदरे जेंव्हा भवानी तलवार बघायला लंडनला गेले होते तेंव्हा त्यांना तिथे वाघनखं देखील बघायला मिळाली. त्यांच्या म्हणण्यानुसार लंडनला शिवाजी महाराजांची २ वाघनख आहेत. 

तर इंद्रजित सावंत यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलंय की, ही  वाघनखं महाराजांची नसावीत. तर मराठ्यांचा आद्द्य इतिहासकार मानला जातो त्या ग्रॅण्डफने जो साताऱ्यात राहून मराठ्यांचा इतिहास लिहीत होता त्याच्या नोंदीनुसार, छत्रपतींनी त्यांना वाघनखे भेट म्हणून दिली होती. ग्रॅण्डफचा जो नातू होता त्याचंही नाव ग्रॅण्डफ होतं त्याने ही वाघनखं लंडनच्या अल्बर्ट म्यूजियमला गिफ्ट दिली. 

त्या वाघनखांचा बॉक्सवर “ही वाघनखं अफजल खान नावाच्या सरदाराला मारण्यासाठी शिवाजी महाराजांनी वापरलेली होती” असा उल्लेल्ख आढळतो. मात्र ही वाघनखं शिवाजी महाराजांचे च असावेत का यावर इतिहासकारांचे मत-मतांतरं आहेत.  

 टीपू सुल्तानची तलवार 

याशिवाय आणखी काही गोष्टी परकीयांच्या ताब्यात आहेत, त्यातील एक म्हणजे टीपू सुल्तानची तलवार. श्रीरंगपट्‌टनमच्या युद्धात टीपू सुल्तानचे निधन झालेलं. त्यानंतर ब्रिटनच्या सैन्याने टीपू सुल्तानची तलवार आणि अंगठी आपल्या ताब्यात घेतली होती.

भारत सरकारला याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी ही तलवार भारतात परत आणण्यासाठी बरेच प्रयत्न केले, परंतु यश आले नाही. काही वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये टिपू सुलतानच्या मौल्यवान तलवारीसह त्याच्या इतर ८ दुर्मिळ शस्त्रांचाही लिलाव करण्यात आला होता. यादरम्यान विजय मल्ल्याने सर्वात मोठी बोली लावून टिपू सुलतानची ही तलवार खरेदी केली होती.

कोहिनुर हिरा 

जगातील सर्वात मोठा हिरा म्हणून प्रसिद्ध आहे तो म्हणजे ‘कोहिनूर हिरा. १४व्या शतकात हा हिरा भारतात सापडला आणि १८४९ पर्यंत अनेक जणांच्या हातात हा हिरा पडला होता. १८४९ मध्ये ब्रिटीशांनी पंजाबचा ताबा घेतल्यानंतर हा हिरा राणी व्हिक्टोरियाला देण्यात आला. तेव्हापासून हा हिरा ब्रिटिश क्राउन ज्वेल्सचा एक भाग आहे.

आज कोहिनूर हिरा भारतात परत आणण्‍याच्या मुद्द्यावरून भारतात वारंवार मागणी होत असते. केंद्र सरकारने कोहिनूर हिरा मायदेशात परत आणण्यासाठी आपापल्या पद्धतीने प्रयत्न केले आहेत. मात्र अद्याप यश आलेले नाही. पण कोहिनूरवर फक्त भारतानेच नाहीतर पाकिस्तान, अफगाणिस्तान व इराणने दावा केला आहे त्यामुळे ऐतिहासिक मालकी विवादाचा विषय कधी सुटेल ते सांगता यायचं नाही. 

 १५०० वर्षे पुरातन बुद्ध मूर्ती 

 १८६१ मध्ये बिहार ते भागलपूर जिल्ह्यात सुल्तानगंज भागात रेल्वे रुळ टाकताना एका ब्रिटिश अधिकार्‍याला ही ५०० किलोची बुद्ध मूर्ति सापडली होती. त्यानंतर ब्रिटिशांनी ती ताब्यात घेतली आणि बर्मिंघहॅमधील एका म्युझियममध्ये ठेवण्यात आली आहे. पितळ धातूची ही मूर्ती जवळपास १५०० वर्ष पुरातन असल्याचं इतिहासकारांचं म्हणणं आहे. 

रिजेंट हिरा 

मद्रासचे गव्हर्नर थॉमस पिट यांनी एका व्यापार्‍याकडून हा हीरा घेतला होता. त्यानंतर त्यांनी तो फ्रान्सला पाठवला. त्यानंतर १७१७ मध्ये फ्रान्सचे १४ वे सम्राट लुई यांनी ऑर्लिंनमध्ये फ्रान्सचे प्रतिनिधि ड्यूक फिलिप (द्वितीय) यांच्याकडून खरेदी केला आणि लुई यांनी १७२२ मध्ये हा हीरा आपल्या मुकुटात मढवला होता.

दरिया-ए-नूर हिरा

कोल्लूर खाणीतून सापडलेला हा हिरा १८२ कॅरेटचा आहे. नादिर शाह यांनी कोहिनूरसह दरिया-ए-नूर हिरा दिल्लीतून इराणला नेला होता. महाराज रणजीत सिंहने इराणहून अफगाणिस्तानात जाताना तो मिळवला. पण नंतर तो ब्रिटिशांच्या हाती लागला. गुलाबी रंगाचे हिरे आधीच महाग असतात त्यात हा हिरा अतिशय पुरातन असल्याचं सांगण्यात येतं.

हा हिरा शोधण्याचे श्रेय मुघल सम्राटांना जाते.  आटा हा हिरा नेमका कुणाकडे आहे याबाबत दाव्यानिशी कुणी सांगू शकत नाहीये. पण काही संदर्भ सांगतात कि, हा हिरा सध्या तेहरानमध्ये आहे जिथे तो इराणच्या सेंट्रल बँकमध्ये इराणी क्राऊन ज्वेल्सच्या संग्रहात जतन केलेला आहे.

ओर्लोव्ह हिरा

ओर्लोव्ह हीरा दुसर्‍या शतकात तमिळनाडुच्या श्रीरंगपट्टममध्ये कावेरी नदीच्या काठावरील श्री रंगनाथस्वामी मंदिरात भगवान विष्णुच्या मूर्तीच्या डोळ्यामध्ये होता. पण एका फ्रान्सच्या  जवानाने हा हीरा मूर्तीतून काढून नेला होता. अनेक वर्षे त्याने हीरा आपल्याजवळ ठेवला. १७५० च्या दशकात हीरा मद्रासमध्ये आणला गेला आणि तो ब्रिटीश अधिकार्‍याला विकला.

मध्य भारतातील सरस्वतीची मूर्ती 

लंडनच्या म्यूझियममध्ये देवी सरस्वतीची एक मूर्ती आहे. ती मध्यभारतातील भोजशाळे म‍ंदिरातील असल्याची इतिहासात नोंद आढळते. इतिहासकारांच्या मते १८८६ च्या दरम्यान ही सरस्वतीची मूर्ती ब्रिटिशांनी ब्रिटिश म्यूझियमध्ये ठेवली असल्याचं सांगण्यात येतं.

सरस्वतीची मूर्ती, कोहिनुर, शिवाजी महाराजांची मूळ चित्रे त्यांची जगदंबा तलवार, टिपू सुलतानची तलवार अशी भारताची ऐतिहासिक मौल्यवान संपत्ती आजही परकीयांच्या हातात आहे. आजवर अनेकांनी या संपत्ती भारतात आणण्याचे प्रयत्न केलेत मात्र दुर्दैवाने ते सफल झाले नाहीत. 

 हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.